वैखरी एक प्रेमकथा भाग-२१

A Lovestory Of A Girl


वैखरी एक प्रेमकथा भाग -२१
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालीका
टीम - अमरावती .


प्रेम भूतकाळात फेरफेटका मारून आला नी त्याला अनेक प्रश्नांनी घेरलं …. भूतकाळाशी संबंध जोडत प्रेम विचारांच्या गर्तेत
अडकला …...माझा प्रेमांकुर म्हणजे हा वसंत असेल का? वसंत जर मुलगी असता तर दुसरी प्रतिक्षाच दिसला असता . वसंत तर अनाथ आहे. प्रतिक्षाचा व माझा मुलगा असता तर प्रतिक्षानी सांगीतले असते मला . प्रतिक्षाचं लग्न करून देण्यासाठी आमचं दोघांचं बाळ अनाथालयात टाकलं असेल का तिच्या घरच्यांनी?. लोक लाजेखातर आमचं बाळ अनाथालयात ठेवण्यात आले असेल का? तसंही ती कशी सांगणार होती . माझा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता तिच्याकडे . मी प्रतिक्षा सोडून अमेरिकेला येवून पंचविस वर्षे होतील वसंत वयही चोवीस पूर्ण परिस्थितीजन्य पुरावे सुद्धा वसंत आमचा मुलगा असल्याचे सांगतात .कदाचित मीच मनाचेच मांडे
मांडतोय . एकसारखी दिसणारी अनेक व्यक्ती असतात . वसंत समोर आल्यावर मी त्याच्याकडे ओढला जातो . मला त्याच्याशी बोलावसं
वाटतं .तो मला आपल्यासा भासतो . हे भाव का येतात वसंत समोर आल्यावर अशा असंख्य विचांर प्रेमला स्वस्थ बसू देत नव्हते… .….
आज प्रेमला प्रतिक्षाची तीव्रतेने आठवण येत होती . कधी जातो आणि प्रतिक्षाला भेटतो अशी मनोदशा प्रेमची होती…प्रेमनी त्याची प्रेमगाथा कधीचीच मनाच्या आठवणीच्या साठवणीत बंद करून ठेवली
होती . आज पुन्हा त्या मनाच्या कप्प्यात बंद करून ठेवलेल्या आठवणी समुद्राच्या लाटांप्रमाने त्याच्या मनावर आदळत होत्या त्या आठवणींनी तो कासविस झाला होता…. त्यामुळे आज ऑफीसमधून प्रेम लवकर घरी जायला निघाला .तेवढ्यात समोरून वसंत येतांना पाहून प्रेम थबकला . लगेच वसंतनी प्रेमला गुड आफ्टरनून सर ,म्हणत अभिवादन केलं. प्रेमला वसंतला मिठी मारायची तिव्र इच्छा होत होती पण ते शक्य नव्हतं . प्रेमनी नजर भरून वसंतला बघीतलं आणि निघाला….


"प्रेम आज लवकर आलास ? फार अस्वस्थ 

वाटतोस .बरं नाही का?," प्रेमच्या आईनी काळजीने प्रेमची विचारपूस केली.

प्रेम : " हो आई थोडं अस्वस्थ वाटतय ".
प्रेमची आई :"डॉक्टरांना फोन लावून बोलवून घेवू

का ?"

प्रेम : " नको, नको थोडा थकवा आहे. आराम केल्यावर वाटेल बरं .तू नकोस काळजी करू आई ."
प्रेमची आई :स्वतःची काळजी घेत नाहीस . काम एके काम . तब्येत बिघडणार नाही तर काय? सूनबाई आली असती घरात तर मुलाबाळाच्या ओढीने लवकर घरी आला असता . लग्नही करत नाहीस . काय म्हणावं तुला , मी म्हातारी किती दिवस टिकणार आज आहे उदया नाही .कोण काळजी घेणार तुझी ?
प्रेम : " नको गं आई, काळजी करूस . मी बरा आहे, तू बस माझ्याजवळ . तुला काही सांगायचं आहे . आई तुला गावाकडची आठवण येत नाही का गं ."
प्रेमची आई : " गावाकडची आठवण दररोजच येते रे बाळा . आपलं गावं ते आपलं गावचं . गावाकडं आपली माणसं असतात . आप्तस्वकीयांच्या गोतावळ्यात आनंद, सुख, समाधान मिळतं . माणसंच खरी संपत्ती असतात . पैशानी श्रीमंत असणारा समाधानी असेलच असे नाही मात्र माणसं जोडणारी व्यक्ती मनानी श्रीमंत व समाधानी नक्कीच असते ."
प्रेम : "किती छान होते ते गावाकडचे बालपणीचे दिवस . मुंबईला राहायला आलो नसतो आपण तर बाबांना पैसे कमवायचे व्यसन जडले नसते .व्यवसायात स्पर्धा करून देशमुख काकांत व बाबांत भांडणे झाली नसती . आपली माणसं, आपला देश सोडून कायम इथे स्थायीक झालो नसतो."
प्रेमची आई : " हो तुझ्या बाबांचे आणि देशमुख काकांचे वितुष्ट आले नसते तर आज प्रतिक्षा माझी सून असती . तू बिना लग्नाचा राहिला नसता ."
प्रेम : "आई मला तुला काही सांगायचं आहे."
प्रेमची आई :" काय सांगायचय इतकं महत्त्वाचं बोल ."
प्रेम : " आई, मी तुला व बांबांना सांगणारच होतो . परिस्थितीच अशी होती की मी तुम्हाला सांगू शकलो नाही . बाबांनी मला काही दिवसासाठी म्हणून अमेरिकेला पाठवलं . त्या आधीच मी व प्रतिक्षानी मंदिरात लग्न केलं . देशमूख काका व बाबांमधिल वितुष्ट पाहून ते आमच्या लग्नाला मान्यता देणार नाहीत म्हणून आम्ही असं पाऊल उचललं होतं . अमेरिकेला येवून मला वर्ष झालं तरी बाबा मला आणखी काही दीवस थांब म्हणून सांगत होते . मी प्रतिक्षाला परत येण्याचं वचन दिलं होतं म्हणून बाबांच्या मर्जीविरुद्ध मुंबईला जायच ठरवलं
होतं . तेवढ्यात बाबाच अमेरिकेला आले . ऑफीसमध्ये बाबाचे मुंबईचे सेक्रेटरी आले असता बाबांना सांगत होते की, साहेब काल खूप धूमधडाक्यात तुमच्या शत्रूच्या मूलीचं प्रतिक्षाचं लग्न झालं खूप मोठ्या उद्योगपत्याला दिली देशमुखांनी मुलगी . जेणे करून देशमूखांच्याही व्यवसायाला फायदा होईल असं स्थळ शोधलं देशमूखांनी. ऐकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली . मुंबईला परत जाण्याची योजना मी कायमची रद्द केली . त्यानंतर बाबाचं आजारी पडले . अंथरुणाला खिळले . बाबा गेल्यावर मी बिजिनेस मध्ये गुंतलो तरी प्रतिक्षाच्या आठवणी सोबतीला होत्याच. प्रतिक्षाच्या घरी तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरुच होत्या . मीच अमेरिकेहून लवकर परत गेलो नाही . प्रतिक्षाच्या इच्छेविरुद्ध तिला लग्न करावं लागलं असणार . मी प्रतिक्षाचा गुन्हेगार आहे . मुंबईला परत जावून उगीच तिला डिस्टर्ब करण्यात अर्थ नव्हता म्हणून कायम अमेरिकेतचं राहणं पसंद केलं ."
प्रेमची आई : " मला सांगीतलं असतं तर मी तुझ्या बाबांकडे बोलले असते . निघाला असता मार्ग काहीतरी."
प्रेम : " आई काही उपयोग नव्हता . बाबा व देशमूख काकांमध्ये शत्रृत्वाची आग इतकी भयंकर पेटली होती की त्यात कुणीही जळून खाक व्हावं . आमच्या लग्नाबाबत सांगीतले असते तर कुणाचा तरी जीव गेला असता म्हणून काही दीवस ती आग शांत होईपर्यंत थांबावं म्हटलं तर जास्तच उशीर झाला व प्रतिक्षा दुसऱ्याची झाली ."


प्रेमची आई : " हे सगळं तू मला आज
सांगतोस ? . तुझ्या बाबांना जावून दहा वर्षे झालीत. आज अचानक तुला हे सर्व का सांगावसं वाटलं . मला वाटलं तू प्रतिक्षावर प्रेम करतोस म्हणून दुसऱ्या कुण्या मुलीशी लग्नाला तयार होत नाहीस . तू आणि प्रतिक्षानी लग्न केलं आज सांगतोस . खूप वेळ झाला रे प्रेम . लग्न केल्यावर का नाही सांगीतलं ? तू चुकलास प्रेम . बाबा व देशमुखांमधलं शत्रृत्व कदाचित तुम्हा दोघांसाठी संपलंही असतं काही
दिवसानी . तू प्रतिक्षाला दूर घेवून जावून संसार धाटायचा होता . लग्न करून असं अमेरिकेला येणं . ठीक नाही केलेसं प्रेम . लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला तसाच प्रतिक्षासोबत लगेच संसार थाटण्याचा निर्णय घ्यायचा होता असं तिला सोडून का आलास ?. कदाचित तुमच्या लग्नाची भनक तुझ्या बाबांना लागली असावी म्हणूनही त्यांनी तुला अमेरिकेला अस अचानक पाठवलं असावं ."
प्रेम : " हो आई त्यावेळी माझा निर्णय चुकलाच .
बाबांनी मला अमेरिकेला का पाठवलं ते त्यांचे मुंबईचे सेक्रेटरीच सांगू शकतात . असो . आता या गोष्टींवर बोलण्यात काही एक अर्थ नाही . आज पुन्हा तो भूतकाळ माझ्याभोवती भिरभिरतोय . मला अस्वस्थ करतोय ".
प्रेमची आई : "का ? असं काय झालं ?"

क्रमशः

प्रेम आईला काय सांगतो . ते ऐकण्यासाठी नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा भाग -२२

धन्यवाद !
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .

.



🎭 Series Post

View all