वात्सल्य भाग 3

आईचं प्रेम अतुलनीय असते मग ती कुणीही असो


वात्सल्य भाग 3
विषय -कौटुंबिक कथा
राज्यस्तरीय कथामालिका करंडक
सौ.वृषाली प्रकाश खटे


पूर्वार्ध

यापूर्वी भागात आपण आपण किंजल या प्राध्यापिकेची कथा पाहिली. किंजलला लग्नाला दहा वर्ष झाल्यानंतरही अपत्य प्राप्ती झाली नाही. एक दिवस तिला तिच्या दाराशी एक स्त्री जातीचा भ्रूण गोधडी मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत सापडते. ते बाळ घेऊन कुटुंबासह ती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवते. पोलीस त्यांना ते बाळ 3 तास सांभाळण्यासाठी देतात ….पुढे....


किंजल, प्रसाद, सासूबाई ह्या त्या लहान बाळाला घेऊन घरी येतात त्या बाळाचं हसू बघून सर्व घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. त्याच्यासाठी सासूबाई यांची \"काय करू आणि काय नको\" अशा अवस्था होते. सासुबाई जणू आपल्या हक्काची नात आहे असे समजून किंजल आणि प्रसादला ऑर्डर द्यायला लागतात. किंजल मात्र सुरुवातीला खूप गोंधळून जाते. बाळाला हात लावू की नाही लावू अशी अवस्था तिची होते. तिच्या मनामध्ये बाळाला जवळ घेण्याविषयी खूप ओढ निर्माण होते परंतु ती प्रसादच्या डोळ्यांमध्ये परवानगी साठी बघते. प्रसादलाही त्या बाळाविषयी प्रेम निर्माण होते पण ही क्षणाची माया आहे हे प्रसादच्या पक्के ध्यानी असते. त्यामुळे तो त्या बाळापासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करतो. प्रसादचा होकार मात्र तिला नजरेतून दिसत नाही. ती तिचं अंतकरण थोडं घट्ट करते. त्या बाळाला दुरूनच बघते . अर्धा तास त्या बाळाच्या दूध ,शि सु याच्यामध्ये गेल्यानंतर प्रसादच त्या बाळामध्ये गुंतून पडल्यासारखा वागतो. त्या बाळाच्या आजूबाजूला त्याच्या नजरेशी खेळण्याचा प्रसादला मोह आवरल्या गेला नाही. आणि प्रसाद सर्व बंधने सोडून त्या बाळाला आपल्या मांडीवर घेऊन त्याचा लाड करायला लागतो. त्याची ती मूक संमती बघून किंजलही त्या बाळामध्ये रममान होते. केवळ तीन तासांमध्ये आपल्याला हे बाळ परत करायचं आहे हे सर्व कुटुंब विसरून जाते. बाळ नेण्यासाठी 11 वाजता पोलीस ठाण्यातून आपल्याला फोन येणार हे सगळ्यांना माहीत असते. तेव्हाच फोनची घंटा वाजते. समोरून पोलीस इन्स्पेक्टर आणखी दोन तास वेळ लागू शकतो असे सांगतात. त्यामुळे कुटुंबाला आणखीनच आनंद होतो . शेवटी दोन तासानंतर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी येऊन त्या बाळाला शिशुगृहामध्ये नेण्यासाठी घेऊन जातात. बाळाला पोलिसांच्या हाती सुपूर्द करताना किंजल आणि सासुबाई यांना अश्रू आवरत नाहीत. प्रसादलाही त्याचा चेहरा लपवासा वाटतो. घरात एक भयान शांतता पसरते. केवळ पाच तासाच्या आतच सर्व कुटुंबाला त्या बाळाविषयी जे प्रेम उत्पन्न झालं ते शब्दात वर्णन करणे कठीण आहे. संध्याकाळची वेळ सर्वांना काढणे कठीण होऊन जाते. तो दिवस कसातरी कुटुंबातील व्यक्ती घालवतात. दुसऱ्या दिवशी किंजल आणि प्रसाद दोघेही पोलीस ठाण्यामध्ये जातात. तिथे त्या बाळाची आई मिळाली का? याची चौकशी करतात. पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि इन्स्पेक्टर एवढ्या लवकर ही गोष्ट शक्य नाही असे सांगतात. त्यामुळे किंजल आणि प्रसाद त्या बाळाची चौकशी करतात. बाळाच्या तब्येतीची विचारणा करतात. पोलिसांना त्याविषयी काहीही माहिती नसते. पोलीस त्यांना शिशुगृहाचा पत्ता आणि फोन नंबर देतात. त्याप्रमाणे त्यानंतर प्रसाद आणि किंजल दोघेही बाळाला बघण्यासाठी शिशुगृहात जाण्याचे ठरवितात. तसा किंजल आपल्या सासूबाईंना फोन करते. तेव्हा किंजलच्या सासुबाई शिशुगृहात येण्यासाठी आग्रह धरतात. त्यामुळे प्रसाद किंजल आणि सासूबाई हे तिघेही शिशुगृहात जाण्यासाठी निघतात.


