Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

व.नि.ता ( भाग ७)

Read Later
व.नि.ता ( भाग ७)
कथा मालिका : व.नि.ता ( भाग ७)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ७:

©️Anjali Minanath Dhaske

बघता बघता सहा महिने निघून गेले. सासूबाई वरचे वर मुक्कामाला येत होत्याच. प्रसादच्या चांगल्या वागण्याने वनिता सुखावली. काहीशी निश्चिंत झाली. तिला दुसर्‍यांदा दिवस गेले. पोरांचा संसार रूळावर येतोय असे वाटून सासुबाई ही निश्चिंत झाल्या.

नेमकी याच दरम्यान सासर्‍यांची तब्येत बिघडली. सासू बाईंना गावी जावे लागले. त्यांच्यासोबत वनिताही गेली. प्रसाद नेहमी प्रमाणे आठवड्याला येणे जाणे करत होता. सुरुवातीला त्याच्या वागण्यात पुन्हा बदल होतोय हे वनिताला जाणवले नाही. तिला तिसरा महिना लागला तेव्हा मात्र तिची खात्री होवू लागली की प्रसाद चांगले वागायचे नाटक करतोय. प्रसाद तीला कधीच शिक्षणाची, नोकरीची परवानगी देत नसे. ती आर्थिक दृष्ट्या परावलंबी रहावी याची तो कायम खात्री करून घेत होता. आताची तिची परिस्थिती आधी पेक्षाही बिकट झाली होती. तिने प्रसादच्या खोट्या वागण्याला बळी न पडता दक्ष रहायला हवे होते. प्रतीकचे भविष्य अंधारात असतांना तिने दुसर्‍या गर्भाला वाढविण्याची चूक केली होती. नकारात्मक विचारांनी तिला घेरले. दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर तिला प्रसाद जे म्हणेल ते करण्याशिवाय पर्याय राहणार नव्हता.

सासूबाईंच्या कानावर तिने तिची समस्या घातली. त्यांच्या मुलाच्या विरोधात त्या काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. तसे काही असते तर त्याच्या वागण्यातून जाणविले असते. वनिताही दुसर्‍यांदा गरोदर राहिली नसती. असे त्यांचे मत होते. संसारात कमी जास्त होतच असते. फुकट संशय घेवून संसाराची धूळधाण करण्यात काहीच अर्थ नाही म्हणत त्यांनी विषय उडवून लावला.

तिने वडिलांना पुन्हा एकदा तिची समस्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रसादला इतर पुरुषांचे आकर्षण वाटते असे तिने सांगितल्यावर त्यांनी अगदी थंडपणाने तिला समजावले, " अग जावईबापूंना दुसर्‍या बाईचा नाद नाही ना मग कशाला काळजी करतेस. दुसर्‍या माणसाला लेकरं होणार नाहीत आणि ते तुझ्या संसारावर हक्क ही सांगायला येणार नाहीत. जोश आहे तोपर्यंत करतील असले धंदे नंतर तुझ्याचकडे परत येतील. दोन पोरं पदरी घेवून जाशील कुठे? आम्ही आहोत तो पर्यंत दोन घास खावू घालूही परंतू आमच्या माघारी तुझे हालच होणार आहे. त्यांना जे करायचे ते करू दे. दोन महिन्यापूर्वी शेतीसाठी लाखभर रुपये मागितले तर पटकन दिले जावई बापूंनी. मनाचे खूप चांगले आहेत. झाकली मूठ सव्वा लाखाची असते पोरी. उगा त्यांना बदनाम करू नकोस. उलट त्यांच्यासोबत राहून स्वतःसाठी भरपूर पैसे साठवायला सुरुवात कर. तुझी म्हातारपणाची चिंता जाईल. त्यांची बदनामी झाली तर तुझी ही होईल. मग तुझ्या बहिणींची लग्न कशी होतील? आमच्या जीवाला म्हातारपणी घोर लागेल. " त्यांचे हे बोल ऐकून वनिताला कळून चुकले की तिने कितीही या सगळ्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला तरी तिला सासरचे किंवा माहेरचे कोणीही साथ देणार नाही.

अशातच दवाखान्यात तपासणी करता गेलेली असतांना तिथे तिची प्रसादच्या मित्राशी गाठ पडली. बोलता बोलता तिला समजले की, प्रसादचे नोकरीत कधीच नीट लक्ष नव्हते. कामात ढीगभर चूका करत असल्याने वरीष्ठ अधिकारी कायम त्याच्यावर वैतागत होते. त्यात भरीस भर त्याने कामकाजातील हिशेबात लाखोंचा घोळ केला. तपासणीत रक्कम त्याच्या खात्यात न सापडल्याने ठोस पुराव्या अभावी त्याच्यावर असलेला आरोप वरीष्ठ अधिकार्‍यांना सिद्ध करता आला नाही. परंतू त्याला कायमचे कामावरून मात्र काढून टाकण्यात आले होते. इतर कामाच्या ठिकाणी त्याने घोटाळे करून ते पचवू नये म्हणून ब्लॅक लिस्ट मधे त्याचे नाव टाकले. त्यावेळी प्रसादने थोडे नमते घेतले असते तर गोष्टी या थराला गेल्या नसत्या.असे मित्राचे मत होते.

ही हकिकत ऐकून तिच्या पाया खालची जमीन सरकली. तिला खरे काय आणि खोटे काय याचा काही मेळ बसत नव्हता. त्यातच वनिताने सासूबाईंशी केलेल्या चर्चेबद्द्ल प्रसादला कुणकूण लागली. वनिताला एकट्या गाठून त्याने पुन्हा तिला धमकावले.

क्रमशः

©️Anjali Minanath Dhaske

पुणे

प्रसादच्या खोटे पणाला वनिता कशी सामोरी जाणार? ती दुसर्‍या बाळाला जन्म देणार का? तिच्या आयुष्यात कोणते नवे वळण येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//