वारसा भाग 3

कथा स्त्री च्या विविध रूपांची

बनु आता आबासाहेबांच्या सोबत दौऱ्यासाठी जाऊ लागल्या. त्यांची भाषणे मनापासुन ऐकू लागल्या. त्यांच्या अनेक कार्यात सहभाग घेत असत त्या. आबासाहेब ही बनुबाईंच्या आपल्या सोबत येण्याला आक्षेप घेत नव्हते. आबासाहेबांचे दौरे वाढत गेले, तसे बनुबाईंची सोबतही वाढत गेली. अशाच दौऱ्यावर असताना एका निवांतक्षणी आबासाहेब आणि बनुबाई एकमेकांच्याजवळ आले. "हे असं व्हायला नको होत!". बनुला आपल्या चुकेची जाणीव होताच ती आबासाहेबांपासून दूर झाली. आबासाहेबांच्या चेहेऱ्यावर मात्र 'काहीतरी चुकीचे घडले' आहे याची जाणीव ही नव्हती. बनु दौरा अर्धवट सोडून राधाबाईंच्या घरी आली. आल्या दिवसापासून अबोल झाल्या त्या. राधाबाईंना ही तिचे वागणे खटकले. मात्र त्यांनी आपणहून काही विचारणे टाळले. आपण आपल्या बहिणीला फसवले ही भावना बनुचे मन खात होती. पण राधाबाईंना हे सांगायला तिचे मन धजावत नव्हते. 

चार दिवसांनी आबासाहेब घरी आले. काहीच घडले नाही अशा आविर्भावात त्यांनी बनुला पुढच्या दौऱ्याची आखणी सांगायला सुरूवात केली. पण बनु आबासाहेबांना टाळू लागलेली पाहताच ते नाराज झाले.
"जे काही झाले ते दोघांच्याही संमतीने झाले. यात माझा असा दोष काहीच नाही बनु. तुझी इच्छा असेल तर आपण लग्न करू. तसा ही राधाबाईंना राजकारणात अजिबात रस नाही". आपण दुसरा घरोबा करू हवं तर". आबासाहेब थोड्या बेफिकिरीने म्हणाले.
"यात चूक कोणा एकाचीच नाही ,तर ती दोघांची ही आहे. माझा पाय घसरला म्हणून आपण ही त्याच वाटेने का यावे आबासाहेब? हे सारे राधाताईला कळल्यास किती मोठा गजहब होईल हे आपण जाणताच. म्हणूनच मी पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे जात आहे." - बनुबाई उद्विग्नपणे बोलत होत्या.
हे ऐकून बाबासाहेब जागचे उठले आणि बनुबाईंना अडवू लागले. "आम्हाला सोडून जाऊ नका बनु. तुमच्यासारखे सौंदर्य राधाबाईंत नक्कीच नाही. आमचे आपणावर मन जडले..आ..हे."
'आबासाहेब' "बोलताना भान राखा आबासाहेब इनामदार." बनुचा मोठा आवाज ऐकून राधाबाई आपल्या खोलीतून पळत बाहेर आल्या. दोघांत नक्की काय बोलाचाली झाली, हे राधाबाईंना शेवटपर्यंत कळालेच नाही. अखेर बनुबाई घर सोडून निघून गेल्या.
बनुबाईंना 'दिवस गेले' होते. ही गोष्ट त्यांना स्वतःला समजायला दोन महिने गेले. बनुबाईंच्या मनात आगडोंब उसळला. आपण आपल्या बहिणीला फसवले, ही भावना अनावर होऊन त्यांनी स्वतः ला संपवायचा विचार केला.
मात्र बाळाचा विचार मनात येताच त्यांनी निर्धाराने स्वतःला सावरले. नाईलाजाने त्यांनी ही गोष्ट आपल्या आई-वडिलांच्या कानावर घातली. हे ऐकताच बनुच्या वडिलांनी खूप त्रागा केला, आईने ही तिच्याशी अबोला धरला. त्यात आबासाहेब त्यांचे "जावई". मोठा राजकारणी माणूस. त्याला कसे बोल लावणार? आल्या परिस्थितीला तोंड देणे तर भागच होते. शिवाय बनुच्या पोटातल्या बाळाची काय चूक होती? तिची जशी चूक, तशी आबासाहेबांची देखील होतीच की.

इकडे " लग्नाला दोन वर्षे झाली, तरी राधाबाईंनी अजून आम्हाला वारस दिला नाही" म्हणून राधाबाईंच्या सासूबाई त्यांना बोल लावत होत्या. राधाबाईंना माहेरी जाण्यास त्यांनी बंदी घातली. त्यामुळे राधाबाई आणखीनच उदास राहू लागल्या. एकलकोंड्या झाल्या. आबासाहेबांनी स्वतः ला कामात आणखीनच व्यस्त करून घेतले.
नऊ महिन्यानंतर बनुबाईंनी एका गोंडस 'मुलाला ' जन्म दिला. कुठूनतरी आबासाहेबांच्या कानावर ही बातमी आली. तसे हातातला दौरा टाकून ते आपल्या बाळाला पाहायला बडोद्यात पोहोचले.

'बनुबाईंना मुलगा झाला.' या बातमीने राधाबाईंना  धक्काच बसला होता. याचा सोक्ष- मोक्ष लावण्यासाठी त्या सासूबाईंचा विरोध पत्करून आपल्या माहेरी, 'बडोद्यात 'पोहोचल्या. तिथे आबासाहेबांना पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांना वाटले आबासाहेब आले असतील ही बातमी ऐकून. बनु त्यांना किती मानते, हे राधाबाईंना माहीत होते.
बराच वेळ झाला तरी आबासाहेब बनुबाईंच्या खोलीतून बाहेर येण्याचे नावच घेत नव्हते. अखेर हिंमत करून राधाबाईंच्या आईने सारे काही त्यांच्या कानावर घातले . राधाबाईंसाठी हा जबरदस्त धक्का होता. हे सहन न होऊन राधाबाई बाळाला न पाहताच पुन्हा मुंबईला निघून आल्या.

राधाला सासूबाईंनी आधार दिला. आबासाहेबांना मात्र त्यांनी खूप बोल लावले. बोलणे ही टाकले त्यांसोबत. यातच त्यांची तब्येत हळू -हळू बिघडत गेली. झाल्या गोष्टीचा त्रास साऱ्यांनाच झाला होता.
राधा अजूनही संतती सुखापासून वंचित होती. "बनुबाईंनी बाळ राधाबाईंच्या हाती सोपवावे" अशी आपली शेवटची इच्छा त्यांनी राधाबाईंच्या आईला बोलून दाखवली. शेवटी आबासाहेबांचेच रक्त होते ते. बनुने खूप विचार करून बाळाला आपल्या "देवराजला" काळजावर दगड ठेऊन राधाबाईंच्या हाती सोपवले, आपण केलेल्या चुकीचे प्रायश्चित म्हणून.

सत्य समजल्यानंतर आबासाहेबांपासून राधाबाईंनी कधीच फारकत घेतली होती. एक 'पत्नी 'म्हणून त्या कधीच माफ करू शकल्या नाहीत आबासाहेबांना.
सहा महिन्यांत बनुचे 'अजित केळकर' या एका 'राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत' लग्न झाले. या दोघांचेही एकमेकांशी फारसे कधी पटलेच नाही. त्यामुळे एकमताने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि बनुबाई पुन्हा बडोद्यात आल्या. पुढे त्यांनी '' केळकर "हेच आडनाव कायम ठेऊन सामाजिक कार्यात, राजकरणात स्वतः ला गुंतवून घेतले. त्यांनी पुढे ना राधाबाईंशी काही संबंध ठेवला, ना आबासाहेबांशी.

राधाबाई खुश होत्या. बनु जरी चुकीचे वागली असली तरी, त्या एका चुकीमुळेच राधाबाईंना 'आई होण्याचे सुख ' मिळाले होते. काळाच्या ओघात राधाबाई सारे काही विसरल्या. त्यांनी देवराजकडे पाहून बनुबाईंना मनोमन माफ करून टाकले.
देवराज हळू-हळू मोठा होत होता. आबासाहेबांना देवराजकडून खूप अपेक्षा होत्या, अखेर इनामदार घराण्याचा वारस होता तो. देवराजला राधाबाईंकडे सोपवल्यानंतर बनुबाईंनी राधाबाई आणि आबासाहेबांशी सारे संबंध तोडून टाकले होते. देवराजना देखील इतकेच माहित होते की बनुबाई या आपल्या मावशी आहेत आणि त्या राजकरणात, सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांना याची कल्पनाही नव्हती की, तो राधाबाईंचा मुलगा नसून बनुबाईंचा मुलगा आहे. देवराजना सत्य समजल्यावर आपल्यापासून दूर जातील, अशी राधाबाईंना भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत देवराजना कळू दिले नव्हते की, तो बनुबाईंचा मुलगा आहे.

देवश्रीला आपली सून म्हणून स्वीकारण्यास आबासाहेबांनी नकार दिला. त्यामुळे देवराजना घर सोडावे लागले आणि योगायोगाने याचवेळी बनुबाई मुंबईत स्थायिक व्हायला एकच गाठ पडली. कदाचित नियतीनेच हा डाव रचला असेल, माय -लेकराची भेट घडविण्याचा. म्हणून आईसाहेबांच्या निरोपानुसार देवराज देवश्रीला घेऊन बनू मावशींकडे राहायला गेले.
आज अनेक वर्षांनी राधाबाई आणि बनुबाई एकमेकींना भेटत होत्या.
बनुबाई पुन्हा -पुन्हा राधाबाईंची माफी मागू लागल्या, तसे राधाबाईंनी बनुबाईंचे अश्रू पुसत त्यांना आपल्या जवळ घेतले. "आम्हाला आई होण्याचे सुख केवळ तुमच्यामुळेच मिळाले बनु." झालं गेलं विसरून आम्ही कधीच माफ केले तुम्हाला. मात्र या प्रकरणा नंतर आबासाहेबांशी आमचे नाते पहिल्यासारखे जुळलेच नाही. त्यांनीही कधी प्रयत्न केला नाही, आमच्या सोबत सुखी संसार करावा म्हणून. ते राजकारणातच मन रमवत राहिले. कदाचित त्यांना तुमच्यासोबत संसार करायचा होता बनुबाई. पण एक 'पत्नी ' या नात्याने आम्ही त्यांना कधीच परवानगी दिली नसती, याची त्यांना कुठेतरी कल्पना होतीच. म्हणून ते आमच्यापासून खूप दूर गेले. देवराजकडूनही त्यांना खूप अपेक्षा होत्या. कॉलेजमध्ये असताना ते विविध उपक्रमात सहभागी असायचे, तेव्हा आम्हाला खात्री होती की, देवराज राजकारणात नक्कीच प्रवेश करतील. मात्र राजकारणात फारसा रस नसल्याने देवराजनी आपला व्यवसाय सुरू केला. देवश्री सारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आबासाहेब खूप नाराज झाले. त्यांनी देवराजना घर सोडून जाण्यास सांगितले. आमचा आधारच गेला बनु. योगायोगाने तुम्ही इथे आलात आणि आमची काळजी मिटली. देवाची हीच इच्छा असेल की आता 'माय-लेकराची 'भेट व्हावी". राधाबाई कितीतरी वेळ बोलत राहिल्या बनुबाईंशी
क्रमशः
©️सायली

🎭 Series Post

View all