वन्स कि ताई भाग २

Story Of A Newly Married Woman And Her Sister In Law

' वन्स कि ताई' भाग २





पूजेच्या दिवशीही ताई सकाळी लवकर आली.."आरव, जावई आणि तुझे सासूसासरे?" सुमेधच्या आईने विचारले..

"ते सगळे थोडे दमले आहेत.. ते येतील आरामात.. तुम्हीपण बसा . मी करते तयारी.. " आणि लगेच ती कामाला लागली. जेवणाची ऑर्डर बाहेर दिली होती. पण नैवेद्य आणि बाकी काही ताईच बघत होती. चित्राला पहिल्यांदा तिला जवळून अनुभवता आले. ताई फक्त कामासाठी पुढे होती. आणि बाकी गोष्टींमध्ये जसे आहेर देणे, मानपान करणे इथे आईबाबांना पुढे करत होती. पूजेच्या दिवशी चित्राला काय हवे नको ते सगळे ताईच पहात होती.. तिचीही भीड थोडी चेपत होती.  

   लग्नाला काही महिने झाल्यानंतर चित्राला जाणवले कि ताई महिन्यातून एकदाच चक्कर टाकतात. त्या काकू म्हणत होत्या तसे माहेरी त्या दिसल्याच नाही. सणासुदीला मात्र संध्याकाळी यायच्याच त्या.. (त्या काकूसुद्धा परदेशी त्यांच्या मुलाकडे गेल्यामुळे अजून काही महिने तरी येणार नव्हत्या..) लग्न झाल्यावर तिच्या सासूबाई तर नेहमीच म्हणत होत्या . सुचेता होती म्हणून एवढे सगळे निभावले नाहीतर आम्ही आटोपशीर लग्न करा असेच म्हणत होतो.. चित्राला तर स्वतःचे लग्न खूपच आवडले होते. ती आणि सुमेध जणू हवेत तरंगत होते.. सगळ्यांनाच खूप मजा आली होती..तिला ताईला थँक्स म्हणावेसे वाटत होते.. पण ते त्यांना कितपत रुचेल हे तिला कळत नव्हते. तिने सुमेधशी डायरेक्ट बोलायचे ठरवले..

" सुमेध, ताई जास्त येत नाहीत का इथे?"

" येते कि.. त्या दिवशी तर आली होती."

" तसे नाही म्हणायचे मला.. म्हणजे त्या इथे कधीच रहायला येत नाहीत का?"

" नाही.. तसा विचारही करू नको.. जिजू सांगून सांगून थकले तिला.."

" म्हणजे?"

" काही नाही.. मस्करी करत होतो.. ताई इथे फक्त आम्हाला भेटायला येते. कधीतरी आवडती डिश असेल तर जेवायला थांबते. नाहीतर भेटून जाते.."

" ओके.. मग घरातली खरेदी कोण करते? म्हणजे काही विशेष असेल तर?"

" ती मी करतो, कधी आईबाबा.. का ग?"

" नाही, मला वाटले ताई करत असतील.."

" तिला तिच्या घरची खरेदी करायला वेळ नसतो , ती काय इथे येणार? आपल्या लग्नाच्या वेळेसच तिची किती धावपळ झाली होती.."

" मग बाकी कोणाला का नाही सांगितलेस?"

" कोणाला सांगणार? ते रुसवे फुगवे नको वाटते. या सगळ्याचा अनुभव आम्ही तिच्या लग्नात घेतला होता.. म्हणूनच कितीही त्रास झाला तरी ती ते सगळे मॅनेज करत होती.."

" अच्छा.. मला ना त्यांना थँक्स म्हणायचे होते. पण थोडी भिती वाटते, त्या काय म्हणतील याची?"

" तू ताईला एवढी का घाबरतेस?"

" घाबरत नाही, पण का कोण जाणे त्यांचे दडपण येते.'

" ठिक आहे.. तो तुमचा प्रश्न आहे. मी मध्ये पडणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव.. काही झाले तरी मी ताई आणि जिजूंशी संबंध तोडणार नाही.."

" तू एकदम त्या टोकावर का जातो आहेस? मी असे काही म्हटले तरी का? "

" तसे नाही. मी बघतो ना माझे काही मित्र बायकोचे आणि बहिणीचे भांडण झाले कि ते बहिणीशी बोलणे बंद करतात. मला ते जमणार नाही. म्हणून आधीच सांगितले.."

" ओके बाबा.. भांडणाचे नंतर बघू.. त्यांना बोलवायचे का ते सांग.."

     रविवारीच सुचेताच्या घरातल्या सगळ्यांनाच चित्रा आणि सुमेधने जेवायला बोलावले . नेमक्या त्याच्या आदल्याच दिवशी शेजारच्या काकूसुद्धा आल्या होत्या. सुचेताला बघून त्यांनी लगेच नाक मुरडले.. आरवला चॉकलेट देण्याच्या मिषाने त्यांनी आरव आणि चित्राला घरी बोलावले. आरव गुंगला आहे हे पाहून त्या बोलल्याच, " बघ म्हटले नव्हते तुला. हिचा एक पाय माहेरीच असतो म्हणून. बाकी तुला आला असेलच अनुभव.."

" हो काकू , आला ना अनुभव.. ताई येतात त्यांच्या आईवडिलांना भेटायला. आणि बाकी गोष्टीत म्हणाल तर अजूनपर्यंत त्यांनी एकाही गोष्टीत ढवळाढवळ केली नाही.. काकू मी तुमच्यापेक्षा अनुभवाने, वयाने लहान आहे. पण एक गोष्ट सांगायला आवडेल कि उगाचच कोणाच्याही घरात भांडणे लावायला जात जाऊ नका. "

" बाई, बाई, बाई..मी कशाला कोणाकडे भांडणे लावायला जाऊ.. ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे. तुझे वाईट होऊ नये असे वाटत होते म्हणून सावध केले हो.."

" थँक्स काकू, सावध करण्यासाठी. पण यापुढे मला सावध नाही केलेत तर जास्त बरे होईल.. चल आरव जाऊया.. परत एकदा थँक्स काकू.. चॉकलेट साठी.." आणि चित्रा तिथून निघाली.. पण तिला रहावत नव्हते. तिने सुचेताला बेडरूममध्ये बोलावले आणि घडलेले सर्व सांगितले. ते ऐकून सुचेता हसायला लागली. म्हणाली , "त्या दिवशी तुला तिथे बघूनच मला अंदाज आला होता. पण मी तेव्हाच काही बोलले असते तर तुला खोटे वाटले असते म्हणून मी शांत राहिले. त्या काकूंचा स्वभाव इतक्या वर्षात मला चांगला माहित आहे."

" मग तुम्ही त्यांना काहीच का बोलत नाही."

" कशाला काय बोलायचे. जी आपली माणसे असतात,ती त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. जे ठेवतात त्यांना आपली चूक कळते. आणि आपल्या दोषांचे परिणाम स्वतःलाच भोगावे लागतात. यावर विश्वास आहे माझा. त्यांची मुलगी त्यांच्याशी बोलत नाही, माहेरी येत नाही. म्हणून त्यांना माझे इथे येणे खुपते हे मला माहीत आहे. म्हणून मी दुर्लक्ष करते. त्या बोलल्या तर बोलते नाहीतर नाही.. पण त्या स्वभाव बदलत नाहीत. म्हणून त्यांचा मुलगा आणि सून पण परदेशी निघून गेले.. असो.. कसे आहे लोकं नाती बिघडायला टपलेलीच असतात. पण ते बिघडू द्यायचे कि नाही हे आपल्याच हातात असते ना. आणि दुसरी गोष्ट एखादे लहान मूल सुद्धा आपले खेळणे पटकन दुसर्‍याला देत नाही. तसेच आपले माहेररूपी खेळणे असे सोडून जाताना प्रत्येकीला वाईट वाटत असतेच. त्यामुळेच माहेर जवळ असले कि तिथे जाणे होते.. थोडे गुंतायला झालेले असतेच ना. माहेर सोडवतही नाही आणि जास्त जवळ जाता हि येत नाही. गुंताच असतो बघ सगळा . त्यातही काकूंसारखे काही जण असतातच माहेरी लक्ष ठेवले म्हणून पोटात दुखणारे. पण त्यांच्यामुळे आपण आपल्या भावना का आवरायच्या? त्यांचे दुखणेखुपणे बघायला, काय हवे नको ते बघायला लागतंच ना. तू आली आहेस, माझे काम कमी होईल पण पूर्ण जबाबदारी झटकता तर येत नाही ना.."

ताई बोलत असताना चित्राला आठवले लग्नानंतर पहिल्यांदाच ती माहेरी गेली होती आणि तिचा बेड, तिचे कपाट सगळेच नीराने बळकावले होते. तिचे कपडे कपाटातल्या एका कोपर्‍यात ठेवले होते. तिला वाईट वाटले होते. पण तिने बोलणे टाळले होते. आता तिला जाणवत होते कि ताई का माहेरी राहणे टाळत होत्या. त्या जसे सासर माहेरचा समतोल साधत होत्या तसा आपल्याला जमेल का?

" थँक यू ताई..."

" आज वन्संवरून ताई ?" सुचेताला आश्चर्य वाटले..

" हो ताईच.. कारण आज मला कळले कि ताई होणे म्हणजे काय असते ते.. आणि असेही तुम्ही माझ्यावर भावजय म्हणून नाही तर छोट्या बहिणीसारखेच प्रेम करता.. "

आणि पटकन चित्राने सुचेताला मिठी मारली.. आणि हे बघून त्या दोघींना बोलवायला आलेल्या सुमेधच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते...




कथा कशी वाटली सांगायला विसरू नका...

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई