वजनदार??

Story Of A Overweight Woman


" सांगा बरं मुलांनो, सगळ्यात जास्त वजन कोणाचे असते?" समीर आपल्या सगळ्या भाच्यांना गोळा करून खेळत होता.. खेळता खेळता त्याने विचारले..
" हत्तीचे.."
" गेंड्याचे"
" देवमाशाचे..." प्रत्येकजण आपापले उत्तर देत होता..
" आणि आपल्या घरात सगळ्यात जास्त वजन कोणाचे आहे?"
"मामीचे..." सगळ्यात लहान भाचा पटकन बोलून गेला..
सगळी लहान मुले हसायला लागली, मोठ्यांनी हसू दाबले. दिप्तीने, समीरच्या बायकोने खोटे हसण्याचा प्रयत्न केला पण तरिही तिचे डोळे पाणावलेच.. तेवढ्यात समीरच्या भाचीने त्याला झापले,
"कमॉन मामा.. परत तेच.. आता तरी मोठा हो.. यु नो बाळाला जन्म दिल्यानंतर बायकांचे वजन वाढते.. तरी तू मामीला चिडवतोस? नॉट डन.." तिचे बोलणे ऐकून सगळे गप्प बसले.. दिप्ती मनाशी विचार करत होती , या पंधरा वर्षाच्या मुलीला जे कळले ते अठरा वर्ष माझ्यासोबत संसार केलेल्या नवर्‍याला कळू नये..

दिप्ती आणि समीर एक छान सुखी जोडपे आणि त्यांचा मुलगा हर्ष.. छोटे कुटुंब, सुखी कुटुंब.. दोघांचेही ठरवून झालेले लग्न.. लग्नाआधी दिप्तीही बरीच सडपातळ होती.. स्वतःला मेंटेन करत होती.. पण नंतर दोनदा झालेल्या गर्भपातामुळे तसेच त्यानंतर बाळाचा सुखरूप जन्म व्हावा यासाठी घेतलेल्या इंजेक्शन्समुळे तिचे वजन भरपूर वाढत होते.. हर्ष आता दहा वर्षांचा झाला होता, पण तेव्हा वाढलेले वजन मात्र दिप्तीच्या अजूनही नियंत्रणात आले नव्हते.. तिचे सिझर झाले होते, त्याबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे तिचे तेव्हा व्यायामाकडे दुर्लक्ष झाले होते. त्यात भरपूर पौष्टिक खाणे , मग अजून काय?? समीर नेहमी म्हणायचा ,
" चंद्र कलेकलेने वाढतो आणि तू तर आजकाल किलोकिलोने वाढते आहेस.." आधी ती हे सगळे हसण्यावारी न्यायची.. पण आता सगळेच तिची टिंगल करायला लागले होते. तसा तिचा आहार जास्त नव्हता. पण तरिही वाढलेले वजन काही कमी होत नव्हते.. आयुर्वेदीक उपचार, या गोळ्या, तो बेल्ट, हा डाएट सगळे करून झाले.. सुरू करताना खूप उत्साह असायचा.. वजन कमी होत आहे असे वाटायचे पण केले कि कमी व्हायच्या ऐवजी ते वाढलेले असायचे.. त्यात समीरचे चिडवणेही वाढले होते.. ज्याने ती मनोमन दुखावली जात होती. पण आता मात्र हद्द झाली होती. तिने ठरवले कि आता जग इकडचे तिकडे झाले तरी वजन कमी करायचेच....



होईल का दिप्तीचे वजन कमी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा...
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all