वात्सल्य भाग 1

आईचं प्रेम अतुलनीय असते मग ती कुणीही असो


शिर्षक : वात्सल्य

कॅटेगरी कौटुंबिक कथा
सब कॅटेगरी --राज्यस्तरीय करंडक कथामालिका


टीम --अमरावती



सौ वृषाली प्रकाश खटे



किंजल ही उच्च शिक्षित प्राध्यापिका आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात , सुंदर अशा घरात सासू , सासरे व नवरा प्रसादसह राहते . त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झालीत पण घरात काही पाळणा हलला नाही. सगळे उपाय करून झालेत शेवटी परमेश्वरावर भार सोपविण्यात आला. किंजल स्वभावाने शांत व दुसऱ्यांची भावना जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्याला आधुनिकतेची जोड आहे.

आज किंजल दुपारी तीन वाजता कॉलेज मधून घरी परत आली. तिला तिच्या घराच्या गेट जवळ एक महिला बसलेली दिसली .

किंजल : “काय ग काय हवंय?”

महिला : "काही नको बाई ...थकली म्हणून बसले ".

किंजलला बघून ती महिला निघते. तिच्या अंगावर फटकीतुटकी, मळकी साडी आहे. डोक्यावर दगडाचे खलबत्ते, पाटे इ वस्तूंची टोपली आहे त्यावरून ती रस्त्यावर वस्तू विकणारी बाई आहे हे किंजलच्या लक्षात येते. ती महिला दोन पाऊले चालल्यावर तीचे पोट पाहून ती गरोदर असल्याचे किंजलला जाणवले.


किंजल : "बस ग बाई ...मी तुला उठवत नव्हते... तुला बसायचे असेल तर बस
... पाणी देऊ का?"



महिला -- "द्या हो ताई ...लय तहान लागली बघा... राहून राहून पाणी प्यावंस वाटते .पण किती थांबणार... आणि कुणाला पाणी मागणार ...कुणी पाणी देत नाही ..."


किंजल घरातून पाणी आणून देते .


किंजल -- "तुला पहिल्यांदाच दिवस आहेत ."



महिला - - "नाई ओ बाई हे माझं सहावे लेकरू हाय .लई ताप हाय बघा ओ ताई. मला पाच मुलं आहेत आधी. त्यांनाच खायचा घास मिळायची पंचाईत हाय अन त्यात हे सहावं ...."


किंजल-- "अग मग सरकारी दवाखान्यात जाऊन कुटुंब नियोजन करून घे ."



महिला- "ते काय असते"


किंजल-- "मुलं नको असतील तर शस्त्रक्रिया करून थांबविता येतं."


महिला -- "बर बाई जाते म्या लय उशीर झाला."


डोक्यावर जवळपास 30 किलोचे ओझे घेवून ती महिला निघाली

किंजल घरात जाते पण तिच्या मनातील त्या महिलेची प्रतिमा काही जात नव्हती. नकळत ती देव्हाऱ्यासमोर उभी होते . " कारे इतका निष्ठुर आहेस तू. जिला पोसायला जड जाते तीला सहा सहा अपत्य ....आणि मी इथे मातृत्वाला आसुसले माझी कूस एकदाही नाही भरायची....हा कुठला नियम रे तुझा.... ." किंजलच्या डोळ्यांचे पाझरणे सुरू झाले. आणि डोळ्यासमोर आला तो गत दहा वर्षाचा काळ.


