वर्तुळ भाग ५

Whatever We Do Comes Back To Us


(मागच्या भागात पाहिले , प्रीती माणिक बद्दल माहिती काढायचा प्रयत्न करते. विपुल आणि मालिनी भेटतात तिथेही हा विषय निघतो पण काहीच महत्वाचं मिळत नाही.)

दुसऱ्या दिवशी ऑफीस मध्ये,
"आपल्याला ठोस असं काही मिळत नाही अजून यशश्री ताईंच्या केस बद्दल. मला तुमचं मत विचारात घ्यायचं आहे. काय करायचं? माझं असं मत आहे की यशश्री ताईंना बोलवून स्पष्ट सांगू. जर काही ठोस पुरावा नसेल तर केस उभी राहणार कशी? समजा पोलिस कंप्लेंट केली आणि त्यांनाही काहीच मिळालं नाही तर यशश्री ताईंचं नुकसान होईल. मुळात केस कोणाविरुद्ध करायची? विवेक, माणिक, डॉक्टर, औषध कंपनी काहीच नाहीये आपल्याकडे." मालिनी निराश झाली.
" मॅडम प्रत्येक वेळेला सगळे दोषी नसतात ना. यशश्री ताई आणि त्यांचे यजमान पण चूक नाहीत आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्यांबद्दल संशयास्पद असं काही मिळालं नाही. माझं मत आहे की ह्या केस मध्ये काहीच मुद्दा उरला नाही आता." ललित ने मत मांडलं.
" तुमची ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट मध्ये ओळख आहे ना? त्यांच्या कानावर घालून ठेऊया का फक्तं?" प्रीतीने विचारले.
" नाही असं उगाच आपला संशय आहे किंवा नुसतंच कोणाची तक्रार करू शकत नाही आपण. ते चुकीचं ठरलं तर कंपनी आपल्या विरोधात केस करेल. आत्ता तरी ही केस बाजुला ठेऊ. बंद नाही करायची कारण एखादी दुसरी केस सोडवताना ह्या केसचा संदर्भ मिळेल."
" हो. बरोबर आहे तुमचं. मग आता यशश्री ताईंना फोन करायचा का? मी करते मॅडम गेल्या वेळेस तुम्ही केला होता." प्रीतीने विचारले.
" नाही. ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही दुसरी केस हातात घ्या. ललित त्या डॉक्टर धांडे बद्दल अजून माहिती काढ. त्या केस ची तारीख पंधरा दिवसांनी आहे. प्रीती तू इंटर्न कडून केसचे मुद्दे घे आणि छान खरमरीत लेख लिहून काढ. असल्या उपचारांच्या नावाखाली नको ते धंदे करणाऱ्या बोगस लोकांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे."
" लगेच सुरू करते काम." प्रीती जायला निघाली.
"ऐक थांब जरा. ह्या रविवारी तुम्हा दोघांना वेळ आहे का?" मालिनीने विचारले.
"हो आहे. का?" प्रीती आणि ललितने एका सुरात विचारले.
" लग्नासाठी एक स्थळ आलं आहे. त्याला तुम्हाला भेटायचं आहे."
"आम्हाला??" प्रीतीने जवळपास किंचाळून विचारले.
"हो. काल आम्ही भेटलो होतो कॅफे रूमा ला तेव्हा तुमचा विषय निघाला म्हणजे ऑफिस मध्ये कोण कोण असतं? तेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं. " मालिनीने सांगितलं.
"नाव काय आहे त्यांचं?" ललितने विचारलं.
" विपुल राजे. फार्मसिस्ट आहेत आणि एक मेडिकल शॉप आहे स्वतःचं. तुम्हाला सांगितलं नाही मी पण त्यांना मी विवेक आणि माणिक बद्दल माहिती विचारली. दोघांना ओळखतात ते. त्यांनीही सांगितलं की खडूस आहेत पण व्यापारात थोडं होतंच. बाकी घोळ किंवा बेकायदेशीर काही नाही. व्यवहारात चोख आहेत."
"बरं भेटूया रविवारी." ललित म्हणाला आणि कामाला निघून गेला. प्रीतीसुद्धा भेटूया म्हणून निघाली.
मालिनी यशश्री ताईंना फोन करते.
"हॅलो ताई नमस्कार. वेळ आहे का? थोडं बोलायचं आहे तुमच्याशी."
"हो बोला."
" माफ करा पण केस संदर्भात काही ठोस पुरावा, माहिती मिळाली नाही. तुम्ही पोलिस कंप्लेंट केलीत तर ते शोध घेतील पण काही मिळालं नाही तर उपयोग नाही. तुम्हाला फेऱ्या मारायला लागतील. मुळात कंप्लेंट कोणावर करणार हाच मुद्दा आहे. डॉक्टरांवर केली तर काही निष्पन्न होणार नाही. तेच उलट अब्रूनुकानीचा दावा करतील."
" तुम्हीच करू शकता तेवढा तपास. मी एकटी काही करू शकत नाही. त्यामुळे राहू दे आता हे सगळं. माफ करा तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. पण माझ्या मनात सल कायम राहील की काय चुकलं आहे." यशश्री मुसमुसत बोलली.
" ताई ही केस आम्ही बंद नाही करत आहोत तर जरा वेळासाठी बंद ठेवत आहोत. माझ्या सहकाऱ्यांना आणि मला कुठलाही किंतू पाठी सोडायचा नाही. कधीतरी चुकून अशी केस आली परत तर काही धागेदोरे सापडतील."
" मालिनी तुमची फी नाही परवडणार मला. त्यापेक्षा बंदच करा."
" ताई मी तुम्हाला विचारलं का फी बद्दल? आम्ही पुढे ही केस काढू ते आमचं मत आहे. त्याला काही फी नाही लावणार आहोत. तुमची परिस्थिती मी समजू शकते. आमच्याकडून कमी - जास्त काही बोललं गेलं असेल तर माफ करा."
" मालिनी तुमची काहीच चूक नाही. दैव आमचं त्याला कोण काय करणार? असो मला आत्तापर्यंत जी मदत केलीत त्यासाठी आभार. ठेऊ फोन?" यशश्री ने विचारले.
"हो. सांभाळून रहा आणि काही वाटलं कधी तर फोन करा. अच्छा!" मालिनीने फोन ठेवला. आज पहिल्यांदा मलिनीला दडपण आलं होतं. काही वेळाने ती घरी जायला निघते.
.
……………………………………………………

" आई मी आले ग. आज तुझ्या हातचा चहा प्लिज." मालिनी हातपाय धुवून आली.
"काही झालंय का आज?" आशा स्वयंपाकघरातून विचारते.
"हो. आम्ही यशश्री ताईंची केस बंद केली. फार वाईट वाटलं मला. बघ ना सगळं बरोबर, सगळ्यांचं बरोबर पण कुठेतरी चूक आहेच. "
"मालिनी घरी विचार करू नकोस आता त्याचा. ते ऑफिस मध्ये ठेवायचं. शिक आता. सासरी गेलीस की केस बद्दल बोलत बसणार का रोज? काही ना काही घडतंच तुझ्या कामात. "
" आई मी कधी बोलते का अगं? पहिल्यांदा मला असं हरल्यासारखं वाटतंय. इतर वेळेस नाही वाटंत पण आज जड गेलं मला."
" बरं बाई सॉरी. नको वाईट वाटून घेऊ. खरं काय असतं ते नेहमीच बाहेर येतं. हे सगळं तू मला सांगितलंस पण विपुलरावांशी काय बोलणं झालं ते नाही सांगितलंस. काल आलीस आणि जी खोलीत काम करत बसलीस ती तिथेच. सांग ना?"
"तुला का एवढा उत्साह आला आहे? काही नाही साधरण ते काय करतात, माझं काम कसं आहे असं बोललो. माझ्या अपेक्षा आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. रविवारी परत भेटणार आहोत. प्रीती आणि ललित सुद्धा येणार आहेत."
" आता ती दोघं कशाला? कबाब मे हड्डी."
"अगं आई माझ्या कामाचा विषय निघाला मग हे दोघे आलेच ना. विपुलना भेटायचं होतं मग त्या दोघांना. त्यांना असं वाटंत असेल की प्रीती आणि ललित कडून माझ्याबद्दल अजून काही माहिती मिळेल. माझ्याबद्दल अंदाज घ्यायचा असेल त्यांना आणि त्यात काही चूक नाही. त्यासाठीच आम्ही भेटतोय."
" अरे वाह. आत्तापासून त्यांच्या मनातलं कळतं की काय तुला?" आशाने गमतीत विचारले.
" काही काय हा अंदाज आहे तो कोणीही व्यक्त करू शकतो. चल जेवणाचं काय करायचं? आज मी करणार. काल सगळं तुला करायला लागलं." दोघी स्वयंपाकघरात जातात.

……………………………………………………..
"विपुल जेवायला ये खाली." कल्याणीने जोरात आवाज दिला.
"हो आई आलोच." विपुल खाली आला आणि जेवायला बसला.
" पुढे काय झालं मालिनीच्या बाबतीत? का ह्या बाबतीत सुद्धा आम्हाला निराश करणार?" मुकुंदने विचारले.
"भेटणं चालू आहे. काय होतंय ते मी आईला सांगतो. तुम्ही जास्त काळजी करायची गरज नाही. मला हवं तेच मी करणार आणि तेच होणार." विपुल जरा रागातच बोलतो.
"बघा राग केवढा येतो. थोडंसं कमवायला काय लागला तर किती माज. चांगलं पद, वैज्ञानिक झाला असता किंवा डॉक्टर जरी झाला असता ना तर कसं सांगायला चांगलं जातं. आम्ही काय सांगतो एक मेडिकल आहे फक्तं आमच्या पोराचं."
"अहो तुम्ही हा विषय जेवताना काढू नका प्लिज. विपुल जेव तू." कल्याणी समजुतीच्या सुरात बोलली.
"आई तू काळजी करू नकोस मी जेवणार पोटभरून. हे काय नेहमीच होतं. मला अजून वाढ थोडं मी हॉलमधे जातो." विपुल निघून गेला.
" तुम्ही असच करणार आहात का? सून यायचे दिवस आलेत आता तिच्या समोर असं काही बोललात तर किती वाईट वाटेल."
" मुळात ह्याला मालिनी हो म्हणणार नाही त्यामुळे एखादी मेडिकल शॉप बघणारीच आणू ह्याला बायको म्हणून." मुकूंद इतकं बोलूनच थांबले. कल्याणी ह्या दोघांचं कसं होणार हया विचारत हरवली.

क्रमशः

© स्वराली सौरभ कर्वे.

( ही कथा काल्पनिक पात्र आणि काल्पनिक मुद्दे घेऊन लिहिली आहे. कुठल्याही पात्राचा, केस चा ह्या कथेशी संबंध नाही. तसा संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

🎭 Series Post

View all