वारसा भाग 1

कथा स्त्री च्या विविध रूपांची

समुद्राच्या किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर वसलेला टुमदार बंगला 'विसावा'. सायंकाळच्या प्रकाशात फार छान दिसत होता. बंगल्या भोवतीची दाट ,गच्च झाडी पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरून गेली होती. अथांग समुद्रात दूरवर दिसणाऱ्या छोट्या- छोट्या बोटी हळू -हळू पुढे सरकताना दिसत होत्या. मध्येच समुद्री पक्षी मासे पकडण्यासाठी समुद्रात झेपावत होते. या वातावरणाचा आनंद घेत बंगल्यापुढे पसरलेल्या लॉनवर मा. मुख्यमंत्री ' सौ. देवश्री इनामदार' बसल्या होत्या. आज कितीतरी दिवसांनी त्यांना असा निवांत वेळ मिळाला होता. बंगल्याच्या आवारात कार्यकर्त्यांची लगबग चालली होती. देवश्री मॅडमचे पी. ए. त्यांच्याशी काही तरी बोलण्यासाठी त्यांच्या मागे -पुढे करत होते. मात्र याकडे " देवश्री इनामदारांचे" लक्षच नव्हते. त्या कुठल्याशा विचारात गुंग झाल्या होत्या.

गोरापान चेहेरा, बोलके डोळे, आनंदी आणि उत्साही व्यक्तिमत्व असणाऱ्या देवश्री यांचा एक 'सामान्य स्त्री ' ते 'यशस्वी राजकारणी' हा  प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. आयुष्यात काहीतरी 'वेगळं' करून दाखवण्याची जिद्द देवश्री यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांची ओळख, एक वर्ष सिनियर असणाऱ्या 'देवराज इनामदार' यांच्या सोबत झाली.
'देवराज इनामदार' एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. ते कॉलेजमध्ये 'देव ' या टोपण नावाने प्रसिद्ध होते. सहा फूट उंची, दाट कुरळे केस, घारे डोळे, तरतरीत नाक आणि कायम चेहेऱ्यावर असणारे एक खेळकर हास्य. कॉलेजमधील कितीतरी मुली देवराज सोबत 'मैत्री ' करायला उत्सुक असायच्या. मात्र देवराजने असल्या गोष्टीत कधीच रस घेतला नाही. देवराज यांचा कॉलेजमधील एन. सी. सी., स्पोर्ट्स, एन. एस. एस. पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, कॉलेज मधील निवडणुका अशा अनेक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग असायचा. देवराजपासून प्रेरणा घेऊन देवश्रीही कॉलेजमधील विविध उपक्रमात हळू -हळू सहभागी होऊ लागली. निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्व, मेहेनत करण्याची तयारी, धडाडी, जिद्दी, मत परखडपणे मांडण्याची देवश्रीची पद्धत पाहून, देवराज खूपच प्रभावित झाले. त्यांनी देवश्री ला आपलं पूर्ण सहकार्य दिलं. पुढे देवराज यांच्या पाठिंब्यामुळे कॉलेजमधील जी. एस. च्या निवडणुकीसाठी देवश्री पात्र ठरल्या. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.
आता देवराज आणि देवश्री यांच्या ओळखीचे रूपांतर छान 'मैत्रीत' झाले. जसं जशी दोघांतली मैत्री फुलत गेली, तसे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

देवराज यांचे वडील '"श्री. अरविंद इनामदार " म्हणजेच "आबासाहेब" हे राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. देवराज हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांना देवराज कडून खूप अपेक्षा होत्या. अरविंद इनामदारांनी आपले अत्यंत जवळचे स्नेही आणि माजी आमदार नरवणेंची त्यांची सुकन्या इनामदारांची सून म्हणून करून घेण्याचा शब्द दिला होता. पण देवराजने देवश्री सारख्या सामान्य मुलीला वधू म्हणून निवडल्याने ते अत्यंत नाराज होते. तसे देवश्रीत नाकारण्यासारखे काहीच नसले, तरी इनामदारांची 'सून ' होणे हे काही सामान्य मुलीचे काम नव्हते. 'राजकीय पार्श्वभूमी' असलेलीच मुलगी या घरची 'सून ' व्हावी अशी आबासाहेबांची इच्छा होती. शिवाय हे लग्न झाल्यास आबासाहेबांचा फायदा काहीच होणार नव्हता. त्यामुळे त्यांनी देवराजला हरतऱ्हेने समजावून, धमकावून पाहिले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर देवराज ही आबासाहेबांचाच मुलगा होता. त्याने लग्न करेन, तर देवश्री सोबतच. अशी शपथ घेतली. त्यामुळे आबासाहेबांनी देवराजशी अबोला धरला होता.

आबासाहेबांची कार एका छोट्या बंगलीपाशी येऊन थांबली. ' एस.एन.देशमुख' दरवाज्यावर लावलेली पाटी वाचत आबासाहेब आपल्या पी. ए.- श्री. परब यांच्यासह मोटारीतून खाली उतरले. खुद्द आबासाहेब आपल्या घरी आलेले पाहून देवश्रीच्या वडीलांनी- 'सुरेशरावांनी' धावत- पळत येऊन त्यांचे स्वागत केले. जेमतेम चार खोल्यांचे घर. पण अगदी नीटनेटके,स्वच्छ, टापटीप दिसत होते. आबासाहेब उभ्या- उभ्याच घराचे निरीक्षण करीत होते. सुरेशरावांनी लागलीच बैठक अंथरून आबासाहेबांना बसायला जागा करून दिली.
"आपली कन्या घरी असल्यास तिला जरा बाहेर बोलवता का"? आबासाहेबांच्या शेजारी उभे राहत 'परब ' देवश्रीच्या वडिलांना म्हणाले. देवराज, देवश्रीसह अनेकदा देशमुखांच्या घरी येऊन गेले होते. दोघांतली मैत्री, लग्नाचा निर्णय याबाबत देवश्रीच्या घरी सारं काही माहित होत. "त्यासाठीच आबासाहेब आले असावेत का"? असा विचार करत सुरेशरावांनी आपल्या पत्नीकडे 'अनिताबाईंकडे 'पाहत देवश्रीला बोलावण्यासाठी डोळ्यांनीच खुणावले.

आबासाहेबांना पाहताच देवश्री त्यांच्या पाया पडली. बराच वेळ विचार करून आबासाहेब म्हणाले,
"आमच्या मुलापासून दूर जाण्याची किती किंमत घेणार तुम्ही देवश्री"? आबासाहेबांच्या आवाजात जरब होती. तशी परब यांनी लागलीच एक बॅग देवश्री समोर ठेवली. तशी देवश्रीने ती बॅग घेऊन उघडली, त्यात भरपूर पैसे होते. "
"आबासाहेब तुम्ही देवराजांची किंमत फारच 'कमी ' केलीत". असे म्हणत आहे तशी ती बॅग देवश्रीने आबासाहेबांच्या समोर धरली.
"देवश्री"...ठेव ते. सुरेशराव पुढे होत आबासाहेबांच्या समोर हात जोडत म्हणाले. "आम्ही सामान्य माणसं, हे असलं काही रुचत नाही आम्हाला".
"हेच म्हणतो आहोत आम्ही, सामान्य माणसाने आपल्यापेक्षा वरच्या पायरीवर पाऊल ठेवण्याआधी हजार वेळा विचार करावा. आणखी पैशांची व्यवस्था करू आम्ही. फक्त देवराजशी लग्न न करण्याचा किती मोबदला घेणार ते बोला." आबासाहेब आपला आवाज आणखी चढवत म्हणाले.
"आबासाहेब या पैशापेक्षा आमचे प्रेम जास्त किंमती वाटते मला. ते या पैशात नाही मोजता येणार. देवराज ना किती किंमत द्याल, आबासाहेब, आपले प्रेम विसरण्यासाठी?" निर्भिडपणे विचारत देवश्रीने आपल्या समोरची बॅग उचलून परबांच्या हातात दिली.
"देवश्री!! आपण कोणाशी बोलत आहात याचे भान ठेवा". आबासाहेब कितीतरी मोठ्याने गरजले आणि रागारागाने उठून देशमुखांच्या घराबाहेर पडले. तसे सुरेशराव आबासाहेबांच्या मागे धावले. पण तोपर्यंत आबासाहेबांची मोटार दूर निघून गेली होती.

आबासाहेबांची मोटार निघून गेलेली पाहताच देवराज देशमुखांच्या बंगल्यात शिरला. सुरेशराव चेहेरा पाडून बाहेर पायरीवर बसले होते. देवश्री आत अजुनही तशीच कोपऱ्यात उभी होती. देवराजला एकंदरीत परिस्थिती पाहून काहीतरी घडल्याचे जाणवले. झाला प्रकार देवश्रीच्या आईने देवराजच्या कानावर घातला.
"आम्ही साधी माणसे आहोत इनामदार. हे असे पैसै घेऊन, माझे तुमच्यावरचे प्रेम कमी होईल असं आबासाहेबांना वाटत असेल तर ते कधीच शक्य नाही. या घडीला तुमचा नकार असेल आपल्या लग्नाला तर मी कोणतीही जबरदस्ती करणार नाही तुमच्यावर. आबासाहेबांच्या मर्जीने खुशाल लग्न करा देव. राग विसरतील आबासाहेब तुमच्यावरचा". रागाने देवश्रीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
"माणूस पाहून प्रेम करायला लागलो तर आबासाहेबांना कधीच होकार दिला असता आम्ही. ते एक कसलेले राजकारणी आहेत.  आपले प्रेम ही त्यांनी राजकारणाच्या चष्म्यातून पाहिले आहे देवश्री. आम्ही लग्न करू ते केवळ तुमच्या सोबतच". देवराज देवश्री चा हात हातात घेत पुढे म्हणाले, "राजकारणात न शिरता आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला, हे आबासाहेबांना फारसं रूचलेल नाही. त्यांच्या खूप अपेक्षा आहेत आमच्याकडून. पण आम्हाला राजकारणात काही रस नाही, हे तुम्ही जाणताच. पण हे सारे गुण तुमच्यात दिसतात आम्हाला. हे आबासाहेबांना किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही. पण ते ऐकायलाच तयार नाहीत". म्हणतात, हा काही स्त्रियांचा प्रांत नव्हे. "आपल्या घरच्या स्त्रियांनी राजकरणात अजिबात पाऊल ठेवता कामा नये". "आपल्या स्वार्थासाठी राजकारण्यांशी सोयरिक चालते, पण राजकारणासाठी आवश्यक असणारे गुण असलेली सून मात्र चालत नाही, आमच्या आबासाहेबांना". असो, पुढे देवराज सुरेशरावांकडे वळून म्हणाले, बाबा तुम्ही लग्नाची तयारी सुरू करा. हे लग्न होईलच. मग "आबासाहेबांची परवानगी असो वा नसो."

क्रमशः

✍️©️सायली.

🎭 Series Post

View all