वारसा भाग 2

कथा स्त्री च्या विविध रूपांची

"आम्हाला माहित आहे, तुम्हाला राजकारणात फारसा 'इंटरेस्ट' नाही. तुम्हास वाटते तितके सोपे नाही राजकारण आणि फारसे अवघड ही नाही. राजकारणाचे अनेक पैलू आहेत, रंग आहेत. ते त्यात उतरल्याविना कळायचे नाहीत तुम्हाला. 'आबासाहेब इनामदार ' या नावास आज ही लोक मानतात. आम्ही हे सारं साम्राज्य उभं केलं ते केवळ आपल्यासाठी 'राजे '. तुम्ही आमचे एकुलते एक पुत्र. तुम्हीच आमचा 'वारसा ' पुढे न्यायचा आणि यासाठी आम्ही तुमच्याकडून थोडी अपेक्षा ठेवली तर काय हरकत आहे?"  आबासाहेब देवराजला म्हणाले.
"हे सारे ठीक आहे. पण पैशाने नाती विकत घेता येत नाहीत आबासाहेब, हवे असल्यास एखादे 'पद 'घेता येईल. आपल्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही ठरवलेल्या मुलीशी आम्ही लग्न करणे कधीच शक्य नाही. देवश्रीच्या वडिलांना आम्ही शब्द दिला आहे. आम्ही देवश्रींवर मनापासून प्रेम करतो आणि यासाठीच तुमची पुन्हा परवानगी मागायला आलो आहोत". देवराज मनापासून बोलत होते.
" या लग्नास आम्ही कदापिही परवानगी देणार नाही राजे. हा तुमचा हट्टच असल्यास, तुम्ही जाऊ शकता इथून. तुम्ही तुमचे निर्णय घेण्यास मोकळे आहात." आबासाहेब देवराजकडे पाठ फिरवीत म्हणाले. "आम्ही अजूनही समर्थ आहोत हे सारे साम्राज्य सांभाळायला. आमचा 'वारसा ' पुढे न्यायला अनेक कार्यकर्ते आहेत राजे. तुमची आम्हाला गरज नाही. तुमचे आमचे मार्ग आता वेगळे".आबासाहेब देवराजवर आवाज चढवत म्हणाले.
देवराजना हे अपेक्षितच होतं. आबासाहेबांचा स्वभावच असा होता. कुणाशी पटलं नाही तर ते त्यांना सरळ तोडून टाकत. देवराजनी निघण्याची तयारी केली. आईसाहेबांचे रडून- रडून हाल झाले होते. आबासाहेबांचा शब्द अंतिम होता घरात. त्यांच्यापुढे बोलण्याची कुणाचीच हिंमत नव्हती. आईसाहेब तर कधीच बोलत नसत त्यापुढे. त्या केवळ मूकपणे पाहत होत्या सारं. निघताना देवराजनी आईसाहेबांना आपल्या मिठीत घेतल. आईसाहेब मूकपणे अश्रू ढाळत त्या मिठीत सामावल्या. "राजे, आम्ही कुणाकडे पाहायचे आता? तुम्हीच आधार होतात आमचा. जा.. तुम्ही, आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगा. देवश्रींना ही चांगली साथ द्या. आमचे आशीर्वाद सदैव आहेत तुमच्या पाठीशी". देवराज हळूच डोळ्यातले पाणी पुसत आईसाहेबांच्या पाया पडले. आपले जरूरीपुरते सामान घेऊन ते आबासाहेबांचा निरोप न घेताच घराबाहेर पडले. तसेही निरोप घेण्यासारखे उरले तरी काय होते? मागे वळून न पाहताच देवराज गेटबाहेर पडले. बंगल्यातील सारी कामकरी मंडळी तिथे उभी होती. "साहेब जाऊ नका", म्हणत होती. देवराज नी त्यांना समजावले आणि ते देवश्रीच्या घरी जायला निघाले.
देवराजनी घडलेला सर्व प्रकार देशमुखांच्या घरी सांगितला. आता माझ्या हातात काहीच नाही, तरी तुम्ही देवश्रीशी माझे लग्न लावून द्याल? असा सवाल त्याने सुरेशरावांना केला. सुरेशरावांना घडलेल्या प्रकाराचा आनंद मानावा, की दुःख हेच समजत नव्हत. कारण देवश्री सारख्या एका सामान्य मुलीशी एका बड्या घराण्यातील मुलाशी सोयरिक होणे ही साधी -सोपी गोष्ट नव्हती. त्यापायी देवराज ना त्यांचे कुटुंब,घरदार, ऐशोआराम, संपत्ती या साऱ्यांवर पाणी सोडावे लागले होते. सुरेशराव आणि देवश्रीच्या आईने देवराजना पुन्हा एकदा समजावून पाहिले. पण देवराज आणि देवश्री आपल्या निर्णयावर ठाम असल्याने सर्वानुमते कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय झाला. महिन्याभरातच काही मोजक्याच मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह देवराज आणि देवश्रीचे  'शुभमंगल' पार पडले. लग्नानंतर देवराज देवश्रीसह आपल्या मावशीच्या घरी राहण्यासाठी जाणार होते.
या लग्नाची बातमी वृत्तपत्रात छापून आली. अगदी रसभरीत वर्णनासह. अशा काही अफवा ही  उठल्या, की देवराज आपला स्वतंत्र 'पक्ष ' स्थापन करून येणारी निवडणूक लढवणार आहेत. इकडे सारीकडे आबासाहेब उत्तरं देऊन थकले होते. खुद्द आबासाहेबांचा मुलगाच त्यांच्या विरोधात गेल्याने या संधीचा फायदा घेत त्यांचे 'राजकीय विरोधक' जास्तच आक्रमक झाले होते. एक वेळ या लग्नाला परवानगी दिली असती, तरी चालले असते. अशी अवस्था आबासाहेबांची झाली होती .

समुद्रकिनाऱ्यावरील थोड्या अंतरावर असलेल्या 'विसावा ' बंगल्यात देवराज आणि देवश्री यांचे जोरदार स्वागत झाले. देवराज यांच्या मावशी या बंगल्यात एकट्याच राहत असत. दिमतीला दोन-तीन नोकर ही राहत होते सोबत. देवराज यांच्या मावशी 'बनुबाई केळकर ' हे एक राजकारणातील मोठ्या व्यक्तिमत्व होतं. सामाजिक कार्यात ही त्यांचा कायम हिरिरीने सहभाग असायचा. अगदी सामान्य माणसापासून ते एखाद्या सामाजिक संस्थेपर्यंत त्या सर्वांना उत्स्फूर्तपणे मदत करत असत. देवश्रीला मावशींचा परिचय नव्यानेच होत होता. तसे 'बनुबाई केळकर' हे नाव देवराजकडून ऐकून होती. प्रत्यक्षात भेटण्याचा योग कधी आलाच नव्हता. इतकी वर्षे बडोद्यात राहणाऱ्या बनूबाई अलीकडेच मुंबईत स्थायिक झाल्या होत्या. पन्नाशी ओलांडलेल्या बनू मावशी अजूनही उत्साहाने कार्यरत होत्या.

देवश्री माप ओलांडून आत आली. बनू मावशीने तिचे प्रेमाने स्वागत केले. देवश्री मावशींकडे आश्चर्याने पाहातच राहिली, कारण देवराज आणि मावशी मध्ये खूपच साम्य होते. तेच घारे डोळे, तरतरीत नाक, कुरळे केस.. मावशींकडे पाहिल्यावर देवराजचा भास होत होता. देवराजच्या बऱ्याच सवयी, लकबी बनू मावशीं सारख्याच होत्या. देवश्रीला राहून- राहून याच गोष्टीचे सारखे आश्चर्य वाटत असे.

हळू-हळू देवश्री घरात रुळत होती. देवराज ही बऱ्याच वेळा आपल्या व्यवसायासाठी फिरतीवर जात असत. त्यामुळे बनू मावशी आपल्यासोबत देवश्रीला घेऊन जाऊ लागल्या. कॉलेजमध्ये असताना अशा कार्यात सहभाग घेणे आणि खऱ्या अर्थाने समाजात मिसळून कार्य करणे, यामध्ये खूपच फरक होता. देवराजकडे असणारी धडाडी, जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी,असे सारे गुण बनू मावशीत ही होते. त्यामुळे देवश्री बनु मावशींचे कार्य पाहून फारच प्रभावित झाली. पुन्हा एकदा काहीतरी वेगळे करून दाखवण्याची 'जिद्द ' देवश्रीमध्ये निर्माण झाली. बनु मावशींनी देवश्री  ची अनेक लोकांसोबत ओळख करून दिली. आता बनु मावशीं सोबत देवश्रीही ठिक -ठिकाणी जाऊन लोकांच्या अडी-अडचणी समजून घेण्यास, सोडवण्यास मदत करू लागली. समाजात वावरताना लोकांना अनेक अडी - अडचणींचा सामना करावा लागतो, पोटासाठी वाट्टेल ते कष्ट करायला तयार असतात ते साक्षरतेचे प्रमाण कितीही वाढले असले तरी अनेक शिक्षणापासून वंचित राहिलेली लहान मुले, तसेच बाल विवाह, हुंड्यासाठी होणारा सुनेचा छळ या 'प्रथा' आजही समाजात सुरूच आहेत. गरिबी आणि श्रीमंतीतील वाढता भेद, वाढती बेरोजगारी या साऱ्याशी देवश्रीची पुन्हा नव्याने आणि जवळून ओळख झाली. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांच्या व्यथा, ऐकून पाहून देवश्री अस्वस्थ होऊ लागल्या. बनू मावशींनी देवश्रीची हीच अवस्था जाणून तिला काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी आणखी उद्युक्त केले. याला देवराजची ही साथ होतीच. आता कुठे देवश्रीचा खऱ्या अर्थाने सुरू झालेला पुढचा प्रवास देवश्रीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार होता.

रविवार सुट्टीचा दिवस म्हणून देवराज आणि देवश्री बाहेर जाण्यासाठी तयार होत असताना अचानक आईसाहेब आलेल्या पाहून देवराजना खूप आनंद झाला. आज कितीतरी महिन्यांनी ते आईसाहेबांना भेटत होते. देवश्रीला आईसाहेबांनी मायेने जवळ घेत तिची विचारपूस केली. बनु मावशींसोबत सुरू असलेल्या देवश्रीच्या कार्याची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. लग्नानंतर पहिल्यांदाच भेट होत असल्याने त्यांनी आपल्या सुनेसाठी खूप सार्‍या भेटवस्तू ही आणल्या होत्या. आबासाहेब दोन- चार दिवसांसाठी दौऱ्यावर गेले असता, आईसाहेब कोणालाही काही न बोलता बनु मावशींकडे आल्या होत्या. आईसाहेब आणि बनूबाई दोघी बहिणी खूप वर्षांनी भेटत असल्याने कितीतरी वेळ दोघी भरभरून बोलत राहिल्या. जुन्या आठवणी ना उजाळा देत गहिवरल्या.
राधाबाईंचे आबासाहेबांशी लग्न होऊन त्या इनामदारांची सून झाल्या. राधाबाई अत्यंत साध्या शांत आणि संयमी होत्या आणि आबासाहेबांचा स्वभाव मात्र कडक, हेकट आपले तेच खरे करणारा. राधाबाईं सोबत पाठराखीण म्हणून आलेल्या बनुबाई आबासाहेबांच्या नुकत्याच केलेल्या राजकीय प्रवेशामुळे खूप प्रभावित झाल्या. या राजकीय जगाशी बनुची नव्यानेच ओळख झाली.
क्रमशः
✍️सायली.

🎭 Series Post

View all