वात्सल्य भाग 4

आईचं प्रेम अतुलनीय असते मग ती कुणीही असो
वात्सल्य भाग 4
विषय कौटुंबिक कथा
राज्यस्तरीय कथामालिका करंडक
सौ वृषाली प्रकाश खटे

पूर्वार्ध
किंजलच्या घरासमोर सापडलेल्या मुलीला सासूबाई दत्तक घेऊ इच्छितात.प्रसाद व किंजल यांना विचार करून त्यांनाच निर्णय घ्यायला सांगतात. आता पुढे…..



प्रसाद आणि किंजल दोघेही वैयक्तिक विचार करतात. एकमेकांसोबत बोलून विचार करतात त्यानंतर बाळाला स्वीकारायचं आहे हा निर्णय घेतात. त्यानंतर कायदेशीर पूर्ण प्रक्रिया पार पाडून जवळपास दोन महिन्यानंतर त्या बाळाला घरी आणले जाते. घरी आणून त्या बाळाचे नामकरण केले जाते त्या बाळाचे नाव \"भक्ती\" असे ठेवले जाते.


शिशुगृहातून घरी येताना शिशुगृहाच्या अधीक्षिका मॅडम त्या बाळासोबत असलेली ती गोधडी पण किंजल आणि सासूबाईंच्या हवाली करतात. ती गोधडी पाहून किंजल थोडीशी गोंधळून जाते परंतु नव्या बालकाच्या आनंदामध्ये ती त्या गोधडीकडे काळजीपूर्वक पाहण्याचे विसरून जाते. भक्तीच्या सोबत खेळण्यात आजी आजोबा आणि आई-वडील ह्या दोघांचाही वेळ कसा जातो ते समजत नाही.

भक्ती आता सुखवस्तु घरात आली त्यामुळे आता तिला ह्या गोधडीचे काही काम नाही असे समजून एक दिवस किंजल ती गोधडी बाहेर टाकून देण्यासाठी काढते. ती त्या गोधडीला काळजीपूर्वक पाहायला लागते. त्या गोधडीला भरपूर तुकड्या तुकड्यांनी मिळून शिवलेले होते. वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या तुकड्यांपासून ती गोधडी शिवलेली होती. त्या गोधडीकडे पाहता असतानाच तिला एक तुकडा आकर्षूण घेतो. ती त्या तुकड्याकडे खूप काळजीपूर्वक बघते. त्या तुकड्याला पाहून तिला काहीतरी आठवते. ती एका निष्कर्षाप्रत पोहचते. ह्या गोधडीचा जो तुकडा आहे तो त्याच साडीचा आहे जी साडी तिने माधुरीला दिली होती.
तिला नक्की आठवते की ही तीच साडी आहे . तिच्या मनात एकदम लख्ख विचार येतो की ही साडी मी माधुरीला दिली होती.... म्हणजे ही माधुरीची मुलगी?..... माधुरीने तिचा बाळ आपल्या अंगणात आणून ठेवलं..... तिच्या मनात एक वीज चमकावी तस तिच्या मनात हा विचार चमकून जातो. मग ती आणखी विचार करायला लागते. पण माधुरी असे का करेल? ..... तिच्या मनात विचारांचे काहूर निर्माण होते.... बरेच वेळा भक्तीच्या काळजीपोटी विषय मागे पडतात. ती ह्या विचाराचा छडा लावण्याचा प्रयत्न करते. आता तिला माधुरी एवढ्यात कुठेही दिसलेली नाही.


माधुरी एक दिवस अचानक तिला दुसऱ्या रस्त्यावर दिसते आणि किंजल तिला बघून स्मित करते आणि माधुरीही तिला एक चांगलं स्मित देऊन पुढे निघून जाते. किंजल मात्र तिच्या मागे हळूहळू तिचा पाठलाग करत जाते. किंजल माधुरीचा पाठलाग करत करत माधुरीच्या घरापर्यंत पोहोचते परंतु माधुरीच्या झोपडीत जाण्याची किंजलची हिम्मत होत नाही कारण तिच्या आजूबाजूला बरीच अस्वच्छता, गलीच्छता आणि दारू पिणारी माणसे, बिड्या, सिगरेट धुणकणारी माणसे बसलेली दिसतात. त्यांच्या त्या विचित्र नजरा पाहून किंजल मात्र सरळ घरी निघून येते. परत घरी आल्यावर तोच विचार तिच्या मनात असतो. अचानक दुसऱ्याच दिवशी माधुरी त्यांच्याकडे मनी, पोत , डोरले घेऊन विकायला येते. अगदी हक्काने दाराशी येऊन दार वाजवून आत येते आणि तिची बडबड चालू करते .

माधुरी --" ताई मला त्या कोपऱ्यावरच्या ताईंनी सांगितलं की तुमच्या घरी बाळ जन्माला आलाय म्हणून मी त्याच्यासाठी ही तीट आणली. काळ्या मण्याची माळ घेऊन आली.... हा दृष्ट न लागणारा मणी पण छान आहे. तुमच्या बाळासाठी घ्या की...”


