वल्लरी

Story Of A Plant Lover Girl..

वल्लरी...


"वल्लरी, काय करते आहेस तिथे?" वल्लरीची आई तिला हाक मारत होती.

 " आई, हे बघ ना किती सुंदर फूल आहे.. त्याचा रंग बघना किती वेगळा आहे.. आई त्या काकांना विचार ना हे झाड ते आपल्याला देतील का?" आठ वर्षांची चिमुरडी वल्लरी आईला मस्का मारत म्हणाली.

" अजिबात नाही.. " आतून बाबा ओरडले.." आपण इथे दोन दिवस फिरायला आलो आहोत. झाडे गोळा करायला नाही. आधीच बागेत तू खूप झाडे लावून ठेवली आहेस."

तिचे इवलेसे झालेले तोंड पाहून आई म्हणाली.. " विचारूयात बरे का.. पण आता तू पण जास्त झाडे गोळा करू नकोस.. त्यांना सुद्धा वाढायला जागा लागते कि नाही.. आपल्याकडची जागा आता कमी पडायला लागली त्यांना.." यावर मान हलवून वल्लरी पुन्हा पळाली, झाडे नाही बिया गोळा करायला..

   वल्लरी पुण्यात आपल्या आईवडील आणि भावासोबत राहणारी या कथेची नायिका.. झाडांची, फुलांची भरपूर आवड असलेली. तिच्या आईला बहुधा हे ती पोटात असतानाच कळले होते म्हणून तिचे नाव वल्लरी ठेवले, असे सगळेच म्हणत.. जसजशी वल्लरी मोठी होऊ लागली तसतसे तिचे झाडांचे प्रेम अंहं..वेड वाढूच लागले.. जळी ,स्थळी, काष्ठी, पाषाणी तिला झाडेच दिसत.. तिच्या मैत्रिणी मुलांची चर्चा करत आणि हि फुलांच्या रंगात रमलेली असायची. त्या प्रेमामुळेच तिने वनस्पतीशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केले.. आता तिच्या घरातल्यांना लागले होते तिच्या लग्नाचे वेध.. पण हिचे झाडांचे वेड स्वीकारून हिच्याशी लग्न कोण करेल हा प्रश्नच होता.. पण झाले अगदी उलटेच.. बघता बघता वल्लरीचे लग्न ठरले काय, आणि हा हा म्हणता म्हणता झाले सुद्धा.. 

         झाले असे होते, वल्लरीच्या शेजाऱ्यांनी त्यांचा बंगला विकला होता. तिथे एक जोडपे रहायला आले होते. वल्लरी जेव्हा रोज तिच्या बागेत झाडांशी बोलायची तेव्हा त्या काकू रोज बघायच्या.. त्यांनी मनाशी ठरवून त्यांच्या मुलाला वेदांतला बोलावून घेतले.. तो तर हिला बघूनच घायाळ झाला.. वल्लरीचे निरागस बोलणे, वागणे.. वल्लरीच्या आईबाबांनी त्याला वल्लरीच्या वृक्षप्रेमाबद्दल सांगितले खरे, पण ते त्याला कितपत कळले त्यांना शंकाच होती.. वल्लरीलाही वेदांत तसा आवडला होता.. मग काय चट मंगनी पट ब्याह.. आणि वल्लरी आली थेट पुण्याहून मुंबईला.. पण इथे येताच तिचा मूड थोडासा ऑफ झाला.. कारण माहेरी बंगल्यात राहिलेली ती इथे बघते तर वेदांतचा दोन बेडरूमचा फ्लॅट.. तिला घर लहानच वाटले.. त्यातही आधी तिने पाहिले कि घरात झाडे आहेत का? पण छे.. झाड काय? झाडाचे पानही नव्हते.. तिने वेदांतला विचारले," काय रे तुझ्या या घरात एकही झाड नाही ?"

" तुझे काय म्हणतेस? हे आपले घर आहे.." वेदांत प्रेमाने तिला जवळ घेत म्हणाला.. "आणि झाडे लावणार कोण? मला त्या मातीची आणि त्या किड्यांची घाण वाटते.."

" पण मला तर झाडे खूप आवडतात.. मी नाही राहू शकत त्याशिवाय.." वल्लरीने रडायला सुरुवात केली. आपली नवी बायको रडताना वेदांत नाही बघू शकला.. "अग वेडाबाई, त्यात काय रडायचे? घर तुझे आहे ना. मग लाव तुला जिथे लावायची आहेत तिथे झाडे.. मग तर खुश?"

" खूप.."

" मग आता?" वेदांत रोमँटिक होत म्हणाला..

" आता काय? आता तयारीला लागा.. कुंड्या आणा, माती आणा, रोपे आणा.." वल्लरीची यादी ऐकून वेदांतचा चेहरा पडला.. ते बघून वल्लरीने पटकन त्याच्या गालावर जादूची पप्पी दिली आणि म्हटली.. "नवर्‍याची मदत घ्या.." त्या जादूने कमाल केली.. मग दोघांची पूर्ण संध्याकाळ कुंड्या, माती, झाडे खरेदी करण्यात गेली.. ती जड माती उचलून वेदांतचे हात दुखायला लागले, कपड्यांवर मातीचे डाग लागले.. पण तरिही बिचारा बायकोच्या प्रेमापायी हे सगळे करत होता.. या सगळ्याची भरपाई नंतर त्याने करून घेतली हि गोष्ट वेगळी.. पण वल्लरी सुद्धा मनाप्रमाणे वागता आले म्हणून खुश होती.. दुसर्‍या दिवशी वेदांतचा डब्बा वगैरे दिल्यानंतर ती जी झाडांमध्ये गुंतली ते थेट संध्याकाळपर्यंत चालूच होते.. नंतर मात्र ती आवरून तयार झाली.. वेदांत घरी आल्यावर घराचे बदललेले रूपडे बघून चकितच झाला.. जिथे जागा मिळेल तिथे वल्लरीने छान सजावट करून झाडे लावली होती.. "वॉव.. मला ना असे जंगलात राहिल्यासारखे वाटते आहे.. दिल गार्डन गार्डन हो गया.. आज दिवसभर काम करून दमली असशील ना.. चल आज बाहेर जेवायला जाऊ.." एवढे समजून घेणारा नवरा बघून वल्लरी रडायलाच लागली, कारण तिचे हे वेड पाहून तुझे लग्नच होणार नाही, असे तिला सगळे चिडवायचे.. आणि इथे तर याला आपण केलेले सगळे आवडते आहे.. तिला रडताना पाहून वेदांत जवळ आला," आता काय झाले?"

" काही नाही.. मी आलेच पटकन" असे म्हणत ती त्याचे नाक ओढत पळाली..

       एकमेकांच्या आवडीनिवडी जपत दोघांचाही प्रेमाचा संसार सुरू होता.. वल्लरीच्या घरचेही ती सासरी रूळली म्हणून खुश होते.. वल्लरी अजूनही कामाला जात नव्हती.. थोडे स्थायिक होऊ नंतर बघू असा दोघांचाही एकमताने झालेला निर्णय होता.. तिची सकाळ कामात कशी जायची हे तिला कळायचे नाही.. पण दुपारी मात्र काहीच काम नसल्याने कंटाळा यायचा.. वरकामाला एक मावशी यायच्या.. कामे पटकन होऊन जायची.. करायचे काय हा मोठा प्रश्न तिच्यापुढे होता.. असेच फेसबुकवर तिची एका ग्रुपची तिला ओळख झाली.. संध्याकाळी जेव्हा वेदांत घरी आला तेव्हा दृश्य बदललेले होते.. अतिशय स्वच्छ घर.. आणि स्वागताला त्याच्या आवडीचे कपडे घालून हसतमुख बायको.. तो घरात आल्या आल्या तिने त्याला चक्क चक्क मिठीत घेतले.. वेदांत फक्त चक्कर येऊन पडायचा बाकी होता.. "पटकन फ्रेश होऊन ये.. तुझ्यासाठी गंमत आहे.." हवेत तरंगतच तो बाथरूममध्ये गेला.. त्याचा आवडीचा नाश्ता टेबलवर मांडून ठेवला होता..

" अरे वा, आज काय स्पेशल आहे का?"

" तू तर असे बोलतोस , जसे रोज हे असे काहीच नसते.." वल्लरी फुरंगटून म्हणाली..

" असे नाही ग, पण एवढी तयारी?"

"ऐक ना, तुझा तो मित्र आहे ना?" 

" कोण ग?"

" तोच रे, बियरबारवाला."

" तुझे त्याच्याकडे काय काम आहे?" वेदांतने डोळे बारिक करत विचारले..

" मागे तू सांगत नव्हतास का, त्याच्याकडे भरपूर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आहेत.."

" हो, त्याचे काय?"

" मला हव्या होत्या.."

" मग खालून घेऊन ये कि.. हाय काय आणि नाय काय.." वेदांतला ऊरावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटले..

" मला एक दोन नको आहेत.. मला पन्नास लागतील.. तेही रिकाम्या.."

" पन्नास? एवढ्या का?"

" अरे, मी ना फेसबुकवर एक झाडांचा ग्रुप जॉईन केला आहे.. तिथेना त्यांनी एक कल्पना दाखवली आहे, ज्याने घरातला कचरा घरातच जिरेल आणि झाडांना खतही मिळेल.." 

" अग पण त्याचा वास नाही का येणार?" वेदांतने तोंड वाकडे करत विचारले..

" तुला असे वाटते का, कि ज्याने तुला काही त्रास होईल असे मी वागेन?" वल्लरीने डोळ्यात पाणी आणून विचारले..

" बरे, बघतो त्याला विचारून.." वेदांत विरघळत म्हणाला.

दुसर्‍या दिवशी दोन्ही हातात बाटल्या उचलून नेणाऱ्या वेदांतला पाहायला अख्खी सोसायटी जमली होती..

लगोलग वल्लरीने त्या बाटल्यांपासून तिला हवे तसे छोटे कंपोस्ट बिन बनवले.. काही दिवस सुरळीत गेले.. पण एक दिवस रात्री, 

"वेदांत तिथून काही गेल्यासारखे वाटले का?"

" म्हणजे?"

"अरे काहीतरी भिंतीवर वळवळताना दिसते आहे.."

वेदांतने उठून पाहिले तर एक भलीमोठी पाल भिंतीवर चालत होती.. ती पाहून वल्लरी जोरात किंचाळली.. कारण तिचे झाडावर प्रेम होते, प्राण्यांवर नाही.. कसेतरी वेदांतने तिला हाकलले.. पण तो रागाने लाल झाला होता.. " मला या घरात अजिबात प्राणी नकोत.. मला आधीच झाडे आवडत नाहीत.. पण तुझ्यासाठी मी ते सहन केले.. आता पाली ... अजिबात नाही.. उद्याच्या उद्या ते डबे फेकून द्यायचे.."

वल्लरीने फक्त मान हलवली.. कारण पाली तिला तरी कुठे आवडत होते.

दुसर्‍याच दिवशी तिने मावशींच्या मदतीने आधी त्या डब्ब्यांवरच्या पाली हाकलल्या.. नंतर एका कंटेनरमध्ये तिने ते खत काढायला सुरूवात केली. वेदांत तिथे उभा राहून बघत होता.. अचानक एका डब्यातून एक पालीचे पिलू बाहेर आले.. ते पाहून वल्लरी सोफ्यावर उडी मारून बसली.. ते पिलू घाबरून इथे तिथे पळायला लागले..

" वेदांत पाल.." वल्लरी किंचाळली..

"मारा कि ती दादा.." मावशी ओरडल्या..

वेदांत चप्पल घेऊन पालीच्यापाठी पळायला लागला.. आपल्या जीवाला असलेला धोका ओळखून ती पाल कपाटाच्या पाठी जाऊन लपली.. तिला बाहेर काढण्यासाठी मावशी 'मच्छर मारनेवाला हिट' घेऊन आल्या.. "दादा मी इथून हिट मारते.. ती पाल तिथून बाहेर पडेल, मग तुम्ही तिला मारा. " मावशींनी 'इन्स्ट्रक्शन्स' दिल्या.. वेदांतने मान डोलावली.. तो कपाटाच्या एका बाजूला गेला.. मावशी दुसर्‍या बाजूला.. वेदांतने वाकून पाहिले, तेवढ्यात मावशींनी हिट मारले, ते सगळे वेदांतच्या तोंडात गेले.. पाल बाहेर येणे दूरच.. वेदांतला श्वास घेता येईना.. आता तर काहिही करून त्या पालीला कंठस्नान घालायचेच असा वेदांतने पण केला..

आणि शेवटी पालीला चपलेने मारल्यानंतरच वेदांत शांत झाला.. त्यामुळे झालेला पसारा बघून मावशींनी डायलॉग मारला," आता हा पसारा मी उचलते. पण दोन दिवस मी काय कामावर येत नाय बघा.."



आज परत संध्याकाळी वेदांत आला तेव्हा घर स्वच्छ होते. वल्लरी त्याची आवडती साडी नेसून दरवाजात उभी होती.. हे पाहून त्याला आधीच्या संध्याकाळची आठवण झाली.. त्याच्या पोटात भलामोठा गोळा आला.. पण आज कशालाही होकार द्यायचा नाही, असे त्याने स्वतःशीच ठरवले होते.. 

"तू फ्रेश होऊन ये, तुला गंमत सांगायची आहे.." वल्लरी..

काही झाले तरी मोहाला बळी पडायचे नाही, असे स्वतःला बजावत तो बाथरूममध्ये गेला.. डायनिंग टेबलवर चहा नाश्ता तयार होता..

" मी काय म्हणते.."

" काही नको म्हणूस.."

" असे रे काय करतोस?"

" असेच करणार.. मागच्या वेळेस तुझे ऐकले आणि घरात पाली नाचायला लागल्या .. अजिबात नाही.."

" नाही ऐकायचे, नको ऐकूस.. पण मी सांगून ठेवते.. नाहितर सांगितले नाहीस.. म्हणून चिडशील. मागच्या वेळेस पाली नाचल्या आता बाळ नाचेल घरात.."

" काय?" वेदांत आनंदाने चित्कारला..

" हो.. ते बाळ ना अगदी माझ्यासारखे असेल.. पानाफुलात रमणारे.. मुलगा झाला ना तर नाव ठेवू शिरीष किंवा प्राजक्त .. आणि मुलगी झाली कि लता, प्राजक्ता, अबोली.. किती छान ना.."

वल्लरी बोलत होती आणि वेदांत डोक्याला हात लावून बसला होता...



कथा कशी वाटली नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई