Jan 26, 2022
नारीवादी

वर्तुळ भाग ३

Read Later
वर्तुळ भाग ३
(मागच्या भागात मालिनी यशश्री ताईंना बोलवायला सांगते आणि विवेक फोन वर ललित बद्दल एका माणसाशी बोलतो.)

" यशश्री ताईंना फोन केला त्या अर्धा तासात येतील."
" छान. त्या येईपर्यंत आपण त्यांच्याशी काय बोलायचं, काय विचारायचं ते एकदा ठरवून घेऊ."
" चालेल. एकदा ह्या प्रकरणाची उजळणी करूयात. काय ललित?" प्रीती नेहमीची मजा-मस्करी बाजूला ठेऊन भूमिकेत शिरलेली असते.
मालिनी बोलायला सुरवात करते,"तर ही केस आपल्याकडे ५ दिवसापूर्वी आली. यशश्री ताईंच्या मिस्टरांना म्हणजे विनायक ह्यांना टीबी झाला होता आणि त्यांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन
नुसार अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक औषधं घ्यायला सुरवात केली. काही दिवस बरं वाटून नंतर त्यांची तब्येत खालावत गेली. काही महिने उपचार करून पण ते शेवटी न्यूमोनिया होऊन गेले. यशश्री ताईचं असं म्हणणं आहे की त्यांना उपचारच नीट दिले गेले नाहीत.”
“ त्यांनी आपल्याला सगळे रिपोर्ट आणि औषधं दाखवली अगदी प्रिस्क्रिप्शन सुद्धा होती त्यात म्हणजे त्यांचे मिस्टर औषधं नीट घेत असणार हे म्हणू शकतो. म्हणजे त्यांनाही ती शंका नाही कारण त्या स्वतः औषधं देत होत्या." ललित सांगतो.
" बरोबर. आता त्यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टरांकडून चूक झाली असेल हयात. प्रीती तू डॉक्टरांना फोन करून ह्या संबंधी माहिती घेतलीस का?"
" हो. त्यांनी जे घडलं ते सांगितलं. मी दुसऱ्या काही डॉक्टर ना ही औषधांची नावं पाठवली त्यांनीही सांगितलं की हे उपचार आणि औषधं बरोबर आहेत.त्यामुळे त्यांचा काही दोष नाही."
"ठीक आहे."
इतक्यात यशश्री ताई येतात.
"मी येऊ का आत?"
"हो या ना. तुमचीच वाट बघत होतो आम्ही आणि केस संदर्भात बोलत होतो. या बसा."
यशश्री बसतात.
" काय झालं पुढे? मला वेळ नव्हता चार दिवस. काय करायचं आता पुढे? माझ्या नातेवाईकांनी सांगितलं म्हणून मी इथे झाले होते मला कोर्ट, कंप्लेंट ह्यातलं काही कळत ही नाही आणि माहितीसुद्धा नाही.माझ्या अहोंना खरंच चुकीच्या गोळ्या दिल्या असतील तर मात्र आम्हाला न्याय हवा."
" शांत व्हा. डॉक्टर ना आम्ही विचारुन त्यांच्याबद्दल नीट चौकशी केली. त्यांनी जे उपचार केले ते सगळे बरोबर आहेत. आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडून ते तपासून घेतलं आहे."
"मग कोणाची चूकच नाही का? आम्ही सगळं नीट केलं, सगळे उपचार, एक्स- रे, औषधं सगळं नीट केलं. मग चूक कोणाची? का हेच नशिबात होतं माझ्या? म्हणजे ह्या केसला काही अर्थ नाही आता?"
" यशश्री ताई आत्ता तरी तसा ठोस पुरावा किंवा संशय येईल असं काही मिळालं नाही. आम्ही ह्या गोल्यांबद्दल चौकशी करणार आहोत तोच एक मुद्दा राहिला आहे आता नाहीतर ही केस म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही."
" ठीक आहे मी काय बोलू? म्हणजे आत्ता तुम्ही मला का बोलवून घेतलं?"यशश्री विचारतात.
" तुम्ही एकदा परत आम्हाला सगळं नीट सांगाल का? माफ करा तुमच्यासाठी कठीण आहे हे परत परत सांगणं पण आम्हाला नव्याने काही कळू शकतं."
यशश्री खरं तर अजिबात मनस्थितीत नसतात पण त्या सगळं सविस्तर सांगतात आणि ह्या वेळेला ललित ने ते त्यांचा संमतीने रेकॉर्ड केलं.
"ताई पुढे काय होतंय ते आम्ही तुम्हाला कळवू पण आमच्याकडून तुम्हाला कमीतकमी त्रास होईल ह्याची खबरदारी घेऊ."
यशश्री तिथून निघतात.
" ललित,प्रीती डॉक्टर ची चूक नाही आणि ह्यांची पण नाही. आता आपण गोळ्यांवर लक्ष देऊ. तिथेच गडबड आहे. यशश्री ताई जिथून गोळ्या घेतात तिथे बऱ्याच गोळ्या मेडिकॉम कंपनीमधून वितरित केल्या जातात म्हणून आपण तिथली माहिती मिळवली. हा व्हिडिओ संशयास्पद आहे पण ह्या केस शी काय संबंध येईल त्याचा? असं आपण उगाच संशय म्हणून कोणाला अडकवू नाही शकत. चला आज एवढं बास करूया . घरी जा दोघं मी सुद्धा निघते. उद्या भेटू आणि पुढचं ठरवू."
मालिनी ऑफिस मधून बाहेर पडते आणि तिचा फोन वाजतो. नंबर सेव्ह केलेला नसतो.
" हॅलो. कोण?"
"मालिनी मी विपुल. ओळखलंत ना?”
“हो. बोला.”
“कामात आहात का? म्हणजे मी ऑफिस मधून साधारण निघाला असाल हे समजून फोन केला.”
“कामात नाही आहे पण बोला.”
“आपण भेटूया का? काल बोलणं झालं होतं ना आपलं. उद्या वेळ आहे का? मला उद्याच वेळ आहे. बुधवारी दुकान बंद असतं. तुम्हाला वेळ असेल तरच भेटू नाहीतर नाही.”
“चालेल उद्या काही हरकत नाही फक्त दुपारी चार नंतर. कुठे भेटायचं?”
“ तुम्हीच सांगा. मला वेळ आणि जागा दोन्हीची हरकत नाही.”
“ कॅफे रुमा आहे तिथे भेटू. पत्ता पाठवते.”
“ मला माहिती आहे कुठे आहे कॅफे. मी येईन.”
“ ग्रेट. भेटूया मग.”
मालिनी फोन ठेवते आणि घरी जायला निघते.
. . . . . .. . .. . . . ..... …. ...... ........ …. ...... ....... ..... ....... ........ ........ …. ........ ....... ...... ..... ....

विपुल फोन ठेवून मागे वळतो तोच पाठी कल्याणी उभी असते.
“ आई! मी दचकलो ना.”
“ का रे? असं काय बोलत होतास ? मालिनीचा फोन होता ना? काय म्हणाली?”
“ आई तू काय कां देऊन ऐकणार आहेस का सगळं? हो मालिनीचा फोन होता पान मी केला होता. उद्या भेटायचं का हे विचारायला.”
“काय म्हणाली? तुला खरंच वाटतं ही तुला होकार देईल? मुलगी चांगली आहे मला आवडली पण जरा जास्त स्पष्ट आहे. तुझ्या बाबांना तर ती पसंत आहे कारण त्यांना हे असं वेगळं काही करणारी मुलं आवडतात.”
“ अर्थात. मी अपेक्षा पूर्ण नाही केल्या ना त्यांचा. मला आवड नव्हती संशोधन क्षेत्र निवडायची. मला बिझनेस करायचा होता. त्यांना चांगली कमाई पण हवी हतोय आणि चांगली प्रतिष्ठा असलेला जॉब. मी नाही केला प्रतिष्ठेसाठी प्रयत्न पण पैसे कमावतो ना लाखो. तरी ते फार किंमत देत नाहीत मला.” विपुल थोडा नाराजीच्या सुरात असतो.
“ ह्या सगळ्याचा तू विचार कर आणि मग होकार किंवा नकार दे. काल घाईने सांगितलंस हो म्हणून पण आज तू विचार कर. ती मुलगी ह्या घरात आली की पैसे आणि प्रतिष्ठा दोन्ही बाजूने भेदभाव होईल. तिची आणि तुझी काही चूक नसताना ह्यामुळे वाद होऊ शकतील, कितीही समजावलं मनाला तरी बायको वरचढ झाली की तुम्ही पुरुष दुखावता. नैसर्गिक म्हणा किंवा इतर काही. ह्या सगळ्याचा विचार कर.”
“ आई माझा निर्णय पक्का आहे मी मालिनीशीच लग्नं करणार आणि तिचाही होकार येईल याची खात्री आहे. तिची कमाई किंवा बाबांना काय आवडलं ह्याबद्दल जाऊ दे मला तिचा स्पष्ट स्वभाव आवडला. आमची वादावादी तर नक्की नाही होणार कधी. “
“ बरं तुझी मर्जी.”
“ तुला पसंत ना ती?”
“ हो मला काहीच अडचण नाही.”

..... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . ..

मालिनी घरी येते. तिच्या डोक्यात यशश्री बद्दल विचार चालू असतो.
"आई मी आले. चहा करशील प्लिज…"
"काय मालू काही झालंय का तुला? एरवी आलीस की तुला करायचा असतो चहा. आज माझ्या हातचा चहा म्हणजे विशेष काहीतरी आहे किंवा अडचण."
"आई आत्ता चालू असलेल्या केसेस मध्ये यशश्री ताई म्हणून आहे त्यांची केस दोन दिवस आम्ही डिस्कस करतोय. अजून केस म्हणून त्यात काही सापडलं नाही. इतकी लोकं रडताना, दुःखी होताना पाहिली आहेत पण त्यांना न्याय दिला आहे. ताईंच्या केस मध्ये आत्ताच मला हरल्यासारखं वाटतंय. असं कधी वाटलं नाही ह्या आधी."
" मालू एक सांगू? तू सारखी कामात असतेस. मैत्रिणी, मित्र सगळे आहेत तुझे पण आता तू तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल विचार कर. एक सोबत असणं गरजेचं आहे."
" तू आहेस की आई. अजून काय सोबत हवी."
" मी आहेच पण तुझ्या वयाचा, तुझा सोबती होईल असा कोणीतरी. विपुल चांगले वाटले मला. त्यांची माहिती मी काढली आहे. शेजारी-पाजारी, नातेवाईक जवळपास राहतात सगळ्यांनी चांगलंच सांगितलं."
"उद्या सांग मला सगळं मी सुद्धा माहिती काढणारच आहे. हो उद्या मी आणि विपुल भेटणार आहोत. आजच फोन झाला. त्यामुळे मला यायला उशीरच होईल."
" अरे वाह! चला गाडी पुढे सरकली एकदाची." आशाच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि मालिनी तिच्या भोळ्या हासऱ्या चेहऱ्याकडे बघून सुखावते.

क्रमशः

© स्वराली सौरभ कर्वे.

( ही कथा काल्पनिक पात्र आणि काल्पनिक मुद्दे घेऊन लिहिली आहे. कुठल्याही पात्राचा, केस चा ह्या कथेशी संबंध नाही. तसा संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swarali Saurabh Karve

Business

लिखाणाचा प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात आहे.