Oct 27, 2020
स्पर्धा

वैशाख पुनवं

Read Later
वैशाख पुनवं

©️ मधुनिता

©️ सुनिता मधुकर पाटील

वैशाख पुनवं

त्याने हळुवार हाताने तिच्या केसातून कंगवा फिरवला. गळून किती विरळ झाले आहेत हे केस. एके काळी किती मोठा आंबाडा बनायचा या केसांचा आणि त्यावर माळलेला तो अबोलीचा गजरा. एका क्षणात तिचं ते मोहक रूप त्याच्या नजरे समोर तरळून गेलं.

तिचे केस विंचरून झाल्यानंतर तो तिच्यासमोर जाऊन बसला आणि कुंकवाचा करंडा उघडून तिला आवडतो तसा मोठा ठसठशीत कुंकवाचा टीळा तिच्या कपाळावर लावला.  चेहऱ्यावर वयोमानानुसार सुरकुत्या पडू लागल्या असल्या तरी किती निरागसता आहे चेहऱ्यात. ते गहिरे तपकिरी रंगाचे डोळे अजुनही तेच तेज त्या नजरेत आहे जे पंचेचाळीस वर्षांपूर्वी होतं पण आता, आता डोळ्याखाली काजळी चिकटलेली कायमचीच. उन्हातान्हात काम करून रापलेला चेहरा उजळला होता खरा पण शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे ओठ पांढरेफटक पडलेले असले तरी हिरवंगार लुगडं तिचं रूप अजूनच खुलवत होतं.

थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर गार गार वारा घिरट्या घालतच होता. शाल पांघरवत तो तिला बाहेर अंगणात घेऊन आला आणि चपला घालणार इतक्यात त्याला आठवलं, " अरे !!! हिने काल सांगितलं होत आपल्याला... ही नवी कोरी कोल्हापुरी चप्पल चावते तिच्या पायाला." तेल लावायचं विसरूनच गेलो म्हणत त्याने कपाळाला हात लावला.

" पारू, आपण देवळातनं आलो ना की मग मस्तपैकी तुझ्या चपलांना छान तेल लावून ठेवतो हं. तवर ह्या जुन्याच घाल." म्हणत त्याने तिच्या पायात चपला सरकावल्या.

थोडं अंतर चालून गेल्यावर ओळखीच्या कोणीतरी त्याला विचारलं, " काय शंकर, कुठं निघाली आहे म्हणायची जोडं."

" आरं !!! इथंच जरा देवळातनं जाऊन येतो."

दोघे देवळात गेले, व्यवस्थित दर्शन घेतलं त्यानंतर ते दोघे देवळाच्या पाठीमागुन वाहणाऱ्या नदीच्या काठावर येऊन बसले. तिला असं नदी काठी बसून त्याच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं. 

ती आज सकाळ पासून गप्पच होती. त्याच्याशी काहीच बोलली नव्हती. तिच्या चेहऱ्यावरुन ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत होतं. 

" वैशाख पूनवं कधी हाय ओ," इतकंच तिनं दोनदा त्याला विचारलं होतं.

त्याला ठाऊक होतं ती हे का विचारतेय. आजच्याच दिवशी पंचेचाळीस वर्षांपूर्वी सोळा वर्षाची पारू लग्न होऊन त्याच्या आयुष्यात आली होती. वैशाख पौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्या दोघांचं लग्न झालं होतं. आज त्यांच्या लग्नाचा पंचेचाळीसावा वाढदिवस होता. तिला कॅलेंडर वगैरे काही कळत नसल्यामुळे ती मराठी महिने, आमावस्या, पौर्णिमेवरून सगळ्या तिथी लक्षात ठेवायची. 

तिने डोक्याला जास्त त्रास करून घेऊ नये म्हणुन त्याने सांगितलं, "अगं, उद्याच हाय की वैशाख पुनवं."

" म्हंजी... म्हंजी आज आपलं लगीन," इतकंच बोलून परत ती गप्प झाली आणि नदीच्या खळखळत्या पाण्याकडे टक लावून बसली.

तिची अशी तंद्री लागलेली पाहून त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आणि त्याने हळूच आपले डोळे पुसले.

" ए पारू, तुला त्या सदाच्या टपरीवरचा चहा आणि भजी लई आवडत्याती ना चल आज सदयाच्या टपरीवर जाऊ, अगं पंधरा दिस होत आलं त्या टपरीवरचा कटिंग च्या पिऊन." तो तिचा हात पकडतो आणि दोघे सदयाच्या टपरीकडे जायला निघतात.

सदा दोघांची वाट पहातच असतो. त्याला उशीर झाला होता. टपरी बंद करून घरी जायचं होतं पण त्याला ठाऊक होतं, आज हे दोघे इथे नक्की येणार कारण गेली कित्येक वर्षे दोघे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी तिथे यायचे. छोटसं खेडेगाव असल्यामुळे त्यांना हे लहान लहान क्षण देखील आनंदाची पर्वणी असायचे. 

टपरीसमोरच्या बाकावर दोघे बसले, सदाने चहा आणि भजी आणून त्यांच्या पुढ्यात ठेवले. त्याने चहाचा कप तिच्या हातात दिला. ती उगीचच त्या कपाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही त्रासिक भाव होते. तिने परत त्याला विचारलं, " वैशाख पुनवं कधी हाय ओ," तिच्या या प्रश्नावर परत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो काहीच बोलला नाही. 

" अगं, भजी खा की, तु भाज्याला अजुन हात बी नाय लावलास." त्याने भज्यांची प्लेट तिच्यासमोर सरकावली.

" नगं मला, भजी नाय खायची. चला आपण घरला जाऊ."

" बरं !!! चल, नाय खायची तर राहू दी, आपण घरी जावुया." म्हणत त्याने चहा संपवला आणि भजी बांधून घरी  देण्यासाठी सदाला सांगितलं. 

घरी आल्यानंतर कितीतरी वेळ ती तशीच बसून राहिली. अजुनही तिच्या मनातली चलबिचल तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. परत तिने विचारलं, "आज कोणता दिस हाय ओ, वैशाख पुनवं कधी हाय." आता तिच्या डोळ्यात पाणी होतं. 

आज दिवस भरात तिने काहीही खाल्लं नव्हतं म्हणुन किमान आजच्या दिवशी तरी तिच्या आवडीचं काहीतरी बनवावं म्हणुन तो  तिच्या आवडीच्या गव्हाच्या कण्या बनवायचं ठरवतो. तिला गव्हाच्या कण्या आणि ताक खुप आवडायचं. चुलीवर एकीकडे तो कण्या शिजायला ठेवतो आणि दुसरीकडे एका चरवीत रात्री लावलेलं घट्ट दही घेऊन ताकाची तयारी करतो. पातेल्यातल्या कण्या पळीने हलवता हलवता त्याने एक नजर तिच्यावर टाकली. ती भिंतीवर टांगलेले जुने फोटो पदराने पुसत हळुवार त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवत होती जणू ते क्षण जगण्याचा प्रयत्न करत होती.

आजकाल तिचे दिवसच होते थोडे शाहण्यासारखे वागायचे आणि थोडे वेड्यासारखे वागायचे. हल्ली तिचे काही दिवस शहाणे असतात तर काही दिवस ठार वेडे असतात. कधी कधी पहिल्यासारखी सगळं पटापट आवरायची तर कधी कधी काहीच न आठवल्याने दिवसभर ढिम्म बसून रहायची. मागील सात - आठ वर्षांपासून हे असंच चालू आहे. सुरवातीला लहान लहान गोष्टी विसरत होती तेंव्हा सगळं हलक्यात घेतलं पण हळुहळु तिचं विस्मरण वाढतच गेलं. 
स्थळ, काळाचं भान तिला राहिना. वाक्ये बोलताना त्रास होऊ लागला. परत परत तेच शब्द बोलायची. माणसांना ओळखण बंद झालं. दिवसभर बडबड करणारी पारू गप्प गप्प राहू लागली.

मुलांनी आणि त्याने मिळून तिला चांगल्या शहरातल्या डॉक्टरांना दाखवलं. तिच्या लक्षणांवरून डॉक्टरांनी तिला अल्झायमर झाल्याचं निदान केलं. अल्झायमर हा शब्द ऐकून त्याला आपल्या बायकोला काहीतरी भयंकर झालं आहे असं वाटू लागलं. त्याने असहायतेने डॉक्टरांकडे बघितलं. त्याची साशंक नजर पाहून डॉक्टरांनी त्याला समजावून सांगितलं हा विस्मृतीचा आजार आहे. या आजारात विस्मरण, स्थळ काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्ये बोलता न येणे, परत परत तेच शब्द बोलणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात. शब्दसंपत्ती कमी होत जाते आणि शेवटी व्यक्ती मूक होते. पुढेपुढे दैनंदिन व्यवहार अवघड होत जातात.

एव्हाना कण्या शिजल्या होत्या, त्याने एका ताटलीत गरम गरम कण्या वाढून घेतल्या आणि त्यावर ताक ओतलं.

" ओ बाईसाब, इथं येऊन गप्प गुमान बसा बरं. हे बघा तुमाला आवडतेत्या तशा मऊसूत कण्या आन ताक. पटकन खाऊन सांगा बघू कशा झालेत्या." त्याने तिचा हात पकडून तिला खाली एका जागी बसवलं.

" कण्या,,,? आवं तुम्ही भजी म्हणाला हुता." तिने हरवलेल्या, निर्विकार चेहऱ्याने त्याला विचारलं.

त्याला काय बोलावं काही सुचेना, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो फक्त तिच्याकडे पाहून हसला आणि " हो बाईसाब " इतकंच बोलला.

सदाच्या टपरीवरून आणलेली भजी त्याने तसेच स्वतःसाठी ठेवले आणि तिच्यासाठी गरमागरम भजी बनवण्यासाठी तो परत चूल पेटवू लागला. लहान मुलांचे हट्ट पुरवावे असे तो तिचे सारे हट्ट पुरवत होता.

जेवण केल्यानंतर शांत झोपलेल्या तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत, तिला प्रेमाने थोपटत त्याचा कधी डोळा लागला हे त्याला देखील समजले नाही.

केंव्हा तरी पहाटे साखरझोपेत असताना मधुर गीताचे सूर त्याच्या कानी पडले आणि त्याने डोळे उघडले. बाजूला पाहिलं तर ती तिथे नव्हती. तो घाबरून उठला आणि बाहेर अंगणात आला तर ती अंगणात छान शेणसडा करून रांगोळी काढत होती. रांगोळी काढता काढता ती पूर्वी कधीतरी गायलेली गीते गुणगुणत होती

माझ्या अंगणी सड्याचा थाट ।
तिथं असते सूर्याची वाट।।१

हात जोडती उगवत्या सुर्यनारायणा ।
आहे साऱ्या दुनियेचा किरणा।।२

उगवत्या नारायणा हात जोडती अंगणाला ।
सूर्या डोलतो  गगनाला।।३

नारायण देवा तुला मागत नाही काही ।
पोटीच्या बाळाला औक्ष दुनियेच घाल लई।।४

तिला अस गुणगुणताना पाहून तो तिथेच ओसरी वर टेकला आणि तिला न्याहाळू लागला. आज पुनवंच चांदणच जणू तिच्या चेहऱ्यावर खुललं होतं. आज ती खुश दिसत होती. तिचा आजचा दिवस तर छान सुरू झाला होता, कालच्या मनाच्या अस्थिरतेचा लवलेश ही कुठे तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तिला असं एकटक पाहता पाहता त्याला ती पंचेचाळीस वर्षांपूर्वीची पारू आठवली जेंव्हा त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. 

मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात आपल्या आजीचं हिरवंगार नऊवारी लुगडं नेसून ते सांभाळता सांभाळता त्रेधातीरपीट उडालेली, थोडीशी घाबरलेली, बावरलेली, लाजरी बुजरी ती, पहिल्याच नजरेत त्याच्या मनात घर करून गेली. सर्वसंमतीने लग्नाचा जवळचाच मुहूर्त काढण्यात आला. वैशाख महिन्यातला पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा वैशाख चतुर्दशीचा मुहूर्त ठरवला आणि सोळा वर्षाची नक्षत्रासारखी देखणी पारू सोनपावलांनी त्याच्या आयुष्यात आली.

घरची सगळी जवाबदारी व्यवस्थित पार पाडत तिने लौकरच सगळ्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. सण समारंभ, पाहुणे रावळे, देणं घेणं, रिती रिवाजांचे सारे सोपस्कर ती अगदी चोख पार पाडत होती.

आणि तो !!! त्याची सकाळ व्हायची ती तिने जात्यावर गायलेल्या गीतांच्या सुरांनी. ती गीते खूप सुंदर गायची. शेतामळ्यात राबता राबता तो तिच्याकडेही तितकंच लक्ष द्यायचा. तिची काळजी घ्यायचा. त्याच्या प्रेमाच्या सावलीत ती फुलत होती, बहरत होती, मोकळा श्वास घेत होती.

ती दर पौर्णिमेला मंदिरात जायची. तिची आजी पौर्णिमेचं व्रत करायची. आजीसोबत तीही हे व्रत करू लागली. तो देव, मंदिर, उपासतापास या सगळ्यांपासून चार हात लांबच असायचा पण ती त्याला जबरदस्ती मंदिरात यायला भाग पाडायची. मंदिरात आलं की ती त्याला मंदिराच्या पाठीमागून वाहणाऱ्या नदीकाठी घेऊन जायची. तिथे ते दोघे बसून छान गप्पा मारायचे. सुखी संसाराची स्वप्ने रंगवायची आणि घरी परतण्याच्या वेळी सदाच्या टपरीवर हमखास जायची. सदाच्या हातचा चहा आणि भजी म्हणजे, हा हा हा !!! 

अशातच हळुहळु दिवस सरत होते. त्यांच्या संसाराच्या वेलीवर दिनेश आणि महेश नावाची दोन फुल उमलली आणि घराचं गोकुळ झालं. सार घर आनंदानं न्हालं. त्यांच्या बाललीलांमध्ये दोघेही हरवून गेले. तो चौथी पर्यंत शाळा शिकलेला आणि हिने शाळेचं तोंड देखील कधी पाहिलेलं नव्हतं. पण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचा हा चंगच दोघांनी बांधला. मुलांची आणि नशिबाचीही साथ दोघांना लाभली आणि मुलं चांगली उच्चशिक्षित झाली आणि सरकारी नोकरीत चांगल्या हुद्द्यावर कामाला लागली. 

मुलांची लग्न...नक्षत्रासारख्या सुना सगळं कसं नजर लागेल असं !!!! 

देवाने सारी सुख भरभरून त्यांच्या पदरात घातलेली. 

पण हे सारं वैभव उपभोगायची वेळ जेंव्हा आली तेंव्हा नशिबाला काही औरच मंजूर होतं. तिला अल्झायमरच निदान झालं आणि त्याच सारं अवसानच गळालं.

मुलं चांगली होती, दोघाही मुलांनी त्या दोघांना आपल्यासोबत शहरात येऊन राहण्यासाठी खूप आग्रह केला. तिथे वेळेवर डॉक्टर लगेच उपलब्ध होतील, आईचा इलाज चांगल्याप्रकारे होईल. चुटकीसरशी लगेच साऱ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील म्हणुन सोबत चलण्यासाठी सुनांनी आणि मुलांनी आकाशपातळ एक केलं पण त्याने काही ऐकलं नाही. तो मुलांना समजावत म्हणाला

" लेकरांनो !!! आरं, तुमच्या आईनं त्या सुगरणीवाणी एक एक काडी गोळा करून ह्यो खोपा ईनलायं रं. इथल्या एका एका काडीवर तिचा जीव हाय. आन ह्या खोप्यासंगची तिची नाळ तोडली तर ती कशी जित्ती राह्याची रं. आता अशा वक्ताला तिला जर इथनं दुसरीकडं नेलं तर ती मरून जाईल. तुम्ही जावा पोरांनो, उंच भरारी घ्या. तुमच्या आईचं तेच सपान हाय. तुमास्नी उंच आकाशात उडताना तिला बघायचं हाय."

त्याच्या ह्या बोलण्यापुढे मुलांचं काही चाललं नाही. तरीही मुलांनी त्या दोघांसाठी सर्व सुखसोयींनी युक्त एक चांगल टुमदार घर गावी बांधलं. पण तो तिला घेऊन त्या घरात न राहता तिने लग्न करून ज्या घरात गृहप्रवेश केला होता त्याच घरात राहत होता. त्यांच्या साऱ्या आठवणी तो पुन्हा नव्याने तिला जगवत होता पण ती...........

आवं...आवं !!!  तिच्या आवाजाने तो भानावर आला.

" काय ओ !!! बाईसाब, " त्याने तिच्याकडे पाहत उत्तर दिले.

ती वर फळीवर ठेवलेल्या जुन्या ट्रंककडे बोट करत होती.

त्याने उठून तिला ती ट्रंक काढून दिली. तिने त्या ट्रंकेतून तिला आवडणाऱ्या गुलाबी रंगाचा पटका आणि पांढराशुभ्र शर्ट काढून त्याच्या हातात देत म्हणाली, " तुम्ही आज ह्यो सदरा घाला आन डोक्याला ह्यो पटका बांधा. आज वैशाख पुनवं हाय नव्ह, आपण देवळात जाऊ."

" बरं, बाईसाब." त्याने हासत प्रेमाने तिच्याकडे पाहिलं.

त्याने चहा करून तिला पाजला आणि अंघोळीसाठी गेला. आंघोळीनंतर घरातील देवपूजा आटोपून तो तयार झाला. आज त्याचा उपवास होता. तिची अशी भ्रमिष्टासारखी अवस्था झाल्यापासून तिच्या पुनवेचं व्रत आणि उपवास तो करत होता. तिच्या व्रतात त्याने खंड पडू दिला नाही.

तिने दिलेल्या सदऱ्यात आणि पटक्यात ह्या वयात देखील तो रुबाबदार दिसत होता. थोड्याच वेळात तो तयार होऊन तिच्यासमोर सादर झाला.

तिने त्याच्याकडे पाहत, "आवं, असं नवरदेवावाणी नटूनथटून कुठं निघाला." तिने निर्विकार चेहऱ्याने त्याला विचारलं. 

त्याला काहीच समजेना, त्याने त्याच्या डोळ्यातं आलेलं पाणी पुसत तिच्या गालावरून हात फिरवत तिला कोणाची नजर लागू नये म्हणुन प्रेमाने बोटं मोडली.

28/8/2020

© सुनिता मधुकर पाटील

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.

 

Circle Image

Sunita Madhukar Patil

Self employed

I seem like a strict soul.... Yet I am a child at heart.... In my mind thoughts take a stroll.... And reach out in the form of an art....????