तिच्या भावनांचे मोल.

कुटुंबातील स्त्री आपल्यामुळे आपल्या कुटुंबातील कोणालाही त्रास होऊ नये म्हणून कितीतरी इच्छा,अपेक्षांना बाजूलाठ ठेवते.

सौ. प्राजक्ता पाटील 

राज्यस्तरीय लघुकथा करंडक स्पर्धा.

विषय : स्त्रीला समजून घेणं इतकं कठीण असतं का हो?

उपविषय: तिच्या भावनांचे मोल..

टीम सोलापूर 


"राखी टॉवेल..राखी माझा रुमाल.. राखी माझा मोबाईल.." चंद्रशेखर उठल्यापासून हजार वेळा राखीच्या नावाने ओरडायचा.

दिवस कसा सुरू व्हायचा? आणि कसा संपायचा? याचा राखीला काहीच पत्ता लागत नव्हता. स्वतःसाठी जगणं पार विसरून गेली होती ती. सकाळची कामे आटोपून जेवण झाले की,दररोज खिडकीत निवांत बसून चहा घ्यायचा हा तिचा नित्यक्रम ठरलेला असायचा. जुन्या रोजनिशी वाचणे आणि नवीन काहीतरी लिहीणे हा तिचा छंद अगदी बालपणापासून होता तो ती आजही जोपासायची. आज खिडकीत बसून ती मनात विचार करत होती.

\"आपणच सुरुवातीला लाडावून ठेवलेय मग आता दोष कुणाला द्यायचा ? पण चंद्रशेखरने समजून घ्यायला हवं की नको? मी आता फक्त त्याची बायको नाहीये तर दोन मुलांची आईही आहे शिवाय सासू-सासर्‍यांची सेवा करणारी सूनही आहे.\" 

कारण मुलांनाही आईच्या मनाची घालमेल समजावी इतकी मुले मोठी नव्हती. आणि घरातल्या बाकी मोठ्यांना तिला मुळी समजूनच घ्यायचं नव्हतं. निवांत घरी बसते ती. ती कुठे काय करते? काही बोलायला गेल्यास हे टोमणे ठरलेले असायचे. पण चंद्रशेखर वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचतोय याचं श्रेय ही तिलाच जातं. मुलं वर्गात चांगल्या गुणांनी पास होतात याचं श्रेय तिने तिच्या कौशल्याने घेतलेल्या अभ्यासालाच जातं. पण छे! अस बोलून तिला कशामुळे डोक्यावर घ्यायचं ? असं म्हणून प्रत्येकजण तिला गृहीत धरू लागला होता. 


मुलं झाल्यावर त्यांना सांभाळण्यासाठी आईला आपल्या नोकरीचाही त्याग करावा लागतो. दोघांना सेम पॅकेज असलं तरी पुरुषी अहंकारामुळे "तूच घरी बस." असे प्रत्येक पुरुष चटकन बोलून मोकळा होतो. 


तेव्हा तिच्याकडे देवाने दिलेली दैवी शक्तीच असते जिच्या जोरावर ती मुले किंवा घर अगदी लिलया पेलू शकते हा विश्वास सगळ्यांना असतो. ती नसेल तर घर अगदी उदास वाटतं. पण तिची स्तुती न करता तिच्यावरच जोक करण्यात सगळ्यांना आनंद वाटतो. मनात आणलं तर ती काहीही करू शकते पण काही वेळा काही बंधने ती स्वतःच्या मनाने पाळते आणि त्यातच तिच्या कुटुंबाचं भलं असतं. लहानपणापासून रोजनिशी लिहिणारी राखी फावल्या वेळेत मोबाईलवर किचन टिप्सही शोधायची. आज अचानक तिला फेसबुकवर ईरा ब्लॉगिंग या ॲपची ओळख झाली. या ॲपवरील सुंदर कथा वाचताना ती जणू त्या कथेत हरवून गेली. ही कथा तिच्या आयुष्याशी मिळती जुळती होती. हळूहळू तिच्याही मनातील भावना ती कागदावर उमटवू लागली. मग तिने ॲपवर एक कथा लिहायला घेतली. कधीकधी ती कथामालिकाही लिहू लागली. तिला फावल्या वेळेत स्वतःला व्यक्त होण्याची संधीच गवसली. रोजच ती लिखाणातून आपले विचार व्यक्त करू लागली.सतत चुकून रिमोटवरचं चॅनल चेंज करणाऱ्या सासूबाईंच्या हाकेला "ओ आलेच." म्हणायला तिला आता थोडा वेळ लागत होता.


रात्री सासूबाई जेवताना म्हणाल्या, "आता काय तर उठ सूट मोबाईल घेऊन बसते. लिहीत असते ना.आता चॅनेल बदलून द्यायलाही वेळ लागतो तिला."


"मी माझी सगळी काम व्यवस्थित झाल्यानंतरच माझं लिखाण करते. एवढं तर मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी करू शकते ना?" राखीने आज चंद्रशेखरला उलट प्रश्न केला. 


"आई, असू दे ना. तिला आवडते तर लिहू दे तिला आणि ती काय काम ठेवून थोडीच लिहिते? सगळी काम झाल्यावर ती तिचा छंद जोपासते तर लिहू दे तिला." 


आज चंद्रशेखरच्या एवढ्या वाक्यानेही तिला धीर मिळाला होता. 


कौतुक नाही केले तरी चालेल पण आपल्यासोबत आपला नवरा उभा आहे, आपल्या विचारांचा तो आदर करतोय एवढही एका स्त्रीला समजून घेण्यासाठी पुरेसं असतं. 


थोड्या दिवसातच राखीचा मोबाईल अचानक खराब झाला. ती जरा उदास होती. पण तिने कोणालाही काहीच सांगायचे नाही असे ठरवले होते. कारण तिला परत परत सतत मोबाईल हातात असतो म्हणूनच बिघडलाय. हे वाक्य ऐकायचे नव्हते. आठ दिवस झाले तरी ती कोणाला काहीच बोलली नाही.  


एकेदिवशी सायंकाळी राखीने नेहमीप्रमाणे आपला स्वयंपाक उरकला. मुलांचा अभ्यासही घेऊन झाला होता. आज कितीतरी दिवस झाले होते तिला व्यक्त होता आले नाही याची तिला खंत वाटत होती. 


नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळी दारावरची बेल वाजली. चंद्रशेखरच असणार हे राखीला ठाऊक होते म्हणूनच ती त्याच्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेली. रश्मी म्हणजे राखीची मुलगी दरवाजा उघडायला गेली.


रश्मीने दरवाजा उघडला. 


"वॉव बाबा गिफ्ट ! किती छान! कोणासाठी आणले ?" रश्मी एका दमात म्हणाली.


राखी चहा करायला किचनमध्ये गेली होती.


"राखी, राखी." म्हणत चंद्रशेखरने तिला आवाज दिला. "काय हवय ? आलेच." म्हणून राखी बाहेर आली.


"काही हवं नाहीये. काहीतरी द्यायचंय." चंद्रशेखर आनंदाने म्हणाला.


आज पहिल्यांदा काहीतरी देण्यासाठी चंद्रशेखर राखीला आवाज देत होता. राखी मंद गॅस करून चटकन बाहेर आली. 


मोबाईलचा बॉक्स राखीच्या हातात देत चंद्रशेखर म्हणाला, "माझ्या बायकोसाठी हा नवीन मोबाईल. खराब झालाय ना तुझा मोबाईल?" चंद्रशेखर म्हणाला.


"काय? पण मी तर तुम्हाला सांगितलं नव्हतं माझा मोबाईल खराब झाला आहे ते." राखी कुतूहलाने म्हणाली.


"तुझा चेहरा सांगत होता ना, तू काही लिहू शकत नाहीये ते. काल मी सहज तुझा मोबाईल हातात घेतला होता. तेंव्हा मला समजले की, तुझा मोबाईल स्क्रीन खराब झाल्यामुळे फक्त आलेला फोन घेणे एवढ्याच कामाचा राहिला आहे ते." चंद्रशेखर म्हणाला.


राखीच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता. डोळ्यातूनच ती चंद्रशेखरचे आभार मानत होती. चंद्रशेखरच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. प्रत्येक कुटुंबातील स्त्री आपल्यामुळे आपल्या कुटुंबातील कोणालाही त्रास होऊ नये म्हणून कितीतरी इच्छा,अपेक्षांना बाजूला ठेवून घरच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटत असते. जेव्हा तिच्या मनाचा विचार करून नकळत जोडीदाराकडून तिला अनपेक्षित गिफ्ट मिळतं तेव्हा तिच्यासाठी ती आनंदाची पर्वणीच ठरते. गिफ्टच्या किमतीपेक्षा तिच्या भावनांचे मोल जाणलेले तिला समाधान वाटते. 


धन्यवाद!


सौ. प्राजक्ता पाटील