वन्स कि ताई भाग १

Story Of A Newly Married Woman And Her Sister In Law

' वन्स कि ताई'




"चित्रा उद्या ताई आणि जिजू तुला भेटायचं म्हणत आहेत.." सुमेध फोनवर बोलत होता..

" एवढ्या लवकर?" चित्राचा प्रश्न..

" लवकर.. अग चार वर्ष फिरतो आहोत आपण.. अजून जर थांबायचं म्हटलं ना तर माझी आई माझं लग्न लावून टाकेल.. चालेल का तुला?" सुमेध चित्राची मस्करी करत म्हणाला..

" असे नाही रे. पण.."

" आता तुझा 'पण' पण असणार आहे?"

" शाब्दिक कोट्या नकोत.."

" ओके. आता थोडं सिरियसली बोलतो. हि एक कॅज्युअल मिटींग आहे. घाबरतेस कशाला? तयार रहा उद्या घ्यायला येतो.. बाय.." सुमेधने फोन ठेवला..

 पण चित्रा विचार करत होती.. गेले चार वर्ष त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. आधीचे काही दिवस सोडले तर बर्‍याचदा सुमेधच्या तोंडात ताई आणि जिजूंचे नाव असायचे. त्यांनी हे केले , त्यांनी ते केले.. जिजूंचे टेन्शन नव्हते आले तिला.. थोडे ताईचीच भिती वाटत होती.. त्या थोड्या कडक स्वभावाच्या वाटत होत्या. 'प्यार किया तो डरना क्या' असं स्वतःशीच म्हणत ती उठली.. दुसर्‍या दिवशी तिने एक सौम्य रंगाचा ड्रेस निवडला. कारण सुमेधने ताईंचे जेवढे फोटो दाखवले होते त्यात त्या पंजाबी ड्रेस मध्येच होत्या..खरेतर त्यांच्या आणि सुमेधमध्ये पाचच वर्षाचे अंतर होते. पण मोठ्या बहिणीचा धाक जास्त होता..

" ताई , जिजू हि चित्रा, आणि हि माझी ताई आणि हे माझे जिजू.." सुमेधने ओळख करून दिली..

हाय हॅलो झाल्यावर ताईने लगेच विषय काढला, " मी सरळ विषयावर येते. मला आडवळणाने बोलायला आवडत नाही. हे बघ चित्रा सुमेधने तुला आमच्या घराची सगळी कल्पना दिली असेलच तरिही मी परत सांगते. आमचे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. आम्हाला साधी राहणी आवडते."

हे ऐकून चित्राने हा ड्रेस घातल्याबद्दल स्वतःला शाबासकी दिली.

" सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुमच्या रोजच्या संसारात काहीच बोलणार नाही.. पण जर माझ्या आईवडिलांना काही त्रास झाला तर बोलावे लागेल. पुढचे तुमचे तुम्ही ठरवा.." ताईने बोलणे संपवले.

" ताई तुझी लग्नाला संमती आहे ?"

" हे बघ, लग्न तुम्हाला करायचे आहे, निर्णय तुम्ही घेतला आहे. मग माझ्या संमतीचा प्रश्न येतो कुठे? मी फक्त माझे मत दिले.."

ताईच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच चित्राला समजेना. पण त्यांची संमती म्हणजे लग्न ठरलंच म्हणून समज असे आधीच सुमेधने तिला सांगितले होते. तिच्या घरच्यांची मान्यता होतीच. प्रश्न सुमेधच्या घरच्यांचा होता. पण सुमेधने सांगितलं होते कि ताई हो म्हणाली कि झालं म्हणूनच समज.. आणि आता तिची संमती म्हणजे लग्न ठरण्यातच जमा होते. खरेच सुमेधच्या आईबाबांची भेट होऊन त्यांची साक्षसुपारी सुद्धा झाली. तिथे सुद्धा ताईच सगळी कामे करत होत्या. सुमेधचे , चित्राचे सगळे जवळचे नातेवाईक जमले होते. समारंभ झाल्यावर सुमेधच्या शेजारच्या काकू आल्या आणि बाकीच्यांशी ओळख करून घे म्हणून चल म्हणाल्या. चित्राच्या आईने मानेने जा म्हणून खुणावले. ती गेली त्यांच्यासोबत.. काय, कुठली हे विचारून झाल्यावर काकूंनी सुरुवात केली," सुचेतापासून जपून रहा बरं का.. तिला फार सवय आहे पुढे पुढे करायची.लग्न झाले तरी माहेर काही सुटत नाही तिचे.. आता तू सून होणार या घरची.." त्या अजून काही बोलणार इतक्यात," काकू घेऊन जाऊ का सूनबाईंना?" असा ताईचा आवाज आला. काकू थोड्या चपापल्या. " हो अग, म्हटलं नवीन सूनबाईची चौकशी करावी.."

" ती काय आता तुमची शेजारीण होणार आहे, पण आता आई तिला बोलावते आहे. तुम्ही या नंतर जेवायला.." चित्राला भिती वाटत होती कि काकू काय बोलत होत्या असे त्या विचारतील.. पण तो विषयही न काढता त्यांनी खरेदीचा विषय काढला.. त्यांनी तिच्यासाठी एक पैठणी घेतली होती, आवडली तर ती साखरपुड्याला देणार होत्या. त्यांनी आतल्या खोलीत जाऊन ती दाखवली. तो सुंदर रंग, पोत बघूनच चित्रा हरखली. " चालेल का हि साखरपुड्याला ? कि दुकानात जायचे अजून बघायला... "

" नाही मला हा रंग खूपच आवडला आहे.."

" आम्ही तुझ्या साक्षसुपारीसाठी साडी आणायला आमच्या नेहमीच्या दुकानात गेलो होतो. हा अगदीच वेगळा रंग म्हणून त्याने दाखवला. तो पाहून मला असे वाटले , हा तुला खुलून दिसेल. त्यांना बाजूला ठेवायला सांगितली साडी तर म्हणे हा रंग खूप कमी येतो. खात्री नाही देता येणार. म्हणून घेतली. परत सांगते उगाच होला हो करू नकोस.. नसेल आवडली तर सांग मला.."

" नाही, मला खरंच आवडली."

" मग तुझ्या आईला पण दाखव, घेऊन जा, ब्लाऊज शिवायला लागेल ना.."

तिथून निघताना चित्राच्या भावना संमिश्र होत्या..दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू झाली.. ताईने चित्राच्या आईवडिलांना फोन करुन त्यांचे बजेट विचारले. लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करायचे ठरले होते. दोन दिवसांनी त्यांनी एका ठिकाणाचा नंबर दिला आणि सांगितले, " आपल्या बजेटमध्ये हे लग्नाची सगळी तयारी करुन द्यायला आहेत. आवडले तर बघा."

चित्राचे आईबाबा सुद्धा हॉल शोधतच होते. एवढे शोधतोय त्यात अजून एक. पत्ता थोडा लांबचा होता. चित्राच्या आईची भुणभुण सुरू झाली..

" एवढ्या लांब हॉल घेतला तर पाहुणे येतील का? आपल्याला किती लांब पडेल?"

" एवढ्या लांब आलो आहोत तर बघून जाऊ. सुमेधच्या घरच्यांना डायरेक्ट नाही कसे म्हणणार?" बाबा.

चित्राही थोडी वैतागली होती. पण काही बोलत नव्हती. त्या जागी पोचताच सगळेच थक्क झाले. मध्ये मोठ्ठ गार्डन, बाजूला वाहणारी नदी, आजूबाजूला गुलाबाची रोपे. त्याभोवती रहायला असलेले बंगले.... चित्राची बहिण तर हे पाहून त्या जागेच्या प्रेमातच पडली.... "मस्तच आहे हे... इथेच लग्न करायचे. " तिने जणू सगळ्यांच्या भावना बोलून दाखवल्या. तिथे चौकशी केल्यावर त्यांना कळले कि त्यांच्या शहरात एका दिवसाचा जेवढा खर्च होतो आहे , तेवढ्याच खर्चात इथे साखरपुडा, हळद, लग्न , संगीत हे सगळेच होणार होते. राहण्याची सोयही उत्तम होती. चित्राच्या बाबांनी ताईला फोन लावला, " सुचेताताई , चित्राचे बाबा बोलतो आहे "

" काका , प्लीज मला ताई नका म्हणू.." 

" बरे , सुचेता आम्ही या रिसॉर्टवर आलो आहोत.. आम्हाला आवडले आहे."

" काका, मग तुम्हाला परत परत तिथे जाण्याचा त्रास नको म्हणून एक सुचवते, पटले तर बघा. तिथे डेकोरेशन आणि मेनू ठरवाल का?"

" पण तुमच्या आईबाबांचे काय?"

" तुम्ही ठरवा, त्यांना अगदीच नाही आवडली एखादी गोष्ट तर बदलता येईल.. असेही डेकोरेशन वगैरेमध्ये त्यांना जास्त आवड नाही. होऊ दे सगळे चित्राच्या आवडीने"

नीरा, चित्राची बहिण म्हणालीच, " सॉलिड आहेत ना या ताई.." चित्राने फक्त मान हलवली. चित्राचे दागिने, कपडे घ्यायला मात्र तिच्या सासूबाई आणि सुमेध होते. न राहवून चित्राने विचारले," वन्स नाही का आल्या."


" नाही... ती म्हणाली सगळीकडे मीच नको." तिच्या सासूबाई उत्तरल्या..


 खरेदी झाली पण ताईचे नसणे एकाबाजूला तिला सुखावत होते तर दुसरीकडे खटकत होते.. 

  बघता बघता लग्नाचा दिवस जवळ आला. आदल्या दिवशी सगळे हॉलवर पोचले. एवढ्या सगळ्या पाहुण्यांची उठबस, मानपान, आईच्या हातात सगळे देणे, इथे चित्राचे काय चालले आहे ,हे सगळे त्या जातीने पहात होत्या.. चित्रा हे सगळे पहात होती. लग्न लागले, सगळे घरी आले. सगळ्यांची सोय करून ताई घरी निघाली. " सुचेता, रहा ना आजतरी." सुमेधची आई म्हणाली.

" आई ,मी उद्या सकाळी लवकर येते. पण आत्ता जाते."

" काय बोलू मी.."

" काही नको. आता झोपा लवकर.. उद्या गुरूजी येतील लवकर. "






पुढच्या भागात बघू ताई खरंच माहेर ताब्यात ठेवत असते कि हा चित्राचा गैरसमज आहे...


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई