वैखरी एक प्रेमकथा भाग -२६

A Lovestory Of A Girl

वैखरी एक प्रेमकथा भाग-२६
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरीय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .



" नाते तुझे माझे मनाशी मनाचे
कळले ना मला कळले ना तुला
कधी कसे दोन मने एक झाले
दुनियेनी त्याला प्रेम असे नाव दिले..!!"

"वसंत काय लिहितोस ? आज तुझ्यासाठी मी खूप खुश आहे. खूप आनंदाचा दिवस आहे . पार्टी करायची का? आणि हो, ते तुझे तत्वज्ञान मध्ये आणायचे नाही . माझ्यासोबत वैखरीला प्रतिष्ठित जीवन मिळणार नाही वगैरे वगैरे…"

सुहित वसंतशी बोलत होता परंतु वसंत लिखाण करतांना वैखरीच्या विचारात गुंतला होता . वैखरीसुद्धा त्याच्यावर प्रेम करते हे माहित होताच तो मनानी सुखावला होता तरिही त्याला वैखरीच्या जीवनात त्याचं प्रत्यक्ष असणं योग्य वाटत नव्हतं . तो एक अनाथ मुलगा ही गोष्ट त्याला दोघांच्या नात्यातील अडसर वाटत होती . वसंतचं वैखरीवर जीवापाड प्रेम त्यामुळे माझ्यासारख्या अनाथ मुलांसोबत ती सुखी राहू शकणार नाही असं त्याला मनोमन वाटत होतं .

सुहित : "मी काय बोललो ऐकलंसं का वसंत ?"
वसंत : " हो ऐकलंय .वैखरीचा विषय मी नशीबावर सोडला . विधात्याला जे मान्य असेल तसं होईल . मी स्वतःहून याबाबत कोणतेच पाऊल उचलणार नाही सुहित".
सुहित : " किती विचित्र आहेस रे तू वसंत . तुझ्याजागी मी असतो तर आज आनंदानी पार्टी केली असती ."
वसंत : " तुला नाही कळणार दोस्ता . एक अनाथ म्हणून जगल्यावर दुनियेचा जास्तच अभ्यास होतो अनाथाला स्विकारणारे तुझ्या आईबाबांसारखे फार कमी माणसं असतात सुहित ."

सुहित : " तू थोडे तुझे तत्व बाजूला ठेवलेत तर सर्व ठीक होईल ."
वसंत : " सोड तो विषय .चल ड्युटीवर जायचे आहे. आज मला प्रेम सरांनी लवकर बोलवलं ."
सुहित : " त्या प्रेम सरांचं तुझ्यावर जरा जास्तच प्रेम दिसतय .खूप माहीती विचारत असतात तुझ्याविषयी मला ."
वसंत : " प्रेमळ आहेत प्रेम सर स्वभावानी मला खरंच मुलाप्रमाणे वागवतात पाठीवर प्रेमानी हात ठेवतात ना माझ्या तेव्हा मीही सुखावतो . माझ्यासारख्या अनाथासाठी असे प्रेम मिळणे खूप मोठी गोष्ट आहे. वडिलांचा स्पर्श कसा असतो नाही माहित पण मला त्यांच्या स्पर्शात जिव्हाळा, प्रेम , आपुलकी सर्वच जाणवतं . भाग्य माझं ."
दोघेही ड्युटीवर जायला निघतात..

******************************************
आतू आणि आई वैखरीच्या बोलण्यावर चर्चा करतात . वैखरी तिच्याजागी कुठेच चुकली नाही . कदाचित हे विधिलिखित असावं असं वैखरीच्या आईला वाटतं म्हणून वैखरीच्या बाबांना सांगायचं असं वैखरीची आई आतूला सांगते व दोघीजणी घरातील लायब्ररीत वैखरीचे वडिल बसले असतात तिथे जातात….

आई( विभा देशमूख) : "अहो, थोडा वेळ आहे का तुमच्याकडे . काही महत्त्वाचं बोलायचं
होतं ."
बाबा( राज देशमूख) : " महत्त्वाचं ? बोला
दोघींचही काम आहे का ? सोबत आलात म्हणून म्हटलं ."

आई : " मी काय बोलते ते न रागावता ऐकूण घ्याल असे वचन दया पहिले". आम्ही जे बोलू तसा निर्णय होणार नाही . आम्ही केवळ आमचं मत मांडतोय . बाकी निर्णय तुमचाच अंतीम राहिल ."

राज देशमूख हातातील पुस्तक बाजूला ठेवतात व थोड्या गंभीर चेहर्‍यानी दोघींकडे बघत बोलतात," अशी काय गोष्ट आहे वचन वगैरे घेताय . ठीक आहे मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकूण घेतो . बोला कोण बोलणार आधी ."

आई : सांगते, तसं आम्ही दोघी एकाच विषयावर बोलायला आलोत… रागावू नका .आपली वैखरी एका मुलावर प्रेम करते…
बाबा : "काय ?"
आई : "तुम्ही रागावू नका प्लीज .
जसं आजकालचं प्रेम आहे तसे नव्हे काळजी करू नका. जो मुलगा वैखरीला आवडतो तो अगदी प्रतिक्षा ताईंसारखा दिसतो म्हणून तिला त्याच्याविषयी जाणून घ्यायच्या उत्सुकतेपोटी नकळत तिला तो आवडायला लागला . ती त्याच्याशी या विषयावर बोलली नाही . तिनी कुठलीच कमीटमेन्ट त्या मुलाशी केलेली नाही . ती तुमच्या शब्दांबाहेर जाणार नाही .काळजी करू नका ."

राज देशमूख वैखरीच्या आईचे बोलणे ऐकत होते .त्यांच्या डोळ्यासमोर वसंतचा चेहरा येत होता . तो वसंत तर नाही ना ? असा प्रश्न त्यांच्या डोक्यात होताच म्हणून त्यांनी त्या मुलाचं नाव काय ?असा प्रश्न केला .
आई : " वसंत "
बाबा : " काय वसंत ?" वैखरीला बोलवा .

आतू आणि आई दोघीही घाबरल्या वैखरीला का बोलवायला सांगतात आहेत हे त्यांना कळत नव्हतं . आतू वैखरीला बोलवून आणते… वैखरीही घाबरेली असते.. तिघींनाही घाम सुटतो.. वैखरी लायब्ररीत येवून खाली मान घालून उभी राहते ….

बाबा : " वैखरी हा वसंत कोणाचा मुलगा ?"
वैखरी : "बा..ss..बा वसंत अ..ssनाथ आहे . अनाथालयात लहानाचा मोठा झाला ."
बाबा : "कोणत्या अनाथालयात होता हे माहिती आहे का?"
वैखरी : "अनाथालयाचे नाव माहिती नाही . माझी मैत्रीण स्वरा आहे ना तिच्या बाबांच्या अनाथालयात होता ."
बाबा : " स्वराच्या बाबाचं नाव ?."
वैखरी :" रमेश जाधव ."

वैखरीचे उत्तर एकूण वैखरीचे बाबा वर पाहून बोलतात विधात्या तुझी लिला अगाध आहे.

आतू , वैखरी , वैखरीआई आश्चर्यचकीत होतात की वैखरीचे बाबा इतके शांत कसे ? तिघीही तिथून न बोलता जायला लागतात तोच राज देशमूख त्यांना थांबवतात .

राज देशमूख : बघा प्रतिक्षाताई विधात्याची लिला . तुमचा मुलगा कुठे आहे हे तुम्हाला ठाऊक असते तर तुमच्यातील आई समाजबंधनं लांघून मुलाला भेटायला गेली असती . समाजापासून जे लपवून ठेवलं ते समोर आलं असतं म्हणून तुमच्या जवळून आम्ही लपवलं . आम्हाला माहित होतं वसंत कोणत्या अनाथालयात आहे . आमचं त्याच्यावर लक्ष होतं . आम्ही नेहमी अनाथालयात काहीना काही मदत देण्याच्या बहाण्यानी वसंतला भेटून त्याचे लाड करून येत

होतो . आम्हाला बघताच तो ओळखेल . तो आम्हाला देशमूख काका म्हणतो . त्याला माहित नाही बिचार्याला की आम्ही त्यांचा मामा आहोत . वसंतला आपल्या घरात आणण्याची खूप इच्छा व्हायची पण
समाज बंधन आडवी यायची . समाजातील आपली इज्जत धूळीस मिळाली असती . अगदी प्रतिक्षा ताईंसारखा दिसतो वसंत . तशीच उजव्या गालावर खळी… नाकावर तीळ… कोणालाही शंका आली असती … त्याचे रुप पाहून… आता पुरे झाले… वसंतला घरात आणायचा छान बहाणा शोधला विधात्यानी .
वसंत आपल्या घरात जावई बनून येणार…
विधात्यानीच हा मार्ग शोधला आणि वैखरीची व वसंतची भेट झाली .


वैखरी, वैखरीची आई व आतू तिघींच्याही डोळ्यात आनंदाश्रु तरळतात . आतू वैखरीला मिठी मारून वैखरीचे आभार मानते..

क्रमशः
पुढे कथेत काय होते जाणून घेण्यासाठी नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा भाग -२७

धन्यवाद !
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .







🎭 Series Post

View all