Login

वैदेही भाग ४

कथा आधुनिक सीतेची

वैदेही भाग ४




"सौमित्र तू घरी जा.. मी आता नाही येत तुझ्यासोबत.."

" का?"

"ताई नसताना मी तिथे कधी गेले नाहीये.. आणि मी दादांना काही चुकून बोलले तर तुला चालणार नाही. मी आमच्या घरी जाते.."

" तू त्या घरी येणारच नाहीस का?"

" येईन ना.. पण आता लगेच नाही.."

" उर्मिला, मला असे वाटते आहे कि तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस.."

"तुझ्या भावासारखा वागणार आहेस का मग? पण मी उर्मिला आहे वैदेही नाही.."

" हो, माहित आहे.. जा बाई तू.. मी सोडू का तुला?"

" नको, जाईन मी.. आणि येईन सुद्धा.."

सौमित्र जाताच उर्मिलाने वैदेहीला फोन लावला..

" ताई, मी आले आहे.. तुझा पत्ता पाठव मी पोचते.."

उर्मिला वैदेहीने पाठवलेल्या पत्त्यावर गेली.. तो एका निसर्गाश्रमाचा होता.. 

"ताई, तू इथे राहते आहेस?"

" हो.. छान आहे ना?" दोघी वैदेहीच्या खोलीबाहेर असलेल्या गवतावर बसून बोलत होत्या.."

" पण इथे का? आपल्या घरी का नाही?"

" मला ना थोडे दिवस नाहीसे व्हायचे आहे या जगापासून.. साधे देवळात जाण्याचा प्रसंग काय घडला, माझे पूर्ण आयुष्य बदलून गेला. लोकांची खरी ओळख झाली त्या निमित्ताने.."

"असे का बोलतेस? आम्ही नाही का तुझ्यासोबत?"

"तुम्ही तिघे आणि हे पोटातले दोन आहेत म्हणून तर आहे मी इथे.. नाहीतर बघ ना.. कोण कुठला तो रजत.. तो काही तरी बोलला, त्याने माझे फोटो व्हायरल केले म्हणून मला निघून जाण्याचा सल्ला देणारा माझा नवरा कुठे आणि मी कोण आहे, इथे का राहते आहे हे माहित असूनही मला मदत करणारी हि लोक कुठे?"

" ताई, पोटातले दोन म्हणजे?"

" जुळे आहेत.." वैदेही लाजत म्हणाली..

" माय गॉड.. मस्तच.. आधीच सांगते.. एकाला मी सांभाळणार दुसर्‍याला तू.."

" अग. आधी जन्माला तर येऊ दे त्यांना.. जन्माच्या आधीच त्यांचे हे धिंडवडे.. नंतर काय लिहिले आहे कोणाला माहित?"

" असा का विचार करतेस? होईल सगळे नीट. आम्ही आहोत ग.."

" नशीबाचे हसायला येते ग मला.. बघना मी एक अनाथ असूनसुद्धा मला आईबाबांनी खूप प्रेम दिले.. आणि माझी हि पिल्ले.. बाबा असूनही त्याच्याशिवाय.."

उर्मिलाने काहीच न बोलता फक्त वैदेहीच्या खांद्यावर हात ठेवला.. कितीतरी वेळ वैदेही उर्मिलाच्या कुशीत शिरून रडत होती..

" मी निघू? परत येते मी.."

" तिथे कोणालाही सांगू नकोस.. मी इथे आहे म्हणून.. "

" हो.. ताई अजूनही विचार कर.. एखाद्या बंगल्यात राहतेस का?"

" नाही अग.. इथे सुरक्षित आहे मी.. चोवीस तास डॉक्टर आहेत, जेवण चांगले आहे.. बंगल्यात एकटे राहण्यापेक्षा इथे बरे वाटते.."

" जशी तुझी इच्छा.. मी इथेच आहे.. तुझी डिलिव्हरी होईपर्यंत तरी नक्कीच.. स्वतःला अजिबात एकटी समजू नकोस.."

उर्मिला तिथून निघून गेली.. ती एकटी समजू नको म्हणाली तरी एकटेपण वैदेहीला जाणवायला लागले.. तिला आठवत होते, अबोल राघव कसा तिच्या मागेमागे करायचा.. काहीच न सांगता तिला हवी हवीशी वाटणारी गोष्ट आणून द्यायचा.. आणि आत्ता जेव्हा खरेच मला काही हवे नको बघायची गरज आहे.. तेव्हा तो इथे नाहीये.. वैदेहीला हुंदका फुटला..



" राघव, उठ ना.. ऑफिसला जायला उशीर होईल नाहीतर.. नंतर चिडचिड केलीस तर बघ हं.."

