Jan 27, 2021
माहितीपूर्ण

वळण

Read Later
वळण

वळण:-

निशांत एक अति श्रीमंत घरातील मुलगा. मध्यम उंचीचा, गौर वर्ण, बोलके डोळे आणि बोलघेवडा स्वभाव. घरात कायम सुखवस्तू पाहिल्याने कशाची किंमत अशी राहिली नव्हती. पैसे हवे तसे मिळत होते त्यामुळे टोळकं जमवून उडाणटप्पू पण करायचा असे आयुष्य. फिरायला जाणे, मुली फिरवणे, डिस्को ला जाणे,  खाणे पिणे बस्स. शिक्षण म्हणाल तर घरचेच कॉलेज मग काय कोण विचारणार. जा नाहीतर नका जाऊ पास मात्र दरवर्षी होणार!
अतिशय चाणाक्ष बुद्धीचा हा मुलगा आई वडिलांच्या अति लाडाने वाया जातोय असे कायम त्याच्या आजीला वाटत असे. आजीने आपले आयुष्य कष्टाने,स्वाभिमानाने जगले होते त्यामुळे तिला हे  अजिबात पटत नव्हते पण काही करू शकत नव्हती आणि घरातल्यांना म्हणाला तर पैशाचा माज आल्याने तिला कोणी फारसं मनावर घेत नव्हतं. तिला कायम वाटे की निशांत मनाचा वाईट नाही, त्याची संगत जर चांगली झाली तर तो खूप काही करू शकेल.
निशांत ला आजीचं फार वेडं होते कारण त्याच्याकडे लक्ष द्यायला आईला वेळ नव्हता आणि बाबा राजकारणात अडकलेले. थोडं मोठं होईस्तोवर तो आजीचं  पूर्णपणे  ऐकत असे पण जसा मित्रमंडळी चा वेळ वाढला तसे आयुष्य बदलत गेले. मग त्याला वाटे की आजी जुन्या विचारांची तिला काय आणि कशी लाईफ जगायची कुठे कळते? आणि मित्र मंडळीला हा पैसे खर्च करतो म्हंटल्यावर काय फरक पडणार. त्याची वरवर करायची, त्याला  चढवायचे आणि आपल्या मनासारखे करायचे हे त्याच्या मित्रांचे मुख्य काम. कधीतरी त्याच्या हे लक्षात येई पण दुर्लक्ष करून तो पुन्हा तेच करायचा जसे त्याचे मित्र म्हणतील.
" आज खूप छान दिवस आहे निशु, तुझा वाढदिवस आहे! आज माझ्याकडून तुला एक गिफ्ट आहे बघ तुला आवडते का?" आजीने तिच्या पिशवीमधून एक फाईल काढली आणि त्याच्या हातात दिली. ते वाचून आणि पाहून निशांत ला आनंद पण झाला आणि आश्चर्य सुध्दा करण ते पेपर साधे नव्हते तर आजीच्या नावावरील गावाकडील  100 एकर शेतजमीन आणि गावातील त्यांचा मोठा वाडा याचे होते.
आजी त्याचे हावभाव टिपत होती. शेवटचा पेपर बघताच मात्र त्याची नजर स्थिर झाली आणि तो आजीकडे बघू लागला.
त्यात आजीची एक अट होती. हे सगळे त्याला तेव्हा मिळणार होते जेव्हा एक वर्ष तो आजीबरोबर त्यांच्या गावी  जाऊन राहणार होता आणि त्यात त्याच्या कुठल्याही मित्र मैत्रिणीला येता येणार नव्हता.
काय करू आणि काय नाही असे त्याचे विचार होते आजीला नमस्कार करून म्हणाला "हे बघ आज्जे, माझा बाबा मला पैसे देत आहे, मग कशाची कमी? तू ठेव तुझे तुझ्याजवळ मला नको."
" फक्त 1 वर्षाचा प्रश्न आहे निशु, मग तू पुन्हा तुझे मित्र मंडळी, ट्रीप करायला मोकळा. 1 वर्ष फक्त माझ्यासोबत रहा त्यानंतर एक दिवस पण मी तुला थांबवणार नाही".
फारसा रस न दाखवता तो मित्र आले म्हणून त्याची स्कॉर्पिओ घेऊन बाहेर निघाला. तो कसल्यातरी विचारात आहे हे पाहून त्याचा मित्र प्रशांत म्हणाला " निशांत काय विचार करतोय? अबे लेका, तुझा वाढदिवस आहे आज, ऐश कर मज्जा कर, पार्टी दे ".
"हम्म" इतकेच तो म्हणाला आणि आपल्याच नादात गेला. सगळे डिस्को ला गेले, धिंगाणा खाणे पिणे दोन्ही सुरू पण आज त्याचा नूर प्रशांत ला काही ठीक वाटत नव्हता.
" निशांत बोल ना काय झाले!"
निशांत ने आजीचं गिफ्ट आणि अट या दोन्हीबद्दल सांगितलं. सगळं नीट ऐकून लालची प्रशांत म्हणाला" अरे तू वेडा आहेस का रे? अरे 100 एकर जमीन लेका, 'तेरी तो निकल पडी! वाडा पण, अरे नशीबवान आहेस, तुझ्या बाबाला न देता तुला देतेय आजी. आणि एक वर्ष असाच जाईल रे,आम्ही पण येऊ तुझ्या सोबत."
" अरे नाही, कोणीही मित्र-मैत्रीण नाही हे तिने आधीच सांगितलंय. फक्त मी, ती आणि आमची गावकडले लोक, आई पण नाही."
जरा विचार करून प्रशांत म्हणाला" अरे जा, तीच तुला वैतागून पाठवून देईल बघ" आणि फिदीफिदी हसायला लागला.
कुठेतरी स्वार्थ दिसताच त्याला दुजोरा मिळाला. रात्री खूप उशीरा घरी गेला त्यामुळे उद्या आजीशी बोलावं या विचारात झोपला.
कधी नव्हे ते निशांत लवकर उठला, आवरले आणि आजीच्या खोलीत गेला.
"आजी मी तयार आहे तुझ्या सोबत गावी यायला.उद्याच निघुयात का आपण?"
देव पावला म्हणत मनोमन आजीने कुलदैवताला नमस्कार केला, तसे दाखवले मात्र नाही "बरं निशु बाळा उद्या सकाळीच निघू, तुझ्या बाबाला काय सांगशील?"
"तू कशाला काळजी करतेय, नाहीतरी मी कुठे आहे काय करतो कोणाला पर्वा आहे का? ती आई तिच्या पार्ट्यात गर्क आणि बाबा राजकारणात." त्याचा चेहरा नकळत खजील झाला होता. आजीने ते टिपले पण काही बोलली नाही.
त्याने मी उद्या आजीला घेऊन गावी जातोय इतकेच घरी सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आजी आणि नातू आपले गावाकडे निघाले.
निशांत कधीही 10 च्या आत उठत नसे पण आज तो सूर्योदयापूर्वीच उठला होता आणि आवरून निघाला होता. मनात होते ते वेगळेच, "आजीला उल्लू बनवायचं, इतका वैताग द्यायचा की तिनेच म्हणावे जा बाबा तू तुझ्या शहरात".
इकडे आजीच्या मनात अगदी विरुद्ध, " हा आता माझ्या तावडीत सापडला आहे,  देवा कृपा कर आणि माझे मनोरथ पूर्ण कर! 101 नारळाचे तोरण वाहीन तुला. माझं पोरं, मार्गी लागू दे."
आज त्याच्याही नकळत सकाळचा तो गारवा त्याला सुखावत होता, तो कोवळा प्रकाश तो पक्षांची किलबिलाट, स्वच्छ शुद्ध, ताजी हवा त्याला स्फुर्ती देत होती. आजूबाजूची हिरवळ, मोठाली झाडे उलट दिशेने जणू पळत होती. तो गाणं गुणगुणत गाडी चालवत होता. त्याचे हे बदलते भाव बाजूला बसलेली आजी अगदी बारकाईने निरखत होती आणि मनोमन सुखावत होती. मधेच थांबून थोडे खाणे झाले, चहा झाला थोडे आजूबाजूला फिरणे झाले आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. ते सिमेंटचा जंगल कधीच मागे पडला होते, त्याचा मागमूसही जाणवत नव्हता. दिसत होतं ते स्वच्छ निर्मळ जग, निसर्ग आणि खळखळणारे पाणी, नद्या.
5 तासाचा प्रवास करून जेव्हा ते गावाच्या वेशीजवळ आले तेव्हा आजीने त्याला गाडी थांबवायला सांगितली आणि गावाबाहेरील मंदिरात त्याला दर्शनाला नेले. आजीचे संस्कार काही प्रमाणात असल्याने तोही काहीही न बोलता मंदिरात गेला, दर्शन घेतले आणि ओट्यावर बसला " आजी कसे छान वाटतंय ना! इतकं फ्रेश तर मला जिम मध्ये व्यायाम करून पण वाटत नाही, का ग असे?"
"निशु, बेटा अजून तू आपला वाडा, शेत तरी कुठे बघितले? चल आपली वाट बघत असतील तिथली लोक, आपण येतोय हे त्यांना कळवलं आहे."
तसे दोघे वाड्याकडे निघाले. वाडा कसला निशांतला तो पिक्चर मधला महाल भासला दुरून. " आजी मी इथे कधीच नाही का ग आलो?"
"लहानपणी आलास रे राजा, पुढे तुझा बाप येईनासा झाला आणि मलाच उचलून तिथे आणले."
गाडी वाड्याच्या प्रवेशदारात येऊन थांबली, तशी गडी माणसे,बायका पोर लगबगीने पुढे आली आणि आजीच्या पाया पडली. आजीचे ओलावलेले डोळे खूप काही बोलत होते, शब्द स्तब्ध झाले होते पण शांतता खूप बोलत होती.
गड्याने गाडीतील समान उचलले,वाड्याच्या बाहेर मोरीत त्याला हात-पाय धुवायला गरम पाणी होते. एकाने सांगितले" धाकले धनी इकडे या, पाणी ठेवलया तुमचं."
तो गेल्याबरोबर त्याने पायावर पाणी टाकलं, हातावर दिलं आणि लगेच एक पंचा हात पुसायला दिला. निशांत च्या घरात पण नोकरचाकर खूप होते पण त्यांच्या आणि या लोकांच्या नजरेत त्याला खूप फरक जाणवला. ह्या लोकांच्या हालचालीत,बोलण्यात, वागण्यात त्याला खूप प्रेमळ भाव जाणवत होता.
त्याच्या खोलीत त्याला नेलं, आधुनिक सुखसोयी होत्या पण त्याला त्याचे काही अप्रूप वाटले नाही. कपडे बदलून तो खाली आला तर आजी च्या आजूबाजूला खूप बायका जमल्या होत्या, निशांत ला बघताच दोघी चौघी उठून आल्या त्याची दृष्ट काढली. तर कोणी त्यांचा गाल धरून कौतुकाने पापी घेतल्यासारखे केलं. हे सगळं त्याला नवीन होत पण  ते खूप आवडला त्याला, अस प्रेम त्याला त्याच्या आईकडून पण मिळालं नव्हत.
" चला धनी, स्वंयपाक तयार आहे, ताट केलीत." तसे ते स्वयंपाकघरात गेले,  तर ते पाहून निशांत चे डोळे फिरले. त्याला एक मोठे  गोडाऊन वाटले ते. म्हणजे खूप सगळ्या कोठ्या रचलेली भांडी बाजूला पाण्याचे माठ, कांद्याची वर अडकवलेली मेटल चे गोलाकार भांडे. हे सगळं  निशांत हरखून बघत होता तोच खाली चटई टाकली होती त्यावर आजीने बसायला सांगितले बाजूला चुलीवर एक बाई भाकऱ्या करत होती, समोर ताटात गरम गरम वाफ येत असलेला मटणाचा तिखट रस्सा,  बाजूला फोडलेले कांदे, लिंबू,टमाटे आणि ताटात पडणारी गरम भाकरी. मग काय किती जेवतोय आणि काय खातोय याच भान कोणाला? तुडुंब जेवण झाले आता एक घास पण जाणार नाही असे जेव्हा वाटले तेव्हाच तो थांबला. हे  सगळं कौतुकाने दोन थकलेले डॉ बघत पण होते आणि साठवत पण होते.
" आज मी किती जेवलो मलाच कळत  नाहीय, खूप मस्त बनवले होते. पोट बिघडले नाही म्हणजे मिळवले"असे  म्हणत आजीला डोळा मारून तो उठला.तसे खाली बसायची सवय नसल्याने तो आखडल्यासारखं झाला पण त्याची पर्वा त्याला नव्हती.
"जा बाळा, थोडा आराम कर आणि दुपारनंतर जरा गावात चक्कर मारून ये ! ह्या रामुचा मुलगा तुझ्याच वयाचा आहे तो नेईल तुला."
तसाही जेवण अंगात आल होत, आज्ञाधारक मुलासारखा लगेच खोलीत गेला आणि ताणून दिली.
तशी आजीने सगळ्यांची मीटिंग बोलावली, आपला उद्देश सांगितला आणि प्रत्येकाला त्यांचे काम नीट समजावून सांगितले आणि तंबी दिली की यात कसूर चालणार नाही.
दोन तासानंतर आपोआप निशांत ला जग आली आणि तो खाली आला तर जेमतेम 4.30 वाजले होते. " झाली का ओ मालक झोप?" रामुने विचारले.
" हो मस्त! आजचा दिवस खूप वेगळा भासतोय."
रामू एका मुलाला घेवून आला" मालक हे माय पोरग मारुती! हे घेऊन जाईन तुमास्नी गावाकडं."
मारुती तसा चुणचुणीत वाटला निशांत ला, तोवर रामुची बायको चहा घेऊन आली. चहा पिऊन तो जबर फ्रेश झाला आणि कपडे बदलून गावात फेरी मारायला निघाला.
गावातील लोक तो जरी नव्याने बघत असला तरी त्याला सगळेच ओळखत होते,गावच्या पाटलाचा नातू म्हणून नमस्कार करत होते. ते सगळं त्याला अप्रूप वाटत होतं. गावातील साधी लोक, त्यांचे वागणे, प्रेमाने बघणे त्याला भावात होते. अंधार पडेपर्यंत ते गावात फिरले, नदीकिनारी बसले, गप्पा झाल्या त्याला मारुती आवडला होता.
" मालक अंधार होतुया, घराकडं जायचं का?" खरंतर ही खरी वेळ होती की जेव्हा निशांत बाहेर पडत असे पण आज या वेळी तो घराकडे निघाला होता.
घरी आल्यावर,"काय रे निशु बरा आहेस न? नाही या वेळी तू घरात आलास " आजी चिडवत म्हणाली तसा निशांत पण गोड हसला
"अग म्हातारे काय ग हे!  तुझ्या गावात मला वाटलं पोट बिघडेल तर पुन्हा सनकून भूक लागली बघ."
"अरे गावचं पाणी हे, काही तब्येत बिघडत नाही आणि कितीही खा अन शेतावर जा बघ, जाड पण होणार नाहीस."
आपण आजीला मूर्ख बनवायला आलो हे त्याच्या ध्यानीमनी पण राहिले नव्हते, एकाच दिवसात त्याला ते सगळं भावलं होत.
रात्री मस्त पिठलं, वांग्याचे भरीत- मोठ्या भाकरी, ठेचा आणि कांदा सोबत चुलीवर शिजलेला गुरगुत्या भात पुन्हा तुडुंब जेऊन तो झोपायला गेला. घड्याळात बघतो तर फक्त 9 वाजले , आपल्याला काय होतंय हा विचार मनात येताच त्याला झोप पण लागली.
पहाटे पक्षांच्या आवाजाने तो जागा झाला तर सूर्य पण उगवायचा होता. तसाच खाली आला तर आजी चहा पित होती सोबत रामू, त्याची बायको आणि मारुती बसले होते." काय रे निशु आज सूर्य कुठे उगवला तू आणि इतक्या सकाळी उठलास?" आजीने चिडवत विचारले.
"अगं सूर्य उगवलाच नाही ना म्हणून मी उगवलो " हसत निशांत ने उत्तर दिले तसे सगळेच हसले.
निशांत पण फ्रेश झाला आणि गरम गरम चहा प्यायला. " मारुती शेताकडे जा याला घेऊन" आजी म्हणाली.
तसे आवरून तो निघाला, शेत म्हणजे नजर पुरत नाही इतक्या मोठा उसाचा मळा, त्यातून वाहणारे पाटाचे पाणी. जबरदस्त गारवा त्याला जाणवत होता .मारुतीने आपल्यासाठी जॅकेट का आणले ते त्याला आत्ता कळले पण तो मात्र बिनधास्त महिती देत फिरत होता.
" आपले शेत इतके मोठे आहे?"
"मालक, हा तर एक भाग बघा, तिथे केळ्याची बाग, संत्र्याचा बगीचा, आंब्याची लागवड केलीय गेल्याच वर्षी बघा.
आपली 100 च्या वर जनावर आहेत, 8 जोड्या बैलाच्या आहेत ट्रॅक्टर पण आहे."
हे सगळं ऐकून निशांत आवाक झाला.
"धनी आपल्याला  किमान 3 दिवस तरी लागेल बघा सगळं बघायला आणि समजायला."
पोटात कावळे ओरडायला लागले होते त्यामुळे ते परत घरी आले. लगेच हात घुटले आणि तटावर बसले, ताटात वांग्या बटाट्याचा रस्सा, दह्याची वाटी भेंडीची भाजी आणि भाकरी. आघाष्यासारखे तो जेवत होता आणि हे पाहून आजी हसत होती.
जेवण झाल्यावर लगेच " चाल शेताकडे जाऊ" म्हणत निशांत निघाला. शेतावर असलेल्या छोट्या घरी ते गेले पाटाच्या पाण्यात  मारूती सोबत मस्ती करत संध्याकाळ केव्हा झाली ते पण त्याला कळले नाही.
पुन्हा तुडुंम्ब जेऊन, घरच्या गाईचे पेलाभर दूध पिऊन तो 9 च्या आत झोपला. दोन दिवसात त्याने मोबाईल पाहिला नाही की टीव्ही नाही. आजी मनोमन सुखावत होती.
पुन्हा दुसऱ्या दिवशी लवकर उठुन आणि आवरून तो शेताकडे निघाला.
" धनी, आज जेवण तिथंच आणू का?" रामुने विचारले तसे हो म्हणून तो घाईनेच मारुती सोबत गेला.
फिरून दमून बसले तेवढ्यात रामू जेवायचे घेऊन आला. ओल्यातुरीची भाजी,  जवस चटणी, ज्वारी- भाजरी भाकरी - कांदा मिरची ठेचा आणि कुस्करायला बटाट्याचा रस्सा.सोबत मसाले भात होताच.  मग काय जेवणाची वेगळीच लज्जत तो शेतात अनुभवत होता. उत्साहाने सगळे विचारत होता, समजून घेत होता.
आता हेच त्यांचे रुटीन झाले होते, सकाळी इथून आवरायचं शेतात जायचे.. आता तो शेतीच्या कामात पण सहभाग घेत होता. हे सगळे रिपोर्टिंग आजीला बरोबर जात होते.
आवडीने तो काम करत होता, करवून घेत होता आणि नवीन काही करता येईल का याचा अभ्यास पण करत होता.
शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन अजून प्रगती कशी करता येईल याचा विचार आणि कृती तो करायला लागला होता.
बघता बघता दिवस गेले, महिने गेले आणि 1 आठवड्यात वर्ष व्हायला आले होते.
आता आजी थोडी बेचैन झाली होती तर तो ह्या सगळ्या वृत्ती चा हिस्सा झाला होता. या काळात तो दारू प्यायला नाही, की सिगारेट ओढली नाही. जिमला न जाता त्याची तब्बेत बनली होती आणि  तो जास्त देखणा आणि आनंदी दिसायला लागला होता.
एके दिवशी सकाळी तो खाली आला तेव्हा आजीने त्याला फाईल दिली. त्याने ती उघडली आणि नीट वाचली आणि सरळ स्वयंपाकघरात जाऊन चुलीत टाकली.
" अरे हे काय केलास" म्हणून आजी ओरडली.
"आज्जे, मला काय मूर्ख समजलीस का? तू अमिश दाखवलं मी भुललो आणि वेगळा विचार करत इथे आलो. पण खरं सांगू आता मला त्या उडाणटप्पू लोकांमध्ये जावेसे नाही वाटत. इथली हवा, दुध, दुभते, भाकरी , भाजी शेतातील काम मला आनंद देत आहेत. ह्या लोकांचे प्रेम, माया मला खरी दौलत वाटते आहे. जे तुझं ते माझंच आहे मला माहित आहे, पण मला वळण लागावं, माझं आयुष्य मार्गी लागावं म्हणून तू अवलंबलेला मार्ग मला भावला.मी इथेच  राहणार आहे , तुझा काय बेत आहे?"
यावर पाणावलेल्या डोळ्यांनी आजीने देवाचे आभार मानले आणि म्हणाली "आज संध्याकाळी आपल्याला देवाला जायचे आहे . तिथे तू 101 नारळचे तोरण तुझ्या हाताने वाहा. मी फक्त डोकं टेकून त्याचे आभार मानेन."
आजी नातवाच्या या क्षणाचे साक्षीदार असलेले रामू, त्याची बायको आणि मारुती भारावून हे बघत होते आणि होत्या त्या जागेवरून हात जोडून देवाचे आभार मानत होते.
आज एका जीवनाला वेगळेच वळण प्राप्त झाले होते...समाधानाचे...स्वप्नांचे आणि सुंदर वाटचालीचे!
आणि का नाही होणार, या वळणा मागची खरी सूत्रधार 'आजी' त्या जीवनाला दिशा द्यायला स्वतः खंबीरपणे उभी होती!
या वळणावर आज तिचा नातू तिला परत मिळाला होता!
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!