Dec 05, 2021
सामाजिक

#वॅलेंटाईन्स डे गिफ्ट#

Read Later
#वॅलेंटाईन्स डे गिफ्ट#

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

# *वॅलेंटाईन्स डे गिफ्ट* #

सार्थक आंनदी होता,14 फेब्रुवारी वॅलेंटाईन्स डे,सार्थकचा वाढदिवस अवघ्या दोन दिवसांवर आला होता.आई बाबांनी कबूल केल्या प्रमाणे त्याला एकवीस पूर्ण होताच एक गुपित कळणार होते,वर्षानुवर्षे वाढदिवशी पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याला या वेळेस मिळणार होते.पण या वेळेस काहीतरी विपरीत घडणार होते.

14 फेब्रुवारी,सार्थक सकाळी लवकरच उठला,आईने कालच आणलेला नवीन ड्रेस घालून तयार झाला,ड्रायवरला गाडीत पेट्रोल भरून आणायला सांगितलं,आईने लगेच ओवाळायला घेतलं,आई डोळे भरून त्याला बघत होती,तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याच्या त्याला जाणवल्या.दोघंही आज धीर गंभीर वाटत होते,थोड्याच वेळात ते प्रवासाला निघाले.धावत्या गाडीत वेगानी पळणारी झाडे पाहात सार्थक च्या मनात विचार घोळत होते.गेली तेरा चौदा वर्ष त्याच्या प्रत्येक वाढदिवशी ते लोणावळ्याला नेने आजोबांकडे जायचे,दिवसभर थांबायचे,केक तिथेच कापायचा,आजोबा खूप लाड करायचे,छानशी वस्तू भेट करायचे,संध्याकाळी ते परत निघायचे,गेली कितीतरी वर्ष तो हेच बघत होता.थोडा मोठा झाल्यावर त्याने माझा वाढदिवस इथे का साजरा करतो असे प्रश्न विचारलेत पण बाबांनी स्पष्ट केलं की नेने आजोबा त्यांचे दूरचे काका आहेत,मुल बाळ नाही त्यामुळे एकटेच असतात,आपण जातो वर्षातून एकदा तेवढाच त्यांना विरंगुळा.नंतर त्याच्या हट्टापायी आई बाबांनी त्याला प्रॉमिस केले होते की एकवीस चा पूर्ण झालास की तुला सर्व काही कळेल,तोवर काही विचारू नकोस व आज तो क्षण केव्हाही येणार होता,आजच साऱ्या रहस्याचा उलगडा होणार होता.

सूर्य माथ्यावर आला होता,त्यांची गाडी लोणावळ्याला नेने आजोबाच्या टुमदार दुमजलि बंगळीच्या बाहेर थांबली.सार्थक,शरद,निमा तिघंही आत प्रशस्त दिवाणखान्यात आलेत.सार्थक ला बघताच नेने आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले,त्यांना बघून सार्थकला खूप गलबलून आले,त्यांनी त्याला जवळ घेतले,त्याच्या केसांवरून हात फिरवला,त्याला घट्ट मिठी मारली,त्याला पहिल्यांदाच जाणवले की आजोबा आता खूप थकले आहेत,हे आजोबा त्याला खूप आवडतात,त्यावर खूप प्रेम करतात.तिथे आजोबांनी साळवी वकीलांशी भेट घालून दिली.थोड्याच वेळात केक कट झाला,वेळ जात होता, थोड्या थोड्या वेळानी सार्थक आई बाबांकडे कटाक्ष टाकायचा,आज ते दोघंही शांत होते, गप्पांमध्ये त्यांचा सहभाग नव्हता नंतर जेवणं झाली.सर्व परत दिवाणखान्यात येऊन बसलेत,आता काय होणार,सार्थक खूपच अधीर झाला होता. 

बराच वेळ शांतता होती,मग साळवी वकील उठले व घसा साफ करून मोठ्याने बोलू लागले "सार्थकला वाढदिवसाच्या व एकविसावं पूर्ण केल्याच्या खूप खूप शुभेच्छा!!खूप यशस्वी हो,आज तुझ्या जीवनातील विशेष महत्वाचा दिवस आहे,तू उत्तम शिक्षण घेतलंस,संस्कारी आहेस,आता तुला भल्या बुऱ्याची जाण आहे,योग्य-अयोग्य ठरवू शकतोस,या प्रस्तावनेच्या मागे एकच उद्देश की तू आता तुझं मन खंबीर करावस आणी सत्याला पुढे जावं." सार्थकने वैभव व निमा कडे वळून पहिले त्यांचे डोळे पाणावले होते.त्याला आता वास्तवाला सामोरं जावं लागणार होतं.साळवी पुढे बोलू लागले. "आता तुला जे खरं कळणार आहे ते ऐकून तुला विश्वास बसणार नाही,तुझं मस्तिष्क सुन्न होईल,तुझं मन बधिर होईल,तर ऐक आता,हे श्रीधर नेने आजोबा हे तुझ्या आईचे बाबा आहेत व निमा ही तुझी जन्मदाती आई नसून तिने तुझा सांभाळ केला आहे." सार्थकला भूकंपाचा कंप जाणवला,घाम फुटू लागला,त्याची ही केविलवाणी अवस्था बघून निमा,शरद लगेच ऊठले व त्याला जाऊन सांभाळले, तो आई बाबांना बिलगून हमशा हमशी रडू लागला,काही मिनिटांनी तो नॉर्मल झाल्यावर, मन घट्ट करून बोलला,"सांगा मला पूर्ण मी आता ठीक आहे, साळवींनी एक दीर्घ श्वास घेतला व पुढील कथन सुरु केले." श्रीधर नेने,व्यावसायिक,पिढीजात श्रीमंत,एकच कन्या "आभा" आई लवकरच गेली,गोरी पान, नाजूक,एकुलती एक लाडात वाढलेली,तळ हातावरच्या फोडा सारखी जपलेली,श्रीधर रावांनी आईची कमी कुठे जाणवू दिली नाही,कुठेच कमी पडू दिलं नाही.कॉलेजला गेली,नवीन मैत्रिणी,नवीन ग्रुप झाले.एकदा कॉलेज कल्चरल प्रोग्राम मध्ये तीची शरद सोबत ओळख झाली, शरद तिला पहाता क्षणीच भावला,उंच पुरा,व्यायामाने कसलेलं शरीर,गव्हाळ रंग,शरद अधून मधून कॉलेजला यायचा,त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता,फारसा चालत नसे,घरी कायम पैशाची ओढाताण असायची,मोठी बहीण लग्नाची,तो बाबांना कामात मदत करायचा,तिला त्याची खुद्दारी आवडली,भेटी घडायला लागल्या,त्याचं रूपांतर प्रेमात झालं.शरद आपली पायरी ओळखून होता,त्याने आभाला तिच्यातली व त्यामधली दरीची जाणीव पण करून दिली होती,ती म्हणायची "अरे.. बाबा मला नाही म्हणणार नाही,तू काळजी करू नकोस." प्रेम आंधळं असतं पण दुनिया डोळस असते,लवकरच श्रीधर रावांपर्यंत ही बातमी पोचली,ते आभाला एक चकार शब्द बोलले नाही,त्यांना तिला दुखवायचं नव्हतं,फुलांवर भुंगे बसणारच,भुंगे पळवायचे व फुलाला इजा होऊ घ्यायची नाही असा त्यांचा व्यावहारीक दृष्टिकोन होता.एकदा ते प्रत्यक्ष शरदला भेटले,शरद समंजस होता,त्या भेटीतच त्याला तात्पर्य कळले,श्रीधर रावांनी त्याला वाटेल ते मागण्याचे औदार्य दाखवले पण स्वाभिमानी शरदने सपशेल नकार दिला व आभाच्या आयुष्यातून कायमचे निघून जाण्याचे वचन दिले.जड अंतःकरणाने त्याने त्याच रात्री शहर सोडले नंतर तो परत कधीच आभाला भेटला नाही.शरद अचानक निघून गेल्याने तिला खूप धक्का बसला,तिने कॉलेजला जाणे सोडले,श्रीधर रावांनी तिला वेळ दिला,दोन वर्ष गेली,त्यांना माहित होते जखमांवर वेळ ही सर्वात मोठी औषधी आहे.प्रणव,त्यांच्या व्यावसायिक मित्राचा मुलगा, हुशार,देखणा आभासाठी उत्तम वाटला, लवकरच त्यांनी दोघांची भेट घालून दिली.आभाला आता बाबांना दुखवायचे नव्हते तिने होकार दिला,फारच थोड्या काळात त्यांचे लग्न पण झाले.लग्नानंतर बाळाचा जन्म झाला.श्रीधर राव पण आनंदी होते,प्रणवचे सतत बाहेरचे दौरे असायचे,घरी असला की जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला द्यायचा.आभा आता स्थिर झाली होती,प्रणव व बाळासोबत एकरूप झाली होती पण सगळं काही सुरळीत असताना काहीतरी विपरीत घडणार असतं.प्रणव दौऱ्यावर असतानाच त्याच्या गाडीला अपघात झाला व त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.या वेळेस मात्र आभा स्वतःला सावरू शकली नाही,तीला जबर मानसिक धक्का बसला,ती निशब्द झाली.श्रीधर रावही कमालीचे तुटले अशाही परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरलं,बाळासाठी व आभासाठी ते क्रमप्राप्त होतं.बाळाच्या देखरेखी साठी त्यांनी एक आया ठेवली,आभाला आता कशातच रस नव्हता,ति आता प्यायला लागली होती,विक्षिप्तपणा वाढला होता,श्रीधर राव मूकदर्शक होऊन सर्व बघत होते.त्यांच्या कुवतीचे काही उरले नव्हते.नियती काय खेळ खेळत होती कुणास ठाऊक..?? 

