वरद कामिनी

आज कामिनीचे घरातल्या कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. ती खूप नाराज होती. तिचा नवरा वरद हा नेहमीच लहान लहान कारणांवरून तिला ओरडायचा. पण प्रत्येक वेळी ती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. तो नेहमी तिला अडाणी, अशिक्षित, गावठी म्हणून टोचून बोलायचा. पण

वरद कामिनी


आज कामिनीचे घरातल्या कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. ती खूप नाराज होती. तिचा नवरा वरद हा नेहमीच लहान लहान कारणांवरून तिला ओरडायचा. पण प्रत्येक वेळी ती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. तो नेहमी तिला अडाणी, अशिक्षित, गावठी म्हणून टोचून बोलायचा. पण तरीही ती त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला घरकामात व्यस्त ठेवायचा प्रयत्न करायची.
पण आज ती जरा जास्तच दुखावली होती. कारणही तसच होतं.
आज वरदच्या कंपनी मॅनेजर ने पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये वरदला सपत्नीक यायचा आग्रह केला. यावेळी त्याला त्यासंबंधी कॉल आला तेव्हा नेमकी कामिनीही तिथेच होती. त्यामुळे तिला काही कळू नये म्हणून तो फोनवर त्यांच्याशी इंग्रजीत बोलू लागला. पण तिला सर्वकाही बरोबर समजले. वरदला तिला पार्टीला घेऊन जायचं नव्हतं. म्हणून ती आजारी आहे असं त्यांने खोटं सांगितलं.
यावेळी ती त्याला जाब विचारू शकली असती पण तिने तसे केले नाही. नेहमीप्रमाणे यावेळीही सगळं काही शांतपणे ऐकून घेतले. पण आपल्या नवऱ्याला आपली लाज वाटते ह्या गोष्टीचे तिला खूप वाईट वाटले.
ती काम आवरत असताना तिला अचानक वरदचा कॉल आला.

"हॅलो, कामिनी सर्वांसोबत माझ्यासाठीही जेवण बनवून ठेव. मी घरीच जेवायला येणार आहे."

"पण तुम्ही तर पार्टीत आहात ना, मग तरीही?"

"मला नाही ग जेवायचं इथे. खरंतर इथे पार्टीला येण्या आधीच तुला सांगणार होतो, पण विसरलो. त्यामुळे आत्ता सांगतोय. आणि हो, मला घरी यायला उशीर होईल. तुम्ही सगळे जेऊन घ्या. चल ठेवतो फोन."

खरंतर वरद तीच्यावर वरवर कितीही चिडचिड करत असला तरी त्याचं तीच्यावर प्रेम होतं. ती गावाकडची, तिचं शिक्षण कमी ह्या गोष्टीची त्याला अजिबात लाज वाटत नव्हती. उलट तिला सारखी सारखी ह्या गोष्टीची जाणीव करून देऊन तरी निदान ती शिक्षण पूर्ण करेल. ह्या हेतूने तो तुला अडाणी, अशिक्षित म्हणायचा.
तिचं राहणंही अगदीच साधं. त्यामुळे ह्यावरून पार्टीमधील काही आगाऊ मुलींनी कामिनीला त्रास दिला असता तर ते त्याला अजिबात सहन झालं नसतं हा विचार करूनच तो तिला पार्टीला सोबत घेऊन गेला नाही.
आता तो स्वतः कॉल करून अजिबात चिडचिड न करता अगदीच शांतपणे तिच्याशी बोलत होता. त्यामुळे तिला खूप बरं वाटलं. आणि तिच्या चेहऱ्यावरची नाराजी दूर झाली. तिने उत्साहाने स्वयंपाक केला. घरात सर्वांना जेऊ घातले. आणि स्वतः मात्र वरदची वाट बघत बसली. घरच्यांनी तिला जेवण्यासाठी आग्रह केला पण वरद आल्यावर जेवण करेल म्हणाली.
बऱ्याच वेळाने वरद घरी आला.

"काय ग, अजून झोपली का नाहीस तू? मी सांगितलं होतं ना मला उशीर होणार आहे, तरीही?"

"ठीक आहे हो. अहो तुम्ही रोज वेळेवर घरी येतात. तुम्हाला रोज नाही होत उशीर घरी यायला. मग मी एखाद्या दिवशी तुमच्यासाठी जागरण केले तर काय बिघडले, आणि तुम्हाला जेवणही गरम करून द्यायचं होतं."

