वारसा भाग 4

कथा स्त्री च्या विविध रूपांची

आईसाहेब बनुबाईंशी खूप वेळ सुख-दुःखाच्या गोष्टी करत बसल्या. त्यांची जायची वेळ झाली तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा देवश्री आणि देवराजला मायेने जवळ घेतले आणि मागे न पाहताच त्या निघून गेल्या.
बनुबाई कुठल्याशा दौऱ्यावर गेल्याने देवश्री आपल्या माहेरी गेली. खरंतर त्याही जाणार होत्या बनुमावशींच्या सोबत. पण तब्येत बरी नसल्यामुळे जाऊ शकल्या नाहीत. माहेरी आल्यावर देवश्रींची तब्येत जास्तच बिघडली. तसे अनिताबाईंनी डॉक्टरबाईंना बोलावून आणले. देवश्रीला तपासून झाल्यावर डॉक्टरबाई म्हणाल्या, "तोंड गोड करा अनिताताई, गोड बातमी आहे. देवश्री आई होणार आहात तुम्ही." ही गोड बातमी ऐकून साऱ्यांना खूप -खूप आनंद झाला.

बनु मावशी दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी देवश्रीला पुन्हा आपल्या बंगल्यावर नेले. त्या स्वतः देवश्री ला काय हवे, काय नको हे जातीने पाहू लागल्या. खरचं बनुमावशी आणि देवश्रीची छान गट्टी जमली होती. दोघींनाही एकमेकींशिवाय अजिबात करमत नव्हते. देवश्रीला बनु मावशींविषयी फार आदर वाटे आणि मावशी देवश्रीवर पोटच्या मुलीप्रमाणे माया करत.

इतक्या वर्षांनी देवराजला पाहून बनुबाईंना कोण आनंद झाला होता. त्याला मायेने जवळ घ्यावे, आपली ओळख करून द्यावी. असे त्यांना सारखे वाटे. पण त्या देवराजसोबत अंतर ठेऊन वागत होत्या. त्यांना सत्य समजल्यास ते कसे 'व्यक्त ' होतील याची त्यांना भीती वाटत होती.

"आज तुमच्या आईसाहेब इथे असत्या , तर त्यांना ही बातमी ऐकून खूप -खूप आनंद झाला असता. आणखी कितीतरी लाड पुरवले असते त्यांनी तुमचे." बनु मावशी देवश्रीजवळ बसत म्हणाल्या. "राधाबाईंना दोन वर्षे झाली, तरी मूल-बाळ नव्हते. तुमच्या आजेसासूबाईंनी खूप त्रास दिला त्यांना या गोष्टीवरून. त्यातच आबासाहेबांचा स्वभाव पडला कडक, हट्टी. आपले मन कुठे मोकळ्या करणार होत्या राधाबाई? त्यातच आमच्या हातून घडलेला प्रमाद".. जुन्या आठवणीत रमलेल्या बनुमावशी या वाक्यापाशी येऊन थांबल्या. यामुळे शांतपणे मावशींचे बोलणे ऐकणाऱ्या देवश्रीची उत्सुकता वाढली. पण बनुमावशींनी विषय बदलल्याने देवश्रीला फार काही विचारणे योग्य वाटले नाही.

दिवस जात होते. बनुमावशींच्या बरोबरच देवराज ही देवश्रीची काळजी घेत होते. आईसाहेब अधून- मधून चौकशी करत होत्या, देवश्रीसाठी काही ना काही पाठवत होत्या. 
एक दिवस देवश्री आपल्या खोलीत विश्रांती घेत असताना खाली बैठकीच्या खोलीतून मोठ्याने बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. पण आबासाहेबांच्या आवाजाने देवश्रीने बैठकीच्या खोलीत येणे टाळले.  "बनु, खरं तर आम्ही देवराजना पाहायला आलो होतो. देवश्रींवरच्या असलेल्या रागामुळे आम्ही राजेंना घराबाहेर काढलं खरं, पण राधाबाई राजेंच्या जाण्याने खूप खचल्या आहेत. आम्हीही त्यांच्या इतकेच, मनापासून प्रेम करतो राजेंवर. पण ते योग्य शब्दात मांडू शकत नाही हेच खरे. गेली कित्येक वर्षे आपली भेट नाही बनु. मात्र तुमच्या आयुष्यात जे काही प्रसंग घडले याची आम्हाला सारी माहिती मिळत होती, अगदी तपशीलवार.
राधाबाईंशी आमचे लग्न झाले खरे, पण आमचा जीव तुमच्यावर जडला. घडल्या प्रसंगानंतर आम्ही तुम्हाला विसरू शकलो नाही बनु. त्यामुळे आपोआपच राधापासून दूर गेलो आम्ही.
देवराज अगदी तुमच्यावर गेले आहेत. हुशार संयमी, कणखर. अशीच साथ आम्हाला लाभली असती, तर आम्ही कुठल्या उंचीवर पोहचलो असतो! पण तुमच्या रूपाने आपली आठवण म्हणून देवराज आमच्यासोबत होते ,हे काही कमी नव्हते.
देवश्रींशी लग्न करण्याचा राजेंचा निर्णय आम्हास पटला नाही. कारण देवश्री आम्हाला तुमच्यासारखाच वाटल्या बनु..धडाडी, जिद्दी. राजकारणासाठी अगदी योग्य असा स्वभाव असणाऱ्या. त्यांनी तुमची जागा घेतली असती, तर आमच्या मनातील तुमची प्रतिमा पुसली गेली असती. हे आम्हास नको होते. म्हणूनच आम्ही देवराजना निक्षून सांगितले, आपल्या घराण्यातील स्त्रियांना राजकारणात प्रवेश नाही." आबासाहेब बनुबाईंशी बोलत बैठकीच्या खोलीत अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते.
देवराज बनुबाई आणि आबासाहेब यांचा मुलगा आहे हे ऐकून देवश्रीला धक्का बसणे साहजिकच होतं. "देवराज आणि बनू मावशी यात इतके साम्य कसे!" याचा उलगडा आता देवश्रीला झाला होता.

इतका वेळ शांतपणे ऐकून घेणाऱ्या बनुबाई उठून आबासाहेबांच्या अगदी समोर उभ्या राहिल्या. "देवराज ना राधाबाईंच्या हाती सोपवून आम्ही कधीच आनंदी नव्हतो आबासाहेब. ते आपल्या दोघांच्या उत्कट क्षणांचे एक सुंदर चित्र होते. आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याला सोपवताना काय यातना होतात, ते एका स्त्रीलाच ठाऊक. मलाही आवडले असते आपल्यासोबत संसार करायला. पण हे सोपे नक्कीच नव्हते. त्याआधी राधा कायद्याने आपली पत्नी होती आणि माझी सख्खी बहिण. आपल्या बहिणीच्या आयुष्यासोबत खेळण्याचा अधिकार नव्हता मला. योगायोगाने तिला मूलबाळ झालेच नाही. यासाठीच नियतीचा डाव असेल का हा? आणि आबासाहेब तुम्ही राधापासून दूर जायला तिच्या जवळ होतात कधी? कायम आपल्याच विश्वात मग्न होतात तुम्ही. देवराजमुळे राधाबाईंचे मन तरी गुंतून राहिले. नाहीतर त्यांना हा आघात सहन झाला नसता. पार कोलमडून गेल्या असत्या त्या. मी तुमच्यासोबत लग्न करून वेगळा संसार मांडला असता तर कोणीच सुखी राहिले नसते. शिवाय समाजातही काय किंमत राहिली असती आपल्याला आबासाहेब?" इतके बोलून क्षणभर बनुबाई थांबल्या.
" तुमच्या आईसाहेबांच्या शब्दाला मान देऊन आम्ही देवराजला तुमच्याकडे सोपवले. आता तुम्ही आमच्या शब्दाला मान द्यायचा "इनामदार". राधाबाईंना आपलेसे करा आणि देवश्रींना सून म्हणून स्वीकारा. हवं तर ही शेवटची इच्छा समजा आमची.
आबासाहेब ही आपली अखेरची भेट. या तुम्ही. तसेही आम्ही पूर्वसूचनेशिवाय भेटत नाही फारसे कोणाला." बनुबाई हात जोडून म्हणाल्या. तसे आबासाहेब नाराजीने निघून गेले. बनुबाई मात्र अस्वस्थ झाल्या.
या प्रकरणानंतर बनुबाईंची तब्येत अचानक बिघडली. अंथरुण धरले त्यांनी. नऊ महिने सरत आल्याने देवश्रीही अवघडल्या होत्या. त्यामुळे आईसाहेब बनुबाईंकडे मदतीला धावून आल्या. आईसाहेबांनी बनुच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नाही. तरीही बनुबाईंच्या तब्येतीला आराम पडत नव्हता. सारेच काळजीत पडले होते.

एके दिवशी बनुबाईंनी देवराज आणि देवश्रीला बोलावून घेतले. "देवराज एक वचन द्याल आम्हाला?" बनुबाई देवराजना आपल्या जवळ बसवत म्हणाल्या. "आबासाहेबांवरचा राग विसराल राजे? तुमच्या आबासाहेबांची आणि आईसाहेबांचीही हीच इच्छा आहे. आमचा हा बंगला, ही सारी संपत्ती आम्ही तुमच्या नावावर केली आहे. आमचा वारस तुम्हीच आहात देवराज. आमच्या पोटी जन्म घेतलात तुम्ही."
"होय, देवराज तुम्ही आमचे रक्त नसून, आबासाहेब आणि बनुबाईंचे.." आईसाहेब आपले अश्रू पुसत म्हणाल्या. देवराजसाठी हा मोठा धक्काच होता.
"आमच्या कार्याचा 'वारसा ' मात्र देवश्री चालवतील." देेवश्रींकडे पाहत बनुबाई क्षीण हसल्या. देवश्रींना जवळ घेत त्या म्हणाल्या, "आमचा आणि आबासाहेबांचा उत्तराधिकारी." आबासाहेब देवश्रींत आम्हाला पाहतात म्हणे.
"राजकारणाची गोडी आबासाहेबांच्यामुळे लागली आम्हाला देवराज. पूर्वी आम्ही आणि आबासाहेब राजकीय दौरे करायचो. अशाच एका निवांतक्षणी आम्ही दोघे एकमेकांच्या सहवासात आलो. त्यातून आम्हाला दिवस गेले. तुमच्या जन्मानंतर, परिस्थितीनुसार आणि तुमच्या आजी साहेबांच्या इच्छेनुसार आम्ही तुम्हाला राधाबाईंकडे सोपवले. कारण त्यांना मूलबाळ नव्हते. शिवाय तुम्ही आबासाहेबांचेच रक्त होतात." इतके बोलून बनुबाई धडपडत उठून बसल्या." आबासाहेब आणि आईसाहेबांना कधीच अंतर देऊ नका देवराज. हीच आमची शेवटची इच्छा. वचन देताय ना आम्हाला?" आपला हात पुढे करताना बनुबाई अचानक तोल जाऊन खाली पडल्या, ते कधीच परत न उठण्यासाठी. सगळीच धावपळ उडाली.

✍️सायली.

🎭 Series Post

View all