Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

व.नि.ता ( भाग १२)

Read Later
व.नि.ता ( भाग १२)
कथा मालिका : व.नि.ता ( भाग १२)

विषय: कौटुंबिक कथा

भाग १२:

©️Anjali Minanath Dhaske

सगळ्यात आधी वनिताने प्रसादला फोन करून ती एकही रुपया देणार नसल्याचे कळविले. वनिता घरी परतली तेव्हा साक्षी बॅग घेवून वडिलांकडे चालली होती. आई आपल्याला अडवेल, त्रागा करेल, समजावून घरात परत नेईल अशी साक्षीला आशा होती. परंतु वनिताने साक्षीला अडविले नाही उलट तिने साक्षीला ती विसरलेल्या काही वस्तू आठवणीने बॅगेत ठेवायला दिल्या आणि म्हणाली, " बेटा तू जाण्याचा निर्णय घेतला आहेस तर मी अडविणार नाही, तिथे गेल्यावर डोळे आणि कान मात्र सदैव उघडे ठेव. माझी गरज पडू नये अशी आशा आहे परंतु तशी वेळ आलीच तर कुठलाही विचार न करता मला कधीही फोन कर मी ताबडतोब हजर होईल." तिच्या या संयमित वागण्याचे साक्षीला आश्चर्य वाटले. साक्षीचे पाऊल घरा बाहेर पडले होते. ते थांबवणे तिलाही शक्य झाले नाही. ती आपल्या वडिलांकडे गेली.

प्रतीक घरी आला तेव्हा वनिताने शांतपणे सगळ्याच घटना त्याला नीट समजावून सांगितल्या. काहीही झाले तरी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साठवलेले पैसे ती प्रसादला देणार नव्हती. प्रतीकलाही वडीलांकडे जाण्याची इच्छा असल्यास तिची काहीच हरकत नाही असेही तीने समजावले.

एरवी आपल्या बाबतीत अतीशय दक्ष असणारी आपली आई साक्षी घर सोडून गेली तरी इतकी शांत कशी? या प्रश्नाने प्रतीक अस्वस्थ्य झाला. त्याने सगळ्याच घटनांचा नीट विचार करायला सुरुवात केली. आईचे कष्ट, जिद्द, प्रेम या सगळ्यांची त्याला जाणीव होवू लागली. आईने सांगितलेले खरे की वडिलांनी सांगितली ती हकिकत खरी या विचारांचे द्वंद्व सुरू झाले. रात्र वाढू लागली तशी त्याच्या बुद्धीला जास्त विचार करणे कठीण झाले. त्याला वडिलांच्या भेटीची अनामिक ओढ थांबवणे जड जावू लागले. तो घराचे दार उघडून बाहेर पडला तसा त्याला वनिताचा आवाज आला, " वडिलांना भेटायला जातो आहेस तर नक्की जा.... फक्त त्यांनी पान खायला दिले तर त्यात नशेची गोळी नाही ना? याची एकदा खात्री करून घे " वडील आपल्याला खायला पान देतात याची माहिती आईला कशी झाली याचे प्रतीकला आश्चर्य वाटले.

इकडे प्रसाद सारखी चिडचिड करत होता. पूर्वी वनिता घरातून निघून गेल्यानंतर त्याला एका हॉटेलात पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. त्याने मिळवलेल्या पदवी शिक्षणाची कागद पत्रेही खोटी होती. महाविद्यालयात असल्यापासून तो चुकीच्या संगतीत होता. झटपट पैसे मिळविण्यासाठी तो अश्लील चित्रफित बनवून विकत असे. अनेकांना तो या चित्रफितींचा वापर करून ब्लॅकमेल करत असे. त्याच्या मोबाईल मधे त्याने वनिताला धाकात ठेवण्यासाठी तिच्याही चित्रफिती काढून ठेवल्याचे आढळले होते. पैशाची चणचण भासल्यास त्याही चित्रफिती विकण्याचा त्याचा मानस होता. पोलिसांच्या ताब्यात त्याचा लॅपटॉप लागल्याने सगळे उघडकीस आले होते. उजळ माथ्याने समाजात वावरत लोकांच्या,पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकता यावी म्हणून त्याने वनिताशी लग्न केले होते. त्याला सुरवातीपासूनच स्त्रियांबद्दल आकर्षण नव्हते. जेव्हा त्याच्या या सगळ्या वाईट कृत्यांबद्दल घरच्यांना कळले तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडले होते. प्रसादमुळेच वनिता पळून गेली म्हणत वनिताच्या वडिलांनी घेतलेले पैसे परत करण्यास नकार दिला होता. तुरुंगातून सुटल्यावरही तो रहात असलेल्या शहरात त्याची बदनामी झाल्याने त्याला पैसे कमविण्यासाठी शहर सोडून भटकंती करावी लागत होती. कर्ज वसूल करणारी माणसे त्याला सुखाने जगू देत नव्हती. वाढत्या कर्जाचा डोंगर त्याला लवकर फेडायचा होता. वनिताला धमकावत उरलेले आयुष्यही त्याला तिच्या पैशावर मजा मारत घालवायचे होते. पोटच्या पोरांबद्दल त्याला माया नव्हती. मौजमजा आणि नशा करण्यासाठी पैसे मिळवितांना तो कोणत्याही थराला जावू शकत होता. वनितामुळेच आपल्याला वाईट दिवस बघावे लागले असे वाटून प्रतीकला नशेच्या आहारी घालून त्याला वनितावर सूड उगवायचा होता. वनिताने पैसे द्यायला नकार दिलाच तर साक्षीला पळवून नेऊन त्याच्या शेठला विकण्याचा पर्यायही त्याने विचार करून ठेवला होता. परंतू सरळ मार्गी, भित्री वनिता पैसे द्यायला नकार देणार नाही याची त्याला खात्री होती. त्यात साक्षीही न विचारता त्याच्याकडे निघून आल्याने त्याचा पुरता गोंधळ उडाला होता. साक्षीच्या उपस्थितीत त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. सध्यातरी प्रतीकला भेटायला बोलावून त्यालाच नेहमीप्रमाणे घरातून पैसे चोरून आणायला सांगण्याचा बेत त्याने आखला. रात्री प्रसाद खोली बाहेर पडला तसे साक्षीने त्याला हटकले. तो कुठे जात आहे याची चौकशी केली. काहीतरी खिश्यात लपवत साक्षीला त्याने पाय मोकळे करून येतो अशी खोटीच थाप मारली.

वनिताने साक्षीला कान आणि डोळे उघडे ठेवण्याची ताकीद दिली होती याची आठवण तिला झाली. तीही वडिलांच्या मागे मागे चोर पावलांनी चालू लागली.

क्रमशः

©️Anjali Minanath Dhaske

पुणे

साक्षीला सत्य उमगेल का? प्रसाद वनिताला नमवेल काय? वनिताला प्रसादच्या तावडीतून मुलांची सुटका करता येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//