वळण

वळण...! आयुष्याची नाव संकटाच्या वादळातून पैलतीरी नेणाऱ्या नाविकासोबतची एका धाडसी युवतीची प्रेरक लघुकथा.

लघुकथा शीर्षक : वळण


विषय : काळ आला होता पण....

फेरी राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

............................................

          "आयुष्य नावाच्या पुस्तकातली पलटून गेलेली काही पानं कधीच उघडू नयेत असचं वाटत असतं. नुसत्या आठवणींनी चर्र होतं. त्या प्रसंगी नेमकं काय आडवं आलं आणि येऊ घातलेल्या मोठ्या संकटातून आपण तरलो याचं आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही."


          रोहिणी आज मनाचं ते बंद कवाड अगदी मनमोकळेपणाने खोलत होती. रोहिणी नावाप्रमाणे रूपवान जणू काही नक्षत्रच! घरची परिस्थिती बेताचीच पण रोहिणीची सारी स्वप्नं मात्र फार मोठी. लहापणापासूनच अभिनयाची विलक्षण आवड त्यात धाडसी वृत्ती त्यामुळे शालेय जीवनात अनेक भूमिका रोहिणी धिटाईने साकारायची. पुढे अभिनयाचं हे वेड वाढतच गेलं.


     "रोहिणी मॅडम आपली स्वप्नं पूर्ण करताना बरेचदा अनेक वाटा आपल्याला विचलित करत असतात. अशा वेळी नेमकी कुठली वाट निवडावी?" एका मुलीने आपला प्रश्न मांडला.


     "आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना आपलं आयुष्य नेमकं कुठल्या वळणाला जातंय हे ज्याला कळत तो कधीच वाट चुकत नाही... अर्थात अशांच्या स्वप्नपूर्तीला काहीसा अधिकचा वेळ लागतो... पण गत काळातील चुकांवर पश्चाताप करण्याची वेळ अशा ध्येयवेड्या व्यक्तींवर येत नाही जे डोळसपणे आपली वाट निवडतात. सोपी वाटणारी वाट नेहमी योग्य ठरतेच असेही नाही. अशा सोप्या वाटा भुल पाडणाऱ्या देखील असू शकतात."

          रोहिणी आपल्या एन.जी.ओ.च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलींशी उद्बोधनपर आणि प्रेरक संवाद साधत होती. महाविद्यालयात मानसशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळतानाच आपण या समाजाचे देणे लागतो या भावनेतून भरकटलेल्या तरुण पिढीला समाज प्रवाहात आणण्याच कार्य करणाऱ्या एन.जी.ओ.ची रोहिणी सर्वेसर्वा!

     "मॅडम! आपल्याला मदतीसाठी पुढे सरसावलेला हात दरवेळी योग्य व्यक्तीचाच असतो असं नाही... मग नेमकी कशी ओळखायची बरी वाईट माणसं?" एका चुणचुणीत मुलीने हा प्रश्न मांडला आणि रोहिणी काळाच्या तब्बल दोन दशकं मागे लोटली गेली.

     "मॉडेल... सुपर मॉडेल व्हायचयं मला! मग बघ, अख्या जगभरात माझे चाहते असतील.... पैसाच पैसा असेल मग आपल्याकडे!" महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आलेली रोहिणी नुकतीच मैत्री झालेल्या मोहनला आपल्या स्वप्नांबद्दल सांगत होती. मनातलं मांडतांना तिच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती. फार मोठा आत्मविश्वास होता आणि जिद्द देखील होतीच!


     "अगं... पण तुझ्या आई-बाबांचा काय विचार आहे? त्यांना आवडेल ना तू मॉडेलिंग केलेलं?" रोहिणी एका खेड्यातून आलेली असल्याने मोहनचा हा प्रश्न रोहिणीला स्वाभाविक वाटला.

     "आवडायचं काय त्यात...! सुरवातीला नाही जरी आवडलं तरी पुढे नाव झालं माझं आणि मी मोठ्ठी सुपरस्टार झाले की सगळं ठीक होईलच." रोहिणी अगदी आत्मविश्वासाने उत्तरली.

          कालांतराने मोहन आणि रोहिणी यांच्यातली मैत्री अधिकच घट्ट होत गेली. एका अनोळखी शहरात रुळताना मोहन तिची आवश्यक ती सर्व मदत तत्परतेने आणि प्रामाणिकपणे करू लागला.

     "हे काय मोहन तुझा फोटो या मॉडेल सोबत? कधी आणि कुठे.. कसा काय काढलास? आणि कशी ओळख तुझी?" रोहिणीने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

     "हो, अगं सांगतो सांगतो...! केवढी तुझी उत्सुकता. माझा मित्र नाही का सॅम त्याचा मोठा भाऊ जॅकी फार मोठा फॅशन डिझायनर आहे. मोठा फॅशन शो आयोजित केला आहे त्याने... त्यासाठीच ही मॉडेल आलेली." मोहन हे सांगतो न सांगतो तोच रोहिणीने त्याला मधेच टोकले.

     "तुला ठाऊक आहे की मला देखील एक मोठी मॉडेल व्हायचय... याच क्षेत्रात नाव आणि कीर्ती मिळवायची आहे तरी देखील तू हे कधी बोलला नाहीस की फॅशन डिझायनर जॅकीला तू एवढं जवळून ओळखतोस." रोहिणीचा सूर नाराजीचा होता.

     "रोहिणी... एवढी नाराज का होतेस! इथून पुढे तू अशाच शोज मधून झळकणार आहेस... आणि मी तिथे गेलेलो ते तुझ्याचसाठी!" मोहन फार आपुलकीने समजूत काढत होता.

          रोहिणी एकीकडे महाविद्यालयीन समारंभांमधून झळकत होती तर दुसरीकडे मॉडेलिंगच्या ध्यासापायी वेडावल्यागत वागत होती. मोहन तर जणूकाही तिच्या स्वप्नपूर्तीसाठीचा देवदूतच तिला वाटू लागला! एवढा विश्वास मोहनने कमावला होता.

     "रोहिणी ऐक ना... तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे!" मोहन बोलला.

     "काय रे मोहन.... सांग ना! मी खूप एक्सायटेड आहे." रोहिणीची उत्कंठा फार वाढलेली होती.


     "अगं! तुझं फोटोशूट करायचं आहे. एक बडी मोठी नावाजलेली कंपनी आहे... जिची तू ब्रँड ॲम्बेसेडर होऊ शकतेस. तुझे गॅदरींग मधले काही फोटोज् दाखविले मी कंपनीच्या अॅड एजन्सीला... त्यांना तुझे मॉडेल कॉस्च्युम मधले फोटो हवेत." मोहनचे रोहिणीच्या स्वप्नपूर्तीसाठीचे प्रयत्न खरोखरीच वाखाणण्याजोगे होते.

     "अरे पण त्यासाठी कुठे हवे तसे कपडे आहेत माझ्याकडे?" रोहिणी वैतागलेल्या स्वरात बोलली.

     "तू चिंता का करतेस... तुझ्या फोटो शूटची सर्व जबाबदारी माझी!" मोहनने तिला आश्वासन दिले.

     "रोहिणी एक सांगू?" शिल्पा रोहिणीची एक जवळची मैत्रीण तिला सल्ला देऊ पहात होती.

     "विचारतेस काय शिल्पा... बिनधास्त बोल! आज तसंही मी खूप आनंदी आहे." रोहिणी फोटोशूट मुळे आनंदात होती त्यात शिल्पा जवळची मैत्रीण.

     "याआधी देखील सांगून पाहिलं तुला पण आज जरा स्पष्टच बोलते मोहन पासून सांभाळून रहा... त्याचा आधीच्या बॅचच्या काही मुलींना देखील बरा अनुभव नाही... जप स्वतःला." शिल्पाच्या स्वरात मैत्रिणीसाठी काळजी होती.

     "काहीही काय बोलतेस गं शिल्पा... मला तर एकदाही वाईट अनुभव आलेला नाही मोहनचा. तो खूप मदतशील स्वभावाचा आहे... याचाच मुली चुकीचा अर्थ काढत असतील." रोहिणी फार विश्वासाने बोलत होती.

          ठरल्याप्रमाणे रोहिणीचं फोटो शूट झालं. फॅन्सी कपड्यातल्या मेकअपच्या फोटोत ती अधिकच आकर्षक वाटू लागली. फोटोशूट नंतरच्या निवडीच्या पुढील प्रक्रियेची सर्व माहिती मोहनने रोहिणीला दिली. पुढच्या फेरीत तिला अधिकच बोल्ड ड्रेसमध्ये प्रस्तुत करायचे होते. मनाला खटकणारे असले तरीही या क्षेत्रात थोडं धाडसी व्हावंच लागतं या भावनेने आणि मित्रावरच्या विश्वासाने पुढचं पाऊल टाकण्यास रोहिणी धजावत होती.

     "झालं रोहिणी... आता उद्या शेवटचा राऊंड आणि तुझी निवड पक्की. तुला शूटिंगसाठी कदाचित देश विदेशात जाण्याची तयारी ठेवावी लागेल." मोहन रोहिणीला सर्व सूचना देत होता.

     "म्हणजे तू तर असशील ना सोबत... शूटिंगला? भीती वाटते रे एकटीला. देश विदेशात म्हणजे नेमकं कुठे? आणि नेमक्या कुठल्या ब्रँडसाठी निवड होते आहे माझी?" रोहिणी जरा दांदरल्या आवाजात विचारत होती.

     "अगं रोहिणी... तुला तुझ्या ध्येयापर्यंत आणून पोहचवलं ते काय एकटं सोडून द्यायला! हो पण प्रत्येक शूटला तुझ्या या मित्राला कसं काय शक्य होईल सोबत यायला?" मोहन तिची समजूत घालत होता.

     "नेमकी कुठली अॅड एजन्सी आणि कोणता ब्रँड रे मोहन?" रोहिणी कुतूहलाने त्याच प्रश्नाचा पाठपुरावा करत होती.

     "अगं तेच तर सरप्राइज आहे ना! गुलदस्त्यात बंद आहेत ब्रँडची नावं. उद्या अजून काही मुली असतील तिथे... प्रत्येकीला पात्रतेप्रमाणे मिळतील ब्रँड." मोहन बोलत होता.


          दुसऱ्या दिवशी पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व मॉडेल्स जमल्या. त्यातल्या काही भलत्याच अनुभवी आणि बोल्ड होत्या. त्यांना देण्यात आलेल्या पेयांमुळे त्या सर्वजणी काहीशा मादक वाटू लागल्या. पण क्षणार्धात असं काही घडलं की त्या मुलींची नशा उतरली तेव्हा त्या हॉस्पिटलमधे होत्या. आजूबाजूला पोलीस जमलेले होते. एकेका मुलीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेणे सुरू होते. इन्स्पेक्टर प्रसाद राणेंच्या उपस्थितीत कसून चौकशी सुरू होती. रोहिणीसाठी हे सर्व काही धक्कादायक होतं. इतर मुलींच्या विधानांशी तिचं विधान फारसं मेळ खात नव्हतं कारण तिची ध्येयाकडे वाटचाल फार प्रामाणिक होती. काही मुलींना पूर्वीच बऱ्याच गोष्टींची कल्पना असल्याचं चौकशी दरम्यान निदर्शनास येत होतं.

     "रोहिणी मॅडम तुमचा कुणी मित्र मैत्रीण नातेवाईक आलं नाही तुम्हाला सोडवायला... त्यामुळे!" प्रसाद राणे आपलं वाक्य पूर्ण करण्या आधीच रोहिणी ओरडली, "त्यामुळे मला असं स्वतःच्या घरी आणलत... समजता काय हो स्वतःला इन्स्पेक्टर साहेब? थांबा मी मोहनलाच बोलावते."

     "मोहन...! डोळ्यावरची पट्टी काढा रोहिणीजी! फार मोठ्या संकटात अडकवून तुमचा दोस्त फरार झालाय. मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकणार होतात आपण. इतर मॉडेल्सनी यापूर्वी या क्षेत्रात येण्यासाठी बऱ्याच आक्षेपार्ह बाबी केल्यात. पण तुम्ही यातून वाचलात कारण..." प्रसाद राणे रोहिणीला घडलेल्या बाबी सांगत होते.

     "कारण... काय कारण... बोला ना?" रोहिणी रागातच होती

     "कारण तुमची प्रामाणिकता... भीती बाळगू नका. उद्याच तुम्हाला तुमच्या गावी सोडण्याची जबाबदारी माझी. आणि कुठल्याही पोलीस चौकशीत तुम्ही अडकणार नाहीत याची देखील खबरदारी घेईल मी. आता जेवून आराम करा." इन्स्पेक्टर राणेंचे बोलणे ऐकून रोहिणीला दिलासा लाभला. अर्थात मोहनने दिलेल्या धक्क्यातून सावरणे हवे तेवढे सोपे नव्हतेच.

          इन्स्पेक्टर प्रसाद राणे रोहिणीला घेऊन तिच्या गावी गेले. काळ कितीही पुढे गेलेला असला तरीही गावाकडलं वातावरण फारसं पुढारलेलं नव्हतं. चांगली बातमी पसरायला वेळ लागतो मात्र बदनामीकारक बाबी वाऱ्याच्या वेगाने पसरत असतात. रोहिणी पोहचण्या आधीच तिच्याबद्दलच्या नको त्या अफवा तिच्या घरी पोहचल्या होत्या.

     "तोंड काळं करून आली पोर अन तुम्ही म्हणताय पोरीचा दोष नाही... सांगा इन्स्पेक्टर साहेब कोण करल या पोरीशी लग्न? आणली तिथेच नेऊन सोडा... मेली पोर आमच्यासाठी." वडिलांच्या या शब्दाने आधीच हळवी झालेली रोहिणी आतून अधिकच तुटली होती.

     "मी करेल लग्न तुमच्या मुलीशी... तिच्या प्रामाणिकपणावर मला पूर्ण भरवसा आहे. आता तर मुलीला जवळ घ्या.. प्रेमाने मायेचा हात फिरवा." प्रसाद घरच्यांची समजूत काढत होते मात्र आईची फार इच्छा असूनही तिचं वडिलांपुढे काही चालणार नव्हतं.

     "मुलीचं लग्न ही माझी जबाबदारी... ती पार पाडून त्यातून मी आजच मुक्त होतो... मात्र यानंतर या मुलीचं तोंड देखील मी पहाणार नाही." रोहिणीच्या बाबांचा राग रास्त होता कारण स्वतः काबाड कष्ट करून मुलीला चांगल शिक्षण मिळावं म्हणून शहरात ठेवलेलं आणि तिने मात्र त्यांना आपल्या वाटचाली बद्दल निर्णय घेण्यापूर्वी साधं विचारलेलं देखील नव्हतं.

          दोन दशकांच्या फ्लॅशबॅक मधून रोहिणी बाहेर आली आणि अनुभवाच्या बोलातून मुलींच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागली. अल्लड... बिनधास्त... ध्येयवेडी रोहिणी आज डॉ. रोहिणी प्रसाद राणे... अर्थात, एक प्रसिद्ध समाजसेविका, यशस्वी प्राध्यापिका आणि माणूस म्हणून देखील श्रेष्ठ ठरली होती. ती एखाद्या सुपर मॉडेल एवढीच नावाजलेली होती. इतर काही एन.जी.ओ. च्या कलाकुसरीच्या उत्पादनांची ती ब्रँड ॲम्बेसेडर देखील होती. एवढी वळणं येऊन देखील रोहिणीला हे सर्व काही लाभल कारण आयुष्याच्या त्या एका वळणावर काळ आला होता पण... खरचं वेळ सावरून नेणारी ठरली होती म्हणूनच!

©तृप्ती काळे

नागपूर टीम