व्हॅलेंटाइन डे

कथा त्यांच्या प्रेमाची
व्हॅलेंटाइन डे ...


" तुला आवडेल का माझी व्हॅलेंटाइन व्हायला?" निखिलने अख्ख्या कॉलेजसमोर अवनीला विचारले. लाजेने चूर झालेल्या तिने काहीच न बोलता फक्त मान हलवली.. आणि जमलेल्या सर्वांनी जल्लोष केला.


" थॅंक यू.." अवनीचा हात हातात घेत निखिल बोलला. कॉलेजची गर्दी टाळून दोघं एका निवांत ठिकाणी बसले होते.

" पण मला नाही आवडलं हे.." लटक्या रागाने अवनी म्हणाली.

" काय?"

" हे इतक्या लोकांसमोर बोलणं.. काही खाजगी आयुष्य असतं की नाही."

" हे बरं आहे.. कानाखाली मारताना सगळ्यांसमोर मारायची आणि प्रेम करताना एकांतात.." हे वाक्य ऐकताच अवनीचा चेहरा गोरामोरा झाला.

" किती वेळा सॉरी म्हणू त्यासाठी. मला खरंच वाटलं रे तू मुद्दाम मला पाठून नको तो स्पर्श केलास.." अवनी कान पकडत म्हणाली.

" अग मस्करी करत होतो. त्यानंतरच आपली मैत्री झाली ना."

"आणि ती मैत्री प्रेमात कधी बदलली ते समजले देखील नाही.. हेच ना."

" मला तर आजही वाटत नव्हतं, तू हो म्हणशील. समरला बर्फ घेऊन उभं रहायला सांगितलं होतं." निखिलच्या चेहर्‍यावर हसू होते.

" काहिही.." अवनी लाजली.

" मग काय.. वर्षापूर्वी मारलेल्या थपडेचे वण अजूनही आहेत."

" किती चिडवतोस तू.. मी जाते बाबा. कुठून तुला होकार दिला, असे झाले आहे मला." अवनी रडवेली होत म्हणाली.

" अग ए, एका तासात वैतागलीस? मग आयुष्य कसं काढशील?" अवनीला जवळ घेत निखिल म्हणाला.

" तू करशील माझ्याशी लग्न?" हरखून जात अवनीने विचारले.

" यह हाथ हमने छोडने के लिए नही थामा.. बरोबर आहे ना हिंदी? पण त्याआधी स्वतःच्या पावलांवर तर उभं राहिलं पाहिजे. आपली फायनल परीक्षा झाली की मी लगेच पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जाईन. परत आलो की लग्न. बस." निखिल आपले प्लॅन सांगत होता.

"तू खरंच जाणार आहेस?" अवनीच्या डोळ्यात पाणी होते.

" मला जर माझ्या बायकोला राणीसारखे ठेवायचे असेल तर पैसा नको कमवायला? असा जाईन आणि असा येईन.. तोपर्यंत तुझी एखादी आठवण देशील? " निखिल अवनीजवळ सरकत म्हणाला.

" लग्नाआधी काहीच नाही. मला ना लग्नानंतरचे ते सगळे हळूवार, रोमँटिक क्षण जगायचे आहेत. हे असे चोरटे नाही." निखिलला दूर करत अवनी उठली. ती उठताच निखिलने तिची बॅग धरून तिला पाठी खेचले.


काय वळण घेईल अवनी आणि निखिलची कथा बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all