वैखरी एक प्रेमकथा भाग-१६

A Lovestory Of A Girl


वैखरी एक प्रेमकथा भाग-१६
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .


पूर्वांध : भाग १५ मध्ये आपण बघीतलं की, वैखरी वसंतवर प्रेम असल्याचं आतूला सांगते त्याचबरोबर तिचे जीवनाबाबतचे विचार व्यक्त करते आतूला वैखरीचे विचार मनापासून
पटतात .
आता वाचा भाग -१६….


आतू सकाळी लवकर उठून अंगणातील बागेतील फुलझांडांन पाणी घालतांना पाहून वैखरीची आई अचंबित होते… लगबगीने आतूकडे जावून विचारपूस करते…

आई : "प्रतिक्षाताई का हो एवढया पहाटे
उठल्या . पहाटेचे सहा सुद्धा वाजले नाहीत अजून . तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही म्हणून सकाळी उशीरा उठणाऱ्या आमच्या ननंदबाई आज खुश दिसतायतं याचा आनंद आहे …. अशाच आनंदी राहत चला . खूप दिवसांनी तुमच्या चेहर्‍यावर आनंदाची लकेर बघीतली ."

आतू : " हो वहिनी माझ्या आयुष्याची चोविस पंसविस वर्ष मी वाया घालवली . माझ्या बाळाच्या चिंतेत, दुःखात मी जगणं विसरले . माझ्या चिंतेनी मला माझं मूलं परत मिळालं
का ? प्रेमनी धोका दिला त्याचा घोक करत बसले त्यानी प्रेम वापस आला का? जीवन म्हणजे सुख दुःखाचा खेळ . दुःख कुणाला चुकलं ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतचं आणि हो ते जाण्यासाठीच येतं सुख दुःख दोघेही जीवन वाटेवरील पाहुणे हे समजत असूनही मला उमजत नव्हतं . समजणं आणि उमजणं यात
बरचं अंतर असतं वहिनी समजणं जरी सहज असलं तरी उमजणं त्या पलिकडचं असतं . हे मला वैखरीशी बोलतांना उमजलं . खूप समजदार आहे हो वैखरी . जीवनाचे तत्वज्ञान चांगलचं जाणते माझी भाची . "

आई : "अगं बाई प्रतिक्षाताई काय सांगताय ?
तुम्हाला तुमचं आयुष्य वैखरीशी बोलून
उमजलं ? छान झालं आमच्या पूर्वीच्या
प्रतीक्षाताई आम्हाला भेटल्या . तुमच्या दादांना तर फारच आनंद होईल . वैखरी तिच्या रुममध्ये अभ्यास करत आहे . तुमचा आनंदी चेहरा पाहून वैखरीचा आनंद गगनात मावणार नाही आवाज देते वैखरीला ."

आईचा आवाज एकूण वैखरी रुमच्या बाहेर
येते . आतूकडे बघताच…
तिच्या तोंडून आतू…! असा आनंद उद्गार निघून ती आतूला मिठी मारते आतूच्या हातच्या पाण्याच्या पाईपचे पाणी दोघींच्याही चेहर्यावर उडते . दोघीही पाण्यात मनसोक्त भिजतात .

आई : "अगं वैखरी, चला दोघीही घरात या आता . ओल्या कपड्यात सर्दी पडसं होईल ."

वैखरी व आतू दोघीही घरात येतात . त्या फ्रेश होवून पुन्हा हॉलमध्ये बसतात . तेवढ्यात वैखरीचे बाबा मॉर्निक वाकवरून हॉलमध्ये प्रवेश करतात…

"सूर्य आज पश्चिमेला उगवलाय ", म्हणत आतूची गम्मत करतात .

आई : "आज खूप आनंदाचा दिवस आहे. खूप दिवसानी प्रतिक्षाताई आज खळखळून
हसल्यात . त्याच्या चेहर्‍यावरिल आनंद परत आलाय .मी देवाजवळ दिवा लावून देवाचे आभार मानले . ह्याच दिवसाची वाट बघत होतोय आपण . आज तो दिवस आला " .

बाबा : " हा चमत्कार तुमच्या देवानी केला
तर ?".

आई : नाही , हो

बाबा : "नाही पण आणि हो पण . किती गोंधळलात . हर्षवायू झाला की काय
तुम्हाला ?".

आई : "नाही हो तसे नाही . देवाचे तर आशीर्वाद आहेतच हा चांगला दिवस
उगवण्यास . ईश्वरानी वैखरीच्या वैखरीद्वारा प्रतिक्षाताईंना जीवनाचा अर्थ सांगतीला . वैखरीनी तिच्या आतूला मानवी जीवन अनमोल असून रडत कुढत जगणं म्हणजे मिळालेला मानवी जन्म वाया घालवणं हे तिच्या आतूला पटवून दिलं . हा चमत्कार वैखरीच्या वैखरीचा म्हणावा लागेल ".

बाबा : "इतके वर्ष आपण जे करू शकलो नाही . ज्ञानवंत नावाजलेले समुपदेशक समुपदेशक जे करू शकले नाही ते वैखरीच्या वैखरीनी केलं फारच प्रभावी आहे वैखरीची वैखरी . बाळा तुझं ठेवलेलं नाव आज समर्पक ठरलं . समजदार माझी बेटी ."

आतू : "आतू हो दादा खूपच समजदार आहे आपली वैखरी . योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे तिच्यात . ति जीवनात निर्णय घेतांना कधीच गोंधळणार नाही असे स्पष्ट व स्थितप्रज्ञ विचार आहेत वैखरीचे ."

बाबा : " मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. शाब्बास ! बाळा, खूप मोठं काम केलसं तू . आतूला जगणं शिकवलं नाहीतर आतू जगणं विसरली होती गं . आतू खिन्न राहायची म्हणून आपणही कोणीच मनानी आनंदी नव्हते. आज खऱ्या अर्थाने कित्येक वर्षांनंतर आपल्या जीवनात आनंदाचा प्रवेश झाला तोही तुझ्यामुळं बेटा . हा आनंदाचा दरवळ आपल्या आयुष्यात असाच राहो हीच ईश्वराला विनंती . यावर्षी दिवाळी झकास साजरी करू . संपूर्ण बंगल्याला रोशनाई करू आचाऱ्याला विविध प्रकारच्या मिठाई बनवायला सांगू ."

आई : " हो यावर्षी कित्येक वर्षानी आपल्याकडे दिवाळी साजरी होणार .मी उद्यापासूनच तयारीला लागते… प्रतिक्षाताई पण नियोजनात मदत करतीलच ."

आतू : "हो वहिनी आपण सगळे मिळून छान दिवाळीची तयारी .."

घरात दरवळणारा आनंद पाहून नोकर चाकरही खुश होते त्यांचेही चेहरे खुलले होते….

वैखरी : "आई आज काकूंना आतूच्या आवडीचा मेनू बनवायला सांग ….".

बाबा : "हो अगदी बरोबर ."

आई : " हो सांगते . आजचा दिवस आपल्यासाठी दिवाळी पेक्षाही आनंदाचा आहे."

वैखरी : " आतू मी कॉलेजला जाते तयार होवून . आज लवकर येते . बोलू आल्यावर . मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. माझी आतू मला आज नवीन रुपात भेटली . अशीच रहा आतू आयुष्यभर…".

*****************************************
वैखरी आणि स्वरा कॉलेजमध्ये भेटतात .
भेटताच वैखरी स्वराला सांगते…

"स्वरा आज मला लवकर घरी जायचं आहे त्यामुळे लायब्ररीत बसणं आज शक्य नाही आपण उदया जास्तवेळ बसूया का ?".

"रविवारी येणारा आशय आजच येतोय की
काय ? चेहरा तर आज गुलाबासारखा फुलला .
वेगळीच चमक दिसतेय गालांवर आज . काय आवडला की काय आशय ", स्वरा वैखरीची मस्करी करत म्हणाली .

वैखरी : "तुला तेच दिसतं का गं ? तो आशय
माझ्या डोक्यातही नाही मग मनात कसा
असेल ?".

स्वरा : " सांग तरी पटकन , आज चेहर्यावर वेगळाच आनंद झळकतोय . तू टॉपर आल्यावरही तुझ्या चेहर्‍यावर एवढा आनंद नसतो ."

वैखरी : "अगं , टॉपर येणार हा अंदाज असतो मनाला . एखादी अनपेक्षित सुखद धक्का देणारी घटना घडली की आनंदाला उधान येतं तसं काहीसं झालयं आज ."

स्वरा : " सांग पटकन काय झालं . माझी उत्सुकता ताणू नकोस . लेक्चर सुरु झालं की बोलायला वेळ मिळणार नाही . आनंदाच्या भरात तू पटकन निघूनही जाणार आहेस म्हणतेस ."

वैखरी : "सांगते, सांगते . तुला पूर्वइतिहास काहीच माहिती नाही माझ्या घरचा त्यामुळे विस्तारानी सांगावं लागेल ."

स्वरा : " कसा माहिती असणार . तू कधी तुझ्या घरच्यांबद्दल मोकळी बोलतच नाहीस .
"योग्य वेळ आली की सांगेन " हे वाक्य तुझं पाठ झालयं माझ्या . ती योग्य वेळ तुझ्या पंचागात आज आली असेल तर सांग पटकन ."

क्रमशः


वैखरी स्वराला आत्याबद्दल सारं काही सांगेल की हातचं राखून सांगेल हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा…
वैखरी एक प्रेमकथा भाग १७

धन्यवाद !

कथा आवडल्यास लाईक ,कमेन्ट करायला विसरू नका .न आवडल्यास माफ करा .

©® ऍड. निता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .
🎭 Series Post

View all