Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

व.नि.ता ( भाग ६ )

Read Later
व.नि.ता ( भाग ६ )
कथा मालिका : व.नि.ता ( भाग ६)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ६ :

©️Anjali Minanath Dhaskeवनिताला चार चौघींसारखा साधा सरळ संसार करायचा होता. तीने विचारल्यावर प्रसादने सगळे कबूल केले तेव्हा तिला थोडी आशा वाटली की, अजूनही ती त्याचे मन वळविण्यात यशस्वी झाली तर तिचा संसार नक्की वाचेल. प्रसाद बाहेरून परत आल्यावर ती त्याला छोटा का असेना व्यवसाय करण्यासाठी विनवू लागली. देहविक्रीच्या कामातून येणारे पैसे आपल्याला नको. सरळ मार्गी कामातून कमी पैसे मिळाले तरी घर भागविता येईल, असे सांगू लागली. तेव्हा मात्र प्रसाद चीड चीड करू लागला. त्याने स्पष्ट सांगितले की, " नोकरी आता पुन्हा मिळणार नाही . व्यवसायासाठी भांडवल गुंतवावे लागते. कोणत्याही व्यवसायात रातोरात जम बसत नसतो तेव्हा जम बसेपर्यंत सगळे खर्च कसे भागवायचे? हे सगळे खर्च भागविण्यासाठी पुन्हा नवे कर्ज काढण्याची माझी तयारी नाही. गावच्या घर बांधणीसाठी काढलेले कर्ज डोक्यावर आहे. त्यात शहरातला आपला खर्च वाढलेला आहे. मी ज्या कामात आहे तिथून माघारी फिरता येणे शक्य नाही. या कामातही आता कुठे माझा जम बसलाय. भरपूर मोबदला मिळू लागला आहे. देहविक्रीच्या कामातून झालेल्या ओळखीचा ऊपयोग करत मागच्याच महिन्यात तुझ्या भावाला मी चांगल्या नोकरीला लावले आहे. आपल्या प्रतीकसाठी मला बराच पैसा जमवून ठेवायचा आहे." असे तो सांगू लागला.

प्रतीकचा विषय निघाल्यावर वनिताने त्याचाच आधार घेत प्रसादचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

"आपल्या मुलावर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. अजूनही उशीर झालेला नाही. आपण गावी जावून शेती करू आणि त्याचे भविष्य उज्ज्वल करू" असे तिने सांगितल्यावर तर तो अधिकच चिडला.