सासुबाई-- " अगं हो घेते.... बाळासाठी घेते ....सांग तुझ्याकडे काय काय आहे .... “
असे म्हणून सासूबाई वेगवेगळ्या वस्तू पाहायला लागतात. परंतु किंजलच्या मनात मात्र वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. ही आज कशी काय आली? आणि तिला बाळ जन्माचं कुणी सांगितलं असेल? आणि आज बरे हिने सगळं बाळाचं साहित्य आणलं? हे सगळे योगायोग ....की काहीतरी ठरवून माधुरी आली आहे . असे प्रश्न किंजलच्या मनात निर्माण होतात. ती त्यावेळी चेहऱ्यावर कुठलाही भाव दाखवत नाही . माधुरीशी बोलण्याचा प्रयत्न करते.


किंजल--" काय ग माधुरी.... तुला यावेळी काय झालं.... मुलगा की मुलगी आणि कधी झालं. "

माधुरी -- "अहो मी म्हटलं नव्हतं का तुम्हाला ? मला मुलगाच हवा तसा मला सहावा मुलगा झाला. आणि मला तो खूप लवकरच झाला सातव्या महिन्याला संपायला आला आणि मला मुलगा झाला. आता माझा मुलगा चांगला पाच महिन्याचा झाला बघा. त्यामुळेच तर मी आता बाहेर निघु शकते"



किंजल--" त्याला कुणाकडे ठेवून आलीस आज"



माधुरी --" आमच्या त्या झोपडी मध्ये बऱ्याच बाया घरी राहतात की . त्यांच्याकडे ठेवला आणि तशी माझी सासू आहे माझ्या घरी. ती सांभाळते की पोराला... “

किंजलच्या मनात परत प्रश्नांचा डोंगर उभा झाला…. हिला मुलगा झाला म्हणते.... आणि मुलगा पाच महिन्याचा आहे म्हणते .....आणि आपली भक्ती तर तीनच महिन्यांची आहे ....मग भक्ती हिची मुलगी नाही ?....दुसरच कोणीतरी आपल्या दाराशी बाळ आणून ठेवलाय की ही प्रयत्नपूर्वक खोटी बोलते ?...मला याचा शोध नक्कीच लावावा लागेल...


माधुरी --" तुमच्या घरी काय आहे मुलगा की मुलगी?... आणि मला दाखवत पण नाही तुमचं बाळ? कसा आहे बघू तर द्या की मला."



किंजलच्या मनात प्रश्नांची धार अजून तेज झाली .

किंजल-- "नाही ग माझी भक्ती झोपली. आता तिला उठून आणता येणार नाही .


किंजल ने बाळ झोपला आहे असं म्हटल्याबरोबर माधुरीचा चेहरा खाडकन उतरला. तरी तिने तो चेहरा सावरण्याचा प्रयत्न केला. आणि लगेचच सासूबाईंना जेवणासाठी काहीतरी मागायला लागली. सासूबाईंनी तिला आनंदाने भाजी पोळी जेवायला दिली. जेवून माधुरी जवळपास अर्धा तास तिथेच थांबली. तेवढ्या वेळात भक्तीचा रडण्याचा आवाज आला. भक्तीचा रडण्याचा आवाज ऐकून माधुरीच्या चेहऱ्यावर एक हास्य दिसलं. तिचं ते हास्य किंजलने अचूक टिपलं . तिच्या मनात शंकेची पाल अजून चुकचुकली. तिच्या मनात काहीतरी वेगळंच निर्माण झालं. परंतु त्यावेळी ते प्रगट न करता तिने भक्तीला बाहेर आणलं आणि भक्तीला घेऊन जोजवू लागली.


माधुरी बाळाला पाहून धन्य झाल्यासारखे वाटत होती. बाळाच्या अंगावरील भारीचे कपडे, भक्तीच्या गळ्यात व कानात घातलेले सोन्याचे दागिने आणि तिचा होत असलेला लाड , कौतुक बघून ती भरभरून पावल्यासारखी झाली. डोळ्यात तिच्या कुठेतरी एखादा अश्रू असल्यासारखे किंजलला दिसले. तिने ते लपवत बाळाला दुरूनच आशीर्वाद देत दारातून निघून गेली .


किंजलच्या मनामध्ये प्रश्नांना उत्तर नव्हती. त्यामुळे किंजल ने आणखी एकदा माधुरीच्या घरापर्यंत जायचा निर्णय घेतला.त्यानुसार ती माधुरीच्या दारापर्यंत पोहोचली . माधुरीला दुरूनच शोधायला लागली. अशावेळी एक वयस्क स्त्री आणि माधुरी एका झोपडीतून दुसऱ्या झोपडीत जाताना तिला दिसली. त्या झोपडीतून तिने एक बाळ आपल्या कडेवर घेतलेले होते. ती बाळाला थोपटून थोपटून झोपवण्याचा प्रयत्न ती करत होती. परंतु ते बाळ खूप रडत होते. किंजलने ते बाळ बघून तिथून परत निघण्याचा निर्णय घेतला. किंजल घरी आली आणि झालेल्या प्रकार पुन्हा पुन्हा आठवू लागली. तिला तिथे माधुरी दिसली. माधुरीच्या जवळ एक बाळही दिसलं. त्यामुळे तिच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले होते, ते आता कुठेतरी शांत झाले होते. आता किंजलचे समाधान झाले की हे बाळ माधुरीचे नाही. त्यामुळे ती परत आपल्या बाळामध्ये रममान झाली.


काय असेल भक्तीचे सत्य ती मधुरीची मुलगी की दुसऱ्या कुणाची .....बघूया पुढील भागात


सौ.वृषाली प्रकाश खटे

🎭 Series Post

View all