वात्सल्य भाग 2

आईचं प्रेम अतुलनीय असते मग ती कुणीही असो
वात्सल्य भाग 2
कॅटेगरी --कौटुंबिक कथा

सब कॅटेगरी -- राज्यस्तरीय कथामालिका करंडक

टीम -- अमरावती

©सौ वृषाली प्रकाश खटे



पार्श्वभूमी आपण मागील भागामध्ये किंजल या एका सुशिक्षित प्राध्यापिकेची गोष्ट वाचली ज्यामध्ये तिला दहा वर्ष होऊनही अपत्य झालेले नाही... काल किंजल ने तिच्या घरासमोर एक दगडपाटे विकणारी महिला बघितली ती महिला गरोदर होती तिला बघून किंजलचा आसवांचा बांध सुटलेला होता आता पुढे...


गेल्या वर्षीपासून थोडं हलकं वाटते पण अधूनमधून अस काही घडलं की डोळ्याच्या कडा ह्या पानवतातच .

दुसरे दिवशी किंजल सगळं विसरून नियमित कामामध्ये गुंतून जाते . दोन महिन्यानंतर एके दिवशी तीच महिला कींजलच्या घरासमोर पुन्हा बसून राहते. ती किंजलची वाट पाहत असते.

तीच वेळ... किंजल गाडी घेऊन कॉलेज मधून घरी परत येते. ती आपली गाडी लावत असते तेव्हाच ती महिला किंजलला आवाज देऊन बोलते.

महिला -- "ओ ताई अंगावर ओढायला काही देता का ?...एखादी शाल देता का ? थंडी पडायला लागली."

किंजलतिला रोखून बघते . ती महिला लवकर ओळखू येत नाही पण काळजी पूर्वक पाहिल्यावर ओळख पटते.

किंजल-- "तू तीच ना ग जी या अगोदर पण दाराशी येऊन जाते, पाटे खलबत्ते विकत असायची"

महिला-- "व्हय ताई मी आधी पण तुमच्या घरी आली होती".

किंजल--"थांब ....इथे बैस मी आणते तुझ्यासाठी एखादी शाल"

किंजल घरातून एक शाल व एक साडी घेऊन येते.आणि तिला देते.

किंजल -- "बघ ही एक चांगली आणि नरम साडी आहे तुला तुझ्या बाळांतपणात कामात येईल... असू दे तुला...."

महिला-- "लई उपकार झाले बघा तुमचे ताई"

किंजल--"नाव काय ग तुझं?"

महिला -- " माझं नाव माधुरी"

किंजल -- "अहा...किती छान नाव आहे तुझं. माधुरी ....दीक्षित का ग" (हसत)

माधुरी ---- "दीक्षित कशाची हो ताई .....माझं तर ...नाव गंगुबाई हाती कथलाचा वाळा सारखे झाले आहे .....राहायला घर नाही, नेसायला अंगभर कपडा नाही ..... चेहऱ्यावर नूर नाही आणि ओठी हसू नाही..... तरी कशाची मग माधुरी दीक्षित...."


किंजल -- "जाऊ दे ग बाई ....मी तुला सहज गमतीने बोलली .....बरं मग या वेळी काय हवंय तुला मुलगा की मुलगी ?"

माधुरी -- "मुलगा च बरा बाई"

किंजल (अवाक )-- "काय ग बाई तुला आधीचे 5 मुलगे आहेत न तरी मुलाचाच हव्यास ".

माधुरी -- "तस नव्ह बाई.... तुम्हाला नाही कळणार आम्हा गरिबांचा दुखणं त्यामुळे मुलगी नकोच."

किंजल --"असं कसं म्हणतेस ग मुलगा काय नि मुलगी काय दोघेही सारखेच असतात"

माधुरी--" नाही हो ताई मुलगा मुलगी सारखे हे तुमच्यासाठी.... माझ्यासाठी नव्हे...."

किंजल--" बरे बाई काहीही होऊ दे ....ते सगळं देवाच्या हाती..... तुझ्या इच्छेप्रमाणे झालं म्हणजे मलाही आनंद वाटेल."


आता तीचे पोट चांगलं वर दिसत होतं. पाच महिने झाले असावेत असा विचार करत किंजल आपल्या पोटावरुन हात फिरवते. ती महिला पण निघून जाते .

महिन्या दोन महिन्यात ती महिला किंजलला रस्त्याने वस्तू विकताना दिसायची. वेगवेगळ्या वस्तू ती विकायची.... आता मात्र तिने दगडाच्या वस्तू विकणे बंद केले होते. वजनाने हलक्या वस्तू घेऊन ती विकायला लागली होती. कधी तिच्याकडे मनी, पोत ,डोरले इत्यादी सामान दिसायचं, तर कधी प्लास्टिकचे फुले घेऊन ती विकायची .अजून तिची सुटका झालेली नव्हती. पण ती परत कधी घरी आली नाही. रस्त्याने ती किंजलला दिसली की एक छोटसं स्माईल देत राहायची किंजलही तिच्याकडे पाहून हसायची.


एक वेगळीच छटा होती तिच्या हसण्यात. तिच्याकडे पाहील की मन शांत व्हायचं. माधुरी दिसायला माधुरी दीक्षित सारखी जरी नसली तरी तिचा सावळा रेखीव चेहरा अतिशय सुंदर दिसायचा .

न जानो ती कुठल्यातरी सतत विचारात गर्क असायची.एक कुठलं तरी अनाहूत संकट तिच्या चेहऱ्यावर सदैव दिसत राहायचं त्यामुळे ती मोकळेपणाने हसतही नव्हती.


अजून दोन महिन्यांच्या कालावधी लोटला एके दिवशी किंजल सक्काळी 6 च्या सुमारास उठून दैनंदिन कामाला लागते. सर्वप्रथम गेटचे कुलूप उघडण्यास जाते आणि बघते की घराच्या गेट समोर एका चिंघ्या चिंध्यानच्या गोधडीत एक चार पाच दिवसच स्त्री जातीचं बाळ.... त्या गोधडीला हात नावणार तोच बाळ रडायला लागते. .. किंजल खूप गोंधळून जाते घाबरते काय करावे ते तिला सुचत नाही.

किंजल इकडे तिकडे बघते, प्रसादला आवाज देते , घरातील सगळे दारात गोळा होऊन बघतात .किंजल त्या बाळाला जवळ घेते . जास्त थंडी असल्याने तिला गेटच्या आत घेऊन जाते. प्रसाद सगळा रस्ता शोधून येतो पण त्याला कुणीच दिसत नाही .बाळ ठेवणाऱ्याचा काही पत्ता नाही.

काय करावे समजेना.... त्या बाळाला घेऊन प्रसाद व किंजल घरात येतात. त्या बाळाला किंजल छातीशी कवटाळते व तिला ऊब देण्याचा प्रयत्न करते . त्याच बरोबर बाळ रडणे थांबवते .तेव्हपर्यंत सासूबाई दूध गरम करून आणतात .आणि किंजल च्या हातात देतात. किंजल प्रसाद कडे परवानगी साठी पाहते .तोच

प्रसाद - "आई मूल देव जाणो कुणी ठेवलं पण दूध देणं योग्य राहील की नाही "

सासूबाई - "अरे जे काही करायचे ते नंतर करा.पण पहिले त्या बाळाला दूध पाजा भुकेने रडतोय ते बाळ"

किंजल -- "हो रे प्रसाद पहिले दूध.... नंतर बघू काय करायचे ते"

किंजल अगदी आई होऊन तिला दूध पाजते. ते बाळ ही दूध पिऊन किंजलच्या कुशीत झोपी जाते.

प्रसाद --"माझ्यामते आपण पोलिसांकडे जावं"

किंजल --"हो नक्कीच "

असे म्हणून प्रसाद ,किंजल बाळ व सासूबाई चौघेही पोलीस ठाण्यात जातात.
तिथे प्राथमिक रिपोर्ट घेतला जातो .

पोलीस ठाणेदार - "मॅडम आम्ही या बाळाची आई शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तुम्ही फक्त थोडी मदत कराल काय ? आज 11 वाजे पर्यंत या बाळाला संभाळाल का ? कारण आमच्या लेडी स्टाफ यायला वेळ लागेल आणि त्या आल्या की बाळाला शिशु गृहात नेलं जाईल. केवळ तो पर्यत मदत कराल."

सासूबाई --"अहो शिशु गृहात का ?आम्ही सांभाळू की एक सोडून चार दिवस सांभाळू ."

किंजल --"आई काय म्हणताय तुम्ही ?"

सासूबाई- -"तू काही काळजी करू नको ....मी सांभाळते"

कुणाचं असेल हे बाळ ....भेटेल का त्याची आई ....की त्याला शिशुगृहात नेलं जाईल.....किंजलची काय प्रतिक्रिया असेल......पाहूया पुढील भागात

© सौ. वृषाली प्रकाश खटे

🎭 Series Post

View all