त्यानंतर तिघेही शिशुगृहामध्ये येतात. शिशुगृहाच्या दारावरतीच जी अधिक्षिका असते ती किंजलच्या सासूबाईंना ओळखते. आणि त्यांचा चरण स्पर्श करते .

अधिक्षीका मॅडम -- "मॅडम तुम्ही मला ओळखले नाही का?"

सासुबाई --" नाही ग. कोण तू...?"

अधिक्षीका मॅडम-- "तुम्ही मला शिकवायला होत्या. मी आपल्याच शाळेत शिकायला होती. तुम्ही जरी मला ओळखले नाही तरी मी आपल्याला चांगली ओळखते. तुमच्या आशीर्वादामुळेच मी आज या ठिकाणी आहे . आपले माझ्यावर खूप उपकार आहेत. मला वडील नव्हते त्यामुळे माझी परिस्थिती अत्यंत हलाखिची होती. आपण मला शिक्षणासाठी वेळोवेळी खूप मदत केली. वह्या , पुस्तके पुरविलीत. त्यामुळेच मी आज या पदाला येऊन पोहोचलेली आहे. मी आपले उपकार ह्या जन्मातही कधीही फेडू शकणार नाही. मी आपल्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या शहरांमध्ये आपला मला पत्ता मिळाला नाही. आज तुमचे आशीर्वाद मला मिळाला माझे जीवन सार्थकी लागल्याचे मला वाटते."



सासुबाई-- " शिक्षकाच्या जीवनामध्ये अनेक पिढ्यांचे विद्यार्थी येतात. ती मुलं शिकताना खूप लहान असतात. मोठी झाल्यावर ती आम्हाला ओळखायला येत नाहीत. विद्यार्थी मात्र शिक्षकांना आवर्जून ओळखतात. त्यांचा परिचय देतात आणि त्यांनी जे यश गाठलंय ती माहिती शिक्षकांसोबत सांगतात. त्यावेळी आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो. आज तुला बघूनही मला खूप अभिमान वाटत आहे अशीच जीवनात यशस्वी हो."

अधिक्षीका मॅडम -- " पण आज आपण इकडे कसे येणे केलं मॅडम."


सासुबाई -- " अगं काही नाही ग.... काल आमच्या दारासमोर एका छोट्या मुलीला कोणीतरी आणून ठेवलं. त्याची आम्ही रीतसर पोलीस कम्प्लेंट केली आणि ते बाळ तुमच्या शिशुगृहात ठेवलेला आहे असे आम्हाला पोलिसांनी सांगितलं. त्या बाळाला बघण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहोत. हा माझा मुलगा प्रसाद आणि ही माझी सुनबाई किंजल.".....
सासूबाई दोघांचीही ओळख करून देतात.

अधिक्षीका मॅडम -- " हो सिटी कोतवाली मधले प्रकरण..... त्या प्रकरणातील बाळ काल आमच्याकडे आलेलं आहे. आपण त्या बाळाला नक्की भेटू शकता.... या मॅडम आपण समोरच्या हॉलमध्ये बसावं ...मी त्या बाळाला इथेच आणते. "

हॉलमध्ये तिघेही अतिशय अधीरतेणे बसतात. बाळ कधी येईल आणि त्याला कधी बघतो अशी सर्वांची अवस्था झालेली होती. त्यात सर्वात जास्त अधीर होती किंजल. ती मनात, चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे भाव दिसू देत नव्हती. अधिक्षीका मॅडम बाळ घेऊन येताना दिसल्या तशीच किंजल उठून उभी राहते आणि अधिक्षिका मॅडम बाळ किंजलच्या सुपूर्त करतात. जाताना सांगून जातात

" मॅडम मला थोडं काम आहे ते काम करते. " असे म्हणून त्या निघून जातात.


थोड्या वेळा नंतर सर्व कुटुंब त्या बाळाशी एकरूप आणि तल्लीन होऊन बोलते, खेळते. किंजल आणि प्रसादला बाळाजवळ सोडून सासूबाई अधिक्षीका मॅडमला भेटायला बाहेर जातात. सासूबाई अधिक्षीका मॅडम यांना घरची सर्व परिस्थिती समजून सांगतात.

सासुबाई -- " माझी सून खूप छान आहे. पण देवाची कृपा झाली नाही ग तिच्यावर .... ती दहा वर्षापासून लेकरासाठी आसुसलेली आहे.... देव मात्र तिची काही कूस भरत नाही..... हे बाळ आमच्या घरात आलं आणि जणू उत्साहाची एक लाट आमच्या घरात निर्माण झाली.... ते बाळ काल पोलीस स्टेशनला नेऊन देताना आम्हाला असं वाटलं की जणू आपलंच बाळ आपण नेऊन देत आहे. केवळ पाच तासात ह्या बाळाने खूप माया लावली. एक अनाहूत ओढ या बाळाविषयी आमच्या सर्व कुटुंबामध्ये निर्माण झालेली आहे. मला हे बाळ हवं आहे. आम्ही कुटुंबामध्ये ह्या बाळाचा स्वीकार करायला तयार आहोत ......पण हे शक्य होईल का ?......"


अधीक्षिका मॅडम -- "मॅडम मी आपल्याला याविषयी थोडं मार्गदर्शन करू इच्छिते. बाळ कुणीतरी आपल्या दारासमोर आणून ठेवलं.... त्याची आई शोधणे एवढं लवकर शक्य होत नाही ....त्याच्या आईचा कदाचित शोध लागेलही किंवा लागणारे नाही .....परंतु आपण रजिस्ट्रेशन करून ......एक प्रकारचा कोर्टाची ही प्रक्रिया असते ह्या प्रक्रिये द्वारे रजिस्ट्रेशन करून आपण ह्या बाळाला स्वीकारू शकता. ह्याचं पालकत्व तुम्ही घेऊ शकता. जवळपास एक महिना याच्या आईचा शोध केला जाईल. त्यानंतर मात्र त्याला कायमस्वरूपी या शिशुगृहातच ठेवलं जाईल. मधात कधी आई किंवा वडील यांनी त्याच्यावर हक्क दाखवला तर त्यावेळी कायदेशीर मार्गाने त्यांना ते बालक परत दिलं जाऊ शकतं..... परंतु असं फार कमी वेळा होतं ...ज्यांनी बाळ टाकून दिलेला आहे ती पालक शक्यतोवर परत बालकावर केव्हाही अधिकार दाखवत नाहीत.... त्यामुळे अशा लहान मुलांना शिशुगृहातच राहावं लागतं... आणि नंतरच त्यांना अनाथाश्रमांमध्ये पाठविले जाते.... पण माझ्यामध्ये आपण एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात... आपल्याला यामध्ये पोलीस स्टेशन, शिशुगृह यातील सर्व कर्मचारी सहकार्य करतील. त्यानुसार आपण 15 एक दिवसांमध्ये कायदेशीर बाबी पूर्ण करून ह्या बाळाला नक्कीच स्वीकारू शकता."


सासुबाई -- "खरंच हा बाळ मला मिळू शकेल का ?"

अधिक्षीका मॅडम -- "हो मॅडम थोड्या कायदेशीर कारवाया आहेत त्या पूर्ण केल्यानंतर आपण ह्या बाळाला दत्तक म्हणून घेऊ शकता. काही कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याविषयी मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतच राहील. जवळपास पंधरा दिवसांमध्ये आपल्याला हे बाळ मिळू शकतं. पंधरा दिवस याला शिशुगृहामध्ये ठेवाव लागेल. तेवढ्या वेळात आपली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ह्या बाळाला दत्तक घेऊ शकाल."


थोड्या वेळानंतर किंजल , प्रसाद आणि सासूबाई घरी परत येतात. आज बाळाला भेटण्यासाठी प्रसादने तशी सुट्टीच काढलेली होती त्यामुळे प्रसाद आणि किंजल घरीच आहेत .तेव्हा सासूबाई त्यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवितात.

सासुबाई -- " प्रसाद ....किंजल दोघे या बरे इकडे .....मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.

कींजल-- " बोला आई काय म्हणता."
प्रसादही येऊन बसतो

सासुबाई-- " किंजल मी आजपर्यंत कधीही बाळाच्या विषयावर आपल्या दोघांच्या निर्णयांमध्ये बोलली नाही. परंतु आज मला असं वाटते की आपण दहा वर्षे झाले बाळाची वाट बघतोय, मग आज आपल्या दाराशी देवाच्या कृपेने एक बाळ कुणी आणून दिलं..... कदाचित माझ्या मते..... तो देवच असेल की ज्याने आपली गरज ओळखून आपल्या दाराशी हे बाळ सोडलं.... माझ्यामते आपण ते बाळ दत्तक घ्यायला काय हरकत आहे? ...... मला तुमच्या दोघांचीही मते जाणून घ्यायची आहेत."

किंजल -- ( आनंदाने) " आई तुम्ही माझ्या मनातलं बोललात. मला सुद्धा त्या बाळाला दत्तक घेण्याची खूप इच्छा निर्माण झालेली आहे. परंतु ....मी प्रसाद काय म्हणेल हा विचार करून गप्प बसलेली होती."

प्रसाद -- "आई ते कायदेशीर दृष्ट्या शक्य आहे का ? त्या बाळाचे आई वडील कोणी ना कोणी सापडतील.... ते बाळ आम्हाला आताच लगेच दत्तक द्या असं आपण म्हणू शकत नाही. आपण खूप लवकर हार मानत आहोत असं मला वाटतं. .. लग्नाला केवळ दहाच वर्षे झालेली आहेत. ह्या जगामध्ये लोकांना पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतरही स्वतःचं मूल होतं मग आपण एवढी घाई का करायची?"


सासूबाई-- " आपलं मूल ? .... असं कसं काय म्हणतोस रे तू ? ते देवाच मूल आहे.... देवाने आपल्या दारात आपल्याला दिलेलं फुल आहे ..... मला नाही वाटत की तू आणि किंजल आपलं मूल आणि त्या मुलांमध्ये काही भेदभाव करतील. तुम्हाला मूल झालं तर आम्हाला आनंदच होईल. पण हेही जर आपण स्वीकारलं तर मला त्याहूनही जास्त आनंद होईल . माझ्या संस्काराचे फलित मला त्यात दिसेल ....कारण मी तुम्हावर चांगले संस्कार केलेले आहेत..... कुणावरही दया करावी ....प्रेम करावं हे संस्कार मी तुम्हाला दिलेले आहेत . त्यानुसार ते मुल माझं, तुझं की अनाथ हे विचार करून स्वीकारायचे नाही तर ते एक मुका जीव आपल्या दाराशी आलाय म्हणून आपल्याला स्वीकारायचे आहेत. त्याला तू मनापासून स्वीकारायला तयार असशील तरच हो म्हण . अन्यथा तू नाही म्हटलं तरीही मला दुःख होणार नाही. किंजल आणि प्रसाद तूम्ही दोघेही एक दोन दिवस विचार करा आणि त्यानंतर मला तुमचा विचार सांगा ."

किंजल आणि प्रसाद हे मूल दत्तक घेतील की त्यांना स्वतःच मूल होईल….बघूया पुढील भागात

सौ वृषाली प्रकाश खटे

🎭 Series Post

View all