गेली दहा वर्ष अपत्य प्राप्तसाठी दवाखाना ,औषधे सगळे चालू होते आणि ते न झाल्याने येणारी उद्विग्नता सतत घरात दिसायची.
किंजलचे सतत रडणेपडणे ,औषधी , धागेदोरे, देवधर्म सगळं अखंड चालू होतं . ज्यांनी जो उपाय सांगितला तो उपाय किंजल व प्रसादने करून बघितला मग तो आध्यात्मिक असो की वैज्ञानिक. बुद्धी गहाण ठेवल्याप्रमाणे अनेक उपाय ते सतत करत राहिले पण त्यांना यश प्राप्त झाले नाही. किंजलची प्रकृती त्यामुळे सतत खालावत होती. अनेक गोळ्या, औषधे, अघोरी उपाय यामुळे तिच्या शरीरावर वाईट परिणाम दिसायला लागले होते. किंजल मानसिक दृष्ट्या देखील खूप खचली होती. तिला मूल होत नाही याचं दुःख होतं आणि घरच्यांच्या नजरा बघून तिला त्यात अपराध्यासारखं वाटत होतं. जागोजागी शरीरावर विविध इंजेक्शनने टोचल्यामुळे किंजलच्या शरीराची चाळणी झालेली होती. विविध औषधी घेतल्यामुळे चेहऱ्यावर मुरूम आणि विविध खड्डयाचे साम्राज्य झालेले होते. नियमितपणे औषधे आणि गोळ्यांचे दुष्परिणाम तिच्या मानसिक स्वास्थ्यावर ही दिसू लागले होते. सततची होणारी चिडचिड, आदळआपट ,रडपड हे सुद्धा किंजलच्या स्वभावात झालेले दुष्परिणाम होते. पण किंजल जेव्हा कॉलेजला जायची त्यावेळी आपले सर्व दुःख विसरून ती विद्यार्थ्यांच्या समोर जायची. त्यामुळे तिथे तरी तिचे मन शांत व स्वस्थ राहत होते तिच्या ह्या स्वभावात झालेला बदल पाहता व शरीरात झालेले दुष्परिणाम पाहता प्रसादने आता मुलासाठी प्रयत्न आपण कमी करावेत असा निर्णय घेतला. आणि त्याचा तो निर्णय सुद्धा योग्यच होता. आईला सांगून त्याने विविध दैवी किंवा केले जाणारे औषध उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ एका डॉक्टरांचा नियमित औषधोपचार सुरू ठेवला आणि घरातही सगळ्यांना अपत्यासाठी आता देवावर विश्वास ठेवा बाकी काही नको असं सांगितलं. तसे प्रसादचे आई-वडील सुशिक्षित होते. प्रसादच्या आई म्हणजेच किंजलच्या सासूबाई एका नामांकित शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या होत्या. सासरे सुद्धा महसूल विभागातून निवृत्त झालेले होते. त्यामुळे त्यांचा बराचश्या लोकांशी परिचय होता. आणि आईचा स्वभाव सुद्धा मायाळू होता. त्या कधीही किंजलला रागवून किंवा भांडून बोललेल्या नव्हत्या. मूल होत नाही याचा कधी तिला दोषही दिला नाही. या उलट सतत त्या किंजलच्या पाठीशी उभ्या होत्या आणि विविध औषधोपचार करण्यात तिची नेहमी मदतच करायच्या सासरे सुद्धा आपल्या सुनेविषयी सार्थ अभिमान बाळगून होते. एवढं सगळं असलं तरीही नातवाची ओढ मात्र त्यांना लागून होती. प्रसाद ने मागील वर्षी आई-वडिलांनाही समजावून सांगितले. विविध औषधोपचाराचे दुष्परिणाम त्यांनाही किंजलवर दिसू लागले होते त्यामुळे त्यांनी सुद्धा प्रसादच्या या प्रस्तावाला अनुमती दिली आणि औषधोपचार कमी करण्यात आला. प्रसादने किंजलला समजाऊन सांगितले ....
आपल्याला मूल होत नाही ह्या गोष्टीचं टेन्शन न घेता आपण एकमेकांना वेळ देण्याची गरज सांगितली आणि देवाच्या मनात असेल तेव्हा देव आपल्याला अपत्य देईल तोपर्यंत आपण वाट पाहायचं. आपण त्यासाठी म्हणून रडायचं नाही असे वचन प्रसादने किंजल कडून घेतले.


किंजल ने प्रसादला वचन दिले आणि तेव्हापासून खरच तिनेही आपल्यात खूप बदल केला. मुलांसाठी रडणे बरेचसे कमी झाले होते. केवळ एका डॉक्टरचा औषधोपचार चालू होता त्यामुळे औषधे गोळ्या यांचे सुद्धा प्रमाण कमी झालेले होते. किंजलला आता जरा स्वस्थ वाटू लागले होते. पण आज मात्र तिच्या भावनांचा बांध फुटला होता ....
प्रसादला दिलेलं वचन आठवून किंजल लगेच अश्रू पुसत उठून बसते......



काय लिहिलंय किंजल आणि प्रसाद च्या आयुष्यात..... त्यांना मुल होईल ....की काही विपरीत घडेल......दारात आलेल्या महिलेचा काही संबंध असेल पुढे.... जाणून घेण्यासाठी नक्की वाचा पुढील भाग....


सौ वृषाली प्रकाश खटे 9404375920

🎭 Series Post

View all