वर्गमित्र भाग 13

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगद उलगडणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र.

# वर्गमित्र-13

सिमल्याच्या शांत,थंड मनप्रसन्न करणाऱ्या प्रदेशाला मागे टाकत गाडी हळूहळू दिल्ली एअरपोर्ट कडे भरधाव वेगाने धावत होती.तिथला उष्मा आणि गर्दी मूळे प्रचंड अस्वस्थता जाणवत होती.
फ्लाईट वेळेवर सुटली आणि एकदाचा निश्वास टाकला मी.
सगळ्या सुचना देवून हवाईसुंदरी तिथून अंतर्धान पावली.अवघ्या पावणेदोन तासाचा प्रवास होता.
हा हा म्हणता चुटकी सरशी मुंबईच्या विमानतळावर पोहचत असल्याची सुचना मिळाली.
               # ## ## ## #
जेवढा वेळ दिल्ली हून मुंबईला लागला त्याहून दूप्पट वेळ विमानतळ ते घर ह्या प्रवासाला लागला.
एका गोष्टीची गंम्मत वाटली आपण कितीही प्रगती करा वेगवेगळ्या क्षेत्रात, पण एका विशिष्ट मर्यादे पलिकडे त्याची उपयोग्यता संपतेच.
जणू काही हेच सुचवायचे असते की पाय सतत जमिनीवर असुद्यात.
म्हणजे अगदी मालकीची स्वत:ची हेलिकॉप्टर्स असणारी मंडळीही एका विशिष्ट टप्प्यावर त्याला सोडून गाडीतच बसतील.आणखी घराजवळ पोहोचल्यावर पायानीच चालत प्रवेश करावा लागेल घरात.मग तो बिल क्लिंटन असेल नाहीतर सर्वसामान्य व्यक्ती.किती खरय ना!!
विचारांच्या नादात घर कधी आले समजलेच नाही.
          # ## ## ## #
मुंबईच्या चिकट गर्मीने अंग नुसते आंबुन गेले होते.प्रवास सुखावह असला तरी शीणवटा जाणवत होता.
6/7 दिवसापासून घर बंद होते.
उघडल्या बरोबर आलेला उग्र दर्प त्याची जाणीव करून देत होता.
पटापट सर्व खिडक्या दारे उघडून फॅन लावल्यावर थोड्याच वेळात हवेशीर आणि प्रसन्न वाटायला लागले.
बऱ्याच लग्न पत्रिका बॉक्समधे पडल्या होत्या.मे म्हणजे लग्नाचा सिझन.कुठे मुंज तर कुठे लग्न. आता त्याही गोष्टी बघाव्या लागणार होत्या.
तो विचार तात्पूरता बाजूला ढकलून बॅगांची आवराआवर करायला घेतली.
खरेतर खूप थकायला झाले होते प्रवासामूळे पण काही अंगच्या खोडी मरेपर्यंत सुटत नाही म्हणतात ना,त्यातलीच ही एक खोड.
वाईट की चांगली देवच जाणे...!
कुठूनही बाहेरून आले की ती बॅग जोवर रिकामी करून वस्तू जागच्या जागी जात नाहीत मला काही चैन पडत नाही.जरा कंटाळतच ते काम उरकले.बाहेरून येतानाच श्री ने खायचे पॅक घेतले होते.त्यामूळे मूले लगेच खावून झोपली.
माझे काम कसेबसे उरकून मीही अंथरूणावर लवंडले.
कधी डोळा लागला हेही कळले नाही.
# # # # # # ## ## ## ##
(क्रमश: 13)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?
 कथा आवडतेय की नाही?
 कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all