Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

व.नि.ता ( भाग ९ )

Read Later
व.नि.ता ( भाग ९ )
कथा मालिका : व.नि.ता ( भाग ९)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ९ :

©️Anjali Minanath Dhaske

सुमन निराधार असून आश्रमात एकटीच रहात असल्याने तिला वनिता आणि प्रतीकचा लळा लागला. शिवणकाम विभागात काम करतांनाच ती अधून मधून प्रतिकलाही सांभाळू लागली होती. वनिताचे दिवस भरत आले तरी सुमनच्या मदतीमुळे ती शेवटपर्यंत काम करत होती. बाळंतपण सुखरूप पार पडले. तिच्या पोटी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. मुलीचे \" साक्षी \" असे नामकरण करण्यात आले. बाळंतपणात तिला आलेला थकवा बघता तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ आश्रमातील इतर बायका आळीपाळीने करत . तिला मात्र दोन्ही मुलांचे भविष्य घडविण्यासाठी अधिक मेहनत करायची होती. देबाश्री ताईंना तिच्या धडपडी आणि लाघवी स्वभावाने खूप प्रभावित केले होते. आश्रमातील नोकरीतून मिळणार्‍या पगारात तिच्या दोन्ही मुलांच्या संगोपनाचा खर्च भागविणे कठीण जाईल म्हणून तिने आश्रमा बाहेर जास्त पगाराची नोकरी करावी असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. मुले लहान असेपर्यंत तरी तिला आश्रमा बाहेर नोकरी करणे शक्य नव्हते. याचाच तिला फायदा व्हावा म्हणून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला प्रोत्साहित केले.

दोन्ही मुलांना सुमन अत्यंत आनंदाने सांभाळत होती. अभ्यास, आश्रमाची कामे व आश्रमातील नोकरी यातच वनिताचा अधिक वेळ जात असल्याने मुलांना ती इच्छा असूनही फार वेळ देवू शकत नव्हती. सुमन सोबत असल्याने तिला मुलांची फारशी काळजी राहिली नव्हती. तिने जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मुक्त विद्यापीठातून तिला पी.एच.डी. करण्याची ईच्छा होती. मुलांचे खर्चही वाढत चालले होते. जास्तीचे चार पैसे गाठीशी असावे म्हणून तिने रिकाम्या वेळेमधे शिवणकाम विभागात बॅगा शिवण्यास सुरुवात केली. तिने स्वतःला कामात झोकून दिले होते. अतिशय कष्टाने तिने अवघ्या दोन वर्षात पी.एच.डी. ही पूर्ण केली. दोन्ही मुले आता शाळेत जावू लागली होती. मुलांच्यामुळे तिला आश्रमा बाहेर नोकरी करण्याचे धाडस होत नव्हते. केवळ शिक्षण घेवून फायदा नाही तिच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी तिने आश्रमा बाहेर नोकरी करणे गरजेचे आहे हे ओळखून देबाश्री ताईंनी त्यांच्या ओळखीने आश्रमाजवळील महाविद्यालयात तीला अध्यापिकेची नोकरी मिळवून दिली.

सुमनने मुलांना शाळेत नेण्याआणण्याची जबाबदारी ही स्विकारली. संस्थेचे आर्थिक व्यवहार वनिता हाताळत होतीच. आता नोकरीमुळे ती तिच्या आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करून बँकेचे व्यवहारही चोख सांभाळत होती. सुमन करत असलेली मदत बघता तीने सुमनसाठी ही थोडी रक्कम शिल्लक टाकायला सुरुवात केली. विनिता सुरवातीपासून स्वाभिमानी होती. श्रीमंत लोक आश्रमातील अनाथ मुलांसाठी, स्त्रियांसाठी अनेक गोष्टी दान करत परंतू वनिता स्वतःसाठी किंवा मुलांसाठी कधीच त्या वस्तूंचा स्विकार करत नसे. तिच्या ह्याच स्वाभिमानी स्वभावाने तिने अध्यापिकेच्या कामात ही स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. आश्रमा बाहेर नोकरी करणार्‍यांना आश्रमात रहाण्याची परवाणगी तेव्हाच मिळत असे जेव्हा तिथे रहाण्याच्या मोबदल्यात पगारातील ठराविक रक्कम दरमहा आश्रमाला दिली जात असे. तसेच आश्रमातील आतल्या बाजूच्या खोल्या सोडून आश्रमाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या खोल्यांमधे त्यांना त्यांचे बस्तान हलवावे लागे. वनितानेही सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले . सुमनही त्यांच्या सोबत राहू लागली.

आश्रमात आल्याने आपल्या जीवनाला एक चांगली दिशा मिळाली या जाणिवेने वनिता आश्रमाला दरमहा घरभाड्यासोबत एक ठराविक रक्कम देत होती. याव्यतिरिक्त आश्रमातील आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून त्यातील चुका सुधारण्याचे कामही ती निशुल्क करत होती. बघता बघता दोन्ही मुले मोठी झाली. याच दरम्यान वनिताने तिच्या महाविद्यालयातील संदेश चक्रवर्ती या विधूर कारकुनाचे स्थळ सुमनसाठी देबाश्री ताईंना सुचविले. देबाश्री ताईंनीही नीट चौकशी करून संदेश आणि सुमनचे लग्न लावून दिले. वनिताने सुमनसाठी साठवलेली रक्कम तिच्या नवीन संसाराला शुभेच्छा म्हणून दिली. निराधार सुमनला तिच्या हक्काचे घर मिळाले.

वनिता दुसरे लग्न करणार नाही याची देबाश्री ताईंना खात्री होती. परंतू आता वनितानेही स्वतःचे स्वतंत्र घर घ्यावे अशी देबाश्री ताईंची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला मान देत वनिताने घरातून बाहेर पडतांना जवळ बाळगलेले दागिने विकून छोटेसे घर घेण्यासाठी नोंदणी केली.

प्रतीकने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकला पदव्युत्तर शिक्षण परदेशात करण्याची इच्छा होती. त्यासाठीच्या स्पर्धा परीक्षांची तयारीही तो करत होता. साक्षी वाणिज्य शाखेत शिकत असून सी.ए. ची तयारी करत होती.

सगळे काही सुरळीत सुरू असतांनाच अचानक तिच्या महाविद्यालयात प्रसाद तिला भेटायला आला. त्याला समोर बघून तिचे हृदय एका क्षणासाठी थांबले. तिच्या पोटात भीतीने मोठा खड्डा पडला .क्रमशः

©️Anjali Minanath Dhaske

पुणे

प्रसाद इतक्या दिवसांनी वनिताच्या समोर का आला आहे? वनिताचा भूतकाळा तिचे भविष्य नष्ट करणार का? प्रसादला पश्चाताप झाला असेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//