शरदने त्याच रात्री शहर सोडले,आता त्याला गुंतायचं नव्हतं.मुंबईला मामाकडे आला व नोकरी करत अर्धवट शिक्षण पूर्ण केले.एका मोठ्या कंपनीने त्याची हुशारी बघून बोलावून घेतले.त्याचं सगळं स्थिरस्थावर आहे बघून मामाने मुलगी सुचवली.निमा सुस्वरूप,सुशिक्षित व लोभस मुलगी होती,एकाच भेटीत दोघंही एकमेकांना आवडले.योग्य मुहूर्तावर अक्षता पण पडल्या.दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होते,काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता.निमाला मातृत्वाची खूप ओढ,आई होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती जगत होती.वर्ष झालं पण तिला दिवस रहात नव्हते,तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला घेतला,टेस्ट केल्या.निदान हृदय पिळवटून टाकणारे होते,निमाला निसर्गाने मातृत्व बहाल करण्यास नकार दिला होता.निमाचं काळीज फाटलं होतं,शरदने तिला सांभाळले,धीर दिला,पाठीशी उभा राहिला.निमाने पण सत्य स्वीकारलं.शरद पण कामात गुंतला,बढती मिळाली,गाडी मिळाली,त्याचे दौरे सुरु झाले.दोघंही अधून मधून फिरायला जायचे.वेडी निमा..!! लहान मुलं दिसली की कासावीस व्हायची,शरदला सर्व असह्य व्हायचं.एकदा निमाने त्याच्या दुसऱ्या लग्नाचा हट्ट धरला.शरद मेटाकुटीस आला पण समजूत घालण्यात यशस्वी झाला त्याने तिला मूल दत्तक घेण्या बद्दल सुचवलं,एका अनाथाला घर मिळेल,लवकरच या बाबत कायदेशीर बाबींची माहिती घेऊन बाळ दत्तक घ्यायचं ठरलं.

इकडे आभाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती.गेली काही वर्ष सतत अल्कोहोलीक असल्यामुळे ती खंगली होती.तिची जगण्यावरची वासनाच उडाली होती.बाळ आता तिन वर्षांचा झाला होता,तिचं बाळावर प्रेम होतं,काळजी होती पण ती आता मनाने खचली होती.हल्ली शरदची सुद्धा आठवण यायची.आज तिची डॉक्टरांसोबत भेट ठरली होती ती वेळेवर पोचली पण डॉक्टर एका शास्त्रक्रिये मधे व्यस्त असल्यामुळे थोडा अवधि होता,तिने नजीकच्या मॉल मध्ये जाऊन बाळासाठी खरेदी करायचं ठरवलं.

दौऱ्या निमित्त आज शरद पुण्याला चालला होता,पुणे सोडल्यावर तो प्रथमच जात होता.नकळतच आभाची आठवण आली,पूर्ण प्रवासात तिचेच विचार मनात घोळत होते.कुठे असेल..?? कशी असेल..??पुणे आता झपाट्याने फोफावत होतं,कंपनीत आल्यावर त्याला कळलं की थोडा वेळ त्याला थांबायला लागेल,वेळ काढावा म्हणून तो बाहेर आला,समोर मॉल दिसला व आत शिरला.

आभाने बाळासाठी खरेदी केली व दुकानातून बाहेर आली,समोरून शरद येत होता.दोघांची नजरानजर झाली.आज इतक्या वर्षांनी एकमेकांना बघताच दोघंही स्तब्ध झाले.तिच्या अश्रूंचा बांध फुटला.शरदने तिची अवस्था ओळखली,पुढे होऊन त्याने लगेच तिला धरून बसवले.आभाकडे बघून त्याला गलबलून आले.देखणी आभा हिची अशी काय अवस्था.?? बराच वेळ शांतता होती.काय बोलावं दोघांना कळत नव्हत.काही वेळात ती नॉर्मल झाली मग शरदने पुढाकार घेऊन तीची विचारपूस केली.आभाने आपलं मन मोकळं केलं.कॉफी घेऊन दोघं डॉक्टर कडे गेली मग त्याने तीला घरी सोडलं.श्रीधर राव घरीच होते,शरदला बघून त्यांना लाज वाटली.आभाला खूप थकल्या सारखं वाटत होतं,तिची इच्छा नसतानाही त्याने तिला आता नेऊन निजावलं.परत भेटण्याचं आश्वासन दिलं.बाहेर श्रीधर राव येरझाऱ्या मारत होते,जाताना त्यांनीं फक्त शरदला परत येण्याची विनंती केली.

मुंबई ला परतल्यावर शरद काही दिवस अंतर्मुख होता,निमाला जाणवलं पण तिने त्याला काही विचारले नाही,त्याने कधी काही लपवून ठेवले नव्हते.आभा बद्दलही लग्ना आधी त्याने सांगितले होते.नंतर शरद बऱ्याचदा आभाला भेटायला आला.आभाने आता वैद्यकीय उपचार थांबवले होते,तिला आता कशाचाच मोह उरला नव्हता.तिचा जीव फक्त बाळात अडकला होता.शरदने पण खूप विनवण्या केल्या पण ती हसून टाळून द्यायची.एकदा शरदने निमाला सगळं सांगितलं.तिने पण भेटायची इच्छा दर्शवली.दोघींची भेट झाल्यावर दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या.निमा गेली की बाळ तिच्या जवळ रमायचा.दोघांना एकमेकांचा लळा लागला होता.शरद व निमा दोघांनी तिला आयुष्यात परत आणण्याचे खूप प्रयत्न केले पण विष्फळ झाले.

आभा आता अंथरुणाला खिळली होती,तिच्या शरीरात आता कसलेच बळ उरले नव्हते.शेवटचे काही दिवस निमा सतत तिच्या सोबत होती.शरदचे जाणे येणे सुरु होते.बाळाचं सर्व निमा बघत होती,त्या दोघांमध्ये एक सुंदर नातं निर्माण झालं होतं.आभा मूकपणे सारं बघत होती.तिची  जीवाची हुरहूर मिटली होती,काळजी संपली होती.तिला प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.श्रीधर रावांना तिने तिची शेवटची इच्छा सांगितली.त्यांनी पण होकार दिला.त्याच रात्री तिने समाधानानी मरण पत्करलं.तिचे सर्व विधी झाल्यावर श्रीधर रावांनी शरद व निमाला बोलावून घेतलं.

श्रीधर राव,साळवी वकील,शरद,निमा,दिवाणखान्यात बसले होते.भिंतीवर आभ्याच्या तसबिरीवर हार घातला होता.श्रीधर रावांनी त्यांना आभाची शेवटची इच्छा सांगितली.बाळाचे संगोपन शरद व निमाने करावे.बाळाला कायदेशीर रित्या दोघांना दत्तक द्यावे.बाळाला एकवीस पूर्ण होई पर्यंत यामधील काहीच कळू देऊ नये.बाळाला दत्तक घेतल्यावर शरद व निमानी त्याचे नामकरण केले,बाळाचा "सार्थक" झाला.सार्थक वर त्यांनी जीवापाड प्रेम केले,त्याला कुठेच काहीच उणीव भासू दिली नाही.ते आता खऱ्या अर्थाने आई बाबा झाले.ठरल्याप्रमाणे दर वर्षी त्यांनी सार्थकचा वाढदिवस श्रीधर रावांसोबत साजरा केला.सार्थकला काही कळू दिलं नाही,त्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल,तो कसा व्यक्त होईल या विचारांनी ते अस्वथ व्हायचे,पण नंतर सर्व काही वेळेवर सोडून सार्थक वर लक्ष केंद्रित करायचे.सार्थक च्या वाढदिवसाच्या काही दिवस अगोदर शरदनी श्रीधर रावांशी बोलणे केले होते,श्रीधर रावांनी साळवी वकिलांना बोलावून घेऊन आपली संपत्ती मृत्यू पश्चात सार्थकच्या नावावर केली होती.आता केवळ प्रतीक्षा होती ती सार्थकच्या वाढदिवसाची !! आज सगळं अपेक्षित घडलं होतं.

साळवी वकिलांनी बोलणं संपवलं होतं,ते आता खुर्चीवर रेटून बसले होते.वातावरणात स्तब्धता होती.सार्थक बराच वेळ शांत बसून होता किंबहुना सर्वांनी त्याला मुळीच छेडलेलं नव्हतं,नंतर तो उठून ठाम निश्चयाने पाऊले टाकत शरद व निमा कडे गेला व त्याने दोघांना आपल्या बाहुत कवटाळून घेतले.त्यांचा हा अनुपम मिलाफाचा क्षण अलौकिक होता,प्रत्येकाच्या गालावर आनंदतिरकाने आसवं घरंगळत होती.रक्तापेक्षा हृदययाचं नातं किती घट्ट असतं ते सिद्ध झालं होतं. 

 *_सार्थकला त्याच्या वाढदिवसाचं व वॅलेंटाईन्स डे चं अमूल्य गिफ्ट मिळालं होतं._*

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now