वैखरी एक प्रेमकथा भाग-१५

A Lovestory Of A Girl
वैखरी एक प्रेमकथा भाग -१५
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .

पूर्वांध : वैखरीला तिची आई विवाह संस्थेचे महत्त्व सांगते . वैखरी लग्न करायलाच हवं का असा प्रश्न विचारते त्यावेळी आतूला वैखरीच्या मनात दुसरचं काही चालू असल्याचा अंदाज येतो . वैखरीला समजावण्यात तिच्या आईला यश येतं का बघू चला…..

पुढे भाग -१५….

आतू : " वैखरी काय करतेस ? "

वैखरी : " अभ्यास करतेय आतू . का गं काय झालं चिंतेत दिसतेस ?"

आतू : "काही नाही गं वैखरी काल तू माझ्याशी बोलली अन् निघून गेलीस . माझ्या मनात वेगवेगळे विचार यायला लागलेत . चित्त थाऱ्यावर नाही माझं कालपासनं ."

वैखरी : " तुला विचारात पाडण्याजोगं असं काय बोलले मी आतू ? "

आतू : " मनात जागा नसेल तर कसं लग्न करायचं कुणाशी ? म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय . असं बोलून निघून गेलीस तू काल . काय अर्थ काढायचा गं या वाक्याचा वैखरी".

वैखरी : " अर्थ काय काढत बसतेस .उगीच ताण घेतेस आतू तू . सहज बोलले मी तुझ्या आयुष्याबाबत चर्चा करतांना . इन जनरल सांगीतलं मी . खरंच सांग मनाला एकदा कुणी आवडलं तर मन त्याचचं होवून जातं की नाही त्यानंतर दुसर्‍यासाठी मनात जागा कशी उरेल ?"

आतू : " वैखरी एक विचारू का गं ? खरं सांगशील ?".

वैखरी : "आतू एक नाही दोन विचार . तुझे प्रश्न संपले की मी अभ्यासाला लागते ."

आतू : "वैखरी तुझ्या मनात कुणी आहे का
गं ? हे बघ जे काही आहे ते खरं सांग बाळा ."

वैखरी : " हा प्रश्न विचारायची ही वेळ आहे का आतू ? मी सांगेल न तुला योग्यवेळ आल्यावर . आता मला माझा अभ्यास करू दे".

आतू : "उत्तर देणं टाळतेस म्हणजे तुला कुणीतरी आवडतं . दादानी आशयची गोष्ट काढली तेव्हा तुझा चेहरा पडला त्यावेळीच मला शंका आली . त्या शंकेला तुझ्या वाक्यांनी दुजोरा दिला त्यावेळीच ठरवलं की तुला विचारायचं . घरात पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती नको . म्हणून वैखरी खरं सांग तुला कुणी आवडतं का ?"

वैखरी :" हो आतू मला आवडतं कुणीतरी ."

आतू : " अरे देवा ! माझा अंदाज खरा निघाला तर ."

वैखरी : " काय प्रतिक्रिया देतेस ? कुणी आवडणं गुन्हा आहे का ? कुणी ठरवून आवडतं का ? कसं कुणी अचानक आवडतं अन् मनात जावून बसतं हे सगळं नकळत घडतं गं आतू . मी तर अशा नजरेनं कुण्या मुलाकडे कधी बघीतलं नाही . अचानक घडलं गं हे सर्व . मी जाणून बुजून काहीही केलेलं नाही . प्रेमबिम मला करायचचं नव्हतं गं मी त्या मार्गानी कधी गेलेच नाही . कधी कसं मन हरवलं कळलचं नाही गं आतू ."

आतू : "कोण आहे तो ? चांगल्या घरचा आहे ना ?".

वैखरी : " काय प्रश्न विचारतेस आतू ? . मी सांगीतलं ना कसं घडलं मलाही नाही कळालं . नकळत घडलं ठरवून नाही. ठरवून प्रेम केलं असतं तर बघीतलं असतं कोण आहे ? चांगल्या घरचा आहे का ?".

आतू : "तरी पण नंतर कळालं असेल ना त्याचं घराणं वगैरे ….".

वैखरी : " ऐक आतू तो अनाथ आहे. त्याचं घराणं त्या बिचाऱ्यालाच ठाऊक नाही ."

आतू : "काय बोलतेस?".

वैखरी : "तू जे ऐकलं तेच बोलले मी आतू".

आतू : " अगं अनाथ मुलाशी लग्न तुझे बाबा मान्य करतील काय ? "

वैखरी : " अगं लग्नापर्यंत जावून पोहचलीस तू . मी वसंतवर प्रेम करते हे फक्त मलाच माहित आहे"

आतू : "अच्छा वसंत आहे तर त्याचं नाव .
हे काय नवीनच तू त्याच्यावर प्रेम करते हे वसंतला सुद्धा माहित नाही की काय ?".

वैखरी : "हो ही फक्त माझी भावना आहे. आपल्या घरच्या निर्बंधानुसार मी माझ्या मनातील भाव वसंतला दिसणार नाही याची दक्षता घेतली . माझी सख्खी मैत्रीण स्वराला सुद्धा याची कल्पना नाही . आतू अनाथ असणं त्याचा गुन्हा नाही . अनाथ आहे म्हणून त्याला नाकारणे हा कोणता न्याय ?"

आतू : " तुझं एकतर्फी प्रेम तुला कुठं घेवून जाईल देवच जाणे . वसंतचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही याचा अंदाज आहे का तुला ? ".

वैखरी : " वसंत माझ्यावर प्रेम करतो की नाही याचा अंदाज नाही मला . तसं त्याच्या वागण्यात दिसलं नाही कधी ."

आतू : "असलेही वसंतचे प्रेम तुझ्यावर त्याचा उपयोगही नाही . तुझे बाबा ह्या लग्नासाठी कधीही तयार होणार नाही . एकुलती एक मुलगी चांगल्या घरी पडावी असं स्वप्न आहे दादा वहिनींचं . अनाथ मुलाला घर ना दार अशा बेघर मुलाला मुलगी द्यायला कसे तयार होतील ते ."

वैखरी : असं कसं बोलतेस आतू . अनाथ असला तरी कुणाचा तरी मुलगाच ना तो . तुझा मुलगा अनाथालयात आजोबांनी नेला तो पण तिथेच लहानाचा मोठा झाला असेल म्हणून त्याला कुण्या बापानी मुलगी देवू नये का ? शिकून सवरून मोठा झाला असेल . कर्तृत्वान असेल तरीही ? फार चुकीचे विचार आहेत
हे .समाज प्रतिष्ठा, घराणे ह्या बाबी एखादया व्यक्तीच्या आनंदापेक्षाही मोठ्या आहेत का गं?
जीवन जगतांना माणूस सुखाच्या शोधात
असतो . एखादया मुलाचे किंवा मुलीचे सुख आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्यात असतांना, खोटया समाज प्रतिष्ठेसाठी मर्जीविरुध्द लग्न लावून देणे कितपत योग्य ? ऑनर किलींग यातूनच होतात ना ? किती भयंकर प्रकार हा ना हा . मान्य आहे मुलगा किंवा मुलगी चुकीच्या मार्गावर जात असेल नामसमजपणे चुकीचा निर्णय घेत असतील तर समजावून सांगावं केवळ समाज प्रतिष्ठेसाठी दोन जीवांचे सुख हिरावण्यात काय अर्थ आहे आतू ?

आतू : "हो गं वैखरी खरं बोलेलीस तू .माझेही डोळे उघडलेस तू आज . किती स्वार्थी मी . माझाच राग मला यायला लागला . माझ्याही मूलाला अनाथ म्हणून समाजाचा त्रास होत असेल नाही का गं वैखरी . समाज संवेदनशिल नाही गं .कसं असेल माझं मूलं ? हे देवा माझ्या मुलाला सुखी ठेव !".

वैखरी : "आतू तुला तुझ्या मुलाबद्ल जे वाटतं तेच इतर अनाथांबद्दल वाटायला हवं ती झाली माणूसकी . केवळ स्वतःच्या मुलांबद्दल वाटणे हे झालं वात्सल्य . माणसांतील माणूसकी हरवली आहे. प्रतिष्ठा, अहंकार, अभिमान, , द्वेष, शत्रुत्व हया दुर्गुणांनी माणूसकीला गिळंकृत केलयं . माणूसकीच्या भावनेतून बघीतलं तर समोरचा व्यक्ती तुम्हाला माणूस वाटेल नाही तर गरिब-श्रीमंत; श्रेष्ठ कनिष्ठ; अनाथ- अपंग हे नजरेला दिसेल ."

आतू : "खरं आहे वैखरी तुझं . माणूस माणूसपण विसरतो तेव्हाच जिवनातलं सुख हरवतं . सुख कशात आहे हेच विसरतो . वैखरी तू अंदाज घे वंसंतचही तुझ्यावर प्रेम आहे का याचा . मी बोलेल दादाशी . माझ्यासोबत जे झाले ते तुझ्यासोबत होणार नाही… तुला तुझं प्रेम मिळायलाच हवं … तुझ्या आयुष्यातील सुख हरवणार नाही याची काळजी मी घेणार . तू फक्त पक्की रहा . घाबरून लग्नाला तयार होवू नकोस".

वैखरी : " आतू माझं लग्न वसंतशी लावून दया हा हट्ट मी नाही करणार परंतु दुसऱ्या कुणाशी लग्नही करणार नाही . विधीवत लग्न वगैरे ठीक आहे. खरं तर ज्याला आपलं मन वरतं तोच आपला वर असतो . माझ्या मनातील वर वसंत शिवाय दुसरा असूच शकत नाही . आतू आणखी एक मी तुझ्यासारखी स्वतःला चारभिंतीच्या आत स्वतःला कोंडून जीवंतपणी मरण पत्करणार नाही . छान बाबांचा बिझिनेस सांभाळत मनाच्या साठवणीत साठवलेल्या वसंताच्या आठवणीत सुखानी जगेल . ज्याच्यावर प्रेम करतो त्यानीही आपल्यावर प्रेम करावं हे जरूरी नसतं . वसंतचं माझ्यावर प्रेम नसेल तरीही मला त्याचा फरक पडणार नाही . मी वसंतवर प्रेम करते हेच माझ्यासाठी पुरे आहे आणि तेच माझ्या सुखानी जगण्याचं कारण आहे ."

आतू : "किती स्पष्ट विचार आहेत वैखरी तुझे जीवनाबाबतचे . आवडले मला . तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एखादं व्यक्ती आपलं नाही झालं . एखादी वाईट घटना आपल्यासोबत घडली म्हणजे जीवन थांबलं असं होतं नाही . सर्व दुःख मनाच्या एका कप्यात ठेवून आनंदानी जगता यायला हवं तेच खरं जीवनाचं तत्वज्ञान ."

क्रमश:

वैखरीला वसंतच्या मनातलं कळेल का? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा….
वैखरी एक प्रेमकथा भाग-१६

कथा आवडल्यास लाईक, कमेन्ट करा . काही सजेशन असतील तर कमेंन्ट मध्ये दया कृपया . तुमच्या सजेशनचा आदर आहे .
कथा न आवडल्यास माफ करा प्रिय वाचक स्नेहींनो ?


धन्यवाद !

©® ऍड. निता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .





🎭 Series Post

View all