वजनदार.. भाग २

कथा वजन वाढलेल्या तिची


वजनदार... भाग २


" दिप्ती, ए दिप्ती, कुठे आहेस? माझा डबा, नाश्ता कुठे आहे. शर्टला इस्त्री पण नाहिये.." समीरचा धिंगाणा सुरू होता..
" बाबा, का ओरडत आहात? आई योगाक्लासला गेली आहे.." अभ्यासाला बसलेला हर्ष सांगायला आला..
" मला का नाही सांगितले तिने?" समीरचा राग हळू हळू हर्षवर निघण्याच्या बेतात होता..
" मगाशी तुम्ही बाथरूममध्ये असतानाच आईने जाते म्हणून सांगितले, तेच मी ऐकले.. आणि मला का ओरडताय? तुम्हीच आईच्या नावाचा जप करत होता म्हणून सांगितले.."
समीरचा रागाने अगदी तिळपापड झाला होता.. पण बोलणार कोणाला.. नशीब जाताना चहा करून गेली होती.. चहाच्या इथेच एक चिठ्ठी होती. \"आज ऑफिसमध्येच काहीतरी खा.\"
समीरची ऑफिसला जायची वेळ झाली तरी दिप्तीचा पत्ता नव्हता.. तणतणतच तो ऑफिसला गेला.. आज तिथे पण एवढे काम होते कि त्याला दिप्तीला फोन करून भांडताही आले नाही.. दिप्तीच्या जेवलास का, या मॅसेजला त्याने रिप्लायही दिला नाही.. घरी जाताना त्याला खूप भूक लागली होती.. आता तरी दिप्तीने छान काहीतरी खायला केले असेल अशी त्याला आशा होती. तशीही तिच्या हाताला चव होतीच आणि रोज पॅटिस, कटलेट, वडे, डोसे असे चमचमीत करून ठेवायची.. असे काही असेल तरच तिला माफ करायचे असे तो मनोमन ठरवत होता.. घरी दिप्ती त्याची वाटच पहात होती.. ती आता टवटवीत दिसत होती , पण याच्या नाकावर राग होता..
" लवकर फ्रेश होऊन ये, गंमत आहे खायला.." दिप्तीने सांगितले. शेवटी भुकेने रागावर विजय मिळवला.
" लवकर वाढ. खूप भूक लागली आहे.. दोन मिनिटात आलोच.." समीर फ्रेश होऊन अक्षरशः दोन मिनिटात आलाच.. दिप्ती स्वयंपाकघरातून बाऊल्स घेऊन येत होती..
"हर्ष लवकर ये.. नाहीतर हे थंड होऊन जाईल.." दिप्तीने आवाज दिला..
समीरने उत्सुकतेने पाहिले तर वडे वगैरे काहिच नव्हते ,होते ते पालक सूप.. " हे काय आहे?"
" हेल्दी फूड सर.."
" पण हे काय नवीन?"
" आधी खाऊन तर घे.. नाहीतर थंड होईल.."
भूक लागली होती म्हणून गुपचूप त्याने सूप ओरपले, तोच गुपचूप पितो आहे म्हटल्यावर हर्षने कटकट न करता पिऊन टाकले.. "आई जेवायला हे असेच आहे का?"
" नाही रे बाळा.. छान काहीतरी मुगाची खिचडी , ताक असे काहीतरी करते.."
दोघांच्याही घशाशी आवंढा आला.. कुठे वडे कुठे खिचडी.. तेवढ्यात हर्षचा मित्र आला म्हणून तो खेळायला गेला..
" दिप्ती हे काय चालू आहे? आणि सकाळी कुठे न सांगता गेली होतीस?"
" त्याचे काय आहे , आपल्या घरातल्या सगळ्यात वजनदार व्यक्तीने वजन कमी करायचे ठरवले आहे.. त्या दृष्टीनेच हे सुरू आहे.. आणि सकाळचे म्हणशील तर एका क्लासमध्ये मी नाव नोंदवले होते. पण त्यांची बॅच फूल होती म्हणून त्यांनी कन्फर्म केले नव्हते. सकाळी त्यांचा मॅसेज आला, एक सीट रिकामी झाली आहे म्हणून लगेच पळाले.. त्यामुळे डबा करायला वेळ नाही मिळाला.."
" पण एवढा वेळ योगा.. ?"
" फक्त योगा नाही, झुंबा पण आहे. त्यांची डाएटिशन पण आहे.. ती महिन्याचा डाएट लिहून देणार.. तो खायचा.."
" आम्ही सुद्धा?"
" हो.. तुम्हीसुद्धा.. आता तुम्ही चमचमीत खाणार आणि मी हे असे अळणी.. तुमच्या घशाखाली घास तरी उतरेल का? म्हणून सगळ्यांसाठीच सारखे जेवण.. आणि हो सकाळच्या स्वयंपाकासाठी एक मावशी येतील उद्यापासून म्हणजे तुझ्या नाश्त्याची आणि डब्याची सोय.."
" तू नाही करणार?" समीरने निराश होत विचारले..
" काहिही.. मी योगावरून येणार कधी? माझे आवरून स्वयंपाकपाणी करणार कधी? ऑफिसला जाणार कधी? इतके दिवस हे करत बसले म्हणून तर योगा वगैरे काही करता आले नाही.. पण आता करीनच.." दिप्ती ठामपणे म्हणाली..
संध्याकाळी खिचडी खाताना ,रोज हेच खायचे का? हा विचार समीरचे डोके कुरतडत होता.. त्याला आठवत होते त्याने वजनावरून दिप्तीला मारलेले टोमणे.. त्याची मोठी व धाकटी दोघी बहिणी दोन दोन मुलांच्या जन्मानंतर सुद्धा बारिकच होत्या.. तो नेहमी त्यांचे उदाहरण देई..
" ताई आणि वर्षा बघ, कशा स्लीम आहेत. ती वर्षा तर त्यामुळे काहिही कपडे घालते.. आणि तू बघ.. वजनामुळे फक्त साडी नाहीतर पंजाबी ड्रेस.. नुसती काकूबाई झाली आहेस.."
" अरे पण प्रत्येकाची शरीरयष्टी सारखी नसते हे काय मी तुला सांगायला पाहिजे का? आणि माझ्यासारखे मिसकॅरेज त्यांचे झाले आहेत का? आणि बाळंतपणानंतर बर्‍याच बायका सुटतात हार्मोन्स बदल्यामुळे..."
" तू ना फक्त कारणे दे.. ती हर्षच्या मित्राची आई बघ कशी जीमला जाते.. आली तेव्हा कशी होती, आणि आता बघ.."
" अरे हाताखाली दहा नोकर आहेत तिच्या.. तिला काय कामाला जायचे नसते कि घरी स्वयंपाकपाणी करायचे नसते ना मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो.."
" म्हटले ना तू फक्त कारणे दे, ज्याला करायचे तो कसाही करतो.."



कथा कशी वाटली नक्की सांगा...
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all