वटपौर्णिमा .. एका सावित्रीची

एक सावित्री , एका घटनेमुळे तिच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी .....

वटपौर्णिमा .. पूजेसाठी सावित्रीबाई छान तयार झाल्या ..गोऱ्यापान अशा जरीकाठ च्या जांभळ्या रंगाच्या साडीत त्या अजूनच खुलून दिसत होत्या .. पांढ-या आंबाड्यात लाल गुलाब मोहक वाटत होता .. ठसठशीत कुंकू , गळ्यात साधसच वाटी मंगळसूत्र आणि पोहेहार , हातात चॉकलेटी रंगाच्या काचेच्या बांगड्या त्यात सोन्याच्या पाटल्या आणि पायात मध्यम आकाराची जोडवी अशा मोजक्या अलंकारांनी नटलेल्या सावित्रीबाईनी वयाच्या ६८ व्या वर्षी नव्या नवरीलाही मागे टाकले होते .. जातीच्या च सुंदर त्यात सरळ साधा स्वभाव .. सगळ्यांना सावरून - सांभाळून घेणं , प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढणं , कायम हसतमुख त्यामुळे त्या सगळ्यांनाच हव्याहव्याशा .. !! सासर माहेर एकाच गावात असल्यामुळे  नणंदा जावा , भावजया , भाच्या पुतण्या , सगळ्यांचा त्यांच्याभोवती कायम गराडा असायचा .. त्याही सगळ्यांमध्ये रमायच्या ..लेकी बाळींना नवनवीन गोष्टी शिकवणं आणि सगळ्यांचं कोड कौतुक भरभरून शब्दात करावं ते सावित्रीबाईंनी च .. !! 
 सर्व जणींनी वडाची यथासांग पूजा केली ..  मनोभावे पूजा झाल्यावर नेहमीप्रमाणे सावित्रबार्इंनी सगळ्या जणींना उखाणा घ्यायला सांगितला आणि स्वतःही घेतला ..
      ' मंगलमूर्ती मंगलमाते नमन करते तुला
       माधवरावांची साथ जन्मोजन्मी मिळो मला' 
 सगळ्यांनी खूप छान म्हणून टाळ्या वाजवल्या .. यथासांग पूजा संपन्न झाल्याने सावित्रीबाई मनोमन समाधान पावल्या..
        माधवराव सकाळीच गावाला गेल्यामुळे आज सावित्रीबाई घरात एकट्याच होत्या .. साडी ब्लाऊज घडी घालतांना त्यांना कालचा दिवस पुन्हा आठवला .. त्या मनाशीच हसल्या ..  पोहेहार डबीत ठेवतांना त्यांच्या मनात आलं  'अशा कितीही दागिन्यांनी शरीराला सजवल तरी मनाला सजवणार्या सौभाग्याची सर मात्र कुठल्याच दागिण्याला नाही .. सौभाग्याची साथ आयुष्यभर हवीच .. माधवरावांच्या साथीने आपलं आयुष्य किती समृद्ध झालं .. पांगलेल घर सावरलं त्यांनी .. मोठे असल्याने आणि वडिलांचं छत्र हरवल्याने सगळ्या कुटुंबाची जबाबदारी येवून पडली .. पण तीही सक्षमपणे पार पाडली .. आपला खारीचा वाटा काय तो .. बस .. पण त्यांचं कर्तृत्व थोरच ..!! त्याचा कायम अभिमान वाटेल मनाला .. सगळे आप आपल्या आयुष्यात रम्य आहेत .. आपलं उभयतांच ही आयुष्य आताशा कुठे स्थिर झालंय .. स्वतःसाठी वेळ मिळतोय .. आता जगायचं ते एकमेकांसाठी .. एकमेकांच्या सोबतीने .. नाहीतरी हेच तर वय असतं .. गेलेल्या दिवसाच्या रम्य आठवणी , मनातले सल आणि काही अव्यक्त गोष्टी ज्या बोलायच्या राहूनच गेल्या  असे कितीतरी क्षण जगायचे बाकी आहेत .. ते आता जगायचे आहेत ..  दोघांनाही..' फोनच्या आवाजाने सावित्रीबाईंची  विचार शृंखला तुटली.. ' इतका वेळ झाला..!!'  असं पुटपुटत त्यांनी फोन उचलला .. ' पोहोचलो ' असा माधवरावांचा फोन .. ' बर बर ' म्हणून त्यांनी फोन ठेवला .. आणि घर आवरायला घेतलं .. पाणी आल्याचा आवाज आला .. ते त्यांनी भरून घेतलं .. 'आज नेहमीपेक्षा पाणी जास्तच आलं .. सगळं भरलं गेलं ..आज हे घरी असते तर पाण्याशी च खेळत बसले असते ..' मनात आलेल्या ह्या विचाराने आणि माधवरावांच्यात दडलेल बालमन आठवून त्यांना परत हसू आलं ..स्वतःसाठी चहा बनवून त्या आरामात बसणार तितक्यात पुन्हा फोन खणाणला .. हातातला कप बाजूला ठेवून त्यांनी फोन उचलला .. ' हॅलो ' .. हळू हळू त्यांचा चेहरा बदलू लागला .. इतक्या वेळ डोळ्यात असलेली समाधानाची चमक क्षणात लुप्त झाली .. फोन कानाशी पण त्यांच्या तोंडून शब्द निघेना .. त्या स्तब्ध झाल्या .. आणि अखेर त्यांच्या हातातला रिसिव्हर गळून पडला .. त्या आवाजाने त्या दचकल्या .. काहीशा भानावर येत त्यांनी चहाकडे बघितलं .. चहात माशी पडली होती .. काहीवेळ तडफडली आणि मग स्थिरावली .. !!
        त्या मटकन खाली बसल्या .. समोरून येणारी त्यांची बहीण  ' आक्का काय झालं ' म्हणत त्याच्याकडे  धावली .. ' आक्का तुला बरं वाटत नाहीये का ?' तिने परत विचारलं .. 
        ' माधवराव गेले ' सावित्रीबाई पुटपुटल्या .. त्यांना जे फोनवर सांगितलं होत तेच त्या बोलल्या .. ' माधवराव गेले ग.. '  आणि पुन्हा पुन्हा बोलत होत्या .. बहिणीने त्यांना गदागदा हलवल .. पाणी दिलं .. थोडा चहा केला .. चहाचे घोट पोटात गेल्यावर त्यांना जरा बर वाटल .. त्या पूर्ण भानावर आल्या .. एव्हाना बहिणी सोबतच जावा भावजय भाच्या गावातले सगळे नातलग जमा झाले .. सगळ्यांना बातमी कळली होती .. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने माधवरावांचे आकस्मात निधन झाले होते .. सावित्रबार्इंना हा धक्का जबरदस्त होता .. सकाळी चालत बोलत घराबाहेर पडलेला माणूस अस जग सोडून जातो म्हणजे काय ..वय अवघं ७० वर्ष आणि त्यांना काहीच आजार नाही .. बीपी , शुगर तर त्यांच्या आसपासही नव्हते .. 
       ' आताच कुठे आयुष्याला स्थिरता आलेली .. स्वतःसाठी जगण्याचे दिवस आणि .. ' विचाराने सावित्रीबाईंनी हुंदका दिला .. बायकांनी त्यांना सावरायचा आणि बोलत करण्याचा प्रयत्न केला .. ' हो ना .. 'असं अचानक काही होईल वाटलं ही नव्हतं .. काल तर पूजा .. ' बोलताना आवाज कचरला आणि जाऊबाई गप्प झाल्या .. ' हं .. काहीतरी चुकलंच बघ माझं पूजेत .. नाहीतर काल अशी पूजा करावी .. त्यांच्यासाठी आरोग्य , आयुष्य आणि जन्मोजन्मी ची साथ मागितली .. आणि आज लगेचच त्यांनी साथ सोडून जावं .. कुठे ती यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणणारी सावित्री आणि कुठे मी सावित्री .. जिला इतकं काही अभद्र घडावं आणि त्याचा पत्ताही लागू नाही ..  ' सावित्रीबाईंना स्वतःच अपराधी असल्यासारखं वाटलं .. बायकांनी त्यांना समजावलं ..' जन्म मरण कुठे कुणाच्या हातच आहे बाई .. '  सावित्रीबाईंच कालच रूप सगळ्यांच्या डोळ्यासमोरून गेलं .. आता त्या  'तशा ' कधीच दिसणार नव्हत्या ..  सावित्रबार्इंना पुढे बोलवेना .. आता त्यांची आसव बोलू लागली .. ' ज्यावेळी साथ हवी त्याच वेळी तुम्ही मला एकटं टाकून गेलात .. आता नातवंडांचे कोड कौतुक करण्याचे दिवस , त्यांच्यात खेळण्याचे , रमण्याचे दिवस  आणि तुम्ही .. अशा भरल्या गोकुळातून तुम्ही कसे गेलात हो .. कुठेच जीव अडकला कसा नाही तुमचा .. कसा नाही अडकला .. ' .. ' आई ssssss .. ' पोरींच्या टाहो ने सावित्री बाईं भानावर आल्या  ..क्षणात त्यांनी स्वतःच  स्वतःला सावरलं .. पोरींसाठी .. त्यांच्या चिमण्यांना त्यांनी कवेत घेतलं .. कुशीत घेतलं .. 
       स्वतः च्या अपार दुःखाला आत डांबून एक नवीन सावित्रीबाई समोर येणार होत्या .. 
     
                  © सौ. गायत्री प्रशांत देशपांडे