वारसा असाही अंतिम

कथा मायलेकींच्या संघर्षाची..


वारसा असाही.. भाग ४


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा..
विषय : कौटुंबिक
जिल्हा : मुंबई..

मागील भागात आपण पाहिले, मालतीताई त्यांच्या गतकाळातील घटना गुरूजींना सांगत आहेत. त्यांचा मुलगा समर गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होतात पाहू आजच्या भागात..


" अग बोल ना. का जीव टांगणीला लावते आहेस?" मालती बहिणीला म्हणाली.
" ताई, भाऊजी दुसर्‍या लग्नासाठी स्थळ शोधत आहेत.."
" काय?" मालतीच्या हातातून फोन खाली पडत होता. तिने तो कसाबसा धरला.
" काय सांगते आहेस हे?"
" ताई, खरेच. अग त्यांनी एकदोन मध्यस्थांना सांगितले आहे म्हणे. मुलगी वयाने लहान हवी. बाकी जातपात नाही पाहिले तरी चालेल म्हणून. यांना समजल्या समजल्या त्यांनी मला सांगितले. मला माहित आहे आता हे तुला सांगणे योग्य नाही. पण मला रहावलेच नाही. ताई.. ताई.. आहेस का?"
मालती सुन्नपणे बसून राहिली. मुलाच्या जाण्याचा घाव भरायच्या आतच नवर्‍याने नवीन घाव द्यायची तयारी केली होती. काय करावे, कोणाशी बोलावे काहीच सुचत नव्हते. एवढी फॅक्टरी आहे, पैसाअडका आहे तू नोकरी करू नकोस म्हणून श्रीकांतने मालतीला कामासाठी बाहेर पडू दिले नाही. आणि आता स्वतः स्थळ बघतो आहे या वयात. ना माझी चिंता ना आपल्या मुलीची. आपला वंश एवढा महत्त्वाचा आहे याच्यासाठी की बायको आणि मुलगी त्याला दिसतच नाही. नशीब बलवत्तर म्हणून थोडी बहुत बचत करून ठेवली आहे. पण त्यावर आयुष्य जाईल? मधुच्या भविष्याचे काय? विचार करून करून मालतीचे डोके बधिर होऊ लागले. आज काही झाले तरी याचा सोक्षमोक्ष लावायचाच असे तिने ठरवले. त्या दिवशी श्रीकांत आला तोच आनंदात.
" मालती, मला एका पेपरवर तुझी सही हवी आहे.."
" कसल्या घटस्फोटाच्या?" श्रीकांतचा चेहरा पडला.
" तुला कसे समजले?"
"ते महत्वाचे नाहीये आता. पण लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर सुद्धा तुम्हाला माझ्याशी खोटे बोलून घटस्फोट हवा आहे या गोष्टीचे जास्त वाईट वाटते."
" हे बघ मालती, हे फक्त लग्नापुरतेच असेल. मी दुसरे लग्न करतो. मला मुलगा होऊ दे. मी तिला सोडून परत तुझ्यासोबत संसार करीन." श्रीकांत मालतीला समजावत होता.
" लग्न, संसार म्हणजे भातुकली वाटली का तुम्हाला? आज हिच्यासोबत, उद्या तिच्यासोबत. आणि उद्या तिलाही मुलगा नाही झाला तर?" मालतीने चिडून विचारले.
" हे असे वेडेवाकडे बोलू नकोस. मी करणार दुसरे लग्न आणि मिळवणार मुलगा. माझ्या वंशाला वारस. यामध्ये जर तू आलीस ना तर.." श्रीकांतच्या डोळ्यात वेडसर झाक दिसत होती.
"माझा आणि मधुचा काही विचार?" मालतीने शेवटचा प्रयत्न करून पाहिला.
" विचार कसला? तू इथेच रहायचे. मला मदत नको का?" त्याचे डोळे वेगळेच काहीतरी सांगत होते. मालतीने त्याच रात्री निर्णय घेतला. तिने तिचे सगळे स्त्रीधन, पैसे काढून घेतले आणि लगोलग घर सोडले. मालती घर सोडून जाताच श्रीकांतने तिला शोधायची तसदीही न घेता ताबडतोब दुसरे लग्न केल्याचे तिला समजले. पण वाईट वाटून घेण्यासाठी तिच्याकडे वेळ नव्हता. तिच्या मधुसाठी तिला उभे रहायचे होते. आणि ती राहिली. हौस म्हणून शिकलेली शिवणकला आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स तिच्या उपयोगी आला. माहेरच्यांच्या थोड्याफार मदतीने तिने शून्यातून विश्व उभे केले. मधुला चांगले शिकवले. स्वतःच्या पायावर उभे केले.

बोलता बोलता मालतीताई थांबल्या. इतका वेळ त्यांची गोष्ट काही न बोलता ऐकणार्‍या गुरूजींनी रहावले नाही.
" पण याचा आणि हिच्या लग्न न जुळण्याचा काय संबंध?"
" संबंध? गुरूजी बरेचसे आईवडील आपल्या मुलांना वारसा देतात चांगल्या नावाचा, गुणांचा फार फारतर संपत्तीचा. माझ्या वडिलांनी मला वारसा दिला आहे त्यांच्या बदनामीचा. " मधुने बोलायला सुरुवात केली.
" मला नाही समजले.."
" सांगते. आम्ही बाबांपासून वेगळे जरी राहिलो तरी बाबांचे नाव टाकले नाही. माझ्या सर्व सर्टिफिकेट्सवर माझ्यासोबत त्यांचेही नाव आहे. पण आता तेच निमित्त मिळाले आहे सगळ्यांना. आम्ही बाहेर पडताचक्षणी बाबांनी एका अशा बाईशी लग्न केले जिच्या चारित्र्याबद्दल शंका होती. हस्ते परहस्ते अशा गोष्टी आमच्या कानावर येत होत्या. आम्ही दुर्लक्ष करत होतो. ज्या नातेवाईकांना आम्ही एकाकी राहताना आमची साधी चौकशीही करावीशी वाटली नाही ते सर्वजण आता लग्नाच्या वेळेस जागे झाले आहेत. माझ्या वडिलांचे सर्व कारनामे आलेल्या स्थळाच्या कानावर घालायचे काम इमानेइतबारे ते करतात. वडिलांनी मला, माझ्या आईला सोडून दुसरे लग्न केले हा माझा दोष असल्यासारखे लोक मला नाकारतात." मधु पोटतिडीकीने बोलत होती.
" तुझी पत्रिका बघू का?" गुरूजींनी विचारले.
" हो. आणली आहे मी." मालतीताईंनी पत्रिका गुरुजींकडे दिली. त्यांनी काही गणिते मांडली.
" तुमच्या आयुष्यातला खडतर योग संपला आहे. इतके वर्ष सहन केलेत आता फक्त काही महिने कळ काढा. तुमचे सर्व चांगले होईल. खात्री बाळगा. दर मंगळवारी बाप्पाला मोदकांचा नेवैद्य दाखवायला विसरू नका आणि शनिवारी मारूतीला तेल.. बस. " गुरूजी धीर देत म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवून दोघी मायलेकी घरी आल्या. मालतीताईंनी काही दिवस स्थळे बघणे थांबवले होते. एक दिवस समोरूनच स्थळ आले राजचे. तो होता उच्चपदस्थ, पण अनाथ होता. मधुचे दुःख समजून घेऊन त्याने तिची साथ द्यायची ठरवली.. दोघांनी सुखाच्या संसाराला सुरूवात केली..


काही वर्षांनंतर भाऊबीजेचा दिवस..

" अभिषेकदादा, एका प्रश्नाचे खरे उत्तर देशील?"
" आजच्या दिवशी बहीण जे मागते ते द्यायलाच लागते ना.. बोला मधुताई. काय प्रश्न आहे?"
" तू माझे भविष्य खोटे सांगितले होतेस ना? आमची समजूत पटावी म्हणून?"
" तुझी समजूत पटली?"
" असे नाही पण.." मधुला शब्द सुचेना.
" हे बघ. या विषयावर आज आपण पहिल्यांदा आणि शेवटचे बोलून घेऊ. तुम्ही दोघी जेव्हा माझ्याकडे आल्या होतात खूप त्रासलेल्या होतात. तू तर मानसिक कडेलोटाच्या सीमेवर होतीस. तुला वाचवणे जास्त गरजेचे होते. आकाशातले ग्रहतारे पण आपल्या मनाप्रमाणे चालतात आपली इच्छा असेल तर. मग मी त्याला थोडीशी कर्माची जोड दिली. तुला जर मी सांगितले असते की काही महिने थांब मी तुझ्यासाठी स्थळ शोधतो तर तुझा कदाचित त्यावेळेस विश्वास बसला नसता. पण आता मला सांग राज कसा आहे?"
" तो छानच आहे. एक सांगू त्याच्यापेक्षा छान ना हा बाप्पा आहे ज्याने माझा रक्ताचा भाऊ नेला पण हा धर्माचा भाऊ मिळवून दिला ज्याने माझा नको असलेला वारसा पुसून हा नवीन वारसा दिला आहे." मधु गुरूजींना नमस्कार करत म्हणाली.



नमस्कार.. ही कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे. आपण सुधारलेल्या जगात आहोत असे म्हणतो पण अजूनही वडीलांच्या चुकीची शिक्षा त्यांच्या मुलांना कोणत्या प्रकारे मिळू शकते त्याचे हे उदाहरण. कथेतील मधुला तिचा जीवनसाथी मिळाला पण अजूनही खऱ्या जीवनातील मधु सहचराच्या प्रतिक्षेत आहे.
कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all