वैखरी एक प्रेमकथा भाग-१२

A Lovestory Of A Girl


वैखरी एक प्रेमकथा भाग-१२
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती

पूर्वांध : आतूनी तिची प्रेमकहानी वैखरीला सांगीतली . पुढे आतूच्या मुलाचं काय झालं याबाबत वैखरीला जाणून घ्यायचं होतं .

पुढे वाचा भाग -१२

आतू : गोंडस बाळ माझं, गोरंगोरंपान , नाकावर काळा तिळ . उजव्या गालावर खळी . दाट कुरळे जावळं . माझ्या नजरेत अजुनही माझ्या बाळाचा तो चेहरा तसाच आहे . दिवस कसाबसा निघून जातो गं . पण रात्र सरता सरत नाही बाळाचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतो गं
माझ्या . गेल्या चोवीस वर्षापासून क्षणाक्षणाला मरतेय गं मी . श्वास असले तरी मी जीवंत नाही . श्वासही याच प्रतिक्षेत आहेत की एक दिवस कुठेतरी कधीतरी माझं मूलं मला नक्की भेटेल .
चांगलेच .त्याच्या उजव्या खांद्यावर काळाडाग जन्मखूण आहे ."

वैखरी बाळाचं वर्णन ऐकूण सुन्न झाली . तिच्या मनात आणखीच प्रश्नांनी गर्दी केली . वैखरी विचारात असतांना आतूनी वैखरीला हलवलं व रडत म्हणाली , "सांग नं गं वैखरी कुठे असेल माझं बाळ ? भेटेल का गं मला पुन्हा ?".

वैखरी : "आतू शांत हो . तुझं बाळ आता बाळ नाही राहिलं ते चोवीस वर्षाचं झालं असेल .
आतू तुझं बाळ मुलगा होता की मुलगी ?".

आतू : "मुलगा होता ."

वैखरीच्या डोळ्यासमोर वसंत आला . ती विचारात पडली . वसंतला पहिल्या क्षणी बघताच तिच्या मनात आलेली शंका सत्याचं रुप घेत होती . आतूनी केलेलं बाळाचं
वर्णणातील खाणाखुणा वसंतमध्ये होत्या . तिला आता जाणून घ्यायचं होतं आतूचं मूलं नेमकं कुठे आहे.

वैखरी : " आतू तुझं बाळ नेमकं कुठे आहे हे कोण सांगू शकेल ?".

आतू : "बाळाला जन्मदिल्यावर प्रसव वेदना विसरून आईच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळतात . मला तेही भाग्य लाभलं नाही . बाळाला जन्म देण्याचा विचार मी घरच्यांना बोलून दाखवला तेव्हाच बाबा म्हणाले ," बाळाला जन्म देताच डोळे भरून बघून घेशील त्यानंतर लगेच बाळाला एखाद्या अनाथालयात नेण्यात येईल . कबूल असेल तर बाळाला जन्म ". अशी अट माझ्यापुढे ठेवण्यात आली . मला माझं बाळ जीवंत हवं होतं त्याचं जीवन वाचवण्यासाठी मी माझ्या मातृत्व भावनांचा त्याग केला . बाळाचा जन्म होताच मी त्याला डोळे भरून बघून
घेतलं . चोनचार मिनिटातच बाबांनी माझ्या हातून बाळ हिसकावून घेतलं . कोणत्यातरी अनाथालयात देवून आले म्हणाले होते बाबा . तुझ्या बाबांनी कोणतं अनाथालय ? प्रश्न विचारताच तोफी सारखे कडाडले ," यानंतर हा प्रश्न कोणीही घरात विचारणार नाही . बाळाला सर्वजण विसरुन जा . प्रतिक्षाचं लग्नच झालं नाही असं समाजाला दिसायला हवं . लगचचं काही महिन्यांनी प्रतिक्षासाठी चांगला मुलगा बघून लग्न लावून देवू ." असे फर्माण बाबांनी काढल्यावर त्यानंतर तो विषयच घरात कुणी काढला नाही ."

वैखरी : " म्हणजे तुझा मुलगा अनाथालयात आहे

तर ? "


आतू : "बाबांनी तर असचं सांगीतलं होतं त्यानुसार तो अनायालयातच लहानाचा मोठा झाला असेल . कसा असेल गं माझा बाळ ? कसा दिसत असेल ? "

वैखरीचा अंदाज पक्का होत होता . वसंत पण अनाथालयात वाढला . आतुच्या चेहर्‍यावर असलेला वसंत नक्कीच आतूचा मुलगा असेल असे तिला वाटायला लागले . घरी ही गोष्ट सांगायची कशी हा पेच वैखरीसमोर होता . कारण आतूच्या भूतकाळाविषयी घरात बोलायची मुभा नव्हती . वसंतबद्दल पहिल्याच नजरेत तिला ओढ वाटली . तो तिला आपलासा वाटला . त्याचा चेहरा तिच्या मनात न सांगता अलगद जावून बसला . पहिल्यांदा नजरानजर झाली तेव्हापासूनच वसंत वैखरीच्या मनात राहू लागला . घरच्या वातावरणामुळे तिला तिच्या भावना वसंतपासून लपवणे गरजेचे होते .

वैखरी : " ये आई तू आतूच्या मुलाविषयी बाबांजवळ गोष्ट काढनं गं त्यांना काही माहिती असेल तर आपण शोधूयाना आतूच्या मुलाला ."

आई : "मूर्खपणा नको करूस . इतके वर्ष लपवलेली गोष्ट अचानक समोर आल्यास तुझ्या भविष्याची राखरांगोळी होईल ."

आतू : "हो वैखरी . वहिनीचं बरोबर आहे. तसंही माझा मुलगा नेमका कोणत्या व कुठल्या अनाथालयात आहे हे तुझ्या आजोबांनाच ठाऊक होतं . अनाथालयाचं नाव माहित असल्याशिवाय शोधणं सोपं नाही . माझं लग्न झालं हे आपल्या घरच्यांशिवाय समाजात कुणालाच ठाऊक नाही . समाजाच्या नजरेत मी अद्यापही अविवाहित आहे . माझं असं अविवाहित असणंही घरच्यांना डोकंदुखी ठरलं . खूप सहन करावं लागलं सगळ्यांना . समाजाच्या कित्येक प्रश्नांना तोंड देत जगणं माझ्यामुळं कुटुंबीयांच्या नशीबी आलं . आता पुन्हा तो सर्वाना त्रासदायक ठरणारा अध्याय न वाचलेला बरा . ही गोष्ट तू इथेच विसरावी अशी माझी इच्छा आहे."

वैखरी : "पण आतू ? असं कसं विसरेल मी . तुला प्रेमात धोका मिळाला तरी तू का त्या प्रेमाला कवटाळून एकटी राहिलीस .
लग्न का नाही केलसं .बालपणापासूनचं तुम्हा दोघांमधलं नातं . प्रेम इतक्या सहज संपलं ?."

आतू : संपलं म्हणता येणार नाही . आजही मी त्या प्रेमच्या प्रेमाच्या आठवणींना उराशी घेवून जगत

आहे . प्रेमचं प्रेम खरं नसेल . माझं तर खरं होतं . हदयापासून केलेलं . प्रेमात प्रेमनी धोका दिल्यावर कोणत्या तरी कविने कवितेत मांडलेले विचार खरे वाटले…..
प्रेम म्हणजे काही दगडावरची रेघ नसते…
पाण्यावर पसरलेल्या आगीसारखी ती अत्यंत क्षणभंगूर अशी गोष्ट असते…. अशा आशयाची कविता वाचली त्यावेळी ते कवि मला चुकीचे वाटले होते . प्रेमनी मला धोका दिल्यावर त्यांचेच विचार सत्य होते हे कळालं ; म्हणूनच तुला मुलांशी मैत्री करू नकोस आम्ही सांगत असतो .
खरं प्रेम मिळणं सोपं नाही गं जगात . आयुष्यभर साथ देणारं प्रेम मिळालं तर बरं नाहीतर केवळं श्वास उरतात त्यात जगणं नसतं .


आतू तुला कसं सांगू प्रेम ठरवून केल्या जात नाही ते कसं केव्हा कुणाशी होईल सांगता येत नाही . नाही केली मुलांशी मैत्री तरी ते प्रेम माझ्यापर्यंत पोहचलं . क्षणात अचानक मन कसं हरवलं कळालचं नाही . खूप प्रेम करतं गं हे मन वसंतवर पण कधी त्याला दाखवलं नाही . तुझा अनुभव ऐकूण माझं प्रेम मनातच राहिल अव्यक्त हे निश्चित . … वैखरी मनाशीच पुटपुटली…

क्रमशः

वैखरी ज्या वसंतवर प्रेम करते तो आतूचा मुलगा असेल का ? चेहर्‍यातील साधर्म्य केवळ योगायोग असेल ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा…

वैखरी एक प्रेमकथा भाग -१३

धन्यवाद !

©® ऍड. निता प्रफुल्ल कचवे ..
टिम- अमरावती .

🎭 Series Post

View all