Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

व.नि.ता ( भाग ११ )

Read Later
व.नि.ता ( भाग ११ )
कथा मालिका : व.नि.ता ( भाग ११)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ११ :

©️Anjali Minanath Dhaskeवनिताच्या घरातले वातावरण एकदम बदललेले. साक्षीचे अभ्यासातील लक्ष कमी होवून ती कायम महागड्या मोबाईलवर सतत काहीतरी करत बसे . येवढा महागडा मोबाईल कोणी दिला? असे वनिताने विचारले असता साक्षी वनिताला धड बोलत तर नाहीच, मात्र

" तू आमची हौस कधीच केली नाहीस सतत बंधनात ठेवले. तूला फोन मागितला असता तर तू नक्किच घेवून दिला नसता. माझ्या वडिलांनी मात्र मला न मागता हा मोबाईल भेट दिला आहे. इतकी वर्षे आम्हाला खोटे बोलून त्यांच्यापासून दूर ठेवले आता त्यांच्या भेटवस्तूही हिसकावून घ्यायच्या आहेत का?" असे उलट उत्तर दिले.

प्रतीक हल्ली रात्र रात्र भर घराबाहेर असतो. कुठे जातो? काय करतो? काही सांगत नाही. त्याने परदेशी शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तयारी ही करणे सोडून दिले आहे. प्रसादला देण्यासाठीही रक्कम जमत नाही. दोन्ही मुले हाताबाहेर चालली आहे या जाणिवेने वनिता पुरती गलितगात्र झाली. "वडिलांचा येवढा पुळका आला आहे तर त्यांच्याकडेच जावून रहा " असे ती चिडून साक्षीला म्हणाली. साक्षीही, " हो... हो जाईलच मी माझ्या वडिलांकडे" म्हणत तोऱ्यात निघून गेली.

सगळ हातून निसटून जात आहे या भावनेने वनिता धायमोकलून रडू लागली. तेवढ्यात तिला देबाश्री ताईंनी भेटायला बोलाविले. वनिताची दोन्ही मुले तिच्या माघारी प्रसादला भेटत होती. प्रसादने दोन्ही मुलांच्या बुद्धीवर वडिलांच्या मायेचा पडदा टाकला होता. इतकेच नाही तर त्याने अनेकदा प्रतीकला घरातून पैसे आणायला सांगितले. दर वेळी पानाच्या माध्यामातून प्रतीकला नशेची गोळी खावू घालायला सुरवात केली आहे. त्या नशेच्या अंमलाखाली असल्याने प्रतीक रात्री घरी परतत नाही. प्रतीकला कल्पनाही नाही की त्याचे वडील त्याला पानातून नशेची गोळी देत आहेत. तो अत्यंत निरागस भावनेने वडिलांचे प्रेम मिळवू पाहत आहे.

वनिताला अशी सगळी माहिती देबाश्री ताईंकडून समजल्यावर मुलांना प्रसादच्या विळख्यातून सोडविण्यासाठी तिने तडकाफडकी घर विकून रक्कम जमविण्याचा निर्णय घेतला. तिचा त्रागा, हतबलता देबाश्री ताईं समजून घेवू शकत होत्या. त्यांनी तिला शांत केले. "प्रसादला कितीही पैसे दिले तरी तो पैसे संपले की त्रास द्यायला पुन्हा येणारच आहे. आता त्याने मुलांच्या मनात प्रेम निर्माण केले आहे तेव्हा त्याला आयुष्यातून हाकलून लावले तरी मुलांचा त्याच्याकडे असलेला ओढा कमी होणार नाही. पोलिसांच्या मदतीने प्रसादकडे असलेल्या नशेच्या गोळ्या पुरावा म्हणून वापरत त्याला तुरुंगात टाकता येईलही परंतु तुरुंगातून सुटल्यावर तो मुलांना खोटे सांगून पुन्हा तुझ्या विरोधात भडकवेल. तुझी समस्या सुटण्यासाठी मुलांना त्याचे खरे रूप कळणे गरजेचे आहे. तेव्हा यावेळी प्रसाद पासून दूर न जाता खंबीरपणे त्याचा सामना करणे गरजेचे आहे " असे त्यांनी वनिताला समजावले. यावेळी वनिता एकटी नसून त्या तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत याची तिला खात्री दिली. तिला त्यांचा खूप आधार होता. त्यांच्यामुळेच तिची प्रसाद बद्दलची भीती थोडी कमी झाली. आयुष्याच्या खडतर प्रवासात देबाश्री ताईंनी तिला कायम सांभाळून घेतले होते. आताही त्यांनी सुचविल्याप्रमाणेच वागायचे असे तिने ठरवले.क्रमशः

©️Anjali Minanath Dhaske

पुणे

प्रसादचा खोटेपणा मुलांसमोर उघड होईल का? कात्रीत सापडलेल्या वनिताला स्वतःची सुटका करून घेता येईल का? मुलांच्या आयुष्यातील प्रसादरुपी संकट तिला दूर करता येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//