वारांगना

वारांगना


कथा

वारांगना..


एकदिवस खरेदीच्या मूडमधे फेरफटका मारत होते. रविवार होता. त्यामुळे मनी पण होती बरोबर. चालत चालत आम्ही रेड लाईट एरीया जवळ पोचलो. तिथे जेमतेम बारा-तेरा वर्षांची गोड मुलगी उभी होती. गोरी, गोबरे गाल कुरळे सोनेरी केस. चेहर्या रंग फासून उभी होती पण तिच सौंदर्य कमी होत नव्हत.
मनीने माझा एक हात गच्च धरला होता. दुसर्या हाताने मी तिच्या गालाला हात लावला. ती घाबरून मागे सरकली. "तुम कहाॅसे हो बेटी? तुम्हाला नाम क्या है?" मी पटकन विचारले. तेवढ्यात तिथल्याच चार पाच जणी आल्या आणि तिला ओढून घेऊन गेल्या. इकडे मनीही मला ओढून नेऊ लागली. नंतर खरेदी आटपून आम्ही घरी आलो. पण मनातून तिचा विचार जात नव्हता. एवढ्या लहान वयात का आली असेल ही इथे? कशी आली असेल? की आणले गेले असेल जबरदस्तीने?

मनीने बरोबर तोच प्रश्न मला विचारला. ," आई, किती गोड होती ना ती मुलगी. कशी आली असेल इथे? बिचारी. " आणि माझ्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. "वारांगना" शब्द डोक्यातून जाता जाईना.

आम्ही लहान होतो तेव्हा एवढे काही कळत नव्हते. पण "वारांगना" हा शब्द कानावर पडला की आम्ही लगेच आईला विचारायचो, " म्हणजे काय ग आई? ". आई तेव्हा नजरेनेच आम्हांला दटावत असे. काका आजोबा आणि आजी यांची भांडणं झाली की " वारांगना " हा आजोबांचा परवलीचा शब्द असे. ते ऐकून तोंडात पदर घालून खालमानेने आजी तिथून निघून जात असे.पुढे मोठे झाल्यावर आईने आजीची कथा सांगितली.

आजीच लग्न ती अकरा वर्षांची असताना झाले. अजून ती मोठी देखील झालेली नव्हती तेव्हा. आईच्या हाताखाली घरकाम शिकत होती. वडील नव्हते. काका आणि चुलत काका यांच्यावर भार. मोठ्या दोन बहिणींची अशीच लहान वयात लग्न लावून दिलेली. आजी म्हणजे रमा, रमा जरा जास्त देखणी, म्हणून तिला मोठी झाल्यावर सासरी पाठवायची असे ठरले होते. पण…

हा पण फार मोठा असतो स्त्रीच्या आयुष्यात. रमा मोठी झाली आणि सासरी धाडायच्या आधीच रमाच्या चुलतकाकाची नजर तिच्यावर पडली आणि तिच्या काकाने तिच्यावर बलात्कार केला. कुंपणानेच शेत खाल्ले. घरगुती सोपस्कार करून रमेला सासरी पाठवले. जरा एक- दोन वर्ष सुखाने गेली असतील तोपर्यंत रमाच्या नवर्याला दम्याचा अटॅक आला आणि त्यात तो दगावला. आणि तिथून रमाची परवड सुरू झाली. माहेरी जाता येत नव्हते. सासरी बापाच्या जागी असलेल्या सासर्यांची आणि चुलत दिराची वाईट नजर होतीच. सासूबाई चांगल्या होत्या. रमेला जपत होत्या तरीही सासरे नावाच्या गिधाडाने झडप घेतली. रमा अगदीच तरी ती प्रतिकार करत होती पण ढाण्या वाघा पुढे हरिणीचे काय चालणार? सासर्यांनी केलयं म्हंटल्यावर चुलत दिराची भीड चेपली. तो उघड उघड नालायकपणा करू लागला. कधी खोलीतून जात असताना वाट अडव, कधी मुद्दामहून शरीराला स्पर्श कर. रमेला किळस येत असे. पण इलाज नव्हता. शेवटी एक दिवस दिराने डाव साधलाच. आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. रमेला दिवस गेले. रमेला एका खोलीत बंद करण्यात आले. खाणे पिणे सुद्धा खोलीत.सासूबाईंनी आकांडतांडव केला कारण नक्की कुणाच पाप हे फक्त त्या देवालाच माहिती. आता सासूबाई सुद्धा रमेला पाण्यात पाहू लागल्या. " विधवा झालेली वारांगना" असे म्हणू लागल्या. रमेला मुलगा झाला आणि सासूबाईंनी अंथरूण धरले. रमावर सगळे पडले. ह्याच काळात रमेच्या सासरचा नातेवाईक त्यांच्याकडे शिकायला आला. रमेची आणि त्याची नजरानजर झाली. थोडथोडं बोलता बोलता चांगली ओळख झाली. आणि दोघ एकमेकाच्या प्रेमात पडले. शिक्षण झाल्यावर लग्न करायचे दोघांनी ठरवले. पण विधवेशी लग्न, म्हणजे त्याकाळी महापाप. समाजाला सामोर कसे जायचे?
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना नोकरी लागली तिही लांबच्या गावात. मग दोघेही बरोबरच तिकडे पळून गेले. दोघांचे आयुष्य सुखाने चालले होते. पण रमेनी एक चूक केली. आपला सर्व भुतकाळ तिने त्याला सांगितला. अगदी सासूबाई "विधवा झालेली वारांगना" म्हणत हे ही सांगितले. आणि त्यात थोडे दिवसांनी नातेवाईकांशी येजा सुरू झाल्यावर त्यांनी ही त्याला रमेबद्दल काहीबाही सांगितले. झाले, काही भांडण झाल्यावर तो तिला "वारांगना" म्हणू लागला. लहान असताना रमेला त्याचा अर्थ कळत नव्हता, पण आता ती मोठी झाली होती. तिला अर्थ कळत होता. तिने दोनचार वेळा विरोध दर्शवला. पण काहीच उपयोग झाला नाही. आता फक्त ती तोंडात पदर दाबून रडत रहायची. तिच्या लहानपणी तिच्यावर झाले त्यात काही चूक होती का? तिच्या मनाने तिने काही केल होत का?

किती वाईट आहे हे. अत्याचार करायचा कुणी आणि त्याची शिक्षा कुणाला? वारांगना म्हणजे वेश्या. पैसे घेऊन शरीर विक्रय करणारी. होती का रमा तशी? कोणतीच स्त्री मनापासून हे करायला तयार होणार नाही. पण तिची कोणतीही पार्श्वभूमी न जाणून घेता आपण तिच्यावर लेबल लावून मोकळे होतो. एखाद्या मनाने पवित्र असणाऱ्या मुलीला "वारांगना" म्हणण्यात धन्यता मानतो.

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज