May 15, 2021
नारीवादी

वांझोटी

Read Later
वांझोटी

"ही कशाला आली इथं.. काय काम होतं? लगेच आली.."

"हो ना.. कोणी बोलावलं काय माहिती? वांझोटी कुठली?"

"जिकडे बोलावतील तिकडे जायचं.. घरात कोणाचे कटकट वटवट नाही.. कुणाचा करायचं नाही.. लहान मुले नाहीत. काय काम आहे हिला. उठल की निघाली."

"अजून निमंत्रण गेली नाही तिकडे तोपर्यंत येते.. कशाचा म्हणून हिचा पहिला तोरा.."

नेहा जिथे जाईल तिथे तिला हेच ऐकायला लागे. तिच्या कानावर हे शब्द पडत असत. कारण तिच्या लग्नाला आज पाच वर्षे झाली तरी तिला मुलबाळ झाले नव्हते. सगळे दवाखाने केले. दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल होते. उपास-तपास बुवा बाजी, देवधर्म सगळं केलं. तरीसुद्धा घरात पाळणा हलला नाही. त्यात तिचा काय दोष?

ती जिथे जाई तिथे तिला या कारणावरून सारखे टोमणे ऐकायला मिळे. आधी लांबून बोलत होते, पण आता नातेवाईक सुद्धा तोंडावर बोलायला कमी पडत नाहीत. बोलून बोलून तिला हैरान करून सोडत असत. तिचा जीव मेटाकुटीला येई, तिला खूप वाईट वाटे. या सगळ्यामध्ये तिचा काय दोष? पण तिला वांझोटी असे म्हणून घ्यावे लागते.

आज तिच्या भावजयीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. पण तिला जावेसे वाटत नव्हते. कारण तिथे गेल्यावर आणखी पाहुण्यांची बोलणी ऐकावी लागतील. त्यात नातेवाईक असे बोलू लागले तर वाईट वाटेल आणि सगळ्या कार्यक्रमाची मजा निघून जाईल. पण गेले नाही तरीही लोक काहीबाही बोलतील. त्यात आईने आणि भावजयीने इतक्या आग्रहाने बोलवले म्हटल्यावर जायलाच पाहिजे, म्हणून ती कशीबशी तयार होऊन तिथे कार्यक्रमाला गेली.

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हॉलमध्ये होता. हाॅलची सजावट खूप सुंदर केली होती. जिथे जाईल तिथे लहान मुलांचे पोस्टर लावले होते. सगळ्या पाहुणेमंडळींनी हॉल भरगच्च भरला होता. पूर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला. ओटी भरण्यासाठी स्टेजवर नेहाच्या भावजयीची बहिण आणि तिची जाऊ या दोघी गेल्या. कार्यक्रमात गेल्यापासून नेहाच्या कानावर पाहुणे मंडळींची कुजबुज ऐकायला येत होती. पण नेहाने त्याकडे दुर्लक्ष केले आपल्या आईसाठी, भावासाठी, वहिनीसाठी आपले दुःख बाजुला ठेवून त्यांच्या सुखात सामील झाली होती.

ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होणार होता, इतक्यात नेहाच्या भावजयीने म्हणजेच निशाने स्टेजवरून नेहाला हाक मारली. नेहा एकदम दचकली, "माझ्याकडे काय काम असेल?" म्हणून आतून थोडी घाबरली. पण तशीच थोडा धीर धरून स्टेजवर गेली. स्टेजवर गेल्यावर निशाने नेहाला पहिल्यांदा ओटी भरण्यासाठी सांगितले. नेहाने नकार दिला. "अहो ताई, तुम्ही पहिल्यांदा ओटी भरायला हवा. नणंदेचा मान असतो." निशा

"नाही निशा, मी नाही भरू शकत." नेहा

"पण का?" निशा

"जिला मूलबाळ झालेलं आहे अशा स्त्रीने ओटी भरायचा असतो." नेहा

"ते मला काही माहित नाही. मला पहिल्यांदा ओटी ही तुम्हीच भरली पाहिजे." असे म्हणून निशाने नेहाला ओटी भरण्याचा मान दिला. ते पाहून नातेवाईकांमध्ये कुजबूज सुरू झाली. तरीही निशाने नेहाला तिचा हक्क तिचा मान मिळवून दिला.

एखाद्या स्त्रीला जर लवकर मूलबाळ झाले नाही, तर त्यामध्ये तिचा काय दोष असतो? तरी या समाजामध्ये तिला वांझोटी म्हणून हिणवले जाते. तिला मानसिक त्रास दिला जातो. यामधून त्या स्त्रीला किती त्रास होत असेल? याची कोणालाही कदर नसते. पण या सगळ्यांमध्ये त्या स्त्रीचा काय दोष असतो?

निसर्गाने मातृत्व ही खूप सुंदर देणगी दिलेली आहे. पण एखाद्याला लवकर मूलबाळ झाले नाही किंवा तिला बाळ झालेच नाही, तर तिला वांझोटी म्हणून कधीही नये. एखाद्याला मानसिक त्रास कधी देऊ नये. त्या बाईच्या वेदना तिचे कष्ट कधी कोणाला जाणारही नाही. पण तिला किती दुःख होत असेल हे तिचं तिलाच माहित?


Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..