"उम्मम"

" मी तीन पर्यंत मोजेन.. आणि नाही उठलास तर हे पाणी अंगावर ओतेन.."

" नाही वैदेही......."

राघव जोरात ओरडला.. त्याचा आवाज ऐकून बाहेर नाश्ता करत असलेले सौमित्र , उर्मिला आणि कौसल्याताई आत आल्या..

" वैदेही? कुठे गेली वैदेही?" तिघांनी एकमेकांकडे पाहिले.. कौसल्याताई राघवच्या जवळ जात म्हणाल्या..

" वैदेही नाही आली.. तुला भास झाला असेल.."

" आई, आता होती. मला उठवत होती.. मी नाही म्हणालो म्हणून अंगावर पाणी ओतले बघ तिने.." राघवने आजूबाजूला पाहिले.. पाण्याचा टिपूसही नव्हता.. तो भानावर आला.. "मी आवरतो.. ऑफिसला जायला उशीर होईल. " राघव तिथून निघून गेला.. त्याची अवस्था बघून कौसल्याताईंना रडू आले.. "बिचारे माझे पोर.. कसे झाले आहे?"

" तरी ते पोर स्वतःच्या घरात आपल्या माणसांसोबत आहे. माझ्या ताईसारखे नाही.. ती बिचारी जेव्हा स्वतःचे कुटुंब सोबत हवे, आजूबाजूला काळजी घेणारे कोणी हवे तेव्हा कुठे एकटी राहते आहे देवाला माहित.." उर्मिला रागाचा कटाक्ष सौमित्रकडे टाकत म्हणाली.. ते वाक्य बाथरूममधल्या राघवच्या कानावर पडलेच.. वैदेहीच्या आठवणीने त्याला अपराधी वाटतच होते.. या वाक्यानी त्यात भर पडली.. त्याने वैदेहीला शोधायचा प्रयत्न केला पण ती जणू नाहिशी झाली होती.. गाडीचे लोकेशन सांगून तिचा मोबाईल बंदच झाला होता.. तिचे बँक अकाउंट ती वापरत नव्हती.. त्याने एक टीम नेमली होती. पण तिचा पत्ता लागत नव्हता.. तिने जीवाचे काही बरेवाईट तर केले नसेल ना? या विचाराने त्याचा जीव सतत टांगणीला लागलेला होता.. एक चूक आणि सगळेच विस्कटून गेले होते.. तिने जर काही चुकीचे पाऊल उचलले असेल तर माझी बाळे? राघवला त्या दृष्टीने विचारच करवत नव्हता.. कधी नव्हे ते तो देवाला विनवत होता , माझी वैदेही सुखरूप असूदे....

 तिकडे वैदेही एकाबाजूला गर्भसंस्काराची पुस्तके वाचत होती तर दुसरीकडे नवीन नावाने तिच्या बाबांच्या व्यवसायात लक्ष देत होती.. तिच्या आईबाबांना उर्मिलाने सगळे सांगितले होते. वैदेहीच्या हट्टामुळेच ते इथे आले नव्हते.. पण रोज तिच्याशी दोघेही बोलत होते. उर्मिला कोणालाही न सांगता वैदेहीला भेटत होती.. तिला हवे नको ते बघत होती.. वैदेहीचे डोहाळजेवण तिने आश्रमातल्या बायकांच्या मदतीने केले.. ज्या समारंभासाठी शेकडो माणसे जमायला हवी त्यासाठी फक्त वीसपंचवीस लोक.. उर्मिला जरी दाखवत नसली तरी तिला या गोष्टी खटकत होत्या.. 

" ताई, तू खूप दिवसात जिजूंबद्दल काही विचारले नाहीस.."

" काय विचारायचे? बायको नकोच होती ना डोळ्यासमोर त्याला? झाला असेल आता शांत.."

" नाही ताई.. जिजू आजकाल ऑफिसमध्ये फक्त जातात.. काम सगळे सौमित्र बघतो.. ते फक्त सह्या करतात.. घरी आले कि तुमच्या बेडरूममध्ये जाऊन बसतात.. काही खात नाहीत.. कोणाशी जास्त बोलत नाहीत.. तू कर ना विचार परत.. तू म्हणालीस म्हणून मी अजून कोणालाच तुझ्याबद्दल नाही सांगितले.. पण आता त्यांची अवस्था पण नाही बघवत मला.. " हे ऐकून वैदेहीचा चेहरा बदललेला उर्मिलाला वाटला.. "सध्या नको.. मी काही बटण नाही ऑन ऑफ व्हायला.. मला पण भावना आहेत ना.. तो जा म्हणाला कि मी जायचे तो ये म्हणाला कि यायचे.. उर्मिला बाबांनी आपल्याला स्वाभिमानही शिकवला आहे ग.. "

" जाऊ दे.. नको तो विषय.. तू आराम कर.. मी निघू आता?"

" आज थांबतेस का ग? जीव खूप घाबरा झाला आहे..आणि हे दोघे बहुतेक पोटात फुटबॉल खेळत आहेत.. केवढ्या जोरात लाथा मारत आहेत बघना.. आई ग.. उर्मिला प्लीज डॉक्टरला बोलव ना.. खूप दुखतय ग.."

 बोलता बोलता वैदेही बेशुद्ध झाली.. उर्मिलाला काय करावे ते सुचेना.. वैदेही बेशुद्ध असताना, राघव, राघव असेच बोलत होती.. मन घट्ट करून उर्मिलाने फोन लावला..

"सौमित्र.."

वैदेहीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते.. बाळांची हालचाल मंदावली होती.. त्यात सततच्या टेन्शनमुळे वैदेही थोडी अशक्त झाली होती.. सीझर करण्यासाठी उर्मिलाला फॉर्म भरायचा होता.. आणि समोरून तिला सौमित्र, राघव आणि कौसल्याताईंना घेऊन येताना दिसला.. तिच्या जीवात जीव आला.. राघवने विचारले..

" वैदेही कुठे आहे?"

" डॉक्टर ऑपरेशनची तयारी करत आहेत.. बाळांची हालचाल कमी झाली आहे.. आणि ताई परत बेशुद्ध पडली आहे.. मला खूप टेन्शन आले आहे.." उर्मिला सौमित्रच्या गळ्यात पडून रडायला लागली..

" काही नाही होणार तिला.." कौसल्याताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या..

" फॉर्म भरला का?" नर्सने विचारले..

" मला वैदेहीला भेटू द्या ना प्लीज", राघवने तिला विनंती केली..

राघवचे नाव ऐकून डॉक्टरांनी परवानगी दिली.. जवळजवळ सहा महिन्यांनी राघव वैदेहीला बघत होता.. ती बेशुद्ध असताना सुद्धा तोंडाने राघव असे पुटपुटत होती.. राघवने पुढे जाऊन तिचा हात हातात धरला..

" वैदेही.." तिने हलकेसे डोळे उघडले.. तिच्या चेहर्‍यावर हास्य आले. पण लगेच तिने डोळे मिटले.. वैदेहीला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्याची तयारी झाली..

" डॉक्टर, प्लीज मला तिच्यासोबत राहू दे. तिला माझी गरज आहे आता." राघव त्यांना विनवत होता..

" आम्ही अशी परवानगी नाही देऊ शकत.." तोपर्यंत सौमित्रने फोन करून हॉस्पिटलच्या ऑथॉरिटीजकडून खास परवानगी मिळवली होती.. पूर्ण वेळ राघव वैदेहीचा हात हातात धरून होता.. आणि ट्यँह ट्यँह आवाज आला..

" अभिनंदन.. एक गोड परी आणि एक राजकुमार आला आहे.. " डॉक्टरांनी राघवचे अभिनंदन केले.. त्या दोन बाळांना पाहून राघवच्या डोळ्यातले आनंदाश्रू थांबत नव्हते.. त्याने वैदेहीच्या कपाळावर ओठ टेकले.. अचानक परिपूर्ण झाल्यासारखे वाटले त्याला.. 

" डॉक्टर, हि कधी शुद्धीत येईल?"

" त्यांच्यावर बहुतेक खूप ताण होता.. औषधे दिली आहेत. त्यांना थोडा वेळ द्या."

" मी या बाळांना बाहेर नेऊ?"

" थांबा.. नर्स येईल.."

ते दोन गोंडस जीव पाहून सगळे खुश झाले.. वैदेही शुद्धीत आली आहे हे नर्स सांगायला आली.. राघव थोडा घाबरतच आत गेला.. 

" तू? का आलास तू इथे?" वैदेही ओरडली..

" ताई प्लीज चिडू नकोस.. मी बाळांसाठी बोलवले जिजूंना.." उर्मिला म्हणाली..

" कुठे आहेत माझी बाळे? काय झाले होते त्यांना?"

" बाळे येतील आता.. पण त्यांनी मला थोडे टेन्शन दिले.. मी एकटी घाबरले म्हणून या सगळ्यांना बोलावले.. प्लीज.." उर्मिला मस्का मारत होती..

"आणि तसेही तूच राघवचा जप करत होतीस.." वैदेही लाजली हे बघून उर्मिला राघवला खुणावून बाहेर पडली..




पुढील भागात पाहू बाळांसाठी तरी राघव आणि वैदेही एकत्र येतात का?



सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

0

🎭 Series Post

View all