"मीही गावी शिकलो,काय ऊपयोग झाला? बहिणींची लग्न करून देण्यात बापाला अर्धी जमीन विकावी लागली. दोघे भाऊ शिक्षणात कमी म्हणुन राहिलेली जमिनीत ते शेती करतात. त्या दोघांची लग्न अजून बाकी आहेत. वडिलांनी शेतीसाठी वेळोवेळी सावकाराचे कर्ज करून ठेवले आहे डोक्यावर तेही फेडायचे आहे. मला नोकरी लागली होती त्यात सगळ्या जबाबदार्‍या पार पडत नव्हत्या. तेव्हा माझ्या ऑफिस मधील एकाने मला या कामाची माहिती करून दिली. मी विरोधाच केला होता. मी कामाला लागलो होतो तेव्हा पासून माझ्या वरीष्ठ अधिकाऱ्याची माझ्यावर वाईट नजर होती. घरच्यांनी माझ्या लग्नाचा आग्रह धरला आणि आपले लग्न झाले. माझे लग्न झाले आहे हे समजल्यावरही वरीष्ठ अधिकारी काही माझा पिच्छा सोडत नव्हता. सुटीच्या दिवशीही तो मला मुद्दाम बोलावून घेत होता.माझ्या समोर इतर मुलांशी चाळे करून त्यांना रोख रक्कम देत होता. मी दुसरीकडे नोकरी शोधायला सुरुवात केली पण यश आले नाही. तेव्हाच प्रतीकच्या आगमनाची चाहूल लागली. तू गावी असल्याने मी ऑफिस मधे थांबून जादा काम करत होतो. एक दिवस इतर सहकार्‍यांच्या मदतीने माझ्या चहा मधे नशेची गोळी टाकून बॉसने माझ्या त्या अवस्थेचा गैर फायदा घेतला. शुद्धीत आल्यावर सगळा प्रकार माझ्या लक्षात आला तेव्हा मी त्याच्याशी भांडण करून त्याला बेदम मारहाण केली. त्याचाच राग म्हणून त्याने मला नोकरीवरुन काढून टाकत ब्लॅक लिस्टमध्ये माझे नाव टाकले. काय करावे? कुठे जावे? कोणाला सांगावे? काही कळात नव्हते. माझी अवस्था फार वाईट झाली होती. सगळी सोंगं आणता येतात परंतू पैशाचे सोंग आणता येत नाही. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या मी पूर्णपणे उध्वस्त झालो होतो. तेव्हा माझ्या रूम पार्टनरने मला समजावले की अजूनही मी नवी सुरवात करू शकतो. माझ्या मनात सुडाची भावना पेटली होती. बॉसला पैशाचा माज आहे म्हणून माझा गैरफायदा घेतल्या गेला होता. मलाही आता भरपूर पैसे करावयाचे होते. मी स्वतःहून देहविक्रीच्या व्यवसायात उतरलो. माझ्याच वरीष्ठ अधिकाऱ्याशी आता मी घसघशीत रक्कम घेवून संबंध ठेवू लागलो. तो मूर्ख अभिमानाने आंधळा झाला होता. वरीष्ठ अधिकारी व ज्या सहकार्‍याने मला फसविले होते त्यांच्याशी संबंध ठेवतांना मी गुपचूप व्हिडिओ काढून ठेवले. याच व्हिडिओचा वापर करून मी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठीची रक्कम तातडीने उभी केली होती. सुरवातीला मन मारून हे काम करत होतो. गेली दोन वर्षे या कामातून मिळणार्‍या पैशांमधून घरखर्च भागवत आहे . आता तर माझ्या हाताखाली दहा मुले आहेत. त्यांचे कमीशनही मिळते. मी या क्षेत्रात अनुभवी असल्याने मला मागणी आहे. पूर्वी महिनाभर राबून जितका पगार मला मिळत होता तेव्हडी रक्कम आता एका दिवसात मिळते. दोन वर्षात सगळे कर्ज फेडून मी राजा सारखे राहणार आहे. तू साथ दिली तर तुलाही राणी सारखे ठेवीन. "

लोकांना दाखविण्यासाठी दिखाऊ राणी बनण्यात काहीच अर्थ नाही हे ती मनोमन समजून गेली. त्याचे हे बोलणे ऐकून वनिताने घटस्फोट घेण्याचा निर्णय त्याला सांगितला. त्यावर प्रासादने तिला स्पष्ट सांगितले, " तुला घटस्फोट हवा आहे तर तो द्यायला माझी हरकत नाही परंतू आपल्या प्रतीकचा ताबा मी माझ्याच कडे ठेवणार. " त्यावर वनिता हतबल होत म्हणाली, " काहीही झाले तरी प्रतिकचा ताबा मी सोडणार नाही "

प्रसाद शांतपणे उत्तरला ," तू आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही, प्रतीकचा ताबा माझ्याकडेच राहील त्याच्या भविष्यासाठी मीच पुरेसा आहे " त्यावर वनिता चिडून म्हणाली, " तुझ्या सानिध्यात राहून तो काय शिकणार आहे. तू त्याला काय संस्कार देणार आहे?"

त्यावर प्रसाद म्हणाला, " मी त्याला माझ्याच धंद्यात घालणार आहे. मी फार उशिरा आलो या क्षेत्रात. लहान मुलांना जास्त मागणी असते. खूप पैसे मिळतात. वय आहे तोपर्यंत कमावून घ्यायच, नंतर आरामात बसुन खायचे. माझ्या पाठीशी कोणी नव्हते .मला जास्त पैसे कसे मिळवता येतात हे सगळे समजून घ्यायला अवघड गेले, आता मात्र मी त्याच्या पाठीशी आहे. एकदा का तो थोडा मोठा झाला की मी त्याला सगळे शिकविणार आहे. तो कामाला लागला म्हणजे बादशाही थाटात राहू आम्ही दोघे. घटस्फोट घेतांना माझी बदनामी करून प्रतीकचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करशील तर घटस्फोट मिळेल तेव्हा मिळेल परंतू प्रतीकचे नखही तुझ्या दृष्टीला पडणार नाही ईतक्या दूर त्याला घेवून जाईल. माझे संबंध मोठ्या लोकांशी आहेत. आम्ही दोघे कुठे गायब झालो याचा पत्ता तुला आयुष्यभर लागणार नाही. तुझ्या नकळत तुलाही विकून टाकेन. मग आयुष्यभर रडत बसशील. शहाणी असशील तर जे जसे सुरू आहे तसेच सुरू राहू दे. " हे बोलत असतांनाच तो प्रतीकला खेळवतही होता. येरवी प्रतीकला त्याच्या हातात हसतांना बघून तिला समाधान वाटले असते परंतू आता मात्र तिच्या मनात प्रतीकच्या आणि स्वतःच्या भविष्या विषयी चिंता दाटून आल्या. तिने स्वतःला या आधी इतके हतबल कधीच अनुभवले नव्हते. प्रसादने जे सोसले त्याबद्दल त्याला सहानुभूती द्यावी की आता तो जसे वागतो आहे त्याचे दुःख करावे. वनिताची विचार शक्ती क्षीण झाली. तिने प्रसादला दाखविले नसले तरी आतून ती पूर्णतया कोलमडली होती.

तिने वडिलांना नवर्‍याला सोडून राहण्याची शक्यता सांगितली तसे त्यांनी तिच्यावर चिडचिड सुरू केली. " नवरा मारहाण करत नाही, घरात लागेल ते सगळे आणून देतो, मुलाकडे लक्ष देतो, तुला कपडेलत्ते सगळे घेतो मग उगी चांगलं सुरू असताना मोडता घालू नकोस. त्यांचे घेतलेले पैसे परत करण्याची आमची ऐपत नाही तेव्हा गपचूप संसार कर. आमच्या जीवाला घोर लावू नको" म्हणत त्यांनी तिच्या मनातील वादळ जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.

माहेरच्यांची मदत मिळत नाही म्हंटल्यावर तिने सासू बाईंना प्रतीकचे कारण देत स्वतःकडे शहरात बोलावून घेण्याचा तगादा लावला. अखेर सासूबाई सुरुवातीला महिनाभरासाठी रहायला आल्या. तेव्हा तिने प्रसाद उशीरा घरी येतो, बाहेरच्या खोलीत झोपतो,वेळी अवेळी कामावर जातो, फोन आला की लगेच घराबाहेर पडतो, काय करता? कुठे जाता? असे प्रश्न विचारले की चिडचिड करतो. अशा अनेक बारीकसारीक गोष्टी सासू बाईंच्या निदर्शनास आणून द्यायला सुरवात केली. सासूबाईंनेही मुलाचा संसार सुरळीत रहावा म्हणून आडून आडून त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला.

प्रसादच्या लक्षात ही गोष्ट यायला वेळ लागला नाही. आई घरात असे पर्यंत त्यानेही चांगले वागण्याचे नाटक सुरू केले. इतकेच काय एकांतात त्याने वनिताशी शारीरिक जवळीक साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वनिताने विरोध केला. परंतू रविवारी तो सगळ्यांना बाहेर फिरायला घेवून जावू लागला. वनिताला आवडते म्हणून सिनेमाला नेवू लागला. प्रसादचे आताचे वागणे खरे मानावे की त्याच्याबद्दलचे जे सत्य आपल्याला कळले आहे ते खरे मानावे. असा संभ्रम तिच्या मनात निर्माण झाला. आईच्या सांगण्यावरून प्रसाद सुधारला तर झाले गेले विसरून जावून नवीन सुरवात करायची आशी वेडी आशा तिच्या मनाला लागून राहिली.

क्रमशः

©️Anjali Minanath Dhaske

पुणे

आईच्या येण्याने प्रसाद खरच सुधारला आहे का? वनिताच्या संसाराची गाडी पून्हा रूळावर येईल का? वनिताच्या सुखी संसाराचे स्वप्नं अस्तित्वात येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//