वऱ्हाड निघालं राजापूरला..

ही एक विनोदी कथा..



लघुकथा स्पर्धा (विनोदी कथा)

वऱ्हाड निघालं राजापूरला..

बरं का मित्रानो, ही गोष्ट आहे आमच्या मयुरेश सरांच्या उर्फ कार्तिकेयच्या लग्नाची.. एका.. हो गं बाय सध्यातरी एकाच लग्नाची गोष्ट आहे ही.. दोन नावं असली म्हणून काय झालं? कुठं दोन लग्न करत असतात व्हय? काहीतरीच बाई तुमचं.. एक झेपेना आणि तुमचं आपली दुसरीची घाई.. तसं ते तयार असतीलही पण मग नंतरचं काय ते त्यांचं त्यांनी निस्तरावं..आम्ही महिलामंडळ आजाबात जबाबदारी घेणार नाय. म्हणजे कसं त्या आमच्या धर की आपट संघटनेच्या अध्यक्ष महोदया स्वामिनी चौगले हे असलं काय घडू द्यायच्या नाहीत. त्यांच्यापासून जरा वचकूनच राहावं लागतंय बघा.. म्हणून सांगतेय ही गोष्ट आहे मयुरेश सरांच्या एका पहिल्या वाहिल्या लग्नाची..

तुम्हाला प्रश्न पडला असेल. कोण आहेत हे मयुरेश? कोणी सेलिब्रेटी आहेत काय? की स्टार किडझ? नाय गो बाय.. एकदम साधा म्हणजे आमच्या कोकणातला साधा माणूस बरं का.. समजून जावा काय तां.. अगदी फणसासारखा.. वरून काटेरी आणि आतून एकदम रसाळ गोड गऱ्यासारखा.. सध्या इतकं कौतुक पुरे हो.. माझ्यासारख्या कोकणी माणसाला इतकं कौतुक करणं झेपत नाय ओ.. हा तर मी काय सांगत होते हा.. आमचे मयुरेशसर एकदम मवाळ माणूस आक्शी आमच्या कोकणातल्या नारायणराव राणेसाहेबांसारखा.. कधी काय बोलतील नेम नाय पण बोलायला लागले संपूर्ण सत्ता हलवून सोडतील. कोकणातला माणूस कधीच शस्त्र बाळगत नाही.. विचारा का? अहो त्याचं तोंड हेच त्याचं शस्त्र.. शत्रू शस्त्राने नाही तर टोमण्यानीच मरायचा..

बघा, हे माझं असं होतं म्हणजे सगळ्याच कोकणी माणसाचं असं होत असावं. मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि भलतंच बोलत बसतात. माझं म्हणजे असं झालं ‘नमनाला घडाभर तेल.’ थोडक्यात आवरतं घेते नायतर तुम्ही माझा बोऱ्याबिस्तरा आवरायला घ्याल.. तर तुम्हाला सांगते आमच्या मयुरेश सरांची कीर्ती लई लांबपर्यंत पोहचलीय बरं का.. अगदी परदेशातही.. म्हणजे ते आमचं इरा पोहचलं नाय का परदेशात म्हणून म्हटलं हो.. मागोमाग त्यांची कीर्तीही गेली इरासोबत परदेशात. त्यांना शक्य झालं असतं तर त्यांनी तिथंलीच मड्डम पटकवली असती पण भारी प्रेम हो या माणसाचं स्वदेशावर आक्शी शहारूखवानी.. हात हवेत काय पसरले की दर्शनाच घावली.. त्या स्वदेशप्रेमापायी मग इथलीच आमची दर्शना पटकवली. म्हणजे अंरेंज मॅरेज बरं का.. उगी गैरसमज नको.. दर्शनाने दर्शन दिलं आणि आमचं मयुरेशसर एकदम फ्लॅट झालं बघा.. काय सांगू तुम्हाला आता.. बरं ते जाऊ दे.. तर या मयुरेशसरांनी
त्यांची ‘यशोदेचा कान्हा’ हि कथा काय लिहली आणि एकदम फेमस झाले की ओ.. अगदी साऱ्यांचे कान्हाच झाले बघा.. अशा या आमच्या लाडक्या उर्फ… समजून जावा काय तां.. मयुरेश सरांचं लग्न लग्न ठरलं.

तर त्याचं झालं असं त्यांच्या लग्नाची तारीख ठरली आणि आमच्या महिलामंडळींच्या अंगात जो काय उत्साह संचारला काय सांगायची सोय राहिली नाही बघा. शब्दमैफिलमध्ये तर रोजच मैफिल घडू लागल्यात. जसंजसं लग्न जवळ येऊ लागलंय तसा आमचा उत्साह वाढतच चाललाय. सगळ्यांची तयारी सुरू झालीय. आमच्या बायकांचं तर तुम्हाला माहीत असेलच तयारीला किती वेळ लागतो ते म्हणून आम्ही एक महिनाभर आधीच तयारीला लागलो होतो.

पण त्याआधी मयुरेशसरांची ‘बॅचलर पार्टी’ करायची राहिली ना राव.. आता माणूस स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात जाणार म्हटल्यावर ‘सेलिब्रेशन तो बनता है ना बॉस’ मग काय, बॅचलर पार्टी ठरली.. कुठं द्यायची याच्यावर लई चर्चा झाली आणि मग अखेरीस शेतकरी बांधव वधूवर काळजीवाहू संघटनेचे अध्यक्ष महोदय सारंग चव्हाणसर यांनी पार्टीची जबाबदारी घेतली. त्यांच्या जोडीला लगबगीने आले ते म्हणजे कौतुकाचे पान लिहून सर्वांना प्रोत्साहन देणारे सर्वांचे लाडके नामदेव पाटीलसर.. पार्टी ठरली ती म्हणजे सारंगसरांच्या ऊसाच्या वावरात.. त्याचा फायदा असा झाला, ऊस भरपूर असल्यानं पुढच्या गोष्टींची त्यांना लगेच सोय करता आली. पुण्याहून ईश्वर आगमसर अगदी देवासारखे मदतीला धावून आले.. म्हणतात नं.. देवाक कालजी हो माज्या देवाक कालजी हो.. त्यांच्या सोबतीला चकना घेऊन आले आमचे लाडके ‘मध्येच काहीतरी पचक’ संघटनेचे अध्यक्ष राहुल चिंचोळकर.. अशी बॅचलर पार्टी रंगात आली म्हणून सांगू.. काय विचारू नका.. सर्वजण मित्राच्या स्वातंत्र्यावर कशी गदा आलीय आक्शी स्वानुभव रडून रडून सांगू लागले. बिचारे मयुरेश सर..! लग्नाला तयार होऊन चूक तर केली नाही ना असा विचार त्यांच्या मनात डोकावत होताच इतक्यात लगबगीने आपल्या मित्राला सावरायला म्हणजे कॉऊंसलिंग करायला पुढे सरसावले ते म्हणजे नेहमी हसतमुख असणारे ‘मोतीचूरके लड्डू है बाबा खा ले वरना पछतायेगा’ असा मोलाचा सल्ला देणारे आमचे आवडते अमित मेढेकरसर. ते आले आणि मैफिलीत रंगत आली. जोरदार पार्टी झाली आणि त्यांना प्रत्येकाच्या मानसिक बदलाचं दर्शनही घडलं. म्हणजे त्याचं काय झालं? त्यांच्या सौ. नी म्हणजेच निधी मेढेकरानी ‘जोडी तुझी माझी’ ची सेटिंग लावण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती.. लग्न झाल्या झाल्या मयुरेशसरांकडून ईराच्या व्यासपिठावर मुलाखतीसाठी येण्याचं वचन घेतलं.. हुश्श.. करत त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बायकोनं म्हणजेच लाटणे संघटनेच्या नव्या अध्यक्षानी फर्मान सोडलं होतं बाबा.. नाही ऐकून सांगतील कोणाला?

बॅचलर पार्टी जोरदार झाली. महिलामंडळ लग्नाच्या खरेदीला लागलं. मेघा अमोलचा मला फोन आला.

“हॅलो निशा, मी कर्नाटकी कशिदा केलेला शालू नेसू का गं?”

तिनं विचारलं. मी संभ्रमात पडले. जरा चाचरत म्हणाले.

“तुझ्या पावकिलोच्या जीवाला झेपेल का गं शालू?”

तिथूनच डोळे वटारले असतील देव जाणे! पण तरी संयमी भाषेत मंजुळ स्वरात तिनं मला विचारलं.

“निशा, तू काय घालणार आहेस मयुरेशसरांच्या लग्नात?”

“अगं मी आताच खरेदी केलेला हिऱ्यांनी जडलेला नक्षीदार व्हेलवेटचा निळ्या रंगाचा घागरा आणि चोली घालणार आहे.”

मी उत्तर दिलं. तशी ती फिदीफिदी हसत म्हणाली.,

“तुझ्या ताडामाडाच्या देहाला कसा दिसेल गं घागरा चोली?”

“शिकली बाई मेघा तू.. कोकणी माणसांची कला.. ये किसके संगत का असर है? मयुरेशसरांच्या की माझ्या?”

मी मनातल्या मनात बडबडत अगदी संयमानं म्हटलं.

“थांबा गो बाय.. कुलकर्ण्याच्या राधिकाला विचारू कपडे कोणते घालूया ते?”

मग आम्ही कॉन्फरन्स कॉल केला. राधिकाला विचारलं. शांत स्वरात ती म्हणाली.,

“हे बघ निशा, तुम्हांला जे आवडेल ते घाला पण वाद करू नका. प्रत्येक वेळीस तलवार उपसलीच पाहिजे का निशा? वाद नकोत. मला भीती वाटते. मयुरेश सरांचं लग्न निर्विघ्न पार पडायला हवं की नाही? मग जे आवडेल ते घाला.”

मग काय.. राधिकाने बजावलं आणि आम्ही तलवारी म्यान केल्या. तिचं म्हणणं ऐकलं. आता लग्नाला जायचं म्हटलं की गाडीघोड्याची सोय हवीच. मी लगेच ईराच्या काहीही झालं तरी हसून शांतपणे बोलणाऱ्या संजना मॅडमना कॉल केला. त्यांचा लगेच मला प्रश्न..

“विमान घेऊन जायचं की हेलीकॅपटर?”

माझी तर बोबडीच वळली. अंबानीच्या मुलानं प्रश्न विचारावा आणि मी आ वासून पाहत राहावं अशी माझी स्थिती झाली. चाचपडत म्हटलं.,

“घेऊन जायला हरकत नाही पण ते चालवणार कोण? आणि लँड कुठं करायचं?”

“काय निशा तू पण ना.. अगदी माझ्या दीड वर्षाच्या रुद्रासारखे प्रश्न विचारतेस. विमान चालवणं काय इतकं अवघड आहे होय? कार चालवण्याइतकं सोप्प असतं ते. निस्ता एक्सिलेटर दाबला रे दाबला की सुसाट पळतंय बघ विमान. आधीमधी कुठंच थांबणार नाय डायरेक्ट राजापूर.. काय समजलीस? आणि समज लँड करायचंच झालं तर सारंगसरांचं शेत आहे की.. हाय काय नी नाय काय.. फिकर नॉट..”

मी कपाळावर हात मारून घेतला.

“नको मॅडम, विमानाचं राहू द्या. आपण बसच करू. नाही म्हणजे काय आहे ना धातू भगिनी श्रावणी लोखंडेला विमान सोसवत नाही. संपूर्ण प्रवासात उलट्या करत राहील. माझी लाडकी सखी डॉक्टर किमया मूळावकर आपली किमया दाखवेपर्यंत विमानाचं समुद्री नौका झालेली असेल आणि त्यात किमयाची तिन्ही बाळं लवकर झोपत नाहीत. दोन परवडली पण तिसरं जरा जास्तच डॅम्बीस आहे बघा. मग ती मुलांना सांभाळून श्रावणीकडे कसं लक्ष देईल? तेंव्हा आपण बसनेच जाऊ. विमानाचं पुढच्या कोणाच्या तरी लग्नात विचार करू.”

मी समजावणीच्या सुरात म्हटलं.

“बघ हं निशा, नक्की विमान नको ना? मी तयार आहे विमान चालवायला.. पुन्हा एकदा विचार कर. नाहीतर आपल्या मराठीच्या एडिटर योगिता टवलारे हिला बाजूला बसवू. ती बरोबर डिरेकशन सांगेल आणि कोणी जास्त शहाणपणा केला तर तिचा दाडंपट्टा बरोबर फिरवेल. सगळ्यांची बोलती बंद..”

