वाट तिची वेगळी (भाग-4)

वाट तिची वेगळी.एका सामान्य मुलीची संघर्ष कथा.


विवस्त्रावस्थेत निपचित पडलेली सिमा बघून सोपानराव आणि गना काकाला धक्का बसला दोन मिनिटं त्यांना काय करावं काही कळलं नाही.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गणा काकांनी आपल्या अंगावरचे घोंगडं सीमा भोवती गुंडाळल आणि तिला उचलून खांद्यावर टाकले.सोपानराव सुन्न होऊन फक्त बघत होते.
"चल दादा.घरला चल"
गणा काकाने आवाज दिल्यावर सोपानराव चुपचाप त्यांच्या मागे चालायला लागले.वाटेनं कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.झपझप पावलं टाकत दोघेही घरी आले.भागाबाई कुसुम आणि शारदा काकू अंगणात वाट बघत बसल्या होत्या.गणा काकांनी आल्या आल्या अंगणातल्या खाटे वर सीमा ला टाकलं.ती अजूनही शुद्धीवर आली नव्हती सिमाला असं गुंडाळून आणलेलं बघून कुसुम ला काय समजायचं ते समजले आणि तिने जोरात हंबरडा फोडला.शारदा काकू रडत तिला सावरायला लागल्या.भागाबाई देवाच्या नावानं बोटं मोडायला लागल्या.सोपानराव अंगणात तुळशी ला टेकून बसले.गना काका धावतच बॅटरी घेऊन ऑटो वाल्या महमूद च्या घरी गेला.अंगणातच खाटेवर महमूद झोपला होता.गणा जवळ जाऊन महमुदला उठावायला लागला.
"मेहमूदचाचा उठो ना.जरा जल्दी चलो."
महमूद गडबडीने उठून बसला आणि समोर कुणाला बघून अवाक झाला.
"अरे गना! तू इतनी रात को? क्या हुआ? वहिनी का तब्येत तो ठीक है?
"हा चाचा, शारदा को कुछ नही हुआ.सीमा की तब्येत बिघडली, लवकर चला.तालुक्याला घेऊन जावं लागेल."
"या अल्ला! क्या हुआ बच्ची को?"
"मेहमूद चाचा...ओ.....आता काय बी नाही सांगू शकत..तुम्ही चला लवकर."
"ठीक आहे चल."
महमूद चाचाने पडवीत भिंतीला अडकवलेला शर्ट अंगावर चढवला.घरात आवाज देऊन,
"सुनती हो सोपानराव की बच्ची का तब्येत बिगडा है.मै उसको लेके डॉक्टर के पास जा रहा हू.जरा अटोका चाबी और पाकीट देना."
मेहमूद चाचा च्या बायकोनं घरातून पाकीट आणि चाबी आणून दिली.चाचाने गडबडीने ऑटो चालू केला. गणा ऑटोत बसला आणि दोघ जण घरी आले.अजूनही कुसुम रडत होती.शारदा तिला समजावत होती.सोपानराव जागचे हलले नव्हते आणि सीमा निपचित पडून होती.घोंगड्या गुंडाळलेल्या जखमी सीमाला बघून मेहमूद चाचाने प्रश्नार्थक नजरेने गणा कडे बघितलं.गणाच्या डोळ्यात खळकन पाणी तरळलं.मोठ्या जड मनाने तो बोलला.
"चाचा......हो.....सीमा.....बाहर......दूध......उशीर....."
मोठ्या मुश्किलीने त्याने एवढे शब्द उच्चारले आणि हमसून हमसून रडायला लागला. चाचाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"गणा हॉस्पिटल जाना जरुरी है.चल जल्दी उठा बच्चे को."
गणा काकाने मान हलवली आणि डोळे पुसून सीमाला उचलून ऑटो मध्ये ठेवली.शारदा कडे बघून बसायचा इशारा केला.शारदा कुसुम ला धरून हळू हळू रिक्शा कडे गेली आणि दोघी सिमाला पकडून बसल्या.धना सोपानराव कडे गेला आणि बोलला,
"दादा चल. पोरीला डॉक्टरला दाखवायला पाहिजे.चल बिगीन."
सोपानरावने गणा कडे बघितलं आणि बोलले,
"आता डॉक्टरला दाखवून गेलेली इज्जत परत नाही यायची गना."
गणाला मात्र आपल्या भावाच्या बोलण्याचा राग आला.पण..ही काय बोलायची वेळ नाही असा विचार करून तो बोलला,"दादा त्या गोष्टी आता बोलायची वेळ नाही.पोरगी वाचली पाहिजे चल.."
त्याने भावाचा हात धरला आणि ऑटो कडे घेऊन गेला.जाताना भागाबाई ला \"काळजी करू नको.राघव कडे लक्ष दे.\"म्हणून सांगितलं.ऑटो तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यासमोर थांबला.महेमुद चाचा आणि गणा धावतच आत गेले आणि त्यांनी वार्ड बॉय ला स्ट्रेचर घेऊन यायला सांगितलं.इमर्जन्सी केस बघून घाईने दोघेजण स्ट्रेचर घेऊन आले.त्याच्यावर सिमाला टाकलं गेलं.नर्सने घाईने येऊन सीमा ला बघितलं आणि ती परिस्थिती समजून गेली. तिने लगेच डॉक्टरांना ताबडतोब बोलवलं.त्यादिवशी नाईटला डॉक्टर गीता मॅडम होत्या.त्या घाईने आल्या.आणि सिमाला बघितल.जागोजागी शरीरावर नखाने ओरबाडले च्या खुणा होत्या.काही ठिकाणी दाताने चावे घेतले होते.जमिनीवर घासत नेल्याने पाठ सोलुन निघाली होती. रक्तश्राव चालू होता.डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवलं आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशनला फोन लावला.ड्युटीवर असलेल्या इन्स्पेक्टर अभय राजे नी फोन उचलला.डॉक्टर गीताने त्यांना आलेल्या केस बद्दल माहिती दिली.आणि लवकर येण्याबद्दल सुचवलं.इन्स्पेक्टर अभय फोन ठेवून घाईने निघाले.सोबत त्यांनी हवालदार कामत ना घेतले. डॉक्टरांनी सीमा वर उपचार सुरु केले होते.बाहेर कुसुम आणि शारदा बाकड्यावर बसून होत्या.सोपानराव उगीचच एका कडेला असलेल्या खुर्चीवर बसून होते.गणा काका आणि मेहमूद चाचा पॅसेजमध्ये येरझारा मारत होते.कुणीही कुणाशी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत.तेवढ्यात नर्स आली.
"एवढी औषधं लगेच घेऊन या.बाहेर गेलात की उजव्या बाजूला मेडिकल आहे."
असं बोलून गणा काकाच्या हातात एक कागद दिला आणि निघून गेली.गणा काकांनी खिशात हात घातला तर शंभर रुपयाची नोट हाताला लागली.दुसऱ्या खिशात थोडीफार चिल्लर होती.येताना घरातले जे काय पैसे घेतले होते ते आल्यावर हॉस्पिटलच डिपॉझिट भरलं होतं.काय करावं तेच त्याला सुचत नव्हतं.महमूद चाचान त्याची घालमेल ओळखली आणि त्याच्या हातातला कागद घेतला.
"चल गना दवाई लेके आते है."
गणा काकांनी डबडबल्या डोळ्याने त्याच्याकडे बघितले.तेव्हा,त्यांनी हलकेच डोळ्याने काळजी करू नको.असा इशारा केला.आणि दोघे धावतच बाजूच्या मेडिकल मध्ये गेले.गणा आणि मेहमूद चाचा औषध घेऊन आले तेव्हा इस्पेक्टर अभय आणि हवालदार कामत हॉस्पिटल मध्ये पोहोचले होते.डॉक्टरगीता ला पेशंट बद्दल विचारून ते नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी शारदा आणि कुसुम कडे आले होते.त्यांच्याकडे बघून इन्स्पेक्टर अभय थोडेसे बावरले.काय बोलावं काही क्षण त्यांनाही कळलं नाही.पण,लगेच सावरून त्यांनी घसा खाकरला.कुसुम कडे बघत प्रश्न केला,
"ताई मी तुमची मानसिकता समजू शकतो.पण ज्यांनी हे अघोरी कृत्य केले, त्यांना पकडण्यासाठी तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील."
कुसुम ने इन्स्पेक्टर अभय कडे बघितलं आणि शेतातून आल्यापासून ते सीमा दूध घालायला जाईपर्यंत ची सगळी गोष्ट त्यांना सांगितली.ते ऐकून अभय गाना काकांकडे वळाले आणि \"पुढे काय घडलं\"असं त्यांना विचारलं तेव्हा,
"मी आणि दादा की मला शोधायला बाहेर पडलो, तवा गावच्या मशानभुमी च्या बाजूला नाल्याजवळ सीमा जखमी होऊन बेशुद्ध पडली होती.आन अंगावर एक भी कपडा...."गणा काका पुढे बोलू शकला नाही.इन्स्पेक्टर अभयने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि धीर दिला.
\"पेशंट शुद्धीवर आली की फोन करा.\"असं डॉक्टर गीताला सांगून अभय तिथून निघाले.जाताना त्यांनी गणा काकाला पोलीस स्टेशनला येऊन रीतसर तक्रार नोंदवायला सांगितलं.इन्स्पेक्टर अभय निघून गेले.तसा गणा सोपान रावकडे गेला आणि त्यांना बोलू लागला.
"दादा त्याला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायला पाहिजे.ज्यांनी आपल्या कवळ्या पोरी असे हाल केले त्या हरामखोरांना असं मोकळं नाही सोडायचं.\"
गणा काका चे बोलणे ऐकून एवढा वेळ शांत असलेले सोपानराव ताडकन उठून उभे राहिले.आणि गणाला बोलले, "काही गरज नाही कुठे पोलीस केस करायची.गेली एवढी इज्जत पुरेशी झाली." गणा अवाक होऊन आपल्या भावाच्या तोंडाकडे बघायला लागला.
"अरे दादा काय बोलतोस आपल्या सोन्यासारख्या पोरीला एवढा मरण यातना दिल्या.त्यांना असंच वार्‍यावर सोडायचं."
"मला ते काही माहीत नाही.उद्या पोलीस केस केली पेपरात आले तर अख्या गावाला माहीती होईल.गाव शेन घालीन आपल्या तोंडात."
"काय बोलतोस दादा? आपल्या पोरीचा काय दोष आहे त्याच्यात.
"ते मला माहिती नाही.उपचार झाला की नीट गावाकडे जायचं.बास."
"दादा........."
"मला काही ऐकायचं नाही.माझी पोरगी, मी ठरवलं काय करायचं ते."
आपल्या भावाचं बोलणे ऐकून गणा काकाना राग अनावर झाला होता.इतक्यात महमूद चाच्यांनी येऊन गणाला बाजूला घेतले.
क्रमशः

🎭 Series Post

View all