वजाबाकी जीवनाची- आयुष्याचं गणितच चुकलं भाग 1

Ayushyach ganitach chukal

वजाबाकी जीवनाची....
आयुष्याचं गणितच चुकलं...भाग 1


जलद कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- भूतकाळात डोकावताना

©®ऋतुजा वैरागडकर

( कथा पुर्णपणे काल्पनिक आहे, वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही.)

बाकावर बसलेला तो विचारांच्या गर्तेत बुडालेला होता,
आज परत तिची तीव्रतेने आठवण येत होती. तीव्र आठवणीने त्याचं मन सुन्न झालं होतं. आयुष्याच्या या वळणावर आपण किती एकटे आहोत याची त्याला स्वत: ला जाणीव झाली होती. आयुष्य अश्या वळणावर येऊन थांबेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. भूतकाळात डोकावताना त्याला त्याच्या चुका लक्षात येत होत्या. काय गमावलं आणि काय मिळवलं याचा ताळमेळ बसत नव्हतं. जीवनाचं गणितच चुकलं हे आता उतारवयात लक्षात आलं होत. आयुष्य सगळे द्वेष करण्यात गेले. पैसे उडवण्यात गेले.  पैसे असले तर सगळे साथ देतात पण पैसे नसल्यावर कुणीही सोबत नसत आणि त्यावेळी  माणसाची खरी किंमत कळते. 

.......................

गिरीजा दिसायला चारचौघी सारखी  सामान्य दिसणारी मुलगी,  शिक्षण जेमतेम झालेले, पण परिस्थितीमुळे बरेच काही शिकलेली. माणसाच्या गर्दीत तिच्या सावळ्या रंगामुळे उठून न दिसणारी ती, रंगामुळे कधी-कधी विचित्र वाटणारी ती, पण देव एका हाताने घेतो आणी दुसर्‍या हाताने देतो अस म्हणतात तसंच गिरीजाच्या बाबतीत होत,  रंगाने जरी कमी असली तरी ती बोलण्यात चतुर आणि कामात हुशार होती. व्यवहारात अगदी चोख होती.


तिला कामाचा उरक भरपूर होता. घरकाम लवकर लवकर करायची. मुख्य म्हणजे आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायची. कधीकुठली तक्रार नसायची. अगदी टापटिप राहून घर सावरणारी होती.

ती लहान असतानाच आई तिला सोडून गेली. वडिलांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आई खूप त्रास द्यायची. तिच्याकडून दिवसभर काम करून घ्यायची, धड जेवायला अन्नही देत नव्हती. बऱ्याच हालअपेष्टा शोषून झाल्यानंतर गिरजाने तिथून पळ काढला, त्यानंतर ती एका आश्रमात राहू लागली.

आश्रमात राहून ती छोटे-मोठे काम करायची आणि स्वतःचे पैसे स्वतः कमवून, स्वतःचा खर्च भागवायची. गिरजाचा स्वभाव शांत आणि प्रेमळ असल्यामुळे सगळ्यांनी तिला आपलंसं केलं होतं, ती सगळ्यांशी प्रेमाने वागत असे.

..............................

मनोज एकुलता एक मुलगा असल्यामुळे खुप लाडाकोडात वाढलेला होता. 
अनुसयाबाईने मनोजला अति लाडावून ठेवल्यामुळे तो बिघडला होता. प्रत्येक गोष्टीची त्याला सवय झाली होती. तो आत्मकेंद्रित झाला होता. मनोजला स्वत: शिवाय काही दिसत नसे. 

त्याचं शिक्षणही कमी होत, शिक्षणात कधी त्याला रस नव्हता.  काही काम करण्याची इच्छा नसल्यामुळे आळशी झाला होता. मनोज छोटाश्या हॉटेल मध्ये नोकरी करून महिना पुढे ढकलत असे.

त्याला कधी कष्ट करणे जमलंच नव्हतं,

त्याने कधी स्वत:चा व्यवसाय टाकायचा प्रयत्न केला नव्हता की कधी पैसे वाचवून बचत केली नव्हता. तिरकस स्वभाव असल्यामुळे सतत त्याचे सगळ्या सोबत भांडण व्हायची.

घरचे काही बोलायला गेले की तो त्यांच्याशीचं भांडायचा. घरच्यांना वाटलं लग्न होईल तेव्हा तरी तो सुधारेल म्हणून त्यांनी त्यांचं लग्न करण्याचा ठरवलं आणि कुठून तरी त्यांना गिरीजा बद्दल माहिती मिळाली.

गिरीजा आश्रमात राहत असल्यामुळे त्यांना समोरचं सगळं सोपं होणार होतं म्हणून ते आश्रमात गिरजा साठी स्थळ घेऊन गेले.

क्रमशः

🎭 Series Post

View all