संजना मॅडम उत्साहाने म्हणाल्या. मी मनात म्हटलं.,

“योगिता मॅडमचा काही नेम नाही.. विमान पुढं गेल्यावर म्हणतील. अरे या डायरेक्शन नाही मागच्या बाजूने वळायचं होतं डाव्या अंगाला. फिरवा विमान माघारी..“

नाही हो करत बसने जायचं ठरलं. बँगलोरहुन बस सुटणार होती. मी, राधिका, मेघा अमोल बँगलोरहुन निघालो. सर्वांच्या सोयीचं कोल्हापूर जंक्शन ठरलं. सर्वांनी कोल्हापूरला जमायचं होतं. महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यातून सर्व लेखकलेखिका मंडळी आवर्जून लग्नाला जाण्यासाठी कोल्हापुरात जमली होती. तशी सगळी मंडळी समंजस हो.. सारंगसरांच्या शिवारात खुशाल फतकल मांडून बसली. ठेचा आणि ज्वारीच्या भाकरीचा आस्वाद घेतला. स्वीटडिश म्हणून सारंगसरांनी ऊसाची एक एक कांडी प्रत्येकाला दिली. जेवणं झाली. सर्वांच्या गप्पा रंगात आल्या. सोलापूरहुन आलेली माझी मैत्रीण शगुफ्ताने प्रश्न उपस्थित केला.

“अगं निशा, आपण मयुरेश सरांच्या लग्नात कोणता डान्स करणार आहोत? काहीच तयारी झाली नाही आपली. कसं गं करायचं?”

झालं.. माझ्या पूजा आडेप म्हणजे पूजा डार्लिंगला निमित्तच मिळालं.

“त्यात काय विचार करायचा? आपण आपला नागीन डान्स बसवू? सोप्पा आणि कोणालाही जमेल.. शास्त्रशुद्ध यावं असं काही नाही.”

तिनं मोठ्या अविर्भावात सांगितलं.

“म्हणजे नेमकं काय करायचं?”

माझा भाबडा प्रश्न..

“अगं निशा, सोप्पंय की.. दोन्ही तळहात एकत्र गुंफायचे आणि गडागडा जमिनीवर लोळायचं.. व्हेरी सिम्पल..”

असं म्हणत लगेच तिने प्रात्यक्षिकं दाखवायला सूरवात केली. तिच्या जोडीला लगेच ऋतुजा वैरागडकर, अपूर्वा देशपांडे, वृंदा फुलकर, स्वाती मुधोळकर, सुप्रिया दिघे प्रियांका पाटील मैदानात उतरल्या. आणि जो काय नागीन डान्स केला म्हणून सांगू.. आजूबाजूचे लोक अवाक होऊन तोंडात बोटं घालून पाहतच बसले. सारंगसरांना मात्र पुढचे काही दिवस लोकांच्या चेहऱ्यांना सामोरं जायचं होतं कारण आम्ही सगळे त्यांचे पाहुणे होतो ना..

सगळे नागीन डान्स करत होते इतक्यात शितल महामुनी मॅडमनी अजून एक नवा प्रश्न विचारला.,

“अरे आहेराचं काय? कोणी काही ठरवलंय का?”

तिचा प्रश्न ऐकून पुण्याच्या मीनाक्षीताई वैद्य म्हणाल्या.,

“हे पण असतं व्हय? मी काहीच आणलं नाही. अरे आमच्याकडं एक ते चार सगळी दुकानं बंद असतात. ती पुण्याची खासियत आहे ना. एक ते चार नुसत्या झोपा..”

सगळ्यांनी त्यांच्याकडे असं काही विचित्र नजरेने पाहिलं की परत काय त्यांनी आपल्या तोंडातून ब्र शब्दही काढला नाही. इतक्यात डॉक्टर वृंदा फुलकर म्हणाल्या.,

“ठीक आहे ना.. जाता जाता घेता येईल की काहीतरी आणि नाहीच काही जमलं तर सारंगसरांच्या शेतातला ऊस घेऊन जाऊ की ट्रकभरून.. तशा मी होमियोपॅथीच्या साबुदाण्याच्या गोळ्यांच्या बाटल्याही सोबत ठेवतेच त्या देता येतील.”

तिची आयडिया सर्वांना आवडली. सर्वांनी तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

दुसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापूरहुन राजापूरला जाणार होतो. गाडी निघणार इतक्यात लगबगीने धावती गाडी पकडत धापा टाकत आल्या त्या म्हणजे कायम घाईत असणाऱ्या पुण्याच्या आमच्या लाडक्या मैत्रीणी जयश्री खेडकर आणि संजाली. जयश्रीताई पुणेरी तोऱ्यात म्हणाल्या.,

“अशी कशी गाडी आम्हाला सोडून निघाली? हे असले फाजील लाड खपवून घेतले जाणार नाही. हा आमच्या पुणेकरांचा अपमान आहे हो..”

सारंगसरांनी बाजू सांभाळून घेतली तेंव्हा कुठं जयश्रीताई शांत होऊन आपल्या जागेवर बसल्या. नाहीतर तिथंच प्रांतवाद सुरू झाला असता.. एकदाची गाडी सुरू झाली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषानें सारी बस दुमदुमली. अगदी धरणीकंप व्हावा तसं फिलिंग आलं. गाण्याच्या भेंड्या खेळण्याची धुरा लहानग्या स्वराजने घेतली. त्यांना साथ दिली ती म्हणजे किमयाच्या ट्विन्स आणि शगुफ्ताच्या बच्चूनें. इतक्यात सारंगसरांनी गाण्याला सुरुवात केली.

“नाव घे पोरी तू लाजू नको.. मोडकी सॅन्डल तू घालू नको.. नाव घे पोरी तुझा नवरा कसा गो नवरा कसा?”

सर्वांच्या नजरा कोण नाव घेणार याचा वेध घेत होत्या. आमच्या लाडक्या धनश्री शिरसाठ मॅडम उठल्या. साडीच्या पदराच्या टोकाशी चाळा करत म्हणाल्या.

“चांदीच्या बशीत बदामाचा हलवा.. रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा..”

सासूबाईंचं नाव काढताच “त्यांना कशाला आता?” असं प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन साऱ्या मैत्रिणीनी कोणाला दिसणार नाही अश्या रीतीने नाकातली नथ हाताने दाबत आपली नाकं मुरडली. पुन्हा सारंगसरांनी गाणं सुरू केलं. मग आमचे ईश्वर सर नाव घ्यायला उभे राहिले. मिशीवर ताव मारत आपल्या सौ. कडे कटाक्ष टाकत नाव घेतलं.

“पुणे ते कोल्हापूर पेरला लसूण. आमच्या राणीसरकारांचं नाव घेतो बांधावर बसून..”

सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ईश्वरसरांनी नाव घेतलेलं पाहून सारंगसरांनी बसच्या खिडकीतून डोकं बाहेर काढलं. वर आभाळाकडं पाहिलं. देवाला हात जोडून नमस्कार केला आणि मनातल्या मनात पुटपुटले.

“हे वरुणदेवा, बघतूय नव्हं.. व्हय तू वरूनच बघ. आमचं ईश्वरशेठ लसूण पेरणार हाईत. पीक चांगलं होऊ दे. नायतर लग्न ऱ्हायलं बाजूला आन म्या सरकारच्या इरोधात उपोषणाला बशीन. काय समजलाव?”

वरूणदेवाने वरून खाली पाहत मान डोलंवावी तशी सारंगसरांनी स्वतःची मान मोडेपर्यंत डोलावली. पुन्हा गाण्याचा ठेका धरला. आता यावेळीस नाव घेण्यासाठी पुढे आल्या ते म्हणजे आमच्या लाडक्या ऋतुजा वैरागडकर मॅडम. लाजत त्यांनी नाव घेण्यास सुरुवात केली.

“जन्म दिला मातेने. पालन केले पित्याने.. पतीराजांचं नाव घेते पत्नी या नात्याने..”

“लय भारी ऋतुजा.. एकदम झक्कास..”

एकदम कोल्हापुरी स्टाईलमध्ये कौतुकाची थाप पाठीवर टाकत कोल्हापूरच्या धर की आपट संघटनेच्या अध्यक्षा स्वामिनी मॅडम उदगारल्या. पुन्हा गाण्यांनं ताल धरला. धातूभगिनी श्रावणी मॅडम पुढे आल्या.

“तांब्याचा प्याला गडगडत गेला.. तांब्याचा प्याला गडगडत गेला.. आणि का ओ बाबा तुम्ही हुंड्याला का भ्याला?”

मी मनात म्हटलं.

“मयुरेश तांबे कधी गडगडत गेले?एकच प्याला कधी घेतला त्यांनी? लागलीच दर्शनाला टीप द्यायला हवी बरं..नवऱ्यावर आतापासूनच लक्ष ठेव बाई.. शास्त्र असतंयं त्ये..”

पुन्हा एकदा गाण्याने ठेका धरला आणि कमरेला पदर खोचून नाव घ्यायला पुढे सरसावंल्या त्या म्हणजे आमच्या सर्वांच्या लाडक्या प्रियांका पाटील मॅडम. त्यांनी नाव घ्यायला सुरुवात केली.

“नागोबाच्या बायकोला म्हणत्यात नागीन.. अभिनंदनरावांचं नाव घेते मी त्यांची जयसिंगपूरची वाघीण..”

तिनं नाव घेतलं आणि माझ्या डोळ्यांसमोर त्या साऱ्या जणींचा नागीन डान्स उभा राहिला. धडकीच भरली ना राव.. पुन्हा एकदा गाण्यानं ठेका धरला. आता नाव घेण्याची वेळ आली ती सारंगसरांवर. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळून होत्या. त्यांनी नाव घ्यायला सुरुवात केली.

“हंड्यावर हंडे सात. त्यावर ठेवली परात. परातीत ठेवली चांदीची बशी.. आणि माझी बायको सोडून बाकी सगळ्याच म्हशी..”

त्यांनी उखाणा घेतला आणि बसमधल्या सगळ्या महिलामंडळींनी त्यांच्याकडे मारक्या म्हशीसारखं बघितलं तसं त्यांनी निमूटपणे खाली मान घातली.

“आता राजापूरला पोहचल्यावर बसमधल्या सगळ्या म्हशी मिळून माझा चांगलाच पाहुणचार करतील यांत शंकाच नाही.”

स्वतःशीच पुटपुटले. त्यांनी तोफेच्या तोंडी जाण्याची स्वतःच्या मनाची तयारी केली आणि पुन्हा गाणी म्हणायला सुरुवात केली. इतक्यात कोणीतरी ओरडलं

“अरे लग्नपत्रिका आणलीय का कोणी सोबत? लग्नस्थळ माहित आहे का कोणाला?

झालं.. गाडी थोड्याच वेळात राजापूरला पोहचणार होती आणि कोणाकडेच लग्नपत्रिका नव्हती कारण मयुरेशसरांनी लग्नपत्रिका कोणालाच दिली नव्हती. काय करावं समजेना. मग आमच्या पुजाचं सुपीक डोकं म्हणालं.

“अरे कित्याक टेन्शन? मयुरेशसरांना फोन लावा आणि विचारा पत्ता.. हाय काय आन नाय काय..”

सर्वांना तिच्या सुपीक डोक्याचं कौतुक वाटलं. सर्वांनी आपापले फोन उचलले आणि मयुरेश सरांना फोन लावू लागले. तर त्यांचा फोन एन्गेज..

“अरे सर्वांनी एकदम लावला तर एन्गेजच येईल ना.. एकेकाने लावा.

मी ओरडले. एकेक करून सर्वजण मयुरेश सरांना कॉल करत होते. पण पट्ठे कॉल उचलतील तर शपथ.. सर्वांची डोकी फिरायची वेळ आली होती.

मी फोन लावता लावता जोरात ओरडले.

“मयुरेशसर, फोन उचला ओ.. फोन उचला नाहीतर ह्या बसमधल्या सगळ्या बायका तुम्हांला उचलतील आणि जोरात…..”

“काय जोरात..? ऐ निशा काय बडबडतेस?”

मी डोळे किलकीले करून पाहिलं. मी माझ्या बेडरूममध्ये होते आणि माझी रूममेट स्वाती मला हलवून जागे करत होती.

“अच्छा, स्वप्नं होतं तर.. बरं झालं ते स्वप्नंच होतं नाहीतर मयुरेश सरांचं काही खरं नव्हतं बाबा.. बायकांनी उचलून जोरात… बाई गं कल्पना करवत नाही गं.. चला पहिला ग्रुपमध्ये मेसेज टाकते. मयुरेशसर, निमंत्रणपत्रिकेची हार्ड कॉपी राहिली तरी चालेल पण ग्रुपवर लग्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट तरी टाका.. नायतर मग…ह्या बायका तुम्हाला उचलून जोरात… समजून घेवा काय तां..”


पूर्णविराम..
©निशा थोरे (अनुप्रिया)