Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

वैखरी एक प्रेम कथा भाग-१०

Read Later
वैखरी एक प्रेम कथा भाग-१०

कथेचे शीर्षक - वैखरी एक प्रेमकथा भाग-१०
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय कथामालिका करंडक स्पर्धा
टीम - अमरावती .


पूर्वांध:- सुहित आणि वसंत अमेरिकेला गेलेत .
वर्षभर त्यांची भेट होणार नाही या विचाराने सुहितची आई तसेच स्वरा उदास होत्या . करमत नव्हतं म्हणून स्वरानी वैखरीला बोलवलं . स्वराला वैखरीपण नाराज वाटली तिच्या चेहरा नेहमीप्रमाणे आनंदी नव्हता …..

पुढे भाग-१० वाचा….

स्वराला वैखरी नाराज वाटली म्हणून तिने वैखरीला घरी काही झाले का ? विचारताच वैखरीने गोष्ट मोडून दिली .

स्वरापण जिद्दी जोवर वैखरी मनातलं बोलली नाही तोवर तिच्या मागे लागली .
"सांग तू नाराज का आहेस ? तुला आपल्या
मैत्रीची शपथ ", असे वारंवार प्रश्न करून स्वरानी वैखरीला बोलकं केलं .

वैखरी :" ये मैत्रीची शपथ नकोस ना देवू ".

" वैखरी मला माहिती आहे तू घरातील गोष्टी सहसा शेअर करत नाहीस . मीही तुला आजवर तसा आग्रह केला नाही . आज तुझा पडलेला चेहरा पाहून राहावतं नाही म्हणून हट्ट
करतेय . सांग नाराजीचं कारण काय ?कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त व्हावं माणसानं . मला आपलं मानत असशील तर सांग . नाहीतर राहू दे ", स्वरानी वैखरीला भावनिक साद घातली ."

वैखरी : "स्वरा तू तर माझी जीवलग मैत्रीण प्राणसखी . घरच्यांना नाही आवडत गं घरातील गोष्टी बाहेर सांगायला . त्यामुळे मी घरचे दुखवल्या जावू नयेत म्हणून त्यांचे मन राखते .
नाहीतर तुझ्यापासून काही लपविण्याचं कारण काहीच नाही ."

स्वरा : " वैखरी पण का ? तुझ्या घरचे तुझ्या वागण्यावर, व्यक्त होण्यावर निर्बंध लावतात .
" मुलांशी मैत्री करायची नाही ." हा कसला रुल
गं . तोही आजच्या काळात . तू कधी तुझ्याघरी कोणाला बोलवतही नाहीस . चारवर्ष होतात आहे आपल्या मैत्रीला मी तुझं घर बघीतलं
नाही ."

वैखरी : त्यांच्या कटू अनुभवांमुळे तसे वागतात गं ते . तुला नाही कळायचं बघ . योग्य वेळ आली की तुला मी सांगेल सर्व . तू सुद्धा म्हणशील की माझ्या घरचे लोकं चुकीचे नाहीत .
पहिलेच दुःखी आहेत गं सर्वजण . त्यात माझ्या वागण्यानी पुन्हा दुःखायला नकोत . मी याची काळजी घेते . कुटुंबियासाठी स्वतःच्या भावना, आनंद दूर ठेवते . त्यातच मला समाधान मिळते.

स्वरा : " बरं , नाराज का आहेस एवढे तरी
सांग . मी त्यावर उपाय शोधण्याचा एक मैत्रीण म्हणून प्रयत्न करेल . तू नाही का माझ्या आनंदासाठी पटकन आलीस धावतपळत ."

वैखरी : "अगं आई बाबांनी तसेच आजी आजोबांनी आधीच ठरवलं होतं माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर लग्न उरकून टाकायचं ."

स्वरा : " ये थांब जरा .what do you mean by "उरकून टाकायचं ". लग्न म्हणजे काय कोणतं काम आहे उरकून टाकायला . अगं आयुष्य भराचं सुख अवलंबून आहे त्यावर ."

वैखरी : हो गं . बरोबर आहे तुझं . जीवनात आलेल्या अनुभवांतून बनलेले विचार आहेत हे घरच्यांचे . त्यांनी ठरल्याप्रमाणे लगेचच स्थळं बघणं सुरु केलयं . सेमीस्टर झाल्यावर लगेच एकदोन महिन्यात लग्न जमायला हवं असं घरच्यांचं मत आहे ."

स्वरा : "आणि हो वैखरी तुझे आजी आजोबा नाहीत ना आता ."

वैखरी : "हो गं आजीला जावून सहा वर्ष झाली अन् आजोबांना जावून पाचवर्ष झाली असली तरी त्यांचे विचार व नियम जीवंत आहेत
घरात ."

स्वरा : ग्रेट ! चांगले संस्कार आहेत . परंतु ज्यातून दुःख पदरी येतं ते विचार सोडायला काय हरकत

आहे ?".

वैखरी : " बरोबर आहे तुझं . मलाही तेच पटतयं .मला सुध्दा सवय झाली गं घरचे म्हणतील तसं वागायची . आपले विचार मांडायला गेलं की आई म्हणते," पूरे ! अनुभवाचे बोल आहेत . ऐकून घे ." काय बोलावं त्यावर. तूच सांग ."

स्वरा : "ठीक आहे नं फायनल सेमीस्टर झालं की, उरकून टाकं लग्न ."

वैखरी : "चिडू नकोस ना . मला तू समजून घेशील अशी अपेक्षा आहे ."

स्वरा : "समजून घेण्यात फायदा काय ? तू तोंड उघडणार आहेस का घरच्यांसमोर ."

वैखरी : " हो नं . मला लग्न करायचं नाही कसं सांगू घरच्यांना कळतच नाही गं स्वरा ".

स्वरा : " लग्नच करायचं नाही की सध्या करायचं नाही वैखरी ".

वैखरी : "काय गं शब्दांत पकडते सारखी ".

स्वरा : "अगं चांगले असेल स्थळ तुला लग्नानंतरही करिअरचं स्वातंत्र्य देणारे तर सेमीस्टर झाल्यावर लग्न करायला काही हरकत नाही .कधी ना कधी करणे तर आहेच ना लग्न ."

वैखरी : "पुढचं पुढे बघू . आता घरच्यांना कसं थांबवायचं सांग ."

स्वरा : " अगं तूला घरच्यांना सांगणे कठीण वाटत असेल तर मला घेवून चल तुझ्याकडे . मी सांगेल काका काकूंना . तुला पोस्ट ग्रॅच्युएशन करायची इच्छा आहे. त्यानंतर तुम्ही म्हणाल त्या मुलाशी करेल ती लग्न ."

वैखरी : " कसं शक्य आहे ?"

स्वरा : "काय ? काय शक्य नाही वैखरी असं दचकून काय बोलतेस " .

वैखरी : "काही नाही . उद्या चल माझ्या बरोबर घरी . गप्पा करता करता सहज आईला सांग . एकदम विषय नकोस काढू ".

" स्वराला कसं सांगू की मी नाही लग्न करू शकणार घरच्यांनी पसंद केलेल्या
मुलाशी "..... वैखरी मनाशीच पुटपुटली .

"चल स्वरा, मी निघू का आता ? बराच उशीर झालाय . आई आणि आतू माझ्या वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील . …", वैखरी स्वराला मिठी मारून व स्वराच्या आईला नमस्कार करून घरी जायला निघते .

*******

आतू : " वैखरी, बराच वेळ झाला आज . बरे आहेत ना स्वराकडील सर्वजण ."

वैखरी : "हो गं आतू बरे आहेत . मूलं अमेरिकेला गेलीत आणि वर्षभर भेट होणार नाही म्हटल्यावर येतयं गं टेन्शन . काकूला तर जेवणही गेलं नाही बघीतलं मी . फार काळजी करतात त्या सगळ्यांचीच . मलाच तर किती जीव लावतात. काहीही गोडधोड वेगळा मेनू केला की, जेवायला बोलवतात . खूप हळव्या आहेत गं काकू . स्वरा त्याहीपेक्षा . ती पण अस्वस्थ होती म्हणून बसली तिच्याशी गप्पा मारत जरा ."

आतू : "वर्षभर भेट होणार नाही म्हणून स्वराची आई अस्वस्थ झाली . जेवणही गोड लागे ना त्यांना . ज्याचा मुलगा कधिच भेटणार नसेल त्याची मनोदशा काय असेल ?".
जगण्यासाठी उदरभरणं केवळ . सर्व प्रकारच्या पदार्थांची चव सारखीच लागणार .

बोलतांना आतूचे डोळयातील आसवं गालावर आली . आतूचे आसवं पुसत आणि आतूच्या डोक्यावर हात ठेवत वैखरी म्हणाली,

" सांभाळ आतू स्वतःला . तू आसवं गाळली की माझ्याही हदयाला वेदना होतात गं . आई यायच्या आत सावर स्वतःला तिचा पण तुझ्यात खूप जीव आहे गं आतू . तिला तुझी आसवं नाही बघवतं . तुम्ही दोघी ननंद भावजया कमी आणि मैत्रीणी जास्त आहात ."

डोळ्यांचे काठ आसवांनी केव्हाच ओलांडले होते त्यावर आता आतूचे नियंत्रण राहिले नव्हते .
आतू वैखरीच्या गळ्यात पडून ढसाढसा
रडली …..

कमशः

वैखरीला नेमकं कुणाशी लग्न करायचं आहे ?
आतू ढसाढसा का रडली ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा…

वैखरी एक प्रेमकथा भाग-११


कथा आवडल्यास लाईक कमेंन्ट नक्की करा .
न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद!

©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम- अमरावती .ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv Nita Kachave

Advocate

सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून एकविस वर्षे नोकरी करून स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करते . मी लेखीका नाही परंतु शालेय जीवनापासून भावलेलं, रुजलेलं, अनुभवलेलं शब्दांत उतरवायचा एक छंद . वाचनाचा व्यासंग . शब्दांच्या दुनियेत रमायला आवडणारी मी एक शब्दवेडी .

//