वल्लरी........ भाग २ 

-----

वल्लरी........ भाग २ 

कॉलेजचा पहिला दिवस. वल्लरी घाईघाईने तयार होत होती. आई- बाबा त्यांच्या ऑफिसला निघून गेले होते. वल्लरीने घाईघाईत बॅग घेतली आणि निघाली. शारदा मावशीने आवाज दिला," वल्लरी, बाळा नाश्ता करूनच कॉलेजला जा. पोहे बनवले आहेत मी. " 

वल्लरी ," मावशी मला आधीच खूप उशीर झाला आहे. नाश्ता करत बसले तर ...? नको, नको... मी निघते." 

मावशी वल्लरीचा हात धरून तिला टेबलवर बसवते आणि हातात पोह्यांची प्लेट देत म्हणते ," अगं , कॉलेज कसं आहे काय माहित ? कॅन्टीन नीट असेल तर ठीक नाहीतर उपवास घडेल. शिवाय लेक्चर्स कधी संपतील काय माहित ? तुला मध्येच भूक लागली तर तुझं लक्ष सुद्धा लागणार नाही. त्यापेक्षा तू २ घास खाऊनच जा. " 

मावशीचा आग्रह वल्लरीला मोडवला नाही. शिवाय त्यांना ती परत येईपर्यंत काळजी राहिली असती. म्हणून वल्लरीने घाईघाईत पोहे खाल्ले आणि मावशीला बाय बोलून निघाली. स्कुटीला किक मारली आणि नव्या जगात प्रवेश करायला निघाली वल्लरी राणी....... कॉलेजपासून काही अंतरावर असताना गाडी वळवताना हॉर्न द्यायचं तिच्या लक्षात नाही आलं आणि समोरून येणाऱ्या मुलाला ती धडकली. तो मुलगा गाडीच्या धडकेमुळे थोडा दूर जाऊन पडला. वल्लरी आता चांगलीच घाबरली होती. तिने स्कुटी बाजूला लावली आणि धावत त्या मुलाजवळ गेली. २३ - २४ वर्षांचा तो मुलगा गोरापान, मजबूत शरीरयष्टी, दिसायला सुंदर. वल्लरी त्याला उचलायला गेली पण त्याच्याकडे पाहतच राहिली. 

त्या मुलाने वल्लरीच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवली आणि म्हणाला," मॅडम, आता मला उठायला मदत करणार की असंच बसून राहणार ? " वल्लरी भानावर येते आणि त्याला उठायला मदत करते. त्या मुलाच्या पायाला जखम झाली होती तर हाताला सुद्धा थोडं खरचटलं होतं. झालेल्या प्रकारामुळे तिथे गर्दी होते. गर्दीतून काही जण बोलतात," या मुलींना गाडी चालवता येत नाही तर कशाला चालवतात ?" तर दुसऱ्या म्हणतो," श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या मुली अश्याच असतात. यांना पोलीस स्टेशनच दाखवायला हवं. "  आता मात्र वल्लरीला रडू येत असता. तेवढ्यात तो मुलगा म्हणतो," त्यांनी हॉर्न दिला होता पण माझ्या पटकन लक्षात आलं नाही म्हणून हा अपघात घडला. " वल्लरी त्याच्याकडे पाहतच राहते. गर्दी कमी होती. वल्लरी त्या मुलाला हॉस्पिटल मध्ये जाऊयात असं म्हणते. त्यावर तो मुलगा नकार देतो. तो म्हणतो," मॅडम, मी माझी काळजी घेईन, तुम्ही फक्त गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. " वल्लरी खूप बोलते पण तो मुलगा तिची मदत न घेता जातो. 

वल्लरी कॉलेज मध्ये येते. कॉलेज वगैरे सर्व छान होत पण सकाळच्या प्रसंगामुळे तीच आज कशातही लक्ष नव्हतं. पहिल्या दिवशी तिच्याच सारख्या नवीन मुली असल्यामुळे त्यातल्या काही जणींशी तिची मैत्री होते. सकाळचा प्रसंग सोडल्यास दिवस छानच होता. दुपारनंतर वल्लरी घरी आली. शारदा मावशी तिची वाटच पाहत होत्या. वल्लरीला गाडी लावताना पाहून त्यांनी पटकन आत जाऊन थंड पाणी आणलं. वल्लरी येऊन सोफ्यावर बसली. मावशी पटकन पाणी तिच्या हातात देऊन तिच्या शेजारी बसल्या. 

वल्लरीने पाणी प्यायल्यावर आणि थोडी रिलॅक्स झाल्यावर मावशीने तिला विचारले," काय गं कसा होता आजचा दिवस ? सकाळी माझ्यामुळे तुला ओरडा नाही ना खावा लागला ?" मावशीचे प्रश्न ऐकून वल्लरी म्हणाली," मावशी ओरडा तर नाही खाल्ला पण........" असं म्हणून तिने सकाळी झालेला सर्व प्रकार मावशीला सांगितला. मावशी घाबरली आणि म्हणाली," अगं त्याला जास्त लागलं होतं का ? तुला गाडी जोरात चालवायची काय गरज होती ? थोडी उशिराच पोहचली असतीस ना ? त्याला काही झालं असत तर? तुला काही झालं असत तर ? कितीला पडलं असतं ते. त्याला दवाखान्यात नेलं होतंस का ?" 

वल्लरी," मावशी मी त्याला खूप म्हणाले पण तो नाहीच आला. मी काय करू ? त्याच्या पायाला लागलं होतं. माझ्या जीवाला सुद्धा लागलं गं मावशी. त्याने उपचार करून घेतले असते तर मला जरा बरं वाटलं असतं. आता मला अपराधी वाटतंय." 

शारदा मावशी ," वाईट नको वाटून घेऊस बाळा. तू त्याला हॉस्पिटलला न्यायला तयार होतीस ना ? तो आला नाही त्याला तू काय करणार ? नको मनाला जास्त लावून घेऊस. आणि आता चल फ्रेश हो मी जेवायला घेते. " 

वल्लरीने फ्रेश होऊन जेवण केलं आणि नवीन क्लासेसची चौकशी करायला गेली. रात्री नेहमी प्रमाणेच आई- बाबा घरी नव्हतेच. वल्लरी आणि मावशींनी जेवण केलं आणि वल्लरी झोपायला तिच्या रूममध्ये गेली. झोपाण्यासाठी तिने डोळे बंद केले आणि समोर त्याच मुलाचा चेहरा आला, ज्याला सकाळी तिने धडक मारली होती. बंद डोळ्यांसमोर त्याला पाहून वल्लरी खाडकन डोळे उघडते. ती बराच वेळ त्याचा विचार करते, नंतर उशिरा केव्हातरी तिला झोप लागते.

रात्री उशिरा झोपल्यामुळे अर्थातच तिला सकाळी उठायलाही उशीर होतो. ती मावशीने बनवलेला नाश्ता घाईघाईत करत असते. मावशी तिला म्हणतात," वल्लरी बाळा वेळ झाला तरी चालेल, तू नीट जा. घाई करू नकोस आणि तो मुलगा आज भेटला तर त्याला पुन्हा एकदा हॉस्पिटलचं विचार, जो काही खर्च झाला असेल तो दे आणि पुढची ट्रीटमेंट मी करून देते असंही सांग." वल्लरी मावशींच्या बोलण्यावर मान डोलावते आणि कॉलेजला निघते. 

जिथे काल अपघात झाला , तिथे ती बराच वेळ वाट पाहते पण तो मुलगा काही दिसत नाही. कॉलेजला जाईपर्यंत तिचे २ लेक्चर्स मिस झालेले असतात. बाकीचे लेक्चर्स करून ती घरी जाते. मावशीला तो मुलगा न भेटल्याचे सांगते. वल्लरी पुढचे २-३ दिवस रोज तेथे जाऊन थांबायची. चौथ्या दिवशी मात्र त्याच वळणावर तो वल्लरीला दिसतो. वल्लरी त्याला आवाज देते," ओ मिस्टर ?" तो मुलगा चमकून तिच्याकडे पाहतो. ती जवळ येत त्याला म्हणते," मागचे २-३ दिवस मी रोज तुमची वाट पाहत होते." 

तो मुलगा म्हणतो," माझं नाव ओ मिस्टर नाही. राहुल आहे आणि तुम्ही २- ३ दिवसांपासून माझी वाट का पाहत होतात ?" 

वल्लरी," ते तुम्हांला माझ्यामुळे लागलं ना. त्यात तुम्ही उपचार न करून घेता गेलात. माझ्या मनाला त लागलं अन माझी मावशी सुद्धा मला ओरडली. तुमची तब्बेत विचारायला मी तुमची वाट बघत होते. आता कशी आहे तुमची जखम ? डॉक्टरकडे गेलं होतात का ?" 

राहुल ," हो , गेलो होतो डॉक्टरकडे, २ दिवस पायाला सूज होती म्हणून आलोच नव्हतो इकडे. आता तब्बेत ठीक आहे माझी." 

वल्लरी," २ दिवस सूज होती ? एवढं लागलं होतं ? आता नक्की उतरलीये ना सूज ? " 

राहुल ," हो, आता उतरली आहे. सर्व ठीक आहे. " 

वल्लरी ," त्या दिवशी तुम्ही माझी मदत नाही घेतलीत, आज निदान झालेला खर्च तरी घ्या. " असं म्हणत ती बॅग मध्ये हात घालते. 

राहुल ," नको मॅडम, खरंच फारसा नाही झाला. तेच आपलं मलमपट्टी आणि काही औषध. त्यामुळे राहू द्या, आणि मी तुमच्या समोर धड धाकट उभा आहे , तेव्हा तुमच्या मनाला सांगा, जास्त लावून घेऊ नकोस." 

वल्लरी," त्या दिवशी तुम्ही माझ्यावर तक्रार दाखल करू शकत होतात, तरी तुम्ही ते केलं नाही आणि आता खर्च सुद्धा नाही घेत ?" 

राहुल ," त्या दिवशी अपघात झाल्यावर तुम्ही मला तसंच सोडून गेला नाहीत, म्हणजेच तुमच्यात माणुसकी आहे. तुमच्या विरुद्ध तक्रार केली असती तर कदाचित पुढच्या वेळी असं काही झाल्यावर तुम्ही थांबला नसतात. मी एक मानवी स्वभाव सांगतोय. म्हणजे जनरली असं होतं. म्हणून मी तसं काहीही केलं नाही, ज्याचा तुम्ही विचार करताय. बरं आता मी निघतो. मला उशीर होतोय. " 

वल्लरीच्या उत्तराची वाट न पाहता तो निघूनही गेला. वल्लरी मात्र TO दिसेनासा होईपर्यंत त्याला पाठमोरा पाहत उभी होती. 

क्रमश......... 

🎭 Series Post

View all