वारसा असाही

कथा मायलेकीच्या संघर्षाची..


वारसा असाही..
राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा..
विषय : कौटुंबिक
जिल्हा : मुंबई..


" मधु, झाले का आवरून तुझे? ती माणसे येतच असतील." आईने प्रेमाने विचारले.
" आई, मला परत परत स्वतःला दाखवून घेण्याचा खूप कंटाळा आला आहे. लाज वाटते ग दर रविवारी साड्या नेसायच्या आणि एखाद्या वस्तूसारखे स्वतःला दाखवून घ्यायचे. नंतर आहेच नन्नाचा पाढा." मधु खूपच खिन्न होती.
" नको ग बाळा, असा चेहरा पाडून बसू. आपल्याला माहित आहे ना की त्यात तुझा काही दोष नाही. मग का अशी निराश होतेस? तो वर बसला आहे ना, त्यालाच काळजी ग."
" काही नाही काळजी त्याला.. त्याला जर काळजी असती ना तर त्याने आपल्याला असे वाऱ्यावर सोडले नसते. आई आपण हे लग्न वगैरे सगळे सोडून देऊ यात ना. मी राहीन ग एकटी." मधुला हुंदका फुटला.
" वेडी आहेस का ग तू? एकटीने राहणे कधीच सोपे नसते ग. या जगात ना वखवखलेले लांडगे असतात, टोचून बोलणारे कावळे असतात, ज्यांचा आपल्याशी दूरदूरपर्यंत संबंध येत नाही तरीही आपली बदनामी करणारी गिधाडे असतात." आई मधुच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
" पण आई तू जगलीस की एकटी. मी पण जगेन तुझ्यासारखीच." मधु आईच्या कुशीत शिरत म्हणाली.
" मी एकटी कुठे होते ग. तू होतीस की माझ्यासोबत. माझा मोठा आधार. आता म्हणशील ग एकटी राहते पण नंतर तुलाच समजेल की भयाण असते एकटेपण. नुसते अंगावर येते. नकोच तो विचार. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तरी तुझे दोनाचे चार हात झालेले बघू दे ग.. तेवढेच माझ्या जात्या जीवाला समाधान."
"आई. नको ना असे बोलूस." मधुने आईला घट्ट मिठी मारली.
" बरं नाही बोलत. आता तोंडावरून हात फिरवून घे. ते पाहुणे येतीलच. रडकी मुलगी म्हणून हसतील.." आई हसत म्हणाली.
" आई, तू त्यांना कल्पना दिली आहेस सगळी?" मधुने साशंकतेने विचारले.
" हो ग. मी त्या वधूवरसूचक मंडळाच्या सुनीताताई आहेत ना. त्यांनाच मी सांगितले आहे. या लोकांना त्यांनी सांगितले असेलच म्हणून तर ते येत आहेत. मी तर बजावलेच आहे त्यांना. फोटो जर पसंत पडला तर आधी ती माहिती सांगत जा. म्हणजे त्यांनाही यायचा जायचा त्रास नाही. आणि आपल्या डोक्याला पण त्रास नाही."

" येऊ का आत? मालतीताई.." बाहेरून सुनिताताईंचा आवाज आला.
" ते आले वाटते. जा आवरून घे पटकन." मालतीताई मधुला म्हणाल्या.

" या ना आत." मालतीताई हात जोडत म्हणाल्या. मालतीताईंनी सुनिताताईंना डोळ्याने विचारले. त्यांनी काळजी करू नका असे सांगितल्यावर त्या जरा निश्चिंत झाल्या. आलेले पाहुणे बसले. जुजबी तोंडओळख झाली.
" मुलीला बोलवायचे का?" सुनिताताईंनी विचारले. पाहुण्यांनी होकार दिला. मालतीताई आत गेल्या. त्यांनी हातात पाण्याचा ट्रे धरला आणि मधुच्या हातात आणलेल्या फराळाचा. मधु बाहेर आली. तिने हातातला ट्रे टिपॉयवर ठेवला आणि बाजूला उभी राहिली.
" अग उभी का अशी? ये बैस माझ्याजवळ." सुनिताताईंनी तिला बोलावले.
" तुम्हाला जे काही विचारायचे असेल ते विचारा." सुनिताताई म्हणाल्या.
" तुझे शिक्षण किती झाले आहे?" वरपित्याने प्रश्न विचारला.
" मी स्टॅटिस्टिक्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे."
" पुढे शिकला नाहीत का?" मुलाने प्रश्न विचारला. मधुने त्याच्याकडे पाहिला. दिसायला अगदीच सर्वसामान्य होता.
" नाही. मी शिकत असतानाच मला नोकरीची एक चांगली ऑफर आली. मग शिक्षण पूर्ण होताच मी ती स्वीकारली."
" मग इथे पगार किती आहे?" त्यांचा हा थेट प्रश्न मधुला तसेच मालतीताईंना खटकला. मधुच्या कपाळावरच्या आठ्या बघून मालतीताईंनी तिला शांत राहण्याचा इशारा केला.
" सर्व कापून हातात साठ हजार येतात." त्या कुटुंबाच्या चेहर्‍यावर हास्य आले.
" लग्नानंतर नोकरी करायला माझी हरकत नाही. पण घरकाम करून जायला हवे." वरमाय बोलती झाली.
" करेल ना. इथेपण ती सगळेच करून जाते. कामसू आहे हो माझी मुलगी." मालतीताई बाजू सावरून घेत म्हणाल्या.
" आम्हाला आता काही विचारायचे नाही. आम्हाला मुलगी पसंत आहे."
" पण मला काही प्रश्न विचारायचे आहेत." मधु मध्येच बोलली. वरकुटुंबाच्या चेहर्‍यावर नाराजी दिसू लागली. ते बघून सुनिताताई मध्ये पडल्या.
" हो. विचारायलाच पाहिजे. लग्न दोघांचे आहे म्हटल्यावर."
" तुमचे शिक्षण?"
" मी बारावीनंतर डिप्लोमा केला."
" अच्छा. मग आता कुठे नोकरी करता? कारण माझ्या बायोडेटामध्ये जसे मी माझे शिक्षण, नोकरीचे ठिकाण वगैरे सगळे लिहिले आहे तसे तुमच्या बायोडेटामध्ये नव्हते म्हणून.."
" माझे दुकान आहे."
" अरे व्वा.. कसले? आणि कुठे?"

" माझे मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे." समोरच्या कुटुंबाचे चेहरे पडले होते.

" अच्छा. मला काही गोष्टी आधीच सांगायला आवडतील. माझ्या आईला माझ्याशिवाय कोणीच नाही त्यामुळे लग्नानंतर माझा अर्धा पगार माझ्या आईला मला द्यावा लागेल." मधु समोरच्या चेहर्‍यांवरचे हावभाव निरखत म्हणाली.
" असे कुठे असते का? लग्नानंतर बायकोच्या पगारावर नवर्‍याचा हक्क असतो. काय हो सुनिताताई?" वरपिता भडकला होता. त्याकडे दुर्लक्ष करत मधु पुढे म्हणाली ,"माझी आई जर आजारी वगैरे पडली तर मी तिच्यासोबत राहीन."

" काय मुलगी आहे ही सुनिताताई? ह्यांचा भूतकाळ माहित पडूनही रूप, चांगला पगार आहे म्हणून आम्ही होकार दिला तर ही नाटके. लग्नाच्या आधी ही अशी तर लग्नानंतर काय करेल?"

" ही नाटके? नाटके कोणाची? माझी की तुमची? तुम्हाला सून नको आहे, तुम्हाला मशीन हवे आहे पैशाचे आणि घरकामाचे. ते झाकायचे म्हणून म्हणताय की भूतकाळ माहित असूनही." मधु चिडली होती.
" सुनिताताई, आमचा असा अपमान होणार आहे हे आधी माहित असते तर आलोच नसतो इथे. शेवटी खाण तशी माती.." वरपिता पाय आपटत तिथून निघून गेला. सुनिताताई त्यांना समजावण्यासाठी त्यांच्या पाठी गेल्या. मालतीताई घायाळ नजरेने मधुकडे बघतच राहिल्या.


काय आहे मधुचा भूतकाळ? का मोडते आहे तिचे लग्न? समजेल का पुढील भागात..
कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all