"मला नाही येत का घेता? लहान आहे का मी? बर ठीक आहे आता. मी अवरतो, तोवर जेवण गरम करून घेऊन ये."

काहीवेळाने तो जेवायला बसला. जेवता जेवता त्याने सहज तिला विचारलं,
"सगळ्यांचं झालं ना जेवण?"

"हो."

"आणि तुझं?"

"नाही अजून. पण तुमचं झालं की लगेच मीही घेते जेवण करून."

तिचं अजून जेवण झालं नाही हे ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटले. ती आपल्यासाठी उशिरापर्यंत जागी असेल ह्याची त्याला कल्पना होती, पण तिने अजून जेवण केले नसेल हे त्याला माहीत नव्हते. त्याने लगेच तिच्यासाठी ताट केले. आणि तिला जेवायला सांगीतले.

दुसऱ्या दिवशी तो ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली,
"वरद, आज कामिनीला तिच्या माहेरी सोडायला वेळ आहे का तुला?"

"काय? पण ती मला तसं काही बोलली नाही, की तिला गावी जायचं आहे ते."

"कसं बोलेल ती तुझ्याशी? तू वागतोस का तिच्यासोबत नीट? तिला वाटलं तू ओरडशील म्हणून नाही सांगितलं तिने तुला."

"अगं पण असं अचानक का जायचं आहे तिला?"

"अरे ती नाहीच म्हणतेय. पण मीच तिला म्हणाले की जा दोन चार दिवस. तिलाही थोडा आराम मिळेल. आणि बरंही वाटेल."

"म्हणजे, तिला बरं नाहीय का?"

"अरे हल्ली ना मला ती खूप नाराज वाटते. कमी बोलते, कमी हसते. नुसती तिच्या कामात व्यस्त असते. मी एखादं काम करेल तर, मलाही काहीच करून देत नाही. मला खूप काळजी वाटते रे तिची."

"बरं ठीक आहे. तसही सद्या मला कंपनीत फारसं काही काम नाहीये. मी रजा घेतो उद्या."

"अरे मग दोन चार दिवसांची घे ना रजा. आणि तूही जा तिच्यासोबत. रहा तिथे दोघे. अरे तुझ्या सासूबाई चांगले लाड करतील तुझे."

"नको गं आई. मी बरा आहे इथेच."

"अरे तू याआधी खूप कमी वेळा रजा घेतली आहे. कंपनी तुला रजा देऊन टाकेल. आणि तुलाही बरं वाटेल गावी गेलास की. तसही तुझं लग्न झाल्यापासून तू एकदाही तिथे राहिला नाहीस."

"बरं ठीक आहे, जातो मी तिच्यासोबत. पण आम्ही इथे नसतांना तू तुझी आणि बाबांची चांगली काळजी घे."

"होय रे माझ्या सोन्या."

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दोघे कामिनीच्या माहेरी जायला निघाले. बऱ्याच तासांनी तिथे पोहोचले. ही अशी कातरवेळ तो पहिल्यांदाच पाहत होता. गावाकडच्या शेतांच्या रस्त्यावरून तो कातरवेळेचा थोडासा प्रवास त्याला भावून गेला.


दुसऱ्या दिवशी कामिनीने त्याला तिची खोली दाखवली. जिथे तिच्या खूप आठवणी होत्या. ती त्याला सर्वकाही सांगत होती. तिला इतकी आनंदी पाहून तोही आनंदला होता. तितक्यात तिला तिच्या काही मैत्रिणी भेटायला आल्या. ती धावत बाहेर गेली.
ती खोलीतून बाहेर गेल्यावर त्याने सहज खोलितले कपाट उघडले. आणि पाहतो तर काय, ते सगळं कपाट तिच्या बक्षिसांनी भरलेलं. तिची खूप सारी प्रमाणपत्र त्याला सापडली. आणि त्याचसोबत तिची गुणपत्रकेही त्याला सापडली. तिचे इतके जास्त मार्क्स बघून त्याचा विश्वास बसेना. तो पुन्हा पुन्हा त्यावरील तिचं नाव तपासू लागला. इतक्यात ती विद्यापीठात पहिली आली तेव्हाचा तो, तिचा फोटो असलेला पेपर त्याला दिसला. अखेर त्याने विश्वास ठेवला. पण त्याला एक प्रश्न खूप सतावू लागला. \"की तिने पदवी घेतली आहे तेही विद्यापीठात पहिली येऊन, हे तिने आपल्यापासून का लपवले असेल?\" तो खूप गोंधळला होता. त्याला खूप गिल्टी वाटत होते. कारण तिला अडाणी, अशिक्षित म्हणून तो नेहमी टोचून बोलायचा, ह्या गोष्टीने त्याच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली.

तितक्यात कामिनी तिथे आली. तो सर्व पसारा बघून वरदला सर्व समजले आहे हे तिच्या लक्षात आले असावे. ती खाली मान घालून उभी राहिली. तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला,

"काय आहे हे? मी काय विचारतो आहे, काय आहे हे कामिनी? इतकी मोठी गोष्ट का लपवलीस तू आमच्यापासून? मी जर हे कपाट उघडले नसते तर हे कधीच समजलं नसतं मला. तुझं फक्त सातवी पर्यंत शिक्षण झालं आहे असं म्हणाली होतीस तू मला, आणि घरातल्या सर्वांनाच. मी तुला उगाच अडाणी, अशिक्षित म्हणून प्रत्येक वेळी तुझा अपमान केला, तरीही तू सहन करत राहिलीस; नेहमी सगळं ऐकून घेत राहिलीस, का? तुझं इतकं शिक्षण झालं आहे, हे सगळ्यांना का नाही सांगितलं तू?"

"वरद तुम्ही शांत व्हा. अहो इतकं काहीही झालेलं नाहीये."

"कामिनी बस झालं आता. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. असं काय कारण होतं की, इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवली?"

"कसं सांगणार होते मी, आणि उपयोग तरी काय होणार होता हे सांगून. माझ्या घरच्यांनी माझी परवानगी नसतांना माझं लग्न लाऊन दिलं. मग त्या नवीन घरात आल्यावर मी सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगणार तोच माझ्याही नकळत सगळ्या जबाबदाऱ्या जणू माझ्या आजूबाजूची काटेरी कुंपण होऊन गेल्या. माझ्या लक्षात आलं की, मी कितीही काहीही केलं तरी, आता हे कुंपण मी नाही तोडू शकत.
अहो वरद, माझं तर अधिकारी व्हायचं स्वप्न होतं; स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं मला. पण मलाच कुणावर तरी अवलंबून राहायची वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं."

हे बोलतांना तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मग वरदने तिला सावरले.

"अगं वेडी. असं कोण म्हणालं तुला, की तू माझ्यावर अवलंबून आहेस? अग उलट मी आणि माझ्या घरचे सगळेजण हे तुझ्यावर अवलंबून आहेत. जसे आधी सगळे आईवर होते. अगं तू किती करतेस सगळ्यांचं. खरंतर प्रत्येक घरात तुझ्यासारखी एक कामिनी आहे. तिला नेहमी असं वाटतं की, आपण कोणावर तरी अवलंबून आहोत. पण खरंतर तिचं घर तिच्यावरच अवलंबून असतं."

"पण ही कामिनी ओळखायला एक वरद असावा लागतो, बरोबर ना?"

"नाही कामिनी. प्रत्येक घरात वरद असेलच असं नाही. त्यामुळे त्या प्रत्येक कामिनीनेच स्वतःला ओळखायला हवे. तिने स्वाभिमान बाळगायला हवा. प्रत्येक \"स्त्री\" आधीशक्तीचं रूप आहे. तिच्यात कुणाशीही लढायची ताकद आहे. हे तिनेच विसरून कसं चालेल!"

"म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की.."

"हो. तू तुझी सर्व स्वप्न पूर्ण करू शकतेस. आणि तुझ्या वाटेतले काटेरी कुंपण दूर करून, तिथे फुले अंथरायची जबाबदारी ही माझी असेल."

वरद असे म्हणाल्यावर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. ती लगेच त्याला बिलगली. पुन्हा घरी जातांना तो तिचे सर्व बक्षिसे, प्रमाणपत्र सोबत घेऊन आला. घरच्यांनाही धक्काच बसला. त्याने तिच्या पुढच्या शिक्षणाबद्दल त्याचा निर्णय सांगितला. आणि घरच्यांनीही तो हसत हसत मान्य केला. आता कामिनी पुन्हा अभ्यास करू लागली.


समाप्त


लेखिका :- कोमल पाटील
कथेचा विषय :- स्त्री आणि परावलंबित्व
कथेचे शीर्षक :- वरद कामिनी
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- ईरा राज्यस्तरीय करंडक