Login

वर्तुळ भाग २

आपण केलेलं काम आपल्याकडे परत येतंच असतं


( मागच्या भागात पाहिलं मालिनी कडे राजे कुटुंब बघण्याच्या कार्यक्रमासाठी येतात आणि शेवटी विपुल मालिनी ला बघत असतो.)

" मला खरं तर हे असं बघण्याचा कार्यक्रम वगैरे आवडत नाही पण आईची इच्छा त्यापुढे काय करायचं?" मालिनी तिचं मत सांगते
"हो आम्हाला पण चाललं असतं पण तुमच्याकडून तसं काही बोलणं झालं नाही म्हणून आलो."
" अहो काकू तसं नाही. मी फक्त माझं मत मांडलं. तुम्ही आलात म्हणून मी बोलत नाही. गैरसमज करून नका घेऊ ."
"नाही ग. गैरसमज कसला. तुझं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. तुझा स्पष्टवक्तेपणा आवडला मला."
" आमची मालिनी जरा जास्तच स्पष्ट बोलते पण मनात वाईट काही नसतं हो तिच्या. तुम्ही चहा, कॉफी, सरबत काय घेणार? "
" चहा चालेल सगळ्यांना. बाकी फार काही करू नका आम्ही लगेच निघणार आहोत आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे." कल्याणी ने सांगितलं.
" मी काय म्हणतो चहा होईपर्यंत मालिनी आणि विपुलला गप्पा मारू देत का? म्हणजे त्यांना त्याचं वेगळं काही बोलता येईल." मुकुंद विचारतात.
“ हो चालेल ना. मालिनी जा त्यांना गच्चीत घेऊन जा.”
मालिनी आणि विपुल दोघेही गच्चीत जातात.
“मालिनी तुमचं काम एकदम छान आहे. म्हणजे आपलं पुढे जमेल की नाही माहित नाही पण तुमचं काम समजून घ्यायला आवडेल. तुम्ही एवढ्या किचकट, जोखीम असलेल्या केसेस सोडवता . भीती नाही वाटत ?”
“भीती ? वाटते ना. भीती कोणाला नाही वाटत? पण माझं काम ही माझी आवड आहे. तुम्ही सांगा. तुम्ही काय करता?”
“ मी? माझा काय छोटासा व्यवसाय आहे. फार्मसी आहे माझी. तुमचं स्थळ आलं तेव्हा भीतीच वाटली की नको तुमची काय प्रतिक्रिया असेल? माझ्याकडेही तुम्ही संशयाने बघाल कायम . कसं जमेल? खरं तर माझी माहिती वाचूनच तुम्ही नकार द्याल असं मला अपेक्षित होतं पण तसं नाही झालं. इथे येऊन कळलं की तुम्ही माहिती वाचली नाही. तुमचा नकार आला तरी मला नवल वाटणार नाही. “
“ तुम्ही घाबरणार का आता मला? मी काही सगळ्या फार्मा आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना त्रास नाही देत. जे गुन्हा करतात त्यांना त्रास देते. तुम्ही असं काही करता का? नाही ना? मग संशय कशाला घेऊ?”
मध्ये थोडा वेळ दोघंही काहीच बोलत नाहीत.
“ बाकी तुमच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत? म्हणजे सहज ..... “
मालिनी किंचित हसते .” फार काही नाही. माझ्या आईला माझ्या बरोबरीने सांभाळणारा, माझ्या कामाचा आदर करणारा आणि माझ्या वेळांना महत्व देणारा नवरा हवा. इतक्या साध्या तीन अपेक्षा आहेत बाकी मी सगळं करू शकते. कामाची काही ठराविक वेळ नसते माझी. “
“मला चालेल.” विपुल पटकन बोलून जातो. मालिनीही चमकून त्याच्याकडे पाहते.
तेवढ्यात आशा त्यांना आवाज देते.” मालिनी, विपुलराव खाली या. चहा तयार आहे.
दोघंही खाली जातात. चहा ,खाणं , गप्पा सगळं व्यवस्थित होतं.
" वाह छान झालं सगळं. बरं आशाताई हा असा बघण्याचा कार्यक्रम आमच्यासाठी नवा अनुभव आहे. मालिनी पहिलीच मुलगी. जर आमच्याकडून काही कमी- जास्त बोललं गेलं असेल तर सोडून द्या हो."
" नाही नाही. तुम्ही असा विचार करू नका. सगळं छान झालंय."
" बरं येतो आम्ही आता. आमचा काय तो निर्णय तुम्हाला दोन दिवसात कळवू. चालेल ना विपुल?" कल्याणी उगाच खोड काढते.
"कशाला? मालिनी मला तुम्ही आवडला आहात. मी एकदाच निर्णय घेतो आणि शेवटपर्यंत साथ सोडत नाही. मालिनी आणि काकूंना विचार करायला हवा ना पण! तुम्ही सांगा आम्हाला फोन करून."
"एक मिनिट. कुठलाही निर्णय घेण्यासाठी आपण एकमेकांना भेटू आधी. असं एका भेटीत मी निर्णय नाही देणार. तुम्हाला मी नीट ओळखत पण नाही. आपण एकमेकांना ओळखून घेऊ, आवड - निवड, दिवसभर काय करतो आपण आणि असं बरंच. काही वेळा भेटल्याशिवाय नाही होणार हे."
"हो चालेल मला. आवडेल खरं तर. आई बाबा तुम्हाला चालेल ना?" विपुल विचारतो.
" आमचं काय. तुम्ही बघा."
" काकू तुम्हाला चालेल ना? म्हणजे मी तुमच्या मुलीला भेटणार, बोलणार ."
" हो. मी जुनाट पद्धतीने वागणारी असले तरी नवं काही स्वीकारायची आवड आहे मला. मालिनीमुळे सतत बदल घडत असतात माझ्यात. तुम्ही भेटा आणि विचार करून ठरवा."
सगळे एकमेकांचा निरोप घेतात. मालिनी आणि आशा आता आरामात बसतात.
" आधी अवघडल्यासारखं झालं होतं पण छान आहेत मंडळी. गप्पा चांगल्या झाल्या."
" बरं आई. फार विचार करू नकोस आत्ता त्यांचा. तू खूप गुंतत जातेस नाहीतर. मला तो उथळ वाटला खूप किंवा डोक्यात काहीतरी घेऊनच आल्यासारखा. इतका पटकन निर्णय कोणी वस्तू खरेदी करताना पण नाही घेत."
" मालिनी प्रत्येक गोष्टीकडे वकील म्हणून पाहू नकोस."
" आई असं असतं तर घरात , आपल्या नातेवाईकांना पण मी तसच पाहिलं असतं ना? मला कळतं काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवणं. हा मुलगा मला नीट कळला नाही पण मी भेटणार जरुर ह्याला." मालिनी ठामपणे सांगते.
मालिनी भेटायला तरी तयार झाली ह्या विचाराने आशा मनातून सुखावते.

……………………………………………………
दुसऱ्या दिवशी मालिनी ऑफिस मध्ये जाते. प्रीती आणि ललित आधीच आलेले असतात.
" काही माहिती मिळाली का?"
" फार नाही पण व्हिडिओ मधल्या दोन्ही माणसांची माहिती काढली. पहिला निळा शर्ट असलेला विवेक आणि दुसरा माणिक. दोघंही औषधांचे वितरक आहेत."
" मेडिकॉम च्या ऑफिस मध्ये काय करत होते हे? तुम्ही एक काम करा. ललित ह्या वेळेला तू ऑफिस मध्ये जाऊन ये त्यांचा. काही तरी मार्ग नक्की मिळेल."
ललित लगेच मेडिकॉम ऑफिस चा रस्ता धरतो.
मेडिकॉमच्या ऑफिस मध्ये रिसेप्शन वर:
" नमस्कार. मला माणिक सरांना भेटायचं आहे."
"कोण? माणिक सर नावाचं कोणी नाही इथे. तुमचं काय काम आहे ?"
" बरं विवेक सर आहेत का?"
" हो. तुमचं काम काय आहे?"
" मला मेडिकल स्टोअर काढायचं आहे ऑनलाईन. त्यासाठी त्यांना भेटायचं आहे."
"बरं सांगते त्यांना."
रिसेप्शनिस्ट फोनवर बोलते आणि ललितला केबिन दाखवते.
ललित आत जातो तर समोर विवेक बसलेला असतो.
" नमस्कार मी ललित. मला ऑनलाईन फार्मसी सुरू करायची आहे. त्यासाठी तुम्ही मला औषधं पुरवू शकता."
" ऑनलाईन फार्मसी?" विवेक जरा शंकेने ललितकडे बघतो." तुझं नाव ऐकलं नाही ह्या आधी."
" म्हणजे? माझं नाव ऐकायला मी काही इतका प्रसिद्ध नाही. आत्ता सुरू करतोय हे सगळं."
" ठीक आहे. तुझं कार्ड देऊन ठेव. बघू नंतर."
" कार्ड? नाही म्हणजे छापली नाहीत अजून. नंबर देऊन ठेवतो."
काही सेकंदाचा वेळ घेऊन ललित विचार करतो,\" माणिक बद्दल विचारू का नको? शिष्ट आहे हा माणूस. संशय येईल माझा. जाऊ दे.\"
" झालं का अजून काही विचारायचं आहे?" विवेक विचारतो.
" नाही. मला नक्की फोन करा."
विवेक काहीच बोलत नाही. ललित निघून सरळ ऑफिस मध्ये येतो.
" काहीच हाताला नाही लागलं. मी सरळ जाऊन विवेक ला भेटलो. भयानक आहे तो बोलायला तरी. माझा संशय आलाय त्याला बहुतेक."
" अरे पण तू सरळ त्यालाच काय भेटलास? बाकी काही चौकशी करायची ना." प्रीती वैतागून बोलते.
" आपण कमी चौकशी केली का? उलट अजून विचारत राहिलो असतो तर संशय आला असता." ललित थोडा चिडून बोलतो. दोघंही बराच वेळ वाद घालतात.मालिनी काहीच बोललेली नसते. दोघंही थोडे शांत झाल्यावर बोलते," अजून आपला संशय आहे फक्त. असंही असेल की काही झालं नाही. ह्या दोघांना जरा आपण बाजूला ठेवू. आपण तिथेच अडकून आहोत चार दिवस. एक काम करा आत्ताच यशश्री ताईंना फोन करा. त्यांनी ही केस आपल्यापर्यंत आणली आहे. पुन्हा एकदा सगळं नीट ऐकून आणि समजून घेऊ. कदाचित असा मुद्दा सापडेल जिथे आपण दुर्लक्ष केलं."
तिघेही एकमेकांकडे बघतात.
…………………………………………………….
" तो छोकरा येऊन गेला. फोटो पाठवला होता अगदी सेम तोच. भानगड काय आहे? अडकलो ना ह्यात तर राडा होईल." ललित निघून गेल्यावर विवेक फोन वर बोलत असतो.
" असं काही होणार नाही. मी सांगतो तेच करायचं ह्या पुढे. छोटी अडचण आहे ही सोडवून टाकू. ठेवा फोन."
विवेक च्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती….

क्रमशः

© स्वराली सौरभ कर्वे.

( ही कथा काल्पनिक पात्र आणि काल्पनिक मुद्दे घेऊन लिहिली आहे. कुठल्याही पात्राचा, केस चा ह्या कथेशी संबंध नाही. तसा संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)