वारसा असाही.. भाग ३

कथा मायलेकींच्या संघर्षाची..


वारसा असाही.. भाग ३

राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा..
विषय: कौटुंबिक
जिल्हा : मुंबई..

मागील भागात आपण पाहिले की सुनीताताईंच्या सांगण्यावरून मालतीताई एका गुरुजींकडे येतात. बघू आता पुढे काय होते ते..

" खूप सुखी होतो आम्ही, निदान तेव्हा तरी मला तसे वाटत होते. छान चौकोनी कुटुंब होते. मी, माझे यजमान श्रीकांत, माझा मुलगा समर आणि धाकटी मधु." मालतीताईंनी सांगायला सुरुवात केली.
" आमची एक छोटीशी फॅक्टरी होती. लक्ष्मी सरस्वतीचा डोक्यावर हात होता. माझी दोन्ही मुले सद्गुणी होती."
" होती? म्हणजे?" गुरूजींनी न रहावून विचारले.
" तीच तर शोकांतिका आहे. माझा मोठा लेक दहावीला होता. नखात रोग नव्हता हो त्याच्या." मालतीताईंना सगळी घटना डोळ्यासमोर दिसत होती.


" आई, अग खूप डोके दुखते आहे. एखादी गोळी असेल तर दे ना." समरने शाळेतून आल्या आल्या दप्तर सोफ्यावर टाकत हाक मारली.
" समर, अरे येता जाता गोळ्या नसतात रे घ्यायच्या. ये मी डोके चेपून देते."
" आई, मी नेहमी घेतो का ग? आज खूपच दुखते आहे."
" बर देते. आधी काहीतरी खा. मग घे बरं वाटेल. आणि झोप थोडा वेळ. मग कर अभ्यास. "
" हो ग.."
गोळी घेऊन समर झोपायला गेला. मालतीताईंचा स्वयंपाक झाल्यावर त्या त्याला बोलवायला गेल्या.
" समर, थोडं जेवून घेतोस का रे?"
" समर, ए समर.."
" आई, का ओरडते आहेस?" छोटी मधू मालतीताईंना विचारू लागली.
" अग, हा दादा बघना उठतच नाहीये. नेमके तुझे बाबा पण उशीरा येणार आहेत. समर ए समर.. याचे अंग एवढे गार कशाने पडले आहे? काय करू मी?"
" आई, डॉक्टरकाकांना बोलाव ना?"
" हो ग.."
मालतीताईंनी पटकन डॉक्टरांना फोन लावून बोलावून घेतले. तोपर्यंत मधुने बाबांनासुद्धा फोन लावला होता "दादाला बरे नाही म्हणून."
" मालती, अग काय झाले समरचे?"
" अहो, कधीपासून उठवते आहे. उठतच नाहीये. मला खूप भिती वाटते आहे. तुम्ही या ना लवकर." मालतीताईंना रडू कोसळले. डॉक्टर आणि श्रीकांत दोघेही जवळ जवळ एकत्रच आले.
" डॉक्टर, बघा ना.. कधीची उठवते आहे. उठतच नाहीये हा." मालतीताई रडू आवरत म्हणाल्या. डॉक्टरांनी तपासले. पण ज्याची भिती वाटत होती तेच झाले होते. समरची प्राणज्योत विझली होती. हसते खेळते कुटुंब दुःखाच्या दरीत कोसळले. श्रीकांत आणि मालतीच्या दुःखाला पारावारच नव्हता. रडून रडून डोळे सुजले होते. एवढ्याशा मधुला पण प्रसंगाचे गांभीर्य समजले होते. ती सतत आईजवळ बसत होती. तिच्या गालावरून हात फिरवून रडू नको म्हणत होती. या सगळ्यात श्रीकांत मात्र सगळ्यांपासून अलिप्त रहात होते. एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हते. समरचे दिवसकार्य झाल्यावर सगळे जवळचे नातेवाईक निघून गेले आणि पहिल्यांदाच श्रीकांत आणि मालती खऱ्या अर्थाने समोरासमोर आले. खरेतर मालतीला वाटत होते की एकदातरी श्रीकांत जवळ घेऊन तिचे सांत्वन करतील. पोटचा गोळा गेल्याचे दुःख वाटून घेतील. पण नाही. श्रीकांतचे स्वतःशीच विचार चाललेले दिसत होते.
त्या दिवशी मधु झोपल्यानंतर तो मुलांच्या खोलीत आला. समरच्या अचानक जाण्यानंतर मालती मधुसोबतच झोपत होती.
" मालती, आपल्या खोलीत चल. मला तुझ्याशी बोलायचे आहे."
" इथे नाही का बोलता येणार?"
" तुला अर्थ कळतो ना?" श्रीकांतचा आवाज बदलला होता. झोपलेल्या मधुला बाजूला करून मालती नाईलाजाने उठली आणि स्वतःच्या खोलीत गेली.
" इथे बस.. सांगायला हवे का?"
मालती निमूटपणे बसली.
" आपल्याला आता पुढचा विचार करायला हवा मालती.."
" म्हणजे?"
" हे बघ.. समर असता तर चिंताच नव्हती. पण आता..."
" असे अर्धवट नका बोलू. बोलून टाका मनातले सगळे.."
" हे बघ.. ही फॅक्टरी, हे वैभव सगळे मी शून्यातून निर्माण केले आहे. त्याला वारस नको का?"
" आहे की आपली मधु.." मालतीच्या तोंडून निघून गेले.
" तुला अक्कल आहे का? मला माझ्या वंशाला दिवा हवा आहे. समजले?" श्रीकांतच्या आवाजात एक वेगळाच सूर होता.
" अहो, अडनिड्या वयाचा मुलगा जाऊन महिनाही झाला नाही. आणि हे काय डोक्यात घेऊन बसला आहात? त्याच्या जागी मधुच आहे आपल्यासाठी सर्व काही आता.."
" तुझ्यासाठी असेल. माझ्यासाठी नाही. मला मुलगा हवा म्हणजे हवाच आहे." श्रीकांतच्या डोळ्यात वेडसरपणाची झाक दिसत होती. मालतीने डोळे मिटून घेतले.
त्यानंतर इच्छा असो वा नसो मालतीला रात्री त्या प्रसंगाला सामोरे जायलाच लागायचे. दर महिन्याला ती बाजूला बसली की श्रीकांतची चिडचिड सुरू व्हायची. एक दिवस मालतीने धीर करून बोलायला सुरुवात केली.
" अशी चिडचिड करून काही होणार आहे का?"
" आहे का म्हणजे? व्हायलाच पाहिजे."
" अहो, जरा माझ्या वाढत्या वयाचा तरी विचार करा. चाळिशी आली माझी. याच्यापुढे मुल होण्याची शक्यता किती असणार? आणि झाले तरी ते मानसिक शारिरीक रित्या सशक्त असेल याची काय खात्री? नको ती रिस्क का घ्यायची?"
" बरोबर आहे तू म्हणतेस ते." श्रीकांत विचार करत बसला. आपला विचार श्रीकांतला पटला याचाच तिला आनंद झाला होता. दोन चार दिवस श्रीकांत खूपच कामात होता. सगळे विसरून तो कामात गुंतला हेच तिच्यासाठी खूप होते.

काहीच दिवसांनी मालतीच्या बहिणीचा फोन आला..
" ताई, कशी आहेस तू?"
" सावरते आहे थोडी थोडी.."
" आणि भाऊजी?"
" ते ही सावरत आहेत.." मालतीला खरेतर खूप काही बोलायचे होते बहिणीशी. पण समोर बसलेल्या मधुच्या कानावर काही पडू नये असेही वाटत होते.
" नक्की का?"
" हो ग. असे का विचारतेस? काही झाले आहे का?" अशुभाचे सावट परत मालतीला जाणवायला लागले.


नक्की काय सांगायचे आहे मालतीच्या बहिणीला? या सगळ्याचा मधुच्या लग्नाशी काय संबंध आहे बघू पुढील भागात..
तोपर्यंत हा भाग कसा वाटला, ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all