वर्षश्राद्ध

कथा आजीच्या श्राद्धाची

वर्षश्राद्ध 



कितीही लवकर निघण्याचा प्रयत्न केला तरी उशीर झालाच.. पण मुलांना शाळेत पाठवून, त्यांची खाण्यापिण्याची सोय करेपर्यंत वेळेत निघणे नाहीच जमले. खरेतर मुलांनाही सोबत घ्यायला हवे होते.. पण.. तिथे आपलेच काय स्वागत होईल याची खात्री नव्हती.. अशावेळेस मुलांची का हेळसांड करा हाच हेतू मनात होता. सुलेखा तिच्या नवर्‍याबरोबर, अमित सोबत माहेरी चालली होती.. दोघेही गाडीत बसले. कितीही घाई केली तरी आता पोचेपर्यंत बारा तरी वाजणारच.. दोनेक तासांचा प्रवास संपवून ते दोघे घरी पोचले.. उशीर झाला होता म्हणून गाडी कुठेच न थांबवता ते आले होते. वाटेत चहासाठी सुद्धा थांबले नव्हते.. त्यात निघताना झालेल्या गडबडीत पाणी सुद्धा घ्यायचे राहिले होते. घशाला कोरड पडली होती. अमित गाडी लावेपर्यंत सुलेखा घरात गेली. एका बाजूला विधी चालू होते. सुलेखाचे काका , बाबा आणि सगळी भावंडे तिथे बसली होती. आजीचा हार घातलेला फोटो तिथे ठेवला होता. तो फोटो बघून सुलेखाला भरून आले. दुसरीकडे आई ,काकू , आत्या यांच्यासोबत बसली होती.. तिच्या पाठोपाठ आलेल्या अमितला बघून आई उठली. पण वहिनीने दखलही घेतली नाही. सुलेखा आईसोबत आत गेली.. पाणी घेतले. आईने गरम केलेला चहा, पाणी तिने अमितला दिला.. वहिनीने केलेले दुर्लक्ष तिला जरा खटकलेच..

         तशीच ती आत्या, काकूमध्ये जाऊन बसली.. सुलेखाला दोन काका आणि एक आत्या.. तिचे वडील सगळ्यात मोठे आणि आत्या सगळ्यात धाकटी.. तिच्यात आणि आत्यामध्ये तसे जास्त अंतर नव्हते. त्यामुळे त्या दोघींचे छान जमायचे. आत्ताही आत्याने तिची विचारपूस केली.. त्या मायेच्या शब्दाने तिला बरे वाटले.. ती येण्याआधी आजीचाच विषय सुरू होता. दुसरी काकू आजीच्या आठवणी काढून उमाळे काढत होती. सुलेखाला आठवले.. 

तिचे नुकतेच लग्न झाले होते. ती अशीच आजीला भेटायला आली होती.. आजी थोडी दुखावल्यासारखी वाटत होती.. "काय ग काय झाले आजी? अशी उदास वाटतेस?"

" तुझा माझ्यावर विश्वास आहे?"

" हे काय आता नवीन?"

" सांग ग बाई आधी.."

" हो.. "

" घे माझी शपथ.."

" तुझी शपथ.. सांग आता."

" कोणाला सांगू नकोस माझी शपथ आहे तुला.. मी चोर आहे का ग?"

" काहिही काय? बरी आहेस ना तू?"

" मग सांग ना, माझ्यावर चोरीचा आरोप कसा करू शकतात ग. आजपर्यंत कोणाच्या पाच पैशांवरही डोळा ठेवला नाही ग.. आणि आज माझ्याच घरातली माणसे माझ्यावर चोरीचा आरोप करतात.. कोणत्या जन्माचे पाप ग हे?" असे म्हणत आजी रडायला लागली..

" शांत हो आधी.. कोण तुला काय बोलले?"

"तुझी काकी म्हणते, मी तिची अंगठी घेतली म्हणून.. अग ढिगभर दागिने होते माझ्या वडिलांकडे पण कधीच कशालाच हात लावला नाही, आणि आता या वयात हे असले आरोप नाही ग सहन होत.."

" तू रडू नकोस.. शांत हो आधी.. मी बोलू का?"

" नको.. काय बोलणार तू? आणि कोण ऐकणार तुझे?"

नंतर ती अंगठी सापडल्याचे आजीनेच फोन करुन सांगितले होते.. किती हायसे वाटत होते तिला.. काकूशी बोलायची सुलेखाची इच्छाच मरून गेली.. दुसरी काकू तिच्यावर, तिच्या मुलांवर आजीचे किती प्रेम होते ते सांगत होती. आपण तिची पथ्यपाणी कशी पाळली.. तिला आवडते ते कसे करून खायला घातले हे ती सांगत होती. सुलेखाला मनाशीच हसली.. आजीचा ऋषीपंचमीचा जन्म.. तो सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखा दिवस आणि गणपती निमित्ताने सगळे एकत्र यायचेच.. तेव्हा आजीचा वाढदिवस जोरात साजरा व्हायचा.. आजीला ऋषीची भाजी आणि गुलाबजाम खूप आवडायचे.. म्हणून लग्न झाल्यावर तिने मुद्दाम बनवून नेले होते.. आम्ही सुद्धा आजीचा वाढदिवस साजरा करतो हे दाखविण्यासाठी काकूने काकाला त्या दिवशी बाहेरून जेवण मागवायला सांगितले.. पण ती भाजी काही आजीला खाऊ दिली नाही.. निघताना दोघी गळ्यात पडून रडल्या होत्या..

          विधी संपले होते.. गुरूजींनी सगळ्यांना नमस्कार करायला बोलावले.. सगळ्यात शेवटी आत्या उठली.. नमस्कार करतानाच ती हुंदके देत होती. नमस्कार करून उठली तेच ती सुलेखाच्या बाबांच्या गळ्यात पडून रडायला लागली.. तोंडाने 'मला माफ कर.. मी एकदाही नेऊ शकले नाही आईला..' असे पुटपुटत होती.. 

        दोन वर्षांपूर्वीपर्यंत आजी छान चालत होती.. बाथरूममध्ये पाय घसरल्याचे निमित्त काय झाले आणि चालतीबोलती ती एकाजागी खिळून राहिली.. सगळ्यांनाच ते अवघड गेले. त्यात आलेले वहिनीचे बाळंतपण. दोन्ही काका बाहेरगावी रहात असल्यामुळे आजी सुलेखाच्या बाबांकडेच होती. मग बाळाचे करायचे कि आजीचे? सुलेखाच्या आईबाबांचे फार हाल होत होते.. तेव्हा आईबाबांनी आत्याला विचारले होते थोडे दिवस आजीला घरी नेऊ शकशील का म्हणून.. पण आत्याच्या घरी तिचे सासूसासरे होते. म्हणून आत्याला हो हि म्हणता येईना किंवा नाहीसुद्धा.. नेमकी सुलेखासुद्धा तिच्या सासरच्या लग्नासाठी बाहेरगावी होती.. शेवटी वहिनीच परत काही दिवसांकरिता माहेरी परत गेली.. नंतर काकाने आजीला थोडे दिवस नेले त्याच्याकडे. पण ते दोघेही दिवसभर कामाला जात असल्यामुळे आजीला बघणार कोण हा प्रश्न आला.. सुलेखाचे आईबाबा निवृत्त असल्यामुळे त्यांनी आजीची जबाबदारी घेतली.. पण त्यांचीही साठी उलटली होती.. दिवसभरासाठी जरी बाई ठेवली होती तरी रात्री अपरात्री आजीचे करायला लागे.. मग त्यातूनच आजीला काही दिवस वृद्धाश्रमात ठेवण्याचे निघाले.. पण आपली आजी वृद्धाश्रमात हा विचार सुलेखाला सहनच झाला नाही.. तिने या गोष्टीला विरोध केला.. हि गोष्ट वहिनीला लागली होती.. तेव्हापासून तिने सुलेखाशी जास्त बोलणे सोडून दिले होते.. आजीला जाऊन वर्ष झालेतरी तिचा राग कमी झाला नव्हता. आत्याला असे रडताना पाहून सुलेखाच्या मनात विचार आला.. 'आजीला चार चार मुले असूनही आज तिच्यावर अशी वेळ आली.. उद्या जर देव न करो आणि आईबाबांना सांभाळायची वेळ आली तर मला जमेल ? कि आपणही आत्यासारखे फक्त रडत बसू..' हा विचार मनात येताच समोरच्या आजीच्या फोटोला नमस्कार करायचे सुद्धा भान सुलेखाला राहिले नाही...




कथा कशी वाटली नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई