Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

व.नि.ता ( भाग १०)

Read Later
व.नि.ता ( भाग १०)
कथा मालिका : व.नि.ता ( भाग १०)

विषय: कौटुंबिक कथा

भाग १० :

©️Anjali Minanath Dhaske

पुणेदोन तीन महिने वनिताच्या व मुलांच्या पाळतीवर राहून प्रसादने त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवली होती. वनिताने त्याला भेटायला यायचे कारण विचारले तेव्हा त्याने उघडपणे पंचवीस लाखाची मागणी केली . ती सोडून गेल्यावर तिच्या शोधात त्याचा बराच वेळ खर्ची पडला होता. धंद्यात अनेक नवीन नवीन पोरं आल्याने त्याची मागणी कमी झाली होती आणि जी मागणी होती त्यातून त्याचा खर्च भागात नव्हता. घरच्यांना तो खरे सांगू शकत नसल्याने त्याला घरच्यांना वेळच्यावेळी पैसेही पाठवावे लागत होते. यातच त्याच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाले होते आणि तो व्यसनांच्या पूर्णपणे आहारीही गेला होता. त्याचा मित्र कलकत्त्याला कामा निमित्त आला होता तेव्हा त्याने वनिताला तिच्या महाविद्यालयातून बाहेर पडतांना बघितले होते. त्याच माहितीच्या आधारे प्रसादने तिचा शोध लावला होता. त्याच्या राजासारखे जगण्याच्या स्वप्नाला तिने पळून जातांना प्रतीकला सोबत नेवून सुरुंग लावला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी तो आता आला होता.

वनिताने त्याला पैसे देण्यास नकार दिला तसा तो बिथरला. मुलांना तिच्या विरोधात भडकावून तिच्यापासून दूर करण्याची धमकी त्याने तिला दिली. तिने त्याच्या त्या धमकीला भीक घातली नाही तसे त्याने मुलीला पळवून नेऊन बाजारात विकण्याची धमकी दिली. ते ऐकून तिच्या छातीत धस्स झाले. आपले शब्द अगदी वर्मी घाव घालणारे ठरले याची जाणीव होवून प्रसादने एक आठवड्याची मुदत देवून तेथून काढता पाय घेतला.

वनिताला धमकी देण्याआधी त्याने प्रतीकशी संवाद साधला होता. साक्षीलाही चोरून भेटत होता. खोट्या कथा रचून त्यांची सहानुभूतीही त्याने मिळवली होती. आपल्याला वडील नाहीच या संभ्रमात वाढलेल्या मुलांना अचानक वडील जीवंत असून आपल्यासाठी ते जीव ओवाळून टाकतात आहे. ही जाणीव सुखावणारी होती. या आनंदात मुलांनीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वनिताला काहीच सांगितले नव्हते. उलटपक्षी वनिताच मुलांच्या नजरेत खोटी, दोषी ठरली होती.

त्याची धमकी व मागणी ऐकल्यावर वनिता खूप घाबरून गेली. मुलांचे भविष्य घडविण्यासाठी इतके दिवस तिने एकटीने कष्ट केले त्या सगळ्याची धूळधाण होईल की काय अशी भिती तिच्या मनात निर्माण झाली. तिने तडक देबाश्री ताईंची भेट घेतली. सबळ पुराव्याअभावी प्रसादला धडा शिकवणे अवघड होते. परंतू पोलिसात जावून प्रसादपासून वनिता आणि तिच्या मुलांच्या जीवाला धोका आहे या आशयाची तक्रार तिला नोंदविता येणार होती. तक्रार नोंदविण्याआधी दोन्ही मुलांना सगळी कल्पना द्यावी म्हणजे प्रसादने पुढे काही करण्याचा विचार केलाच तर दोन्ही मुले सावध असतील. प्रसादबद्दल मुलांना स्वतः वनिताने संपूर्ण कल्पना द्यावी असे देबाश्री ताईंचे मत होते. वनितालाही त्यांचे म्हणणे पटले.

तिने मुलांना सगळे काही स्पष्टपणे सांगितले. प्रसादच्या विरोधात ती पोलिसात तक्रार देणार आहे याची कल्पना देखील दिली. तिला वाटले होते की तिची दोन्ही मुले तिच्या बाजूने खंबीर पणे उभी राहतील परंतू याच्या अगदी उलट झाले. दोन्ही मुलांनी पोलिसात तक्रार द्यायला विरोध केला. तिच्या हट्टामुळे वडिलांचे सानिध्य त्यांना मिळाले नाही असे वनिताला बोल लावत त्यांनी प्रसादची बाजू घेतली.

ज्या मुलांसाठी तिने आयुष्य खर्ची घातले त्यांनीच आज तिला चुकीचे ठरवावे. या धक्क्यातून तिला सावरणे कठीण झाले. प्रसादने मुलांची मने अधिक कलुषित करण्याआधी तिने आहे ती जमा पुंजी प्रसादला देवून त्याच्यापासून पिच्छा सोडविण्याची तयारी सुरू केली. देबाश्री ताईंना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी साक्षीवर दुरून लक्ष ठेवण्यासाठी आश्रमातील एका सेविकेला सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत प्रतीकवरही लक्ष ठेवण्यासाठी विना गणवेशधारी हवालदाराची नेमणूक केली.

या पाळतीत असे लक्षात आले की प्रसाद दोन्ही मुलांच्या संपर्कात आहे. दिवसा महाविद्यालयाच्या वेळेत तो साक्षीला भेटायला जातो. महागडी भेटवस्तू देवून थोडी रडपड करतो. साक्षीची सहानुभूती मिळवतो. रात्री उशिरा घरातले सगळे झोपले की प्रतीक प्रसादला भेटायला जातो. चौकातल्या बस थांब्यावर दोघे एकमेकांशी अगदी थोडा वेळ बोलतात. त्या थोड्यावेळामधे प्रसाद पान बनवायला घेतो आणि दोघेही पान खातात. पान खाल्ल्यावर प्रतीक अनेकदा तिथेच बाकावर प्रसादच्या मांडीवर डोके ठेवून झोपून जातो. प्रतीकला कळायला लागले तेव्हापासून त्याने आईला कायम काम करतांना बघितले. तिच्याजवळ कधीच मुलांजवळ बसुन त्यांचे हट्ट पुरविण्यासाठी वेळ नव्हता. इतके दिवस त्याचे काही वाटले नव्हते परंतू आता रोज प्रसाद त्याला हलके थोपटून झोपवत असे तेव्हा प्रतीकला आतून अतिशय शांत अशा वेगळ्याच आनंदाचा अनुभव येत होता. त्या आनंदाला वारंवार अनुभवण्यासाठी तो रोज रात्री चोरून त्याच्या वडिलांना भेटत होता.

इकडे वनिता प्रसादला देण्याकरिता पैसे जमवत होती. परंतु त्याने सांगितलेली रक्कम पूर्ण होवू शकत नव्हती. तसे तीने त्याला कळविले. प्रसादने काहीही ऐकून घेतले नाही. पूर्ण पंचवीस लाख मिळाले नाही तर दोन्ही मुलांना तो तिच्या पासून कायमचे दूर करण्याची धमकी पुन्हा देवू लागला.क्रमशः©️Anjali Minanath Dhaske

पुणेवनिता पैसे जमवू शकेल का? मुलांना सत्य समजेल का? प्रसाद वनिताचा सूड घेण्यात यशस्वी होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//