वाट निसरडी माझिया शेताची ...

Farmer's girl

वाट निसरडी माझिया शेताची ... 

#बंदूर_स्पेशल #बैलपोळा #miss_u_पप्पा ????????


          महाराष्ट्रातील प्रमुख धंदा म्हणजे शेती ....एखादं दुसरं कुटुंब सोडलं तर प्रत्येक एका व्यक्तीकडे त्याची हक्काची जमीन , राबायला , कसायला  ...घाम गाळून माय मातीत सोनं पिकवायला असते .... कष्टाचं जरी असलं तरी अगदी आनंदाने करतो तो बळीराजा रानातलं काम ..तो करतो , तो पिकवतो म्हणून आज आहोत आपण ... जगतोय , खातोय , पितोय ...ही त्या बळीराजाचीच देण ...

       आम्ही देखील पिढ्यान पिढ्याचे शेतकरी ... आजोबांच्या काळात रानांच्या वाटण्या होऊन जरी त्या धरणीमातेचे  जरी कमी हिस्से आमच्या वाटणीला आले असले तरी ...जे आहे त्यात ... राबून चांगलं पिकवायचे माझे आजोबा , माझे वडील .. पक्के घरंदाज शेतकरी .. खूप अभिमान वाटायचा मला त्यांच्या शेतकरी असण्याचा ... 

         गोठा गाई गुरांनी भरलेला .... जोडीचे दोन बैल उभे गोठ्यात ...शेळ्या ...त्यांची छोटी छोटी कोकरं ....काय नव्हतं म्हणून सांगू घरी ... फार श्रीमंत नसलो तरी ...सधन शेतकरी होतो आम्ही  ( अजूनही आहोत ) माझ्या वडिलांना भारी हौस या सर्वांची ... गोठ्यात गेलं की तिथं ठेवलेली शेतीची अवजारं बघून मन कस अगदी भरून यायचं ...  कुदळ , टिकाव , खोरं , खुरपी ,विळे ...अगदी पेरणी पासून च्या समानापासून ते अगदी बैलगाडीपर्यंत  ..... सगळं काही दिमाखात उभं असलेलं दिसायचं ... हे सगळं बघुन माझ्या इवलुशा मनाला खूप कौतुक वाटायचं ...असं वाटयचं सगळ्या गावात आम्हीच श्रीमंत आहोत ... 

        पप्पांना पण खूप ओढ शेतीची ... आणि अजूनही करतात ... जपतात त्या धरणीमातेला आपल्या आईप्रमाणे ... अगदी अजूनही .. त्यांनी तसंच जोपासल आहे  धरणी मातेला ...फरक फक्त एवढाच राहिला ...आता आजोबा नाहीत त्यांच्याबरोबर ...पण ते थांबले नाहीत ...तेव्हा जेवढे कसोशीने शेतात राबायचे तसेच आजही जीवापाड कष्ट करतात त्या काळ्या मातीत ... जरी हा निसर्गराजा लहरी झाला आहे .... आपल्या मर्जीसारखं वागतोय ...  सगळ्या पिकांची नासाडी होतेय तरी ....  
      तरी माझे वडील हार नाही मानले ..  देणाराही तोच आहे नि घेणाराही तोच आहे ... त्याच्यापुढे काय चालणार .. आपण फक्त करत रहायचं ... अगदी शरीर थकलं , कष्टाने ... तरी मन मात्र अजून तरुण ...  काळ्या मातीवर प्रेमचं त्यांचं एवढं ...अगदी जीवापाड ...  अगदी मी स्वतः बघीतलंय त्यांना .. डोक्यावरून एका वेळेला तीस तीस ...चाळीस चाळीस पेंड्या ओझं बांधून डोक्यावरून गुरांसाठी डोंगरावरून चारा आणताना ..   हिरवंगार ते गवत .. एक पेंडी खोलून बैलाला टाकायची म्हणलं तरी जड लागायची ..आणि तीस चाळीस पेंड्याचा भार.. तोही गावचा एवढा मोठा डोंगर उतरून ... कोण करत हो एवढं .. पण जीवच जडलेला तो पहिल्यापासून मुक्या जनावरांवर वडिलांचा ...  खिशात दमडी का नसेना .. इकडची उचल ...तिकडची उचल पैशांची  ...  पण बैलावाचून गोठ्यातील दावण केव्हा मोकळी सोडली नाही ... दुभत्या म्हशी पण हव्याचं घरी ...याचा देखील खूप मोठा अट्टहास ...

            आम्हीही काही कमी नव्हतो मदतीच्या बाबतीत ...चला म्हणलं की केव्हा नाही म्हणणं नाहिचं ...आई वडिलांच्या जोडीला आम्ही तिघे भावंडे देखील ... छोटी मोठी मदत ... आजोबा ही असायचे आदी मदतीला , पण एकेदिवशी डोंगरात जळण आणायला म्हणून गेले नि पडले , पडले ते पडलेचं ...पुन्हा केव्हा स्वतःच्या पायावर उभे नाही राहिले कामासाठी ???? 
           असो , आमची मदत अगदी टोमॅटोच्या फडापासून ते डोंगराच्या ज्वारीपर्यंत ... 
          इवली इवलीशी लागवड केलेली टोमॅटोची रोपं ... खाली रुक्ष सुकलेली जमीन .. आभाळात पाण्याचा एक ठिपुस देखील नाही ..  त्यांची नजर मग आमच्याकडे ... त्या इवल्याशा पानांच्या नजरा ...आम्ही तरी जगण्यास त्यांची मदत करु याकडे ...मग रस्त्यापलीकडील ओढ्यातून कळशीतून आणलेलं पाणी रखरखत्या उन्हात ग्लास ग्लास भर ओतून त्यांची तहान भागवलेली.. हे सगळं यासाठी   .. की ती छोटी रोपं फुलावी ...जगावी ..  कष्टाचं सोनं करावीत ...  रिमझिम पाऊसधारा केव्हा त्यांना आपल्या कवेत घेतील याची वाट बघत ... 
       पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र ... आलेला टोमॅटोच्या पिकाच्या बहराचा भार त्या इवल्याशा झाडांवरून हलका करण्यासाठी ... पिकलेले सगळी फळं काढून , करंड्यात भरून अगदी संपेपर्यँत ..आई नि आम्ही तिघे तिच्या मदतीला ... मधेच एखादा लालचुटुक टोमॅटो हळूच तोंडात जायचा ...अहो , घरचं पीक ते मोजमाप थोडीच त्याला की संपेल ..   असे किती तरी टोमॅटो रिचवले ...किती करंडे भरले ...कितीदा पाटाने पाणी दिलं ...ते त्या टोमॅटोलाचं माहीत ... गंमत खरी एकत्र काम करण्यात ...
              असंच ...सर्वजण एकत्र असू ... त्या डोंगरमाथ्यावर असलेल्या लांबलचक रानाच्या पट्यांत पेरलेल्या ज्वारीसाठी ....  पीक जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी वडिलांची धडपड नजरेतून केव्हांच सुटायची नाही  आमच्या ...पोटच्या पोराचीदेखील केली नसेल एवढी काळजी त्यांना आपल्या पिकाची .... कधी त्या छोट्या रोपांना खत (युरिया ) घालण्यासाठी एकत्र आम्ही भावंडे , आईवडील ...तर कधी रानांत उगवले गवत कोळपणी करून काढण्यासाठी ...  कोळपणी ओढायला मी ,माझा छोटा भाऊ ... आणि पाठीमागून कोळपा रेटायला आमचे वडील ... मी देखील हिमतीने म्हणू शकते ... " खांद्याने कोळपा ओढलाय मी ..माझ्या भावाबरोबर .." 
               या कामाची केव्हांच लाज नाही वाटली ना केव्हा त्रास ... अगदी हुरूपीने , हौसेनं केलंय हे सगळं काम ...
               छोटुशा हिरव्यागार वाऱ्यावर डोलणाऱ्या त्या पिकांना खत घालताना तर .. कधी हळूच रिमझिम पाऊस अचानक येऊन भिजवून जायचा आम्हाला ...नि पुढच्या एका क्षणात ... सूर्यदेव लक्ख प्रकाश घेऊन हजर ... अंगातले कपडे भिजायचे ...पुन्हा सुकायचे ...पुन्हा भिजायचे ... पुन्हा सुकायचे ... ऊन पावसाचा तो पाठशिवणीचा खेळ मात्र मनात घर करून जायचा ... कोळपणी केल्यामुळे तणांनी लक्ख मोकळं झालेलं ते काळंभोर रान ...  वाऱ्यावर संथ गतीने हलणारी ती हिरवीगार रोपं ...  मनाला कसं समाधान देऊन जायची ... डोंगर चढ उतार करून झालेल्या थकवा अगदी नजरेआड पळून जायचा .. ही नयनरम्य दृश्य बघितल्यावर ..आणि आपण मन लावून केलेल्या कामाचं चीज पण  ... आता डौलाने फुलतील ती ज्वारीची रोपे ... ही मनात आशा घेऊन डोंगर उताराला सुरवात करायची ...
         आईच्या डोक्यावर ओझं खतासाठी नेलेल्या पाट्या .. घमेली ... वडीलांच्या डोक्यावर ओल्याशार गवताचा भारा ... गुरांना ताजी वैरण मिळेल हाच स्वार्थ त्यामागचा त्यांचा ... मग ते स्वतः दिवसभराच्या कामाने थकलेले का असेनात ... 
   

         नुकत्याच झालेल्या पावसाने हिरवागार झालेला डोंगर ....  सगळीकडे वाऱ्याच्या मंद झुळुकीवर संथ हलणारं छोटं छोटं गवत ... मध्येच वाऱ्याचा मोठा झोका नी अंगावर उठणारा थंड शहारा ...त्या बरोबर सळसळणारी मोठीली झाडं ... डोंगरमाथ्यावरून दिसणार , चारीबाजुनी डोंगराच्या कुशीत वसलेलं माझं गाव .. मावळतिकडे झुकणारा तो सोन्याचा लालबुंद गोळा ... रानपाखरं , गाई वासरं केव्हांच परतीच्या प्रवासकडे गेलेली .. राहिलेले फक्त आम्हीचं ... त्या ओबडधोबड पण ज्याची शेवटपर्यंत साथ आम्हाला होती अशा डोंगराची वाट उतरत ...  माहीत नव्हतं त्या एकामागोमाग एक चालणाऱ्या वाटा कुठवर एकत्र असतील ... पुन्हा भेटतील की नाही ... पण जीवनाच्या चालणाऱ्या या रहाटगाड्यात निदान तात्पुरते तरी सोबती होतो आम्ही ...जिवाभावाचे ... आई वडील , मी ,माझा भाऊ ,माझी छोटी बहीण .. 


        मनात एकच आशा ...पुन्हा कधी येऊ एकत्र असेच आम्ही सगळे त्या धरणीमातेच्या कुशीत ...तिच्या सेवेसाठी ...तिच्यासाठी कष्ट करण्यासाठी ... नाही .. कसं शक्य ते ... आयुष्याने ओढून दिलेल्या रेषा केव्हांच वेगवेगळ्या झाल्यात ... जसं तो डोंगरमाथा रुष्ट होऊन बसलाय ..  आपली  कोणाच्यातरी कष्टाने सुपीक झालेली जमीन नापीक करून ...  निदान त्याने माझ्या वडीलांच्या कष्टाची तरी जाणीव ठेवायची ...  जीव तोडून केलेली मेहनत आता गवत बनून डोकं वर करून उभी आहे .. का कोपला असा निसर्ग...  की त्यालाही समजत नाही गरीब श्रीमंतातला भेदभाव ... सगळं माळरान ओसाड ...  नापीक ... 
       जसं काही हसतयं आमच्याकडे बघून ... पोटासाठी पिकवलंत ना तुम्ही इवल्याशा हातांनी मिळून ... पण आता नाही रहा उपाशी ...मरा उपाशी  ..फरक नाही पडत मला ...फरक नाही पडत मला ... ????


    ( सत्य परिस्थिती .... गरीब शेतकरी आपल्या पोटासाठी पिकवतो ...ना की श्रीमंत होऊन गडगंज बंगले बांधून राहण्यासाठी ...पण हा निसर्गराजा ,, कायमचं त्याला हिणवतो ..हिनवत आला आहे ...) 

               © vaishu patil 

(Photo- माझे पप्पा आणि भाऊ ..व्हीडिओ अपलोड होईना)  miss u both ... #love_u