वैखरी एक प्रेमकथा भाग-१३

A Lovestory Of A Girl


वैखरी एक प्रेमकथा भाग-१३
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .

पूर्वांध : वैखरीला आतूच्या मुलांबाबत
कळलं .ऐकलेल्या वर्णनावरून तिचा अंदाज खरा ठरतोय की वसंत आतूचाच मुलगा आहे असं वैखरीला वाटायला लागलं वसंत वैखरीचं पहिलं वहिलं प्रेम ज्यात ती आकंठ बुडाली परंतु त्याची कल्पना तिच्याशिवाय कुणालाच नाही .

पुढे वाचा भाग -१३

वैखरी जी पहिल्या नजरेतच वसंतच्या प्रेमात पडली पण घरच्या वातावरणामुळे ती तिच्या भावना जगापासून लपवतं होती . वसंतच्या व आतूच्या चेहर्‍यातील साधर्म्य कुठेतरी तिला प्रश्नांच्या डोहात बुडवायचं ती त्यात गटांगळ्या खायची पण आज कुठेतरी थांग लागेल असा आशेचा किरण तिला दिसला . पहिल्या भेटीतच वसंत विषयी तिला ओढ वाटली . आज तिला वसंत अगदी आपलासा वाटायला लागला. तिचचं मनं तिच्याशी बोलायला लागलं . एक मन म्हणायचं सांगून टाक एकदाचं मनीचं गुपीत वसंत भेटल्यावर …. दुसरं मन म्हणायचं न सांगता वसंतनी माझ्या मनीचं गुज जाणलं तर किती छान !
वसंतचा विचार करता करता जागेपणीच ती स्वप्न पाहू लागली….
स्वप्नात वसंतसोबत गीत गाण्यात दंग झाली मनी असलेलं स्वप्नात बघू लागली…..

F : न सांगताच समजून घे जरा….
मनी सजलाय रे तुझाच चेहरा…
सांगू कशी मी हे तुला ?
सांग साजना तू हे मला…. ॥ धृ ॥

F : कशी अचानक नजरेला नजर भिडली
मी माझी न आता रे उरली
थेट हदयात बाण नजरेचा लागला….
सांगू कशी मी हे तुला ?
सांग साजना तू हे मला… ।१।
न सांगताच समजून घे जरा….
मनी सजलाय रे तुझाच चेहरा…

F : झोपही डोळ्यांची आज रे हरवली..
तुझ्या आठवात रात आज काढली
तुझ्या गोष्टीत जीव रमू लागला….
सांगू कशी मी हे तुला ?
सांग साजना तू हे मला…. I२।
न सांगताच समजून घे जरा…
मनी सजलाय रे तुझाच चेहरा….

F : तुझ्या प्रेमात मी पुरती रंगली
नशा प्रेमाची तुलाही का रे चढली ?
गोड वेदना होतात रे हदयाला…
सांगू कशी मी हे तुला ?
सांग साजना तू हे मला… ।३।
न सांगताच समजून घे जरा…
मनी सजलाय रे तुझाच चेहरा…

M : पहिल्या नजरेत मनं माझं चोरले
तुझ्या प्रितीत मन माझे रंगले
तुझा चेहरा मी अंतरात कोरला…
मी सांगतो सजनी आज तुला
तुझ्याशिवाय काही सूचेना मला… ।४।
न सांगताच समजून घे जरा
मनी सजलाय गं तुझाच चेहरा….

F: न सांगताच समजून घे जरा
मनी सजलाय रे तुझाच चेहरा…

"वसंत इतकं प्रेम करतो माझ्यावर ? " वैखरी मनाशीच बोलत होती…. तेवढ्यात घरकाम करणाऱ्या आशाकाकू आल्या…

आशाकाकू : " काय हो वैखरीताई, तुमची तब्येत बिब्येत बरी हाय नव्हं ?".

वैखरी तशीच स्वप्नातून जागी झाली . आशाकाकूला बघून दचकली….

वैखरी : "आशाकाकू तुम्ही ? "
आशाकाकू : "हो म्याचं . काय झालं असं दचकायला ?".

"बरं झालं आशाकाकू होत्या . आई किंवा आतू अशी अचानक रुममध्ये आली असती तर कठीण होतं वैखरी तुझं….", मनाशीच वैखरी बोलू लागली.

आशाकाकू : "मनाशीच काय बोलताय
वैखरीताई ? बरं हाय नाव्ह तुमासनी".

वैखरी : " काकू मी एकदम बरी आहे . आई आतूजवळ काही बोलू नका उगीच हालून पाळण्यात घालतील ."

आशाकाकू : "तुमच्या काळजीपोटी सांगणार होते म्या मालकीण बाईला पन आता तुमी म्हनता तर नायी बोलनार ".

वैखरी : " थॅक्यू काकू ."

आशाकाकू : " वलकम वैखरीताई ".

वैखरी हसून म्हणाली , आशाकाकू\" वलकम \" नाही \"वेलकम\" . कितीदा सांगीतले तरी आठवण नाही राहत तुम्हाला म्हणा बघू "वेलकम".

आशाकाकू : "हो बापा येते ना मले . वे ss ल कम . बराबर ना ? ".

वैखरी : "हो जमलं ." आशाकाकू कोणाच्याही रुममध्ये जायच्या आधी नॉक करायचं .

आशाकाकू : "काय ते नाक वाक . ध्यानात नाही येत . तुमच्या खोलीत लहानपनापासून तसंच नाक न करता याची सवय झाली नव्हं
ताई . पुढच्या खेपीनं करनं नाक ."

वैखरी : "तसं नाही काकू इतरांच्या रूमबाबत बोलले मी . माझ्या रुममध्ये नॉक न करता आल्या तरी चालेल ."

आशाकाकू : "चांगली सवय हाय ना नाक
करनं .मी करत जाईन नाक ."

वैखरी मनोमन हसतं म्हणाली," बरं काकू करत जा नाक".

वैखरीच्या मनात वसंतशिवाय दुसरा विचार नव्हता . तिला एकच चुटपूट लागली होती . वसंत आतूचा मुलगा आहे की नाही हे कसं निश्चित करावं . ह्याविषयी स्वराशी बोलावं का? असा प्रश्न ती मनाला करत होती त्यावेळी तिला उत्तर मिळायचं स्वराला सांगीतले तर आतू बद्दल आजवर घरच्यांनी लपवलेलं सत्य उघडं होईल त्यामुळे याबाबत कुणाकडे बोलावं ती गोंधळलेली होती . आतूजवळ बोललं तर आतू जाणून घ्यायला उताविळ होईल भावूक होईल घरातील वातावरण विस्कळित होईल . अशा विचारानी वैखरी अस्वस्थ होती . काय करावं तिला कळतं नव्हतं . शेवटी तिनी मनाशीच निर्णय घेतला ह्याचे उत्तर काळावर सोडावं वेळ आली की होईल सर्व ठीक .
"ज्या प्रश्नाचं उत्तर माणसाकडे नसते ते उत्तर काळ देत असतो फक्त संयम हवा ", हे आजीचे वाक्य वैखरीला आठवले आणि तिनी तसेच करायचे ठरवले .

आतू : "वैखरी कॉलेजला जायचं नाही का आज ? असून तयार नाही झालीस"

वैखरी : " जायचं आहे ना . पटकन तयार होते आशाकाकूला माझा टिफीन भरायला सांगतेस का आतू ?".

आतू : "बरं बरं हो पटकन तयार ".

वैखरी : " आतू , आई येते गं मी सहावाजेपर्यंत.."

आतू : " का ? कॉलेज तर त्यापूर्वीच सुटतं
ना ?".

वैखरी : "अगं आता दोन महिन्यानी फायनल सेमीस्टरची फायनल परिक्षा आहे ना . स्वराकडे जाईल अभ्यास करायला तिच्याकडच्या नोट्ससुधा घ्यायच्या आहेत मला . येते ok
Bye ."

आतू : " बरं ये बाय बाय…. ".

*****************************************

स्वरा : " हॅलो वैखरी ! काय गं बरं नाही का?"
वैखरी : "नाही गं बरं आहे का विचारतेस ?"
स्वरा : "अस्वस्थ वाटतेस"
वैखेरी : " नाही गं , सेमीस्टर जवळ आलय, अभ्यास काहीच नाही . चिंता वाटते थोड़ी "
स्वरा : " चिंता कसली ? प्रत्येक सेमीस्टरला टॉपर आहेस याही सेमीस्टरला रिझल्ट चांगलाच येणार . त्यात प्लेसमेन्टची चिंता आपल्याला नाही . घरचीच कंपनी सांभाळायची आहे . तू तर एकटीच मालकीण आहेस गडगंज संपत्तीची ."

वैखरी :" कसं सांगू स्वराला मनात किती गोंधळ सुरु आहे. आतूच्या बाबत संपूर्ण जाणून घेतल्या पासून चित्त थार्‍यावर नाही ."
स्वरा : " कुठे हरवल्या मॅड्म ? काय विचार करतेस ?".
वैखरी : " काही नाही गं . आज कॉलेज संपल्यावर तुझ्याकडे येते मला नोट्स हव्यात".
स्वरा : "अरे वा! चल . आईला पण आनंद होईल ."

कॉलेज सुटल्यावर वैखरी स्वरासोबत घरी जाते.
काही हस्तलिखित तर काही छापील अशा वसंताच्या नोट्स असतात त्या घेते अन् घरी जायला निघते….. त्यानोट्स हातात घेतल्यावर वसंत समीप असल्याचा आभास तिला होते..

क्रमशः

वैखरी तिच्या मनातलं गुपीत आतूला सांगेल का? जाणून घ्यायला नक्की वाचा…
वैखरी एक प्रेमकथा भाग -१४

कथा आवडल्यास लाईक, कमेंन्ट जरूर करा .
न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद!

©® ऍड. निता प्रफुल्ल कचवे
टीम